Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

गोव्यात भाजप-मगो युती होणे हे जनता आणि पक्ष दोहोंच्या हिताचे ! - मनोहर पर्रीकर

मगो पक्षाच्या ढवळीकर बंधूंना गोवा 
राज्य मंत्रीमंडळातून वगळल्याचे प्रकरण
        पणजी, १३ डिसेंबर (वार्ता.) - मुख्यमंत्र्यांनी जरी मगोच्या नेत्यांना मंत्रीमंडळातून काढून टाकले असले, तरी भाजप आणि मगो पक्षांची पक्षस्तरावरची युती तुटलेली नाही. येत्या विधानसभा निवडणुकीत भाजप आणि मगो यांची युती होणे, हे जनता अन् पक्ष दोहोंच्या हिताचे आहे. मगो पक्षाने प्रस्ताव मांडल्यास येत्या निवडणुकीत भाजप आणि मगो पक्षांच्या युतीसंदर्भात चर्चा करता येईल. युतीचा मार्ग भाजपने बंद केलेला नाही, असे भाजपचे गोव्यातील वरिष्ठ नेते आणि केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी पणजी येथे पत्रकार परिषदेत सांगितले.
        गोवा विधानसभेची निवडणूक काही महिन्यांवर ठेपली आहे. प्रचारालाही वेग आला आहे. ११ डिसेंबर या दिवशी सायंकाळी फोंडा, गोवा येथे झालेल्या प्रचारसभेत सध्या सत्तेत सहभागी असलेल्या मगो पक्षाने सहकारी पक्ष असलेल्या भाजपवर टीका करत ‘मुख्यमंत्र्यांनी राज्याला १० वर्षे मागे नेले आहे. मुख्यमंत्र्यांना पदावरून हटवल्यासच पुढील निवडणुकीच्या वेळी युतीचा विचार करू’, असे विधान केले होते. त्यानंतरच मुख्यमंत्र्यांनी १२ डिसेंबरला रात्री उशिरा मगोच्या दोन्ही नेत्यांना मंत्रीमंडळातून वगळले. श्री. सुदिन ढवळीकर यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम आणि वाहतूक अन् नदी परिवहन खात्यांचे दायित्व होते, तर श्री. दीपक ढवळीकर यांच्याकडे कारखाने आणि बाष्पक मंत्रालय होते.
        मगोचे नेते श्री. सुदिन ढवळीकर आणि श्री. दीपक ढवळीकर यांनी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या आरोपांविषयी मात्र पर्रीकर यांनी काही बोलण्यास नकार दिला. ‘सध्या मी याविषयी काही बोलणार नाही’, असे पर्रीकर म्हणाले. या घडामोडींनंतर गोव्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. ढवळीकर बंधूंनी या प्रकरणी ‘४ दिवसांत आमची भूमिका स्पष्ट करू’, असे सांगितले आहे.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn