Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

सहजावस्थेत राहून सतत सेवारत असणारे सनातनचे संत पू. संदीप आळशी यांच्याकडून कु. गौरी मुद्गल हिला शिकायला मिळालेली सूत्रे

पू. संदीप आळशी
१. वेळेचे महत्त्व असणे
     ‘प.पू. संदीपदादांना तुळशीच्या पानांचा रस करून देण्याची सेवा माझ्याकडे आहे. मी प्रथमच पू. संदीपदादांना तुळशीचा रस करून दिल्यावर ते म्हणाले, ‘‘चांगला केला आहेस. रस करायला किती वेळ लागला ?’’ मी त्यांना ‘‘रस करायला ३० मिनिटे लागली’’, असे सांगितल्यावर त्यांनी विचारले, ‘‘खलबत्त्यात रस करायला इतका वेळ लागतो, तर आपण तो मिक्सरमध्ये करू शकतो का ?’’ तेव्हा माझ्या लक्षात आले की, पू. दादांना वेळेचे गांभीर्य फार आहे. ‘प्रत्येक क्षणाचा परिपूर्ण लाभ कसा करून घेता येईल ? याचा ते नेहमी विचार करतात. ते वेळेचे महत्त्व जाणतात.
कु. गौरी मुद्गल
२. साधनेसंबंधी वेळोवेळी मार्गदर्शन करणे
      पू. दादा नेहमी ‘साधकांची साधना होऊन त्यांच्या सेवेेची फलनिष्पत्ती कशी वाढेल ?’, या दृष्टीने साधकांना मार्गदर्शन करतात. तसेच ते वेळोवेळी साधकांना त्यांच्या चुकाही लक्षात आणून देतात आणि साधकांनी त्यांच्या कुठल्या दोषांवर प्रयत्न करायला हवेत, हेही सांगत असतात. ते साधकांना दोषांच्या मुळापर्यंत जायला सांगून ‘कुठे कमी पडलो ? आणखी कसे प्रयत्न करायला हवेत ?’, यांविषयी मार्गदर्शन करतात.
३. इतरांचा विचार अधिक असणे
अ. एकदा एका ताईचे लग्न असल्याने मला काही सेवा होती. त्यामुळे मला तुळशीचा रस करायला जमत नव्हते; म्हणून मी तो दुसर्‍या साधकाला करायला सांगितले. तेव्हा पू. दादांनी सौ. अवनीताईकडून मला निरोप दिला, ‘तुळशीचा रस उशिरा आणला तरी चालेल.’ आपल्यामुळे इतरांना त्रास होऊ नये, याचा पू. दादा किती विचार करतात, हे माझ्या लक्षात येऊन मला त्यांच्याविषयी कृतज्ञता वाटली.
आ. एकदा मी पू. दादांना तुळशीचा रस द्यायला गेले. माझी धावपळ पाहून ते म्हणाले, ‘‘तुला दमायला होत असेल, तर तू दुसर्‍या साधकांना रस करायला सांग.’’
इ. एकदा पू. दादा म्हणाले, ‘‘उद्यापासून मला सकाळी ९ वाजता तुळशीचा रस आणलास, तरी चालेल. तुझी तेवढी झोप होईल.’’ माझी झोप पूर्ण होण्यासाठी त्यांनी मला उशिरा रस आणायला सांगितले.
४. स्वीकारण्याची स्थिती
     एकदा आम्ही प्रथमच भाज्यांचे सूप बनवले होते. ते थोडे करपले होते. पू. दादांना सूप फार आवडले. आम्ही त्यांना ‘सूप थोडेसे करपले आहे’, असे सांगितल्यावर ते म्हणाले, ‘‘असू दे.’’ आम्हाला हे सूप करायला वेळ लागला, तरी ते काहीच बोलले नाहीत.
५. देहभान विसरून सेवा करणे
अ. पू. दादा सकाळपासून रात्रीपर्यर्ंत सेवा करत असतात. ते रुग्णाईत असतांनाही सेवा करतात. मी मात्र थोडेसे काही झाले, तरी लगेच विश्रांती घेते. त्या वेळी लक्षात येते, ‘मी आणखी प्रयत्न करायला हवेत. संत नेहमी स्वीकारण्याच्या स्थितीत असतात. ते आज्ञापालन करतात. आम्हीही असेच प्रयत्न करायला हवेत.’
आ. पू. दादा भ्रमणभाषवर बोलत असतांनाही सेवा करतात. ‘ते प्रत्येक क्षणाचा सदुपयोग कसा होईल’, याकडे लक्ष देतात.
६. सतर्कता
     पू. दादांची प्राणशक्ती अल्प असल्याने ते त्यांच्या खोलीत असतात, तरीही त्यांचे सर्वत्र बारकाईने लक्ष असते.
७. साधकांचे कौतुक करणे
अ. एकदा माझी लहान बहीण अमृता पू. दादांकडे गेली होती. तिने पू. दादांना सांगितले, ‘‘गौरीताईकडे (माझ्याकडे) व्यवस्थितपणा हा गुण आहे. माझ्यात तो गुण नाही.’’ तिने पू. दादांना तिचे स्वभावदोष सांगितले. मी नंतर पू. दादांकडे गेल्यावर ते मला म्हणाले, ‘‘अमृता उद्घोषणा छान करते. बालसंस्कारवर्ग चांगला घेते.’’ पू. दादांनी आम्हाला एकमेकींचे गुण शिकायला सांगितले.
आ. १७.७.२०१६ या दिवशीच्या दैनिक सनातन प्रभातमध्ये मी सद्गुरु (सौ.) बिंदाताईंविषयी लिहिलेला लेख प्रसिद्ध झाला होता. मी पू. दादांना तुळशीचा रस द्यायला गेल्यावर ते मला म्हणाले, ‘‘छान लिहिले आहेस.’’
८. जवळीक साधणे
      पू. दादा संत असूनही इतरांना आपलेसे करतात. एकदा पू. दादा घरी जात असतांना मला म्हणाले, ‘‘मला तुझी आठवण येईल. तुझ्यासाठी गावाहून काय आणू ? तुला काय आवडते, गोड कि तिखट ?’’ त्यावर मी म्हणाले, ‘‘मलाही तुमची आठवण येईल.’’
९. अल्प अहं
अ. एकदा मी पू. दादांकडे गेल्यावर ते म्हणाले, ‘‘अवनीने मला सांगितले, ‘गौरी चांगले प्रयत्न करते.’ तू मलाही ते शिकवशील ना ?’’ यावरून त्यांची शिकण्याची वृत्ती लक्षात आली. ‘ते प्रत्येक क्षणी देवाला अपेक्षित असे करतात’, असे जाणवले.
आ. पू. दादा घरी जात असतांना मी त्यांचा निरोप घ्यायला गेले होते. तेव्हा ते सौ. अवनीताई सांगत असलेले सर्व ऐकत होते आणि त्यानुसार कृतीही करत होते.
१०. इतरांना आनंद देणे
     पू. दादा सतत देवाच्या अनुसंधानात असतात. ते स्वतः आनंदी असतात आणि इतरांनाही आनंद देतात. मला ते परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यासारखेच वाटतात.
११. कृतज्ञताभाव
      ते आश्रमात रहात असलेल्या खोलीची दुरुस्ती करून खोलीला रंग दिला आहे. ते त्यांना फार आवडले. ते मला सांगत होते, ‘‘प्रत्येक लहान गोेष्ट, उदा. सनातन पंचांग लावण्यासाठीही जागेचे नियोजन केले आहे. घरी आपण इतक्या बारकाईने विचार करत नाही. आश्रमात पुष्कळ शिकायला मिळते.’’ देव लहान गोेष्टींतूनही कसे शिकवत असतो, ते मला पू. दादांकडून शिकायला मिळते.
     ‘देवा, तुमच्या अनंत कृपेमुळे पू. दादांच्यातील अनमोल गुण शिकण्याची संधी मिळाली. त्यासाठी मी तुझ्या चरणी अनंत कोटी कृतज्ञ आहे. पूू. दादांचे गुण माझ्यात येण्यासाठी तूच माझ्याकडून तळमळीने, भावपूर्ण आणि परिपूर्ण प्रयत्न करवून घे’, अशी मी तुमच्या कोमल चरणी प्रार्थना करते.’
- कु. गौरी मुद्गल (वय १६ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (९.१०.२०१६)

धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn