Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

नोटाबंदीनंतर भविष्यातील सर्व व्यवहार रोकडविरहित होणार ! - मुख्यमंत्री

विधानसभा आणि विधान परिषद येथे मुख्यमंत्र्यांचे सडेतोड उत्तर !

       नागपूर, ७ डिसेंबर (वार्ता.) - नोटाबंदीनंतर भविष्यातील सर्व व्यवहार रोकडविरहित अथवा कॅशलेस होत असतांना शासकीय खातेसुद्धा लवकरच ही पद्धत अवलंबणार आहे. सामाजिक बांधकाम विभाग असो वा इतर कुठलाही विभाग असो, जेव्हा कंत्राट दिले जाईल, तेव्हा त्याचे व्यवहार हे सर्व ‘ऑनलाईन’ होतील. इतकेच नव्हे, तर त्यांनादेखील पुढील व्यवहार ऑनलाईन करूनच मजुरांची देयके चुकती करावी लागतील. अर्थसंकल्पही गोपनीय ठेवला जातो. तसे नोटाबंदीचे निर्णय उघडपणे घ्यायचे नसतात. नोटाबंदीसाठी २ वर्षांपासून सिद्धता चालू होती, अशी माहिती मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी ७ डिसेंबरला विधानसभेत दिली. 
      विधानसभा विरोधकांनी उपस्थित केलेल्या स्थगन प्रस्तावावर चर्चा केल्यानंतर यावर ते विधानसभेत बोलत होते. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी हे अर्थतज्ज्ञ नसले, तरी ते भूमीवर काम करणारे नेते आहेत, असे सांगून मुख्यमंत्र्यांनी श्री. मोदी यांनी घेतलेल्या निर्णयाचे समर्थन केले. देशातील काळा पैसा बाहेर आला पाहिजे, अशी सभागृहातील प्रत्येक व्यक्तीची अपेक्षा आहे. भ्रष्टाचार अल्प झाला पाहिजे; मात्र त्याची जननी ‘काळा पैसा’ आहे, असेही ते म्हणाले.
      मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस म्हणाले...
१. ‘आम्ही नोटबंदी करणार आहे. तुम्ही कामाला लागावे’, असे सांगून होत नाही. ८५ टक्के चलन पालटत आहोत, तरीही लोकांनी निर्णय मान्य केला. 
२. लोक मागे उभे राहिले, याचा अर्थ त्रास झाला तरी चालेल; मात्र काळा पैसा बाहेर आला पाहिजे, ही जनतेची भूमिका आहे. श्री. मोदी यांनी २३ कोटी जनधन खाती उघडली. पहिली दोन वर्षे सिद्धता केली. डिजिटल इंडियाची सिद्धता केली. ‘कॅशलेस बँकिंग’ मात्र पहिल्याच दिवशी सांगितले होते.
३. २०११-१२ वर्षात चलनात शंभरच्या १५ लक्ष, पाचशेच्या ४२ लक्ष नोटा, तर एक सहस्रच्या २२ लक्ष खोट्या नोटा होत्या. फोर्ब्स, वॉशिंग्टन पोस्ट, वर्ल्ड बँकेकडूनही पंतप्रधान मोदी यांच्या निर्णयाचे कौतुक करून त्यांनी पाठिंबा दिला आहे. 
४. या देशात काळ्या पैशाच्या विरोधात इतक्या ताकदीने पहिल्यांदा कायदा सिद्ध झाला. त्यासाठी धैर्य लागते. नोटाबंदीनंतर तिसर्‍या दिवशी बाजार समित्यांमध्ये ‘कॅशलेस व्यवहार’ चालू झाले. एकही तक्रार नाही. रब्बी पिकांच्या पेरण्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत १०९ टक्क्यांनी वाढ झाली.
५. खाजगी रुग्णालयांना धनादेश घेण्याची विनंती केली. धनादेश नाकारला (बाऊन्स), तर आम्ही १० सहस्र रुपयांचा निधी देऊन नेहमीपेक्षा अधिक पैसे ग्रामीण भागात पाठवले.
६. एक दिवसाआड बैठक घेतली. राज्यात अधिकाधिक पैसे येण्यासाठी प्रयत्न केले. ‘महावॉलेट’ सिद्ध करणार आहे; मात्र देशातील लहानसहान लोकांचीही अडचण सहन करण्याची सिद्धता आहे. पुणे येथे नोटाबंदीच्या समर्थनार्थ मोर्चा निघाला. सहकारी अधिकोषामध्ये व्यवहार नाही म्हणून अडचणी वाढल्या आहेत. हे व्यवहार चालू झाले पाहिजेत, अशी आमची भूमिका आहे. 
७. नोटाबंदीनंतर काश्मीरमध्ये दगडफेक झाली नाही. गेल्या मासात सर्वात अधिक नक्षलवाद्यांनी समर्पण केले आहे. इतर राज्यातील निवडणुका डोळ्यासमोर ठेवून निर्णय घेतलेला नाही. 
     शेतकर्‍यांची जी हानी झाली त्याची निश्‍चिती करून सरकार त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहील, असे आश्‍वासन मुख्यमंत्र्यांनी विधान परिषदेत दिले.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn