Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

विरोधकांचा पोरकटपणा !

संपादकीय 
     ‘संसदेचे कामकाज सुरळीतपणे चालवण्यासाठी तुम्हाला लोकांनी निवडून दिले आहे. नियतीने आपल्यावर सोपवलेले दायित्व योग्य प्रकारे पार पाडा’, असा खरमरीत सल्ला राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी सर्वच खासदारांना दिला आहे. नोटाबंदीच्या सूत्रावरून प्रतिदिन गोंधळात स्थगित होणार्‍या संसदीय कामकाजासंदर्भात राष्ट्रपती मुखर्जी यांनी चिंतायुक्त स्वरात नाराजी व्यक्त केली. संसदेच्या हिवाळी अधिवेशनात यंदा ८ डिसेंबरपर्यंत लोकसभेत १४ टक्के, तर राज्यसभेत २0 टक्के इतके अत्यल्प कामकाज झाले आहे. लालकृष्ण अडवाणी यांनीही संसदीय कार्यमंत्री अनंतकुमार यांना खडसवले आहे.
हे नेहमीचेच !
     विरोधकांनी संसदेचे कामकाज चालू न देण्याची ही काही पहिली वेळ नाही. क्षुल्लक कारणावरून कोणताही अभ्यास न करता सभापतींसमोर येऊन घोषणाबाजी करणे, एकमेकांवर कागदाचे बोळे फेकणे, प्रचंड गोंधळ करून समोरच्याला बोलूही न देणे असे प्रकार प्रत्येक अधिवेशनातच होत असतात. याच्या परिणामस्वरूप प्रतिदिन दोन-चार घंट्यांसाठी कामकाज स्थगित करणे, त्याच गोंधळात महत्त्वाची विधेयके कोणतीही चर्चा न करता संमत करणे, हेही आता नित्याचेच झाले आहे. संसदेचे कामकाज चालू देण्यासाठी कधी सत्ताधार्‍यांनी, कधी सभापतींनी विरोधकांना आवाहन करणे, कधी मिनतवार्‍या करणे, तर कधी कडक शब्दांत सुनावणे, हेही जनतेने अनुभवले आहे. या सर्व प्रकारांचे थेट प्रक्षेपणही जनता पहात असते आणि त्यातून आपली लोकशाही अद्याप किती अपरिपक्व आणि बाल्यावस्थेत आहे, याचे पुनःपुन्हा प्रत्यंतर येत असते. 
राष्ट्रहितार्थ प्रयत्नांना पाठिंबा देण्याचे विरोधकांचे धैर्य का नाही ? 
      सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात व्यक्तीगत राजकीय वैमनस्यातून एक मोठी दरी पडलेली असते. त्यातून विरोधासाठी विरोध करण्याचे राजकारण चालू आहे. त्यामुळेच सत्ताधार्‍यांनी घेतलेला निर्णय, भले तो जनतेच्या हिताचा असो, त्याला विरोध करायचा आणि त्यावर ऊठसूठ टीका करायची, याचा अर्थ विरोधी पक्षात बसणे, असा घेतला जात आहे. सत्ताधार्‍यांनी राष्ट्रहितार्थ घेतलेल्या निर्णयाचे मोठ्या मनाने स्वागत करण्याइतके औदार्य आजच्या विरोधी पक्षात नाही. त्यांची विचारसरणीही तेवढी व्यापक नाही. त्यामुळेच सरकारने काळ्या पैशाच्या विरोधात उघडलेल्या आघाडीविषयी वास्तविक विरोधी पक्षाने अत्यंत पोरकटपणे विरोध चालवला आहे. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी ‘नोटाबंदीचा निर्णय हा धाडसी नसून मूर्खपणाचा आहे’, असे म्हटले आहे. सारा देश काळ्या पैशाच्या विरोधात एकवटला असतांना काँग्रेस आणि कंपू त्याला इतका पोटतिडकीने विरोध करत आहेत की, एखाद्याच्या मनात संशय निर्माण व्हावा. गेली ६० वर्षे स्वतः सत्तेत असतांना काळा पैसा, आतंकवाद, भ्रष्टाचार यांना प्रोत्साहन दिले. आता त्यासंदर्भात काही प्रमाणात का असेना सकारात्मक प्रयत्न होत आहेत, तर त्याला खिळ घालण्याचे कार्य काँग्रेसकडून होत आहे.
थोडे परिपक्व व्हा !
      देशासमोरील समस्या सोडवण्यासाठी लोकप्रतिनिधींना आपण निवडून दिलेले असते. त्याच समस्यांविषयी उहापोह करण्यासाठी आणि विकासाची पुढील दिशा ठरवण्यासाठी संसद, विधीमंडळ यांची अधिवेशने होत असतात. त्या ठिकाणी जाऊन स्वपक्षाच्या राजकीय स्वार्थासाठी कामकाज थांबवणे अन् सर्वांचा अमूल्य वेळ वाया घालवणे, ही लोकशाहीची प्रतारणाच आहे. अशा लोकप्रतिनिधींना त्यांच्या मतदारांनी तर खडसवायला हवेच; मात्र लोकप्रतिनिधींच्या वर्तनासंदर्भात काही आचारसंहिता घालणेही आवश्यक बनले आहे. अनेक आमदार-खासदार त्यांच्या कारकीर्दीत अगदी नगण्य वेळा सभागृहात उपस्थित असतात. अनेक लोकप्रतिनिधी सभागृहात उपस्थित राहून अक्षरही बोलत नाहीत, खासदार सुप्रिया सुळे तेथे एकमेकांच्या साड्यांविषयी चर्चा करतात, तर राहुल गांधी यांच्यासारखे काही विशेष प्रतिनिधी संसदेत चक्क झोपा काढतात. या सर्व प्रकारावरून या सर्वांना जनतेच्या प्रश्‍नांविषयी संवेदनशीलता किती आहे, तेच लक्षात येते. 
      एका निष्कर्षानुसार संसदेच्या एका मिनिटासाठी २९ सहस्र रुपये ते १ लाख ८३ सहस्र रुपये खर्च येतो. एका घंट्यासाठी साधारण १७ लाख ४० सहस्र ते १ कोटी १० लाख रुपये खर्च येतो. एका दिवसात १ कोटी ९१ लाख ते १२ कोटी रुपये खर्च येतो. असे असतांना कोणतीही चर्चा करतांना सभागृह वारंवार स्थगित करावे लागणे, हे राष्ट्रद्रोहासमान आहे. आज राष्ट्रपतींनी विरोधकांना केलेली सूचना ही शाळकरी मुलांना त्यांचे शिक्षक ज्याप्रमाणे सूचना करतात, त्याप्रमाणे आहे. ज्यांच्यावर देश चालवण्याचे दायित्व आहे, त्यांना ‘नियतीने आपल्यावर सोपवलेले दायित्व योग्य प्रकारे पार पाडा’, असे सांगण्याची वेळ का आली ? ज्यांना असे वारंवार सांगावे लागते, ते देश चालवण्यास पात्र आहेत का, याचाही विचार होणे आवश्यक आहे. आता लोकशाहीच्या नावाखाली जो पोरखेळ चालू आहे, तो थांबवण्याच्या दृष्टीने आता प्रयत्न व्हावे ! संसद या लोकशाहीच्या मानबिंदूचा सन्मान राखला जावा, हीच अपेक्षा आहे !
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn