Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

व्हॉट्स अ‍ॅप आणि तत्सम प्रणाली हाताळण्यात साधनेतील अमूल्य वेळ वाया घालवणारे साधक !

सध्या अनेक साधकांच्या भ्रमणभाष संचावर व्हॉट्स अ‍ॅप असल्याचे लक्षात आले आहे. या संदर्भात साधकांकडून साधनेच्या अनुषंगाने होणार्‍या अक्षम्य चुका पुढे देत आहोत.
१. स्वतःच्या मनाने साधकांचे गट बनवणे
     प्रसार अथवा आश्रम यांतील बरेच साधक व्हॉट्स अ‍ॅपवर गट (ग्रुप) बनवतात. त्यामध्ये आपले सहसाधक, परिचित साधक यांना समाविष्ट (अ‍ॅड) करतात. गट बनवण्यापूर्वी असे करणे योग्य आहे का ?, असे जिल्हासेवकांना विचारून घेत नाहीत.
     आश्रम आणि प्रसार यांतील ज्या साधकांनी आतापर्यंत असे गट सिद्ध केले आहेत, त्यांनी ते यापुढे चालू ठेवण्याविषयी जिल्हासेवकांना विचारून घ्यावे.
२. गटात अनावश्यक संदेश पाठवणे
     काही साधक गटामधून शुभ प्रभात, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा यांसारखे संदेश, सनातन प्रभात नियतकालिकांतील लेख, साधनेच्या संदर्भातील मार्गदर्शक सूत्रे, तसेच छायाचित्रे, व्हिडिओ आदी इतरांना पाठवतात. त्यातील काही संदेश अनावश्यक आणि दीर्घ (पुष्कळ मोठे) असतात. त्यामुळे ते वाचण्यात गटातील सर्वांचाच वेळ वाया जातो.
३. निरनिराळ्या गटांमधून एकच संदेश पाठवला जाणे
     काही साधक अनेक गटांमध्ये समाविष्ट असतात. बर्‍याचदा सर्व गटांमधून एकच संदेश पाठवला जात असल्याने तो पुन:पुन्हा वाचण्यात साधकांचा वेळ जातो.
४. अनावश्यक भ्रमणभाष हाताळणे
     काही साधकांकडे व्हॉट्स अ‍ॅपशी निगडित सेवा नसते, तरीही ते सेवेच्या वेळेत व्हॉट्स अ‍ॅपवरील संदेश वाचण्यात, भ्रमणभाष हाताळण्यात वेळ वाया घालवतात. यापुढे साधकांनी सेवेच्या वेळेत भ्रमणभाष अनावश्यक हाताळू नये, तसेच अन्य वेळीही आपण आवश्यकतेनुसारच हाताळतो का, याकडे लक्ष द्यावे.
     अशा चुका व्हॉट्स अ‍ॅपप्रमाणे हाईक, टेलीग्राम, वायबर प्रणालींच्या संदर्भातही होत असल्याचे लक्षात येत आहे. यामध्ये अनेक साधकांचा समष्टी सेवेतील अमूल्य वेळ जात असून त्यांच्या साधनेचीही हानी होत आहे.
५. साधकांनो, अशा चुका करणार्‍या साधकांविषयी जिल्हासेवकांना कळवा !
      एखादा साधक भ्रमणभाष हाताळण्यात अधिक वेळ वाया घालवतो वा अनावश्यक संदेश अन्य साधकांना पाठवतो, असे सहसाधकांच्या लक्षात आल्यास त्या संदर्भात तत्परतेने त्यांना आणि संबंधित जिल्हासेवकांना कळवून त्याला साधनेत साहाय्य करावे. अशा आणि अन्य गंभीर चुका कोणत्याही साधकाच्या संदर्भात लक्षात आल्यास त्या त्वरित रामनाथी आश्रमात samarpitbhav@gmail.com या संगणकीय पत्त्यावर पाठवाव्यात अन् संबंधित प्रसारसेवकांनाही कळवाव्यात.
      साधकांनो, वाया गेलेला अमूल्य वेळ परत कधीच भरून काढता येत नाही, हे लक्षात घेऊन वेळेचा वापर योग्य प्रकारेच करा !
६. जागो हिंदु या गटात समाविष्ट असणार्‍यांसाठी सूचना
१. जागो हिंदु या हिंदु जनजागृती समितीच्या अधिकृत गटांची सेवा जिल्ह्यातील २ - ३ जणांना दिलेले असू शकते. त्यामुळे त्यांचे अ‍ॅडमिन असलेल्या साधकांना वरील सूत्र क्र. १ आणि ५ लागू होत नाही.
२. या गटांसाठी निश्‍चित केलेले नाव आणि डी.पी.साठीचे छायाचित्र सर्व गटांनी वापरणे अनिवार्य आहे.
३. जिल्ह्यातील व्हॉट्स अ‍ॅप प्रसार पहाणार्‍या समितीसेवकांनी एका गटाच्या नियंत्रणाची सेवा आवश्यकतेपेक्षा अधिक जण करत नाहीत ना, तसेच त्यात अनावश्यक वेळ दिला जात नाही ना, असे पहावे. या सेवेसाठी दिल्या जाणार्‍या वेळेचा आढावा आपल्या जिल्हासेवकांना द्यावा.
सुरक्षिततेच्या दृष्टीने सूचना देऊनही स्वतःच्या खात्यावर वैयक्तिक छायाचित्रे ठेवणार्‍या काही साधिका !
      फेसबूक, ट्विटर आदी सामाजिक संकेतस्थळांवरील, तसेच व्हॉट्स अ‍ॅप प्रणालीवरील खात्यांवर डिस्प्ले पिक्चरम्हणून (डी.पी. म्हणून) ठेवलेली चित्रे, तसेच फेसबूकच्या फोटो गॅलरीमध्येही अनेक साधिकांची व्यक्तीगत छायाचित्रे मोठ्या प्रमाणात असतात. या छायाचित्रांचा वापर अश्‍लील छायाचित्रे बनवण्यासाठी किंवा व्यावसायिक हेतूने केला जाऊ शकतो. त्यामुळे सनातन प्रभात नियतकालिकांमधून प्रसिद्ध झालेली संतांची छायाचित्रे खात्यावर ठेवू नयेत. साधिकांनी अशा कोणत्याही खात्यावर वैयक्तिक छायाचित्रे ठेवू नयेत, अशी सूचना यापूर्वी देण्यात येऊनही त्या संदर्भात साधिकांकडून गांभीर्याने प्रयत्न होत नसल्याचे लक्षात आले आहे. अद्यापही अनेक साधिकांची छायाचित्रे डी.पी. म्हणून, तसेच फेसबूकच्या फोटो गॅलरीमध्ये असल्याचे दिसून येते.
     ज्या साधकांनी संतांची छायाचित्रे अशा खात्यांवर ठेवली आहेत त्यांनी, तसेच ज्या साधिकांनी वैयक्तिक छायाचित्रे अशा खात्यांवर ठेवली आहेत, त्यांनी ती त्वरित काढून घ्यावीत. साधिका डी.पी. म्हणून अन्य सात्त्विक चित्रे ठेवू शकतात. (सनातन-निर्मित देवतांची कॉपीराईट असलेली चित्रे, संस्था वा समिती यांच्या संकेतस्थळांवरील अन्य राष्ट्र आणि धर्म जागृतीपर चित्रे खात्यावर ठेवण्यासाठी वापरावीत.)
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn