Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

जीवनाच्या खडतर वाटचालीत देवावरील अतूट श्रद्धेच्या बळावर स्थिर रहाणार्‍या ६३ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती सुलभा मालखरेआजी (वय ७५ वर्षे) !

श्रीमती सुलभा मालखरे
    ‘देवद आश्रमाजवळील सनातन संकुलात रहाणार्‍या श्रीमती सुलभा मालखरेआजींचा १०.१२.२०१६ या दिवशी वाढदिवस आहे. त्यानिमित्त सहसाधिकांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये देत आहोत. 
श्रीमती सुलभा मालखरेआजींना वाढदिवसानिमित्त 
सनातन परिवाराच्या वतीने नमस्कार !
     तत्त्वनिष्ठता ज्यांच्या उरी तोच जगाला उद्धरी ।
     अशी आमची माय माऊली क्षणभरी उभा देव त्यांच्या दारी ।
वरील ओळी ज्यांना लागू होतात, अशा आमच्या धीरोदात्त श्रीमती सुलभा मालखरेआजी !
१. मोठ्या बहिणीप्रमाणे वागवणे 
     ‘आजींचा आणि माझा गेल्या ३ वर्षांपासून जवळून परिचय आहे. मी मालखरेआजींच्या घरी रहाते. आजी म्हणजे ‘माझी मोठी बहीणच आहे’, असे मला वाटते. आजींच्या काही कामात मी त्यांना बारीक सारीक साहाय्य करू लागले. मग आजीही मोकळेपणाने बोलायला लागल्या.
२. कठीण प्रसंगातही दृढ श्रद्धेमुळे धीराने रहाणे 
     आजींची आर्थिक स्थिती चांगली आहे. आजींना त्यांच्या घरी प्रेम मिळाले नाही. आजींवर मायेची पाखर घालणारे कुणी नव्हते. त्यामुळे त्यांनी एकट्याने रहाण्याचा निर्णय घेतला. यातच त्यांना कर्करोग झाला. त्यांच्या विवाहित मुलीने त्यांचे आजारपण काढले. आजी त्यातून बर्‍या झाल्या. त्यांची एकुलती एक विवाहित मुलगी आणि एक नात यांचे अपघाती निधन झाले. त्यानंतर त्यांना कुणाचा आधार नव्हता. घरची माणसे असून नसल्यासारखी होती. आजी एकट्या रहात असल्याने कुणाचे साहाय्य नव्हते. तेव्हा त्यांनी जे सोसले, त्याला तोड नाही. त्यांची ‘देवच यातून तारणार’, अशी दृढ श्रद्धा आहे. आजी देवाला आळवत घरातील प्रत्येक काम करतात. त्यांच्यात शरणागत भाव आहे. 
३. सत्संगाची आवड 
     आजी संभाजीनगर येथे रहात असतांना त्यांच्या मैत्रिणीने त्यांना सनातनच्या सत्संगात जायला सांगितले. सत्संगात जायला लागल्यावर आजींचे मन हळूहळू स्थिर होऊ लागले. 
४. साधकांमध्ये रहायला आवडणे 
    मैत्रिणीने आजींना सनातनच्या देवद आश्रमात जाण्यासाठी सुचवले. तेव्हा आजींनी सनातन संकुलात सदनिका घेतली आणि गेल्या 
३ वर्षांपासून आजी तेथे रहात आहेत. ‘मला साधकांचा आधार आहे’, असे त्या नेहमी म्हणतात.’
- सौ. जयमाला पडवळ
५. प्रेमभाव 
अ. ‘आजींनी एखादा पदार्थ केला, तर तो पदार्थ आम्हाला देऊन मगच त्या खातात.’ - सौ. जयमाला पडवळ आणि सौ. सुलोचना जाधवआजी
आ. ‘मी मालखरेआजींकडे गेल्या ५ मासांपासून रहात आहे. आजींनी एकदा न्हाण्यासाठी (केस धुवायला) शिकेकाई पावडर घेतली. आजी मला म्हणाल्या, ‘‘तुम्हाला हवी असेल, तर तुम्हीही घ्या. हा आश्रम आहे, मीही आश्रमातच रहाते.’’ 
इ. आम्ही तिघी मनाने एकरूप झालो आहोत. ‘मी स्वतःच्याच घरी रहात आहे’, असे मला वाटते.’
- सौ. सुलोचना जाधवआजी आणि सौ. जयमाला पडवळ
६. नियोजनबद्ध वागणे 
      ‘आजी घरी एकट्याच रहात असल्या, तरी त्यांचा दिवसभराचा कार्यक्रम नियोजनबद्ध असतो. आजी पहाटे ५ वाजता उठतात आणि रात्री १० वाजता झोपतात. आजींची उठल्यापासूनच दैनंदिन कामे चालू होतात. सप्ताहात करावयाच्या कामांचे नियोजन दाराच्या मागे लावलेले असते. त्यात त्यांचा अल्पाहार आणि महाप्रसाद यांचा मेनू, आधुनिक वैद्यांकडे जाण्याचे नियोजन, बाजारातून आणावयाचे साहित्य आदी गोष्टी अंतर्भूत असतात. 
७. काटकसरी 
     आजी स्वयंपाकघरातील कोणतीही वस्तू व्यर्थ दवडत नाहीत. एखादी गोष्ट आवश्यकतेपेक्षा अधिक झाल्यास आजी ती गोष्ट आश्रमात आणून देतात. आजी एकटीला पुरेल एवढाच स्वयंपाक बनवतात. 
८. नीटनेटकेपणा 
     आजींचे राहणीमान साधे आणि नीटनेटके आहे. आजी घरातील प्रत्येक वस्तू नीटनेटकी ठेवतात. त्यांचा स्वयंपाकाचा ओटा आरशासारखा चकचकीत असतो. घरी आणलेले पदार्थ व्यवस्थित बांधून जागच्या जागी ठेवलेले असतात. आजी हे सर्व साधना म्हणून आणि ‘आश्रमातच रहात आहोत’, असा भाव ठेवून करतात. 
९. ऐकण्याची वृत्ती 
     त्या आजारपणात किंवा अन्य वेळीही आधुनिक वैद्यांच्या समादेशाविना कोणतेही फळ किंवा पदार्थ खात नाहीत. 
१०. तत्त्वनिष्ठता 
    आजींकडे आम्ही २ साधिका रहातो. त्या कधीही आमच्या मागून बोलत नाहीत. त्या आमच्या चुका तत्त्वनिष्ठतेने सांगतात. त्या साधनेव्यतिरिक्त अन्य विषयांवर चर्चा करत नाहीत. 
११. अल्प अहं 
     आजींना त्यांच्याकडे असलेल्या संपत्तीचा मुळीच अहं नाही. त्या म्हणतात, ‘‘देवानेच मला दिले आहे. त्याचे त्यालाच देऊन टाकायचे.’’ आजींनी स्वत:ची चारचाकी गाडी आश्रमाला अर्पण केली.
१२. व्यष्टी साधनेचे गांभीर्य 
    आजी सतत देवाच्या अनुसंधानात असतात. आजी मनाविरुद्ध झाले की, रागावतात; मात्र त्यांना त्याची लगेच जाणीव होते. नंतर त्या स्वत:कडे त्रयस्थपणे बघतात. आम्ही दिवसभर आश्रमात असतो. त्यांना त्यांच्या चुका सांगणारे जवळ कुणी नसते. तेव्हा त्या स्वत:लाच उद्देशून म्हणतात, ‘सुलभा, तू फार शेफारलीस. तुझा हात धरणारा इथे कुणी नाही; म्हणून तू स्वत:च्या मनाप्रमाणे सर्व करतेस. श्रीकृष्णाला ते आवडणार नाही आणि तुझी साधनाही होणार नाही.’ आम्ही संध्याकाळी एकत्र जमल्यावर आजी त्यांच्याकडून झालेल्या चुका प्रामाणिकपणे सांगतात. त्या ‘एखाद्या प्रसंगात कसे वागायला हवे’, हेही नम्रपणे विचारतात. आजींना स्वत:ला पालटण्याची तळमळ आहे. त्या स्वतःचे स्वभावदोष विचारून त्यावर स्वयंसूचनाही घेतात. 
१३. समष्टी साधना 
    आजी मध्यंतरी सेवा करायच्या. आता आजींकडून वयोमानानुसार सेवा होत नाही. समष्टीसाठी नामजप करणे, हीच त्यांची सेवा आहे. 
१४. कृतज्ञताभाव 
    वर्ष २०१५ च्या गुरुपौर्णिमेला आजींचा आध्यात्मिक स्तर ६१ प्रतिशत झाला. तेव्हा त्या साश्रू नयनांनी म्हणाल्या, ‘‘देवा, तुझ्यासाठी मी काहीच केले नाही; पण तू मात्र माझ्यासाठी पुष्कळ केलेस. माझे प्रयत्न नसतांना तू एवढे यश माझ्या पदरी घातलेस.’’ 
१५. श्रीकृष्णाने धरले छत्रचामर ।
 किती करावे, किती करावे, किती सोसावे, किती सोसावे ।
धडपडता धडपडता देवाच्या चरणी लीन व्हावे ॥ १ ॥ 

हरवले जरी मायेचे छत्र श्रीकृष्णाने धरले छत्रचामर ।
आज सोनियाचा दिन उगवला एक जीव बंधमुक्त झाला ॥ २ ॥

होऊ कशी उतराई देवा, जन्म-मरणाचा फेरा सुटला ।
आता मागणे एकची देवा, चरणी ठेव तू तिजला ॥ २ ॥

- सौ. जयमाला पडवळ 
    ‘आजींना दीर्घायुष्य लाभो’, हीच ईश्‍वरचरणी प्रार्थना आहे आणि अशा या सर्वगुणसंपन्न आजी लवकरच संतपदी विराजमान होवोत’, हीच त्या दयाघन वैकुंठेश्‍वराकडे प्रार्थना !’
- सौ. जयमाला पडवळ आणि सौ. सुलोचना जाधवआजी, सनातन आश्रम, देवद, पनवेल. 
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn