Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

पुण्यात ‘सनबर्न फेस्टिव्हल’च्या विरोधात सामाजिक आणि हिंदुत्वनिष्ठ संघटनांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा !

हिंदु संस्कृतीवरील आघातांच्या विरोधात संघटित होणार्‍या हिंदूंचे अभिनंदन !
     पुणे - २८ ते ३१ डिसेंबर या कालावधीत केसनंद (वाघोली, जिल्हा पुणे) येथे ‘सनबर्न फेस्टिव्हल’ आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाची पार्श्‍वभूमी पहाता यंदाच्या वर्षी पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला सर्वच स्तरांतून वाढता विरोध होतांना दिसून येत आहे. ‘सनबर्न फेस्टिव्हल’च्या माध्यमातून व्यसनाधीनतेला चालना मिळत असून हा कार्यक्रम म्हणजे सांस्कृतिक राजधानी म्हणवणार्‍या पुणे शहराला कलंकच आहे. त्यामुळेच स्थानिक नागरिकांपासून विविध हिंदुत्वनिष्ठ आणि सामाजिक संघटना या महोत्सवाच्या विरोधात कृतीशील होत आहेत. हिंदु संस्कृती भ्रष्ट करणारा आणि भारतीय युवकांना पाश्‍चात्त्य संगीताच्या नावाखाली व्यसनाधीनतेकडे नेऊ पहाणारा हा महोत्सव रहित व्हावा, या मागणीसाठी १७ डिसेंबर या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य धडक मोर्चा काढण्यात आला. 
     ह.भ.प. मंचक महाराज कराळे (परभणीकर) यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून श्री कसबा गणपति मंदिरापासून मोर्च्याला प्रारंभ झाला. या वेळी ‘सनबर्न’ कार्यक्रमाच्या विरोधात उत्स्फूर्त घोषणा देण्यात आल्या, तसेच या कार्यक्रमाच्या विरोधात समस्त नागरिकांना संघटित होण्याचे आवाहन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ठीकाणी मोर्च्याचे रूपांतर सभेत झाले. यानंतर हिंदुत्वनिष्ठांच्या शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी श्री. राजेश मुठे यांना निवेदन देऊन हा कार्यक्रम रहित करण्याची मागणी केली. पंचायत समितीचे सदस्य संतोष भाडळे, प्रखर हिंदुत्वनिष्ठ श्री. मुकुंद म्हासाळ, भाजपच्या महिला आघाडीच्या सौ. गायत्री काळभोर, मनसेचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष अधिवक्ता गणेश म्हस्के आदी मान्यवरांसह २०० हून अधिक धर्माभिमानी हिंदू या मोर्च्यात सहभागी झाले होते. फेसबूकच्या माध्यमातून मोर्च्याचे ‘लाईव्ह’ प्रक्षेपण करण्यात आले होते. 
धर्माच्या आणि संस्कृतीच्या विरोधात उठणार्‍या आवाजाला आम्ही
प्रखर विरोध करू ! - श्री. चंद्रशेखर शिंदे, लाल महाल उत्सव समिती 
     हिंदु संस्कृतीवर वारंवार घाला घातला गेला, तरीही हिंदु संस्कृती टिकून आहे. मोगल आणि ख्रिस्ती आक्रमकांनी ‘फोडा आणि राज्य करा’, ही नीती वापरून या देशावर अधिराज्य गाजवण्याचा प्रयत्न केला. तशीच परिस्थिती आज आहे. आपल्या संस्कृतीवर पाश्‍चात्त्य संस्कृतीचे आक्रमण होत आहे. जी भूमी छत्रपती शिवाजी महाराजांनी सोन्याचा नांगर फिरवून पवित्र केली, त्या पुण्यभूमीत वेगवेगळ्या पाश्‍चात्त्य सणांच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीवर घाला घालण्याचा प्रयत्न केला जात आहे. हे आम्ही कदापि सहन करणार नाही. धर्माच्या आणि संस्कृतीच्या विरोधात उठणार्‍या आवाजाला आम्ही प्रखर विरोध करू. 
हिंदु धर्म आणि संस्कृती रक्षणार्थ दिलेला लढा नक्की यशस्वी 
होईल ! - श्री. नंदुकाका रहाणे, ज्येष्ठ ज्योतिष अभ्यासक 
     शाळा आणि महाविद्यालयांतून हिंदु संस्कृतीचे शिक्षण काढून टाकणे, हा आपल्या संस्कृतीवरचा सर्वांत पहिला आघात होता. आजच्या पिढीला ना आपल्या सणांचे महत्त्व माहीत आहे, ना संस्कृतीविषयी त्यांना कुठले शिक्षण दिले आहे. हिंदु तरुणांमध्ये धर्मशिक्षणाचा अभाव असल्यानेच हिंदु विरोधक आणि पाश्‍चात्त्य संस्कृतीचे लोक आज लाभ घेऊ पहात आहेत. साधू-संतांचे विचार, हिंदु धर्माचे विचार, एवढेच नव्हे, तर छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य निर्माण केले, ही घटनाही लपवली जात आहे. आज आपले हे आंदोलन याच पाश्‍चात्त्य संस्कृतीच्या विरोधात आहे. संस्कृतीरक्षणार्थ दिलेला हा लढा नक्की यशस्वी होईल.
हिंदु जनजागृती समितीच्या आंदोलनाला पूर्ण पाठिंबा ! 
- श्री. विकास हारगुडे, शेतकरी तथा ग्रामस्थ, केसंनद, वाघोली.
     ‘सनबर्न’ कार्यक्रमाच्या आयोजकांनी आमच्या ग्रामपंचायतीची अनुमती घेतलेली नाही. त्यांना कोणतीही अनुमती दिली नसतांना ते कार्यक्रम करत आहेत. याविषयी आम्ही पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक, तसेच पुण्याचे जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली आहे. या कार्यक्रमास हिंदु जनजागृती समिती विरोध करत असल्याचे आम्हाला समजले. त्यामुळे आम्ही तुमच्या समवेत आहोत. आमचा या आंदोलनाला पूर्ण पाठिंबा आहे. 
सरकारला सहस्रो कीर्तनकारांच्या स्वाक्षर्‍यांचे निवेदन देणार ! - ह.भ.प. मंचक महाराज
     ‘सनबर्न’ कार्यक्रमाच्या माध्यमातून हिंदु संस्कृतीवर आघात होत आहे. पुणेकरांनी जागे होण्याची हीच खरी वेळ आहे. या कार्यक्रमाच्या विरोधात मी कीर्तनकारांमध्ये जागृती करणार असून सहस्रो कीर्तनकारांच्या स्वाक्षर्‍यांचे निवेदन सरकारला देणार आहे. 
‘सनबर्न’मुळे युवा पिढी भिकेला लागेल ! - अधिवक्ता वाजिद खान 
     मला ‘सनबर्न’ कार्यक्रमाच्या संदर्भातील कायदेशीर गोष्टी माहीत होत्या; परंतु या आंदोलनाला आल्यानंतर सांस्कृतिकदृष्ट्याही त्याची भयावहता माझ्या लक्षात आली. या कार्यक्रमात मादक पदार्थ, अश्‍लील चाळे आदी अपप्रकारांचा भरणा असतो. त्यामुळे आपली पुढीची पिढी अक्षरश: भिकेला लागणार आहे. एरव्ही ग्रामीण भागात कोणत्याही कार्यक्रमाला प्रशासनाकडून ‘डी.जे.’ला अनुमती दिली जात नाही. मग ‘सनबर्न’साठी ती कशी देण्यात आली ? या कार्यक्रमाच्या विरोधात श्री. गणेश लक्ष्मण म्हस्के यांच्या वतीने ‘माहिती सेवा समिती’च्या माध्यमातून आम्ही न्यायालयात याचिका प्रविष्ट केली.
तरुणपिढीला व्यसनाधीन करून प्रशासन विकास 
करणार आहे का ? - श्री. बाळकृष्ण वांजळे, शिवसेना 
     संतांची भूमी असलेल्या पुणे शहरात असंस्कृत ‘सनबर्न फेस्टिव्हल’चे आयोजन केले जात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पुण्यभूमीत जिथे हिंदवी स्वराज्यासाठी लढणारे मावळे सिद्ध झाले, तिथे आज तरुण पिढीला व्यसनाधीन बनवणार्‍या कार्यक्रमाला शासन आणि पर्यावरण विभाग अनुमती देते, ही अत्यंत खेदजनक गोष्ट आहे. तरुण पिढीला व्यसनाधीन करून प्रशासन विकास करणार आहे का ? जी संस्कृती आपली नाही, ती संस्कृती या पुण्यभूमीत कधीही रूजू देणार नाही. 
सनबर्न’मधील मादक पदार्थांच्या सेवनामुळे महिलांवरील 
अत्याचारांत वाढ ! - कु. मोनिका गावडे, रणरागिणी शाखा
     पुणे हे सुसंस्कृत शहर आहे. या सुसंस्कृत शहरात असंस्कृत कार्यक्रम कसे काय आयोजित केले जातात ? ‘सनबर्न’ कार्यक्रमात ‘केटामीन’ या मादक पदार्थाचे मोठ्या प्रमाणात सेवन केले जाते. परिणामी महिलांवरील अत्याचारांत वाढ होते. एकूणच हा कार्यक्रम युवा पिढीला व्यसनी आणि व्यभिचारी बनवणारा आहे; म्हणूनच असे कार्यक्रम कुठेही आयोजित केले जाऊ नयेत. 
सनबर्न’ कार्यक्रमाला राष्ट्रद्रोही आणि धर्मद्रोही पार्श्‍वभूमी ! - श्री. पराग गोखले 
     हिंदु जनजागृती समितीचे श्री. पराग गोखले उपस्थितांना मोर्च्याचा उद्देश सांगतांना म्हणाले, ‘‘गोव्यात या ‘फेस्टिव्हल’मध्ये राष्ट्र्रध्वजाची विटंबना केली गेली; म्हणून तेथील स्थानिक लोकांनी या कार्यक्रमाच्या आयोजकांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. तसेच या कार्यक्रमात नटराजरूपी भगवान शिवाचेही विडंबन करण्यात आले. ज्या पुण्यातील लाल महालातून छत्रपती शिवरायांनी शाहिस्तेखानाला हाकलून लावले, त्याप्रमाणे या ‘फेस्टिव्हल’लाही आपण देशातून हद्दपार केले पाहिजे.’’ 
‘सनबर्न’ रहित होईपर्यंत लढा द्या ! - श्री. अभिजित देशमुख
     हिंदु जनजागृती समितीचे श्री. अभिजित देशमुख म्हणाले, ‘‘हा कार्यक्रम रहित होईपर्यंत हिंदूंनी लढा द्यावा. त्यासाठी सर्वांनी संघटित होण्याची आवश्यकता आहे.’’
माहिती सेवा समितीचे श्री. चंद्रकांत वारघडे यांचा ‘सनबर्न’च्या विरोधात कायदेशीर लढा ! 
     माहिती सेवा समितीचे श्री. चंद्रकांत वारघडे यांनी ‘सनबर्न’च्या विरोधात कायदेशीर लढा उभारला आहे. मोर्च्याला संबोधित करतांना श्री. वारघडे म्हणाले, ‘‘केसनंद गावात अवैधरित्या उत्खनन होत असून मोठ्या प्रमाणावर वृक्षतोडही केली जाते. वनखाते, तहसील कार्यालय यांची अनुमती नसतांनाही हा कार्यक्रम आयोजित केला जात आहे. कार्यक्रमाच्या विरोधात नागरिकांमध्ये रोष असून कोणत्याही परिस्थितीत हा कार्यक्रम होऊ देणार नाही.’’
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn