Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

पुण्यात सनबर्नच्या विरोधात वातावरण तापले !

   
आमदार बाबुराव पाचुर्णे (मध्यभागी) यांना निवेदन देतांना संस्कृतीप्रेमी

श्री. भरत (आबा) कुंभारकर (डावीकडे) यांना निवेदन देतांना कार्यकर्ते
ह.भ.प. मंचक महाराज कराळे (डावीकडे) यांना निवेदन देतांना संस्कृतीप्रेमी

पुणे, १५ डिसेंबर (वार्ता.) - आशिया खंडातील सर्वांत मोठ्या संगीत महोत्सवांपैकी एक समजला जाणारा सनबर्न संगीत महोत्सव यंदाच्या वर्षी पुणे-नगर रस्त्यावरील केसनंद येथे होणार असल्याचे घोषित करण्यात आले आहे. असे असले, तरी अमली पदार्थांचे सेवन, अश्‍लीलता, तसेच हिडीस नाच यांमुळे कुख्यात झालेल्या या महोत्सवाला स्थानिक पातळीवर तीव्र विरोध होतांना दिसून येत आहे. हिंदु जनजागृती समितीप्रणित रणरागिणी शाखेच्या वतीने शहराच्या सुसंस्कृतपणाला गालबोट लावणार्‍या या महोत्सवाच्या विरोधात आंदोलन छेडण्यात आले असून या आंदोलनाची धार दिवसेंदिवस वाढत चालली आहे. वाघोली परिसरातील ग्रामस्थ, तसेच शहरातील अनेक संस्कृतीप्रेमी संघटना आणि नागरिक या महोत्सवाच्या विरोधात उभे ठाकले आहेत. युवाजागृती आणि संस्कृतीरक्षण अभियानाच्या अंतर्गत सनबर्नला हद्दपार करण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने महिला संघटना, लोकप्रतिनिधी, पोलीस-प्रशासन यांना निवेदने देण्यात येत आहेत, तर अनेक ठिकाणी जागृतीपर बैठकांचे आयोजन करण्यात येत आहे.

सनबर्न विरोधातील संस्कृतीरक्षण मोहिमेत समितीच्या कार्यकर्त्यांना मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद
१. वाघोली गावातील तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष श्री. गणेश दाभाडे यांनी वाघोली ग्रामसभेत सनबर्न महोत्सवाच्या विरोधात ठराव करून ग्रामस्थांमध्ये जागृती करणार असल्याचे सांगितले. या विरोधात श्री. दाभाडे आणि अन्य कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकार्‍यांना यापूर्वीच निवेदनही दिले आहे.
२. युवा शिवसेना हवेली तालुकाप्रमुख श्री. विशाल सातव यांनीही धर्म आणि भारतीय संस्कृती यांच्या विरोधात असलेला हा कार्यक्रम आम्ही होऊ देणार नाही, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. १ सहस्र ५०० कार्यकर्त्यांसह संस्कृतीरक्षण कार्यक्रमात सहभागी होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
३. वाघोली येथील शिवप्रतिष्ठानचे श्री. मोहन सातव यांनीही धारकर्‍यांसमवेत सनबर्नच्या विरोधात मोहीम राबवणार असल्याचे सांगितले. काहीही झाले, तरी धर्म आणि संस्कृती यांच्या विरोधातील हा कार्यक्रम आम्ही होऊ देणार नाही असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
४. केसनंद गावाचे उपसरपंच श्री. हिरामण शेठ हरगुडे यांना समितीचे सर्वश्री पराग गोखले, सागर शिरोडकर, नीलेश पवार, अमितराव गुरव यांनी सनबर्नच्या विरोधात निवेदन दिले. या कार्यक्रमाच्या विरोधात ठराव करून मोहिमेत सहभागी होतो, असे आश्‍वासन त्यांनी दिले.
५. भाजपचे आमदार भीमराव तापकीर यांना निवेदन दिले असता त्यांनी मी स्वतः यात लक्ष घालतो, असे आश्‍वासन दिले, तर भाजपचे श्री. संदीप बेलदरे-पाटील यांनी संस्कृतीरक्षणासाठी मी सदैव समितीच्या समवेत असेन, अशी भावना व्यक्त केली.
६. शिरूर मतदारसंघाचे आमदार बाबुराव पाचुर्णे यांना निवेदन देण्यात आले. या वेळी भाजपचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष श्री. दादासाहेब जाधव, भाजप किसान मोर्च्याचे उपाध्यक्ष
श्री. केशव कामठे, भाजपच्या सहकार आघाडीचे पुणे जिल्हा अध्यक्ष श्री. रोहिदास शेठ उंद्रे, श्री. नीलेश पवार आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते. यावर त्वरित कारवाई करण्यासाठी पुढे पाठवतो, असे आश्‍वासन त्यांनी दिले.
७. भाजपचे पुणे शहर अध्यक्ष श्री. योगेश गोगावले यांना निवेदन दिल्यावर त्यांनी ते संबंधित विभागाकडे कार्यवाहीसाठी पाठवण्याचे आश्‍वासन दिले.
८. ह.भ.प. मंचक महाराज कराळे (परभणीकर) म्हणाले, संस्कृती भ्रष्ट करणारा असा कोणताही कार्यक्रम आम्ही होऊ देणार नाही. आवश्यकता पडली, तर नियोजित कार्यक्रमाच्या ठिकाणी टाळ आणि मृदुंग घेऊन वारकर्‍यांसमवेत व्यापक आंदोलन करू.
९. ह.भ.प. भानुदास महाराज तुपे म्हणाले, गाडगेबाबा प्रतिष्ठानच्या वतीने पुण्यात २० तारखेला ६० ठिकाणी किर्तने होणार आहेत. त्या सर्व ठिकाणी कीर्तनकारांना हा विषय मांडायला सांगू आणि समाजातील सर्वांना या महोत्सवाला विरोध करण्याचे आवाहन करू. समाजातील प्रत्येक स्तरावर विरोध करणे, हे हिंदूंचे कर्तव्यच आहे.
१०. शिवसेनेचे खडकवासला मतदारसंघाचे अध्यक्ष श्री. भरत (आबा) कुंभारकर, शिवसेना महिला आघाडीच्या सौ. सुनीता खंडाळकर यांनी शिवसेनेचा या कार्यक्रमाला विरोध असेल. शिवसेना आवश्यक ते सर्व सहकार्य करेल. हा कार्यक्रम पुण्यात होऊ देणार नाही, असे आश्‍वासन दिले.
११. पतित पावन संघटनेचे संघटक श्री. नीलेश जोशी म्हणाले, सनबर्नसारखे कार्यक्रम पुण्याच्या संस्कृतीला गालबोट लावणारे असून या विरोधातील आंदोलनात आम्ही सहभागी होऊ.
१२. संभाजी ब्रिगेडचे उपाध्यक्ष श्री. बाळकृष्ण वांजळे म्हणाले, माझा नेहमीच अशा आंदोलनांना पाठिंबा असेल. आपण एकत्र मिळून कार्य करूया.
१३. नरगसेवक श्री. राजाभाऊ लायगुडे, मार्बल असोसिएशनचे अध्यक्ष श्री. पवन जैन, संभाजी राजे गोसावी प्रतिष्ठान महिला अध्यक्ष आणि सकाळ तनिष्क व्यासपिठाच्या गटप्रमुख सौ. ज्योती गोसावी, खडकवासला मतदार संघाचे अध्यक्ष श्री. अरुण राजवाडे यांना निवेदन देण्यात आले.

धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn