Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक हे जगातील पर्यटक येतील असे जागतिक केंद्र होईल ! - चंद्रकांत पाटील, महसूलमंत्री

      मुंबई, २२ डिसेंबर (वार्ता.) - छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक मुंबईमध्ये व्हावे, अशी सर्वांची इच्छा होती. यापूर्वीच्या शासनाने अनेकवेळा स्मारक उभारण्याच्या घोषणा केल्या; मात्र स्मारकाचे काम आवश्यक अनुमती मिळण्यामध्ये अडकले. भाजपने निवडणुकीपूर्वी घोषणा केली होती की, आम्ही छत्रपती शिवरायांचा आशीर्वाद घेऊन सत्तेत जात आहोत. त्यामुळे आम्ही हे स्मारक पूर्ण करणार. जगातील पर्यटक येतील आणि जागतिक केंद्र होईल, अशा प्रकारचे छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक होईल, असे प्रतिपादन महसूलमंत्री श्री. चंद्रकांत पाटील यांनी केले. अरबी समुद्रात होणार्‍या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाचा भूमीपूजन सोहळा २४ डिसेंबर या दिवशी माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी २२ डिसेंबर या दिवशी सह्याद्री अतिथीगृहात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी शिक्षणमंत्री श्री. विनोद तावडे आणि छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीचे अध्यक्ष श्री. विनायक मेटे उपस्थित होते.
      महसूलमंत्री श्री. चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘‘मागील २ वर्षांत आम्ही स्मारकासाठी आवश्यक त्या अनुमती मिळवल्या. त्यांच्या निविदा, आराखडा पूर्ण होऊन पुढील वर्षात स्मारकाच्या कामाला प्रारंभ होईल. वर्ष २०१९ पर्यंत स्मारकाच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण होईल. छत्रपती शिवाजी महाराज हे जग आणि देश यांच्यासाठी स्फूर्तीचा विषय आहेत. महाराष्ट्रासाठी हा जिव्हाळ्याचा विषय आहे. त्यामुळे केवळ कार्यक्रमासाठी कार्यक्रम न करता त्यात संपूर्ण महाराष्ट्राला सहभागी करून घेण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील सर्व नद्यांचे जल आणि सर्व गडकोट किल्ल्यांवरील माती भूमीपूजनाला आणण्यात येईल. कार्यक्रमाच्या ठिकाणी जल आणि गडकोट किल्ल्यांवरील माती आणण्यासाठी मागील २-३ दिवसांपासून राज्यांतील सर्व गावांमध्ये कार्यक्रम चालू आहेत.’’
      श्री. चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘‘मच्छीमारांच्या संघटनांशीही आमची चर्चा झाली आहे. तज्ञांच्या विचारानेच स्मारकाचे काम होत आहे. यामुळे मासेमारीवर कोणताही परिणाम होणार नाही.’’
असा होणार कार्यक्रम !
२३ डिसेंबर
      चेंबूर येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ सकाळी ९ ते ११ या वेळेत सर्व जिल्ह्यांतील नद्यांचे जल आणि गडकोट किल्ल्यांची माती आणण्यात येईल. ते सर्व एकत्रित केले जाईल. मोठ्या रथातून पाणी आणि मातीचा कलश घेऊन चेंबूर ते गेट वे ऑफ इंडिया अशी रॅली निघेल. दुपारी ४.३० पर्यंत गेट वे ऑफ इंडिया येथे येईल. सायंकाळी ६ वाजता मुख्यमंत्री जल आणि माती स्वीकारतील आणि नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सुपूर्द करतील.
२४ डिसेंबर
      एका व्यासपिठावर मान्यवर आणि दुसर्‍या व्यासपिठावर मंत्री महोदय असणार आहेत. ३ सहस्र मान्यवरांसाठी आसनव्यवस्था करण्यात येईल. पंतप्रधानांसमवेत मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस, राज्यपाल विद्यासागर राव, शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीचे अध्यक्ष श्री. विनायक मेटे, श्रीमंत उदयराजे महाराज, श्रीमंत संभाजीराजे महाराज यांच्या उपस्थितीत भूमीपूजन होईल. त्यानंतर मोठी सभा होईल.
पुरुषोत्तम 
खेडेकर यांना चपराक
१. पुरुषोत्तम खेडेकर यांनी ‘स्मारकातील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा अश्‍वारूढ न ठेवता सिंहासनाधिष्ठीत असावा’, असा प्रचार सामाजिक संकेतस्थळाच्या माध्यमातून केला होता. याविषयी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्‍नाला उत्तर देतांना शिक्षणमंत्री श्री. विनोद तावडे म्हणाले, ‘‘जनतेच्या मनात गोंधळ निर्माण होईल, अशा पद्धतीने ‘व्हॉट्स अ‍ॅप’वर प्रचार न करता संबंधित सूचना शासनाला सांगायला हव्यात. शासन याविषयी ‘ओपन माईंडेड’ आहे. स्मारकाचे सर्व महत्त्व छत्रपती शिवाजी महाराज यांनाच आहे.’’
२. कार्यक्रमात सर्व नद्यांचे जल वापरणार असल्याने वैदिकीकरणाच्या सूत्रावरून जातीय संघटनांकडून होणार्‍या आरोपाविषयी पत्रकारांनी विचारले असता श्री. विनोद तावडे म्हणाले, ‘‘महाराज्यांच्या राज्याभिषेकाच्या वेळी काय झाले होते ?’’ तेव्हा श्री. चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘‘छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्यभिषेकाच्या वेळी संपूर्ण देशभरातील पवित्र नद्यांचे जलच आणण्यात आले होते.’’
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn