Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

ख्रिस्ती मिशनर्‍यांवर होणारी आक्रमणे, हिंदुत्वनिष्ठांवर येणारा दोष आणि त्या संदर्भातील उपाययोजना !

अधिवक्ता
श्री. संजीव पुनाळेकर
     काही मासांपूर्वी ख्रिस्ती मिशनर्‍यांवर होणार्‍या आक्रमणांच्या संख्येत वाढ झाली आहे, अशी ओरड माध्यमांतून होत होती. मिशनर्‍यांवर आक्रमणे झाली किंवा तत्सम प्रकार घडले की, त्याचा दोष हिंदुत्वनिष्ठांना दिला जातो. या संदर्भात हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांनी काही धोरण अवलंबणे आवश्यक वाटते. त्याविषयीची माहिती येथे दिली आहे.
१. मिशनर्‍यांवरील आक्रमणाचा हिंदुत्वनिष्ठांवर
येणारा दोष, त्याची कारणे आणि परिणाम !
१ अ. माध्यमांचा दुटप्पीपणा : भाजप सत्तेत आल्यामुळे मिशनर्‍यांवरील आक्रमणांचे प्रमाण वाढले आहे, अशी ओरड माध्यमांतून चालू असते. हिंदुत्वनिष्ठांवरील आक्रमणाचे मात्र साधे वृत्तदेखील दाखवले जात नाही. त्याच माध्यमांना मिशनर्‍यांचा फार पुळका असतो. त्याची कारणे किती अर्थपूर्ण असतात, हे सर्वच जण जाणतात. त्याचे उदाहरण म्हणजे मदर तेरेसा यांना संत घोषित करण्याच्या चर्चा झडत असतांना दैनिक लोकसत्ताने असंतांचे संत, अशा मथळ्याखाली एक लेख प्रसिद्ध केला होता. हा लेख मदर तेरेसा आणि चर्च संस्था यांचे बेगडी स्वरूप जनतेसमोर मांडणारा होता. या लेखाला साहजिकच असहिष्णु आणि मूलतत्त्ववादी ख्रिस्त्यांनी आक्षेप घेतला. दुसर्‍या दिवशी दैनिक लोकसत्ताच्या संपादकांकडून क्षमा मागण्यात आली. हे कशामुळे घडले ? हे नंतर सर्वांनाच समजले. मिशनर्‍यांवर न झालेल्या आक्रमणांविषयीही बेंबीच्या देठापासून ओरडण्याची सवय माध्यमांना का लागली ? हे त्यावरून लक्षात येते.
१ आ. राजकीय दबावाला बळी पडून हिंदूंवर तातडीने कारवाई करणारे पोलीस ! : अशा प्रकारे मिशनर्‍यांवर खरी किंवा खोटी आक्रमणे झाली, तरी त्याचा दोष हिंदुत्वनिष्ठ संघटना किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांच्या माथी मारला जातो. ख्रिस्ती संघटना आणि त्यांचे कार्यकर्ते पोलीस ठाण्याला घेराव घालतात. धर्मांतर हा आमचा अधिकार आहे, असे ठासून सांगतात. पोलिसांवर राजकीय दबाव आणला जातो. मिशनर्‍यांना मारहाण करणारे खरे हिंदुत्वनिष्ठ असोत कि खोटे; पण पोलीसही तातडीने कारवाई करतांना दिसतात. 
१ इ. हिंदूंच्या देवतांची निंदानालस्ती करणार्‍या मिशनर्‍यांनाच होते मारहाण ! : मिशनर्‍यांना हिंदुत्वनिष्ठांनी मारहाण केल्याच्या काही घटना घडल्या आहेत. त्याच्या मुळाशी खरेतर माध्यमांनी जायला हवे. एरवी कन्हैय्या कुमारला भारतविरोधी घोषणा का द्याव्या लागल्या ? याचा विचार व्हायला हवा, असे म्हणणारी माध्यमे मिशनर्‍यांना मारहाण झाल्यावर मात्र त्यांना मारहाण का होते ? याच्या मुळाशी जायला हवे, असे म्हणत नाहीत. भारतात धर्मांतरे घडवणे हा आमचा अधिकारच असल्याचे सांगत जे मिशनरी हिंदूंच्या देवतांची निंदानालस्ती करत फिरत असतात, त्या मिशनर्‍यांना अशा प्रसंगांना सामोरे जावे लागले आहे. 
१ ई. मारहाणीचे भय दाखवून मिशनर्‍यांकडे पैसे मागणार्‍या कथित हिंदु कार्यकर्त्यांची मध्यमवर्गियांच्या मनातील प्रतिमा खालावणे ! : काही घटनांत धर्मांतराच्या कारवाया रोखतांना पकडल्या गेलेल्या कार्यकर्त्यांना सोडवण्यासाठी हातची कामे टाकून काही अधिवक्ता धावूनही गेले. त्यांनी कार्यकर्त्यांसाठी विनामूल्य न्यायालयीन लढा देऊन त्यांना सोडवले; मात्र काही कालावधीनंतर असे लक्षात आले की, अशा प्रकारे मारहाणीचे भय दाखवून या कथित कार्यकर्त्यांनी मिशनर्‍यांकडे पैसे मागण्याचे उद्योग चालू केले. ज्या वकिलांनी अशा कथित कार्यकर्त्यांसाठी विनामूल्य काम केले होते, त्यांचा एका अर्थी विश्‍वासघातच केल्यासारखे हे होते. अशा प्रकरणांची पुढे चर्चाही होत राहिल्याने मध्यमवर्गियांच्या मनातील खर्‍या हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांविषयीची प्रतिमा खालावते. 
२. हिंदुत्वनिष्ठांनी अवलंबायचे धोरण !
      धर्मांतरे घडवतांना हिंदूंच्या देवतांची नालस्ती करणे, हेच प्रमुख सूत्र असते. ते सहन न झाल्याने काही हिंदुत्वनिष्ठांनी मिशनर्‍यांना त्यांची जागा दाखवली असेलही; पण हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांनी एक सूत्र यापुढे धोरण म्हणून लक्षात घ्यायला हवे, असे वाटते. या देशात धर्मांतराचे स्वातंत्र्य कोणालाही नाही. धर्मप्रसाराचे स्वातंत्र्य आहे; मात्र त्यासाठी जाहीर सभा किंवा कार्यक्रम (आवश्यक अनुमती आदी प्रक्रिया पूर्ण करून) घेतले जाऊ शकतात. हे मिशनरी जर धर्मप्रसारासाठी दारोदार फिरत असतील, तर त्यावर आततायीपणाने त्यांना अडवणे, धमकावणे, मारणे, हे उपाय नाहीत. त्यावर पुढीलप्रमाणे उपाय केले जाऊ शकतात. 
२ अ. ठराव करून सेल्समन, भिकारी आणि हिंदु नसलेल्या धर्मप्रसारकांना प्रवेशबंदी असल्याचे फलक लावणे ! : गल्ल्या, आळ्या, सोसायटी, गावे पूर्णत: हिंदु वस्तीची किंवा हिंदुबहुल आहेत, अशा ठिकाणी बैठका किंवा ग्रामसभांमध्ये ठराव संमत करून सेल्समन, भिकारी आणि हिंदु नसलेले धर्मप्रसारक यांना प्रवेशबंदी, अशा प्रकारचे फलकच प्रवेशद्वारावर लावता येतील. अशा प्रकारचा फलक असतांनाही हिंदु नसलेले धर्मप्रसारक तेथे घुसल्यास तातडीने पोलिसांना बोलावून त्यांना पोलिसांच्या हवाली करायला हवे. तसेच त्याच वेळी त्यांच्यावर अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यासाठी पोलिसांना भाग पाडायला हवे. त्याचप्रमाणे ज्या ज्या गावांत, नगरांत, सोसायट्यांमध्ये अशा प्रकारचे ठराव करून फलक लावले जातील, त्यांनी स्थानिक पोलिसांना तसे पत्र द्यावे आणि त्या पत्राची एक प्रत त्या ठिकाणचे पोलीस आयुक्त किंवा अधीक्षक यांना पाठवावी. तसेच अशा प्रकारे ठराव करून आणि तसे फलक लावूनही आमच्या नगरात किंवा गावात किंवा सोसायटीत हिंदु नसलेले धर्मप्रचारक बलपूर्वक घुसत असतील, तर आम्ही आपल्याकडे तक्रार करू आणि त्यावर आपण तातडीने कारवाई करावी, असेही पत्र स्थानिक पोलीस ठाणे, तसेच पोलीस आयुक्त किंवा पोलीस अधीक्षक यांना द्यावे.
२ आ. हिंदुबहुल भागातील हिंदूंना त्यांच्या अधिकारांविषयी जागृत करणे ! : हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांनी त्यांच्या परिसरात ख्रिस्ती धर्मप्रसारकांच्या भूलथापांविषयी आणि ते पसरवत असलेल्या अंधश्रद्धांविषयी जनजागृती करायला हवी. त्याप्रमाणे नागरिक म्हणून हिंदूंना त्यांच्या अधिकारांची माहिती करून द्यायला हवी. अशा ठिकाणी हिंदु नसलेले धर्मप्रसारक हिंदूंच्या घरात घुसत असतील, तर त्याला थांबवून प्रथम त्या कुटुंबातील हिंदूंची अनुमती घेण्याविषयी सांगायला हवे. दुपारच्या वेळेत बहुदा घरात केवळ गृहिणीच असतात. अशा वेळी हिंदु नसलेले धर्मप्रसारक हिंदूंच्या घरी येत असतील, तर त्यांना एकदा तसे न करण्याविषयी समज देऊन पुढील वेळी थेट पोलिसांकडे तक्रार करता येते. त्या वेळी अशा बलपूर्वक घुसणार्‍या हिंदु नसलेल्या धर्मप्रसारकांवर अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यासाठी पोलिसांना भाग पाडले पाहिजे.
२ इ. हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांनी कायद्याचा अभ्यास करणे आवश्यक ! : हिंदु नसलेले धर्मप्रसारक धर्मांतर हा त्यांचा अधिकार असल्याचे सांगत असतील, तर त्यांना कायदेशीर मार्गाने त्यांची जागा दाखवण्यासाठी आवश्यक असा कायद्याचा आणि धर्माचाही अभ्यास प्रत्येक हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्याचा असायला हवा. 
२ ई. हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांनी त्यांच्या चांगल्या आचरणाने आणि वर्तनाने सामान्यांचा अन् प्रतिष्ठितांचाही विश्‍वास संपादन करायला हवा ! : हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांनी त्यांच्या चांगल्या आचरणाने आणि सततच्या चांगल्या वागण्याने त्यांच्या परिसरातील सामान्य हिंदू, तसेच परिसरातील डॉक्टर, अधिवक्ते (वकील), अभियंते (इंजिनिअर), धार्मिक प्रतिनिधी, हिंदुत्वनिष्ठ राजकीय पुढारी यांचा विश्‍वास संपादन करायला हवा. एखाद्या हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यास पोलिसांनी पकडले, तर परिसरातील प्रतिष्ठित डॉक्टर, वकील, इंजिनिअर, धार्मिक पुढारी इत्यादी स्वत:हून त्या कार्यकर्त्याला सोडवण्यासाठी किंवा त्याचे चांगले वर्तन अन् आचरण यांविषयी पोलिसांना सांगायला पोलीस ठाण्यात यायला हवेत. अशा कार्यकर्त्यासाठी धर्मसेवा म्हणून न्यायालयीन काम करतांना अधिवक्त्यांनाही समाधान मिळायला हवे.
२ उ. पगारी नोकर असलेल्या धर्मप्रसारकांना धडा शिकवून न थांबता त्यांच्या पोशिंद्यांना कायद्याच्या आणि धर्माच्या मार्गाने धडा शिकवणे आवश्यक ! : कित्येक ठिकाणी असे लक्षात आले आहे की, दारोदार फिरून धर्मप्रसार करणारे हिंदु नसलेले धर्मप्रसारक हे पगारी नोकर असतात. पगार हाच त्यांचा धर्म असतो. त्यामुळे हे पगारी धर्मप्रसारक पैशासाठी हिंदु धर्माची आणि हिंदूंच्या देवतांची नालस्ती करत असतात. अशा वेळी हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांनी संयम ढळू न देता कायदेशीर मार्गाने त्यांना धडा शिकवायला हवा. अशा पगारी नोकरांना कायदेशीर मार्गाने धडा शिकवणे इतकेच पुरेसे नाही. त्यांचे जगभरात मोठे जाळे आहे आणि त्यासाठी विदेशातून त्यांना पैसाही मोठ्या प्रमाणात येतो. त्यामुळे हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांच्या मारहाणीला किंवा कायदेशीर लढाईला घाबरून असे पगारी धर्मप्रसारक पळून गेले, तरी नवीन पगारी धर्मप्रसारक निर्माण होत असतात. त्यामुळे पगारी धर्मप्रसारकांच्या बरोबरच त्यांच्या पोशिंद्यांना कायद्याच्या मार्गाने आणि धर्माच्या मार्गाने धडा शिकवणे आवश्यक आहे.
२ ऊ. हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांनी स्वत:तील धर्मज्ञान आणि धर्माभिमान जागृत करून इतरांमध्येही ते जागृत करून वाढवणे, हाच धर्मांतराच्या दुष्टचक्राला भेदण्याचा एकमेव उपाय ! : कायद्याच्या मार्गाने, म्हणजे लेखात वर उल्लेख केल्याप्रमाणे कायद्याविषयी आणि हिंदूंना नागरिक म्हणून त्यांच्या असलेल्या अधिकारांविषयी जागृत करणे आवश्यक आहे. तसेच धर्माच्या मार्गाने म्हणजे हिंदूंमध्ये धर्माविषयी अभिमान जागृत करणे आवश्यक आहे. ज्या हिंदुला स्वत:च्या धर्माचे ज्ञान असते, त्याच्यात धर्माविषयी अभिमानही निर्माण होतो. मग कुठल्याही परिस्थितीत तो हिंदु धर्मांतर करणार नाही. थोडक्यात हिंदु नसलेल्या धर्मप्रसारकांनी चालवलेल्या धर्मांतराचे आणि त्यासाठी निर्माण केलेल्या विशाल जाळ्याचे मूळ हिंदूंच्या धर्मशिक्षणाच्या अभावात आहे. हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांनी स्वत:तील धर्मज्ञान आणि धर्माभिमान जागृत करून इतरांमध्येही तो जागृत करून वाढवणे, हाच धर्मांतराच्या दुष्टचक्राला भेदण्याचा एकमेव उपाय आहे.
- अधिवक्ता श्री. संजीव पुनाळेकर, सचिव, हिंदु विधीज्ञ परिषद
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn