Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

सनातन संस्थेवर येणार्‍या संकटांच्यासंदर्भात महर्षींनी सांगितलेले उपाय

शेषशायी विष्णूचे चित्र असलेले धनुष्य
सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ
१. दिनांक ३०.६.२०१६ - महर्षींनी तमिळनाडूतील
नामक्कल जिल्ह्यातील कोळ्ळीमलई पर्वतावर असलेल्या
श्री अरप्पाळीश्‍वर मंदिराचे दर्शन घेण्यास सांगणे
     ‘१८.६.२०१६ या दिवशी महर्षींनी तमिळनाडूतील चेन्नई येथे झालेल्या ८५ व्या नाडीवाचनात सांगितल्याप्रमाणे आम्ही ३०.६.२०१६ या दिवशी श्री अरप्पाळीश्‍वर देवाची पूजा, तसेच त्या मंदिरातच असलेल्या देवी नाथम्माळ (अरप्पाळनायकी) हिला ‘ललितासहस्रनाम मंत्रपठणात कुंकूमार्चन केले. सनातनवरील संकटे दूर व्हावीत आणि हिंदु राष्ट्राच्या (सनातन धर्म राज्याच्या) स्थापनेतील अडथळे दूर व्हावेत यांसाठी या पूजा करण्यात आल्या.’ - (पू.) सौ. अंजली गाडगीळ, त्रिची, तमिळनाडू. (१.७.२०१६)
२. दिनांक १३.९.२०१६ - सनातन संस्थेवर येणार्‍या वाढत्या
संकटांवर मात करण्यासाठी केरळ येथील मंदिरांचे दर्शन घेण्यास महर्षींनी सांगणे
२ अ. महर्षींनी ‘राजस्थान येथून प्रस्थान करून आता केरळ मधील तिरूवनंतपूरम् येथील श्री पद्मनाभ स्वामीच्या दर्शनाला जायचे आहे’, असा आदेश देणे : ‘सनातनवरील संकटे वाढतच होती. यातच अनेक साधकांना चौकशीला सामोरे जावे लागत होते. यात अनेक साधकांचा साधनेतील अमूल्य वेळ वाया जात होता. नाहक चौकशीला सामोरे जावे लागत असल्याने ‘यावर उपाय काय ?’, असे महर्षींना विचारले असता त्यांनी सांगितले, ‘आता आपल्याला केरळ येथे जायचे आहे आणि तेथेच तिरूवनंतपूरम् येथे राहून श्री पद्मनाभस्वामी यांचे दर्शन घेऊन प्रार्थना करायची आहे.’ आम्ही राजस्थानहून विमानाने निघालो आणि केरळ येथे १३.९.२०१६ या दिवशी पोचलो.
२ आ. ओणम्च्या पवित्र दिवशी पद्मनाभस्वामी मंदिरात देवाच्या दर्शनाची संधी मिळणे : दुसर्‍या दिवशी केरळ येथील ओणम् हा प्रसिद्ध सण होता. हा दिवस म्हणजे वामन अवताराच्या जयंतीचा दिवस. या दिवशी आम्हाला पहाटे चार वाजता शेषशायी विष्णूच्या दर्शनाची संधी मिळाली, तसेच उत्सवमूर्तीला होणार्‍या अभिषेकालाही तेथे थांबून मूर्तीतून प्रक्षेपित होणारी सात्त्विकता अनुभवता आली.
२ इ. भारतातील पंचमाधवांपैकी एक म्हणजे सुंदरमाधव, म्हणजेच तिरुवनंतपूरम् येथील पद्मनाभस्वामी ! : भारतात पंचमाधव आहेत. ते म्हणजे काशी येथील बिंदूमाधव, रामेश्‍वरम् येथील सेतूमाधव, प्रयाग येथील वेणीमाधव, पीठापूरम् येथील कुंतीमाधव आणि तिरूवनंतपूरम् येथील सुंदरमाधव. सुंदरमाधव हा खरोखरच सुंदर आहे. त्याचा तोंडवळा अगदी बघत रहाण्यासारखाच आहे. याच ठिकाणी २ - ३ वर्षांपूर्वी मोठा खजिना मिळाला होता. त्याची चर्चा अजूनही सर्वत्र असल्याने हे मंदिर अजूनच प्रसिद्धीला आले आहे.
२ ई. ओणम्च्या दिवशी पहाटे देवाच्या चरणी लाकडी धनुष्य अर्पण केले जाणे आणि हे धनुष्य नंतर भाविकांना प्रसादाच्या रूपात मिळणे : ओणम्च्या दिवशी पहाटे देवाच्या चरणी लाकडी धनुष्य अर्पण करतात. सहस्रो वर्षांपासून ही परंपरा चालत आलेली आहे. या लाकडी धनुष्याच्या पट्टीवर देवाचे चित्र, तसेच भूदेवी आणि श्रीदेवी, हनुमंत अशा प्रतिमांची नैसर्गिक रंगात चित्रे काढलेली असतात. रामराज्याभिषेक, दशावतार, श्रीकृष्णलीला, गणपति अशा प्रकारच्या अनेक दृश्यांचे चित्रांकन या धनुष्यावर केलेले असते. असे चित्रांकन करणारे एक घराणेही येथे आहे. अनेक भाविक धनुष्याचे आधीच ‘बूकिंग’ करून ठेवतात आणि काही ठराविक संख्येत बनवलेली ही धनुष्ये देवाच्या चरणांशी आठ दिवस ठेवून नंतर ती भाविकांना दिली जातात.
२ उ. ‘एक धनुष्य आश्रमात पूजेसाठी आपल्याकडेही हवे’, ही इच्छा देवाने पूर्ण करणे आणि त्यानंतर ‘साक्षात् श्रीविष्णूच्या सांगण्यावरून हे धनुष्य विश्‍वकर्म्याने तुमच्यासाठी सिद्ध केले आहे, असे महर्षींनी नाडीवाचनात सांगणे : ‘हे धनुष्य पूजेसाठी आपल्यालाही मिळावे’, असा विचार माझ्या मनात आला; परंतु येथील पुजार्‍यांनी सांगितले, ‘‘आता ते शक्य नाही; कारण याचे ‘बूकिंग’ एक वर्षभर आधीच झालेले असते. आताच तुम्ही सांगून ठेवले, तर पुढच्या वर्षी तुम्हाला हे देवाचे धनुष्य मिळेल.’’ नंतर दुसर्‍या दिवशी केरळच्या संस्कृतीचे जतन करण्यासाठी काही गोष्टी खरेदी करण्यासाठी आम्ही एके ठिकाणी गेलो होतो. त्या वेळी तेथील माणसाला आम्ही धनुष्याविषयी विचारल्यावर त्यांनी सांगितले, ‘‘मी तीन धनुष्ये आधीच ‘बूकिंग’ करून ठेवली आहेत. त्यांतील एक तुम्ही घेऊ शकता.’’ आमच्यासाठी ही मोठी अनुभूती होती. देवाने आमच्यासाठी त्या माणसाकरवी आधीच धनुष्याचे ‘बूकिंग’ करून ठेवले होते. नंतर झालेल्या नाडीवाचन क्रमांक ९६ मध्ये महर्षींनी सांगितले, ‘हे कार्तिकपुत्री, तुझ्या मनात धनुष्य घेण्याचा विचार आला, तेव्हाच तो शेषावर झोपलेला विष्णूही विचारात पडला. त्या वेळीच त्याने विश्‍वकर्म्याला तुझ्यासाठी धनुष्य सिद्ध करायला सांगितले आणि तेच आम्ही तुला दिले.’ हे ऐकून पुष्कळच भावजागृती झाली.
२ ऊ. ‘दशावताराचे चित्र असलेले धनुष्य वातावरणातील अनिष्ट शक्तींपासून रक्षण करते, तर श्रीविष्णूचे चित्र असलेले धनुष्य तुमच्यावर महाविष्णूच्या कृपेचा वर्षाव करते’, असे पुजार्‍यांनी सांगणे : त्यानंतर आम्हाला मंदिरातूनच एका माणसाच्या माध्यमातून दोन प्रकारची धनुष्येही मिळाली. त्यातील एक दशावताराचे होते आणि दुसर्‍या धनुष्यावर शेषशायी विष्णूचे चित्र होते. येथील पुजार्‍याने सांगितले, ‘‘दशावताराचे चित्र असलेले धनुष्य तुमचे वातावरणातील अनिष्ट शक्तींपासून रक्षण करते, तर श्रीविष्णूचे चित्र असलेले धनुष्य तुमच्यावर महाविष्णूच्या कृपेचा वर्षाव करते.’’
     आता महर्षींच्या सांगण्याप्रमाणे आम्ही शेषशायी विष्णूचे चित्र असलेले एक धनुष्य रामनाथी आश्रमातील ध्यानमंदिरात पूजेसाठी ठेवणार आहोत.
प्रार्थना : महर्षींच्या कृपेने आम्हाला ठिकठिकाणी जाऊन विविध देवतांचे दर्शन मिळत आहे आणि आमच्या रक्षणासाठी देव आम्हाला विविध उपायांतून साहाय्यही करत आहे. येणार्‍या आपत्कालात रक्षण होण्यासाठी देवाने आम्हाला त्याच्या चरणांशी ठेवलेले लाकडी धनुष्य देऊन एक प्रकारे मोठी शक्तीच आश्रमाला प्रदान केली आहे. वेळोवेळी आम्हाला साहाय्य करून धर्मशक्तीचा साठा उपलब्ध करून देणार्‍या महर्षींच्या चरणी आम्हा साधकांचा कोटी कोटी नमस्कार !’
- (सद्गुरु) सौ. अंजली गाडगीळ, तिरूवनंतपूरम्, केरळ. (१८.९.२०१६, रात्री ८.३९)
३. दिनांक १६.९.२०१६ - सनातन संस्थेवरील संकटांच्या निवारणासाठी महर्षींच्या
आज्ञेनुसार रामनाथी आश्रमात गणपति याग करणे आणि महर्षींनी सांगितलेले अन्य उपाय
३ अ. महर्षींनी नाडीवाचनातून आश्रमात चालू असणार्‍या गणपति होमाचे वर्णन करणे आणि प्रत्यक्ष त्रिमूर्तीच देवलोकातून या होमाकडे पहात असल्याचे सांगणे : ‘महर्षींनी सांगितल्याप्रमाणे १२.९.२०१६ या दिवशी आम्ही गणपति होमाला रामनाथी आश्रमात प्रारंभ केला. याच दिवशी राजस्थान येथील सवाई माधोपूर या त्रिनेत्र गणपतीच्या स्थानी झालेल्या नाडीवाचन क्र. ९४ मधून महर्षींनी आम्हाला सांगितले, ‘या यज्ञाकडे देवलोकातून प्रत्यक्ष त्रिमूर्ती पहात आहेत. सर्व ब्रह्मांडाचा कारभार सोडून त्यांचे सर्व लक्ष आता होमाकडे लागले आहे. या होमातून आम्ही (महर्षि) तुम्हाला १०० राजसूर्य यज्ञ केल्याचे फळ देणार आहोत. होमात तुम्हाला नक्कीच काहीतरी दैवी साक्ष मिळेल. रामनाथी आश्रमात आज जणूकाही देवलोकच निर्माण झाला आहे.’
३ आ. त्या दिवशी येणार्‍या संकटाच्या निवारणासाठी महर्षींनी सलग तीन दिवस होमासमवेत बगलामुखी मंत्राचा १ सहस्र ८ वेळा जप करण्यास आणि विष्णुसहस्रनामाचेही पठण करण्यास सांगणे : ‘आज येणारे संकट दूर करण्यासाठी पुढीलप्रमाणे उपाय करा’, असेही महर्षींनी सांगितले.
     ‘आज होम झाल्यानंतर बगलामुखी मंत्राचा १ सहस्र ८ वेळा जप करा आणि त्यानंतर विष्णुसहस्रनामाचेही पठण करा, तसेच गेरूच्या मातीचे (एक प्रकारच्या लाल मातीचे) मंडलही आश्रमाभोवती काढा’, असे महर्षींनी सांगितले. ‘होमासमवेतच हे उपाय आता पुढे सलग दोन दिवसही करायचे आहेत’, असेही महर्षि म्हणाले. हे मंडल आता प्रत्येक बुधवारी आश्रमाभोवती काढण्यास महर्षींनी सांगितले आहे; कारण बुधवार हा प.पू. डॉक्टरांचा जन्मवार आहे.’
- (सद्गुरु) सौ. अंजली गाडगीळ, त्रिवेंद्रम, केरळ. (१६.९.२०१६, सकाळी ८.५०)
४. दिनांक १६.९.२०१६ - १६.९.२०१६ या दिवशी एका संतांनी देहत्याग केल्यानंतरची शक्ती सनातनला देणार असल्याचे आणि त्या संतांप्रमाणे सनातनला विश्‍वभर प्रसिद्धी मिळणार असल्याचे महर्षींनी नाडीवाचनात सांगणे
     ‘१६.९.२०१६ या दिवशी केरळ राज्यातील त्रिवेंद्रम् (तिरुवनंतपूरम्) येथे स्वामी पद्मनाभ मंदिराच्या जवळ असलेल्या स्थानी महर्षींनी नाडीवाचन केले. या नाडीवाचनात त्यांनी सांगितले, ‘आजचा, म्हणजे १६.९.२०१६ हा दिवस पुष्कळच महत्त्वाचा आहे; कारण या दिवशी आम्ही (महर्षि) एका संतांनी देहत्याग केल्यानंतरची सर्व शक्ती सनातन संस्थेला देत आहोत. या संतांना जशी सर्व जगभर प्रसिद्धी मिळाली, तशीच प्रसिद्धी या शक्तीतून संस्थेला मिळेल आणि त्यामुळे सार्‍या विश्‍वभर हिंदुत्वाचा प्रसार होण्यास साहाय्य मिळेल.’ (नाडीवाचन क्रमांक ९६, तिरुवनंतपूरम्, केरळ, १६.९.२०१६) - (सद्गुरु) सौ. अंजली गाडगीळ, त्रिवेंद्रम, केरळ. (१६.९.२०१६, दुपारी ३.३२)
५. दिनांक १७.९.२०१६ - आपत्कालात रक्षण होण्यासाठी महर्षींनी
विविध मंत्रांचे पठण करण्यास सांगणे आणि त्यावरून आपत्कालाची तीव्रता लक्षात येणे
५ अ. नाडीवाचन क्रमांक ९५ मध्ये महर्षींनी ‘आपत्कालात रक्षण होण्यासाठी आता रामनाथी आश्रमात ‘शिव पंचाक्षरी मंत्र’ आणि ‘हनुमान चालीसा’ यांचे पठणही व्हायला हवे’, असे सांगणे : ‘१२ ते १४ सप्टेंबर २०१६ या कालावधीत रामनाथी आश्रमात महर्षींच्या सांगण्याप्रमाणे गणपति होम आणि बगलामुखी मंत्राचा १ सहस्र ८ वेळा जप, तसेच विष्णु सहस्रनामाचे पठण करण्यात आले. त्यानंतर १६.९.२०१६ या दिवशी केरळ येथील तिरूवनंतपूरम् या ठिकाणी झालेल्या नाडीवाचन क्र. ९५ मध्ये महर्षींनी सांगितले, ‘आता रामनाथी आश्रमात विष्णुसहस्रनामासमवेतच ‘शिव पंचाक्षरी मंत्रा’चे आणि ‘हनुमान चालीसेचे’ही पठण करावे. (महर्षींनी सांगितल्याप्रमाणे रामनाथी आश्रमात हे पठण चालू केले आहे. - (सद्गुरु) सौ. गाडगीळ)
     महर्षींच्या सांगण्यावरून आपत्कालाची तीव्रता लक्षात येते. पूर्वी आश्रमात साधक अनेक सेवा करत होते; परंतु आता इतर सेवांसमवेतच जवळजवळ दिवसभर कुठल्या ना कुठल्या तरी मंत्राचे पठण ध्यानमंदिरात चालू असते. ‘नित्य उपासनाच तुम्हाला संकटकाळात तारते’, हेही यातून लक्षात येते.
५ आ. तात्पयर्र् - सनातन संस्थेच्या नित्य वाढणार्‍या कार्यात संतांचा आणि ऋषिमुनींचा आशीर्वाद महत्त्वाचा असणे : अनेक संत रामनाथी आश्रमात येणार्‍या संकटांवर उपाय म्हणून विविध उपासना करण्यास सांगत आहेत. होशियारपूर येथील भृगुशास्त्री डॉ. विशाल शर्मा हेही अनेक उपाय करण्यास सांगत आहेत. यामुळेच सनातन संस्थेवर एवढे आरोप होऊनही तिचे कार्य वाढतच चालले आहे. सनातन संस्थेच्या कार्याला असणारा संतांचा, ऋषि-महर्षींचा आशीर्वाद, हेच यामागचे खरे कारण आहे.
५ इ. प्रार्थना : ‘महर्षींच्या कृपेने संस्थेचे कार्य असेच व्यापक होऊ दे आणि सनातन धर्म राज्याची स्थापना होऊ दे’, अशी आम्ही साधकांची महर्षींच्या चरणी कळकळीची प्रार्थना आहे. ‘हे गुरुवर, आम्हा सर्वांचे आपत्कालात रक्षण करा आणि आम्हा सर्वांनाच मोक्षपदापर्यंत न्या’, अशी आपल्या चरणी प्रार्थना आहे.’
- (सद्गुरु) सौ. अंजली गाडगीळ, तिरूवनंतपूरम्, केरळ. (१७.९.२०१६, सकाळी ९.३४)
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn