Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

... अन्यथा शिवसेना पद्धतीने सनबर्न बंद पाडू ! - शिवसैनिकांचा निर्धार

सनबर्नविरोधी बैठकीत उपस्थित शिवसैनिक
     पुणे, २१ डिसेंबर (वार्ता.) - धर्म आणि संस्कृती यांच्या रक्षणासाठी शिवसेना नेहमी कटिबद्ध आहे. सनबर्न फेस्टिव्हल भारतीय युवकांना व्यसनाधीन बनवणारा आहे. हा फेस्टिव्हल आम्ही कदापि होऊ देणार नाही. हा फेस्टिव्हल होत असेल, तर शिवसेना पद्धतीने हा कार्यक्रम बंद पाडू, अशी खणखणीत चेतावणी शिवसैनिकांनी दिली आहे. सनबर्न फेस्टिव्हलच्या विरोधात २० डिसेंबर या दिवशी लोणीकंद येथील शिवसेनेच्या कार्यालयात शिवसेना कार्यकारिणीच्या पदाधिकार्‍यांची जिल्हास्तरीय बैठक पार पडली. त्या वेळी हा निर्धार व्यक्त करण्यात आला. हा फेस्टिव्हल महाराष्ट्रातच नाही, तर भारतात अन्यत्र कुठेही होऊ देणार नाही, अशी चेतावणी शिवसेनेचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष श्री. संदीप अप्पा भोंडवे यांनी दिली. या प्रसंगी ७३ शिवसैनिक, तसेच हिंदु जनजागृती समितीचे श्री. दीपक आगवणे, श्री. पराग गोखले उपस्थित होते.      जिल्हाधिकार्‍यांनी सनबर्न फेस्टिव्हलच्या आयोजकांसमवेत स्थानिक ग्रामस्थ, तसेच हिंदुत्वनिष्ठ यांची २५ डिसेंबर या दिवशी खुली चर्चा आयोजित करावी. कार्यक्रमाच्या अनुमतीपत्राविषयी याप्रसंगी चर्चा ठेवावी अन्यथा २६ डिसेंबर या दिवशी शिवसेना त्यांच्या पद्धतीने उत्तर देईल, असे श्री. संदीप अप्पा भोंडवे यांनी सांगितले.
सनबर्न रहित करण्यासाठी सातारा येथे प्रशासनाला निवेदन
     सातारा, २१ डिसेंबर (वार्ता.) - पुण्यात होणार्‍या सनबर्न फेस्टिव्हलसाठी शेतकर्‍यांची भूमी बलपूर्वक कह्यात घेऊन त्याचे अवैध उत्खनन करण्यात आले आहे. यासाठी शेतकर्‍यांना धमक्याही देण्यात आल्या आहेत. या सर्वच गोष्टींचा विचार करून सनबर्न फेस्टिव्हलची अनुमती नाकारण्यात यावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीप्रणीत महिला शाखा रणरागिणीच्या वतीने पुण्याचे पालकमंत्री श्री. गिरीष बापट यांच्या नावाने निवेदन देऊन करण्यात आली. उपजिल्हाधिकारी श्री. अविनाश शिंदे यांनी हे निवेदन स्वीकारले.
    या वेळी रणरागिणी शाखेच्या सौ. रूपा महाडिक, सौ. विजया कणसे, सौ. विद्या कदम आदी उपस्थित होत्या.
या निवेदनात म्हटले आहे की,
१. महाराष्ट्र राज्य पर्यटन महामंडळाने पर्यटनवाढीच्या नावाखाली याला अनुमती दिली असली, तरी हा महोत्सव पुण्याच्या सुसंस्कृतपणाला गालबोट लावणारा ठरेल.
२. महोत्सव जेथे होत आहे, तेथे आयोजकांकडून स्थानिक शेतकर्‍यांची भूमी विनाअनुमती वापरणे, अवैध उत्खनन करणे, या संदर्भात तक्रार करणार्‍यांना स्थानिकांना धमक्या देणे, असे गंभीर प्रकारही होत आहेत.
३. या स्थळी अनधिकृतरित्या गौण खनिजाचे उत्खनन आणि वृक्षतोड याविषयीची तक्रार शेतकर्‍यांनी केली आहे. उत्खननामुळे कोट्यवधींचा निधी बुडत असून पर्यावरणाची हानी होत आहे. या प्रकरणी तलाठ्यांनी केलेल्या पंचनाम्यात अंदाजे ६६५ ब्रास मुरुम अवैधरित्या काढल्याचे निष्पन्न झाले आहे.
सनबर्नला विरोध !
     शिवसेनेचे मंत्री, खासदार, आमदार, भाजपचे आमदार, विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना, ग्रामस्थ आदींकडून सनबर्न फेस्टीव्हलला विरोध करण्यात येत आहे.
आम्ही सांप्रदायिकही या कार्यक्रमाला प्रखर
विरोध करू ! - हिंदुभूषण ह.भ.प. श्याममहाराज राठोड
    सनबर्न फेस्टिव्हल हा कार्यक्रम महाराष्ट्रातील संतपरंपरा, संतविचार आणि संस्कृती यांचा अपमान करणारा आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलीदानाचाही हा अपमान आहे. अशा पावन भूमीत व्यसने आणि व्यभिचार करण्यासाठी हा कार्यक्रम होणे, हेदेखील अवमानजनक आहे. शासनाने जनसामान्यांचा आदर म्हणून हा कार्यक्रम होऊ देऊ नये. हा कार्यक्रम सरकारने हस्तक्षेप करून तो रहित करावा. संस्कृतीरक्षक आणि हिंदुत्वनिष्ठ यांनी या कार्यक्रमाला विरोध करणे आवश्यक आहे. आम्ही सांप्रदायिकही या कार्यक्रमाला प्रखर विरोध करू. यामधून कायदा-सुव्यवस्थेला जर कोणती हानी होणार असेल, तर त्याला सरकार उत्तरदायी राहील. असे कार्यक्रम हे देशविरोधी आणि धर्मविरोधी आहेत. त्यातून तरुणांना व्यसनाधीनतेकडे नेऊन त्यांचे जीवन उद्ध्वस्त करण्यात येत आहे. वैदिक सनातन धर्म, महापुरुष आणि संत यांच्या भूमीत आम्ही हे कार्यक्रम होऊ देणार नाही. - हिंदुभूषण ह.भ.प. श्याममहाराज राठोड
सनबर्न फेस्टिव्हलला कोणतीही अनुमती दिली
जाऊ नये ! - आमदार प्रा. (सौ.) मेधा कुलकर्णी, भाजप
     संस्कृती मोडकळीस येईल, अशा कोणत्याही महोत्सवाचे आयोजन केले जाऊ नये. प्रगतीच्या नावाखाली असे उत्सव आपल्या येथे आयोजित का केले जात आहेत, हा प्रश्‍न आहे. या महोत्सवाच्या नावाखाली अवैध गोष्टी आणि दुर्दैवी घटना घडणे, हा पूर्वेतिहास आहे. त्यामुळे त्याला कोणतीही अनुमती दिली जाऊ नये. सर्व प्रकारच्या महोत्सवात सभ्यता पाळली गेली पाहिजे. अवैध आणि अश्‍लील गोष्टी महोत्सवात होणार नाहीत, या अटी-शर्तींवर आयोजकांकडून हमी घ्यायला हवी.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn