Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

काश्मीरमधील आतंकवाद !

संपादकीय
     जम्मू-काश्मीर राज्यात वर्ष २०१५ च्या एप्रिल मासात आतंकवादी खालिद वानी सैन्याबरोबरच्या चकमकीत ठार झाला. राज्यात चालू असलेला हिंसाचार ज्या बुरहान वानी नावाच्या आतंकवाद्याच्या मृत्यूनंतर चालू झाला, तो बुरहान वानी खालिद वानी याचा भाऊ असल्याचे सांगण्यात येते. खालिद वानी याच्या कुटुंबियांना राज्यातील पीडीपी-भाजप आघाडीचे सरकार आता हानीभरपाई देणार आहे. अशा प्रकारचे साहाय्य आतंकवाद्यांच्या आक्रमणात किंवा चकमकीत हुतात्मा झालेल्या सैनिकांना आणि मृत्यू पावलेल्या नागरिकांना दिले जाते. असे असतांना जम्मू-काश्मीरच्या सरकारने या नियमाचे उल्लंघन का केले, ते त्यांनाच ठाऊक ! अर्थात् चाणाक्ष जनतेच्या कल्पनाशक्तीला आव्हान देण्याचे धाडस कोणी करील, असे वाटत नाही. त्यामुळे सत्ता सांभाळायचे जम्मू-काश्मीर सरकारचे धोरणच येथे अधोरेखित होते, हे उघड गुपित येथे स्पष्ट होते. आतंकवादी खालिद वानी मारला गेल्यावर त्याचा भाऊ बुरहान वानी काश्मीरमधील फुटीरता चळवळीत दाखल झाला. तोही मारला गेल्यावर राज्यात प्रचंड मोठ्या प्रमाणात हिंसाचार माजला. शंभरच्या वर माणसे मारली गेली, सार्वजनिक आणि खाजगी संपत्तीची हानी झाली, ती वेगळीच. हिंसाचार माजवणारे काश्मिरी नागरिक म्हणजे खालिद आणि बुरहान वानी यांचे समर्थक ! अशा लोकांनी सरकारला जेरीस आणणे, हा लोकराज्य व्यवस्थेतील अतिरेक होय. खालिद वानी आतंकवादी होता. सैनिकी कारवाईत तो मारला गेला. सैनिकांच्या दृष्टीने ते राष्ट्रीय कर्तव्य झाले. जे लोक या गोष्टीला विरोध करतात, ते देशद्रोही ! त्यांची मनधरणी कशासाठी करायचे ? तसे करण्यात काहीतरी स्वार्थ साधण्याचा विचार दिसत नाही का ? मध्यंतरी भोपाळ मध्यवर्ती कारागृहातून सीमीचे आठ आतंकवादी पळून जात असतांना मारले गेले. त्यांच्यापैकी पाच जणांचे ज्या ठिकाणी दफन करण्यात आले होते, तेथे ते शहीद (हुतात्मा) असल्याचा फलक कुणीतरी लावला होता. म्हणजे गुन्हेगारांना ‘शहीद’ ठरवणारे काही महाभाग या देशात आहेत. अर्थात् जिल्हाधिकार्‍यांच्या हस्तक्षेपामुळे हे फलक काढून टाकण्यात आले, हा भाग वेगळा. खालिदच्या संदर्भातही जवळपास तसेच नाटक रचले गेल्याचे दिसते अन्यथा नाहक बळी पडणार्‍या नागरिकांना जे साहाय्य दिले जाते, तेच साहाय्य खालिद याच्या कुटुंबियांना दिले गेले नसते. देशाशीच दोन हात करण्याचे धोरण आयुष्यभर अंगीकारायचे आणि शेवटी देशालाच अपराधी ठरवून जेवढे लाटता येईल, तेवढे लाटायचे, ही कोणती मानसिकता ? देशवासियांप्रती ही कृतघ्नता नव्हे का ? 
सरकारचे दुहेरी धोरण ! 
     खालिद वानी आणि बुरहान वानी हे दोघे भाऊ होते. दोघांची वृत्ती एकच. काश्मीर सारख्या संवेदनशील राज्याच्या राजकारणात सक्रीय सहभाग, ही एखाद्याला विचारप्रवण करण्यासारखी गोष्ट आहे. अगोदरच हिंसाचाराने पिचलेले काश्मीर हे राज्य. त्या हिंसाचाराला अंत नाही. खालिद आणि बुरहान यांच्यासारखे तरुण युवक हिंसाचाराची परंपरा चालू ठेवत आहेत. या राज्यातील हिंसाचार म्हणजे देशाशीच आरंभलेले युद्ध. ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी ! भारतीय भूमीवर रहायचे आणि भारतीय सरकारशीच युद्ध छेडायचे. कोणत्याच देशात असे चालतांना दिसत नाही आणि कुठे असलेच तर ते सयुक्तिक नाही. कृतघ्नपणा करण्याचे साहस सुसंस्कृत माणसे करत नाहीत. काश्मीरमधील परिस्थितीविषयी विचार केला असता, या सगळ्या गोष्टी डोळ्यांसमोर येतात. हिंसाचाराने काहीही साध्य होत नसते आणि झालेच तर ते दीर्घकाल टिकणारे नसते. काश्मीर राज्यात मागील ४ मासांपासून कोणतेच व्यवहार चालू नाहीत. बँका बंद, दुकाने बंद, सरकारी कार्यालये बंद, माणसांची वर्दळ नाही, सगळे लक्ष फुटीरतावाद्यांच्या हिंसाचाराकडे केंद्रित झालेले ! पंतप्रधानांनी स्वच्छ भारत चळवळ चालू केली आहे. ‘स्मार्ट सीटी’ ही त्यांची दुसरी योजना आहे. देशाला जगाच्या नकाशावर झळकवण्याचा त्यांचा मनोदय आहे. काश्मीर राज्य जणू पंतप्रधानांच्या कार्यक्रमात अंतर्भूत नाही. अर्थात् देशाची प्रतिष्ठा आणि इभ्रत यांविषयी या फुटीरतावादी गिधाडांना काय कळणार ? राज्यात पीडीपी या स्थानिक पक्षाशी भाजपने युती केली आणि सत्तेत स्थान मिळवले. राज्याची सामाजिक प्रकृती भाजप या राष्ट्रीय पक्षाला ठाऊक आहे. तरीही जे काँग्रेसी राजवटीत झाले नाही, ते पीडीपी-भाजप आघाडीच्या राजवटीत घडले. आतंकवाद्याच्या कुटुंबियांना आर्थिक साहाय्य मिळाल्यामुळे भारतीय जनता अचंबित झाली आहे. केंद्र सरकारने यामागील धोरण जनतेसमोर उघड करावे, अशी मागणी केली जात आहे. राज्यातील आतंकवाद नष्ट करण्यासाठी केंद्रशासन एका बाजूने अनेक प्रकारांनी प्रयत्नशील आहे, तर दुसर्‍या बाजूने मृत्यू पावलेल्या आतंकवाद्याला सहानुभूती दाखवत आहे. शासनाच्या या दुहेरी धोरणाविषयी जनतेने समजायचे तरी काय ? काँग्रेसी राजवटीत आतंकवादी कारवायांविषयी विशेष दखल घेतली गेली नाही; त्यामुळे आतंकवाद फोफावला आणि आता मरण पावलेल्या आतंकवाद्याच्या कुटुंबियांना सरकारने आर्थिक साहाय्य देण्याचे ठरवल्याने आतंकवाद्यांना सुरक्षित वाटण्याची शक्यता आहे, म्हणजेच आतंकवाद त्याची जागा सोडायला सिद्ध नसेल.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn