Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

प.पू. कालीदास देशपांडे आणि त्यांच्या पत्नी यांना नवीन ठिकाणी प्रसार करतांना झालेला विरोध अन् त्यांनी गुरुकृपेने त्यावर केलेली मात !

प.पू. कालीदास देशपांडे
१. नवीन ठिकाणी प्रसाराला गेल्यावर आधी 
बुद्धीप्रामाण्यवाद्यांच्या विरोधाला तोंड द्यावे लागणे 
         ‘नास्तिक आणि बुद्धीप्रामाण्यवादी यांच्यासाठी काळ सोकावला आहे. दुसरा काही चांगले करत असेल, तर त्याचे पाय कसे ओढायचे, त्याला खाली कसे पाडायचे, त्याला अनंत प्रश्‍न विचारून भंडावून कसे सोडायचे, यातच ते धन्यता मानतात. आरंभीच्या काळात नवीन ठिकाणी प्रसारासाठी गेल्यावर प्रथम यांना तोंड देणे भागच होते. एका मोठ्या हिंदुत्वनिष्ठ संघटनेचे काही कार्यकर्ते म्हणतात, ‘आम्ही धर्माला मानत नाही’; पण घरोघरी ते सणवार, कुळाचार, तीर्थयात्रा अशा सर्व कृती करतात; मात्र बोलतांना ‘ईश्‍वर वगैरे काही नाही, थोतांड आहे’, असे म्हणतात.
२. विरोधकांनी त्रास 
देण्यासाठी लढवलेल्या क्लृप्त्या
२ अ. सनातनचे कार्यक्रम होऊ न देण्यासाठी प्रयत्न करणे : आम्ही गावातच येऊ नये; म्हणून खोटी कारणे सांगितली जायची. ज्यांच्याकडे आम्ही मुक्कामाला जात होतो, त्यांच्याविषयी ‘तो गावाला गेलाय’, ‘घराला कुलूप आहे’, ‘आज कुणी येणार नाही’, असा निरोप ठेवला जायचा. हे नित्याचेच झाले होते. प्रवचनासाठी जागा निश्‍चित केली की, रात्रीच व्यवस्थापकाला भेटून, त्याला कैचीत पकडून, म्हणजे तो कर्जदार असेल, शेतसारा किंवा कर भरायचा असेल, त्याचे मूल शाळेत असेल, तर अशा नाजूक सूत्रावर बोट ठेवून प्रवचनाची जागा ऐनवेळी मिळू दिली जायची नाही. प्रवचन, सत्संग आणि बैठका घेण्यासाठी निश्‍चित केलेल्या ठिकाणी त्यांचे कार्यक्रम ठरवले जायचे. त्या ठिकाणची स्वच्छता, सिद्धता वगैरे सर्व आधी आम्हाला करू दिले जायचे आणि ऐनवेळी वरच्यांची चिठ्ठी आणून कार्यक्रम रहित करायला लावून आमचा वेळ वाया घालवला जायचा.
श्रीमती वसुधा देशपांडे
२ आ. सनातनच्या कार्यक्रमांना जाण्यापासून लोकांना परावृत्त करणे : प्रवचन करणे, सत्संग चालू करणे यांत अडथळे निर्माण करण्यासाठी काठ्या घेऊन ४ - ५ जणांना उभे केले जायचे. त्यातूनही आम्ही एखाद्या देवळात सत्संग चालू केलाच, तर घरोघरी प्रसार करून चौका-चौकात काठ्या घेऊन माणसे उभी असायची. ही माणसे प्रवचनाला अथवा सत्संगाला येणार्‍यांना परतवून लावयची. रात्री प्रवचनाला अथवा सत्संगाला आलेल्यांच्या घरी जाऊन ‘तुम्ही सत्संगात जाल, तर तुमच्या मुलांना चाकरीवरून काढू’, अशा धमक्या दिल्या जायच्या. एका व्यक्तीचा मुलगा एका अधिकोषात चाकरीला होता. त्यांना सत्संगाला गेल्यास मुलाला चाकरीतून काढण्याची धमकी देण्यात आली होती.
२ इ. गुरुपौर्णिमा महोत्सवाला लोकांनी येऊ नये; म्हणून विविध प्रकारे त्रास देणे : नवीन ठिकाणी गुरुपौर्णिमा साजरी करण्याचे नियोजन केल्यावर त्या ठिकाणी गुरुपौर्णिमेच्या दिवशी उत्सवाला लोकांनी येऊ नये; म्हणून त्यांना घाबरवण्यासाठी मुसलमानांशी हातमिळवणी करून ते त्या जागेभोवती गोल उभे राहून अचकट-विचकट बोलायचे. विजेची जोडणी तोडून वीजपुरवठा खंडित केला जायचा. उत्सव चालू असतांना मुद्दाम गाई-गुरांचा लोंढा त्या ठिकाणी घुसवला जायचा. पाणी मिळू दिले जायचे नाही. जेथे जेवणाची व्यवस्था केली होती, तेथे खोटे निरोप पाठवले की, ‘आज काही करू नका, पुन्हा केव्हा तरी करा.’ पूजा करणार्‍यांना वेळेत येता येऊ नये; म्हणून काहीतरी कारणे सांगून अडवून ठेवले जायचे. आम्हाला म्हणायचे की, पूजा नाही केली, तर काय होते ? सोडून द्या पूजा करण्याचा विचार !’ आम्हाला त्रास देणारे आणि विरोध करणारे स्वतः मात्र घरी जाऊन पूजा आणि नैवेद्य सर्व यथासांग करून आषाढी (गुरु) पौर्णिमा साजरी करायचे.
२ ई. शास्त्र समजून न घेता घराघरात भांडणे लावणे : देवघरात देवतांच्या मूर्तींची संख्या किती असावी, याविषयीचे शास्त्र सांगितल्यावर काही जणांनी याचा अपलाभ उठवून घरोघरी भांडणे लावली. ‘आम्ही ४ गणपति ठेवले; म्हणून यांचे काय जाते !’, असे बोलायचे. आम्हाला पूर्वकल्पना न देता, आधी न कळवता बैठक घ्यायचे आणि आम्हाला अनेक उलट-सुलट प्रश्‍न विचारून आमची थट्टा करायचे. आम्हीच कसे चुकीचे आहोत, हे दाखवले जायचे.
२ उ. प्रसारासाठी गेलेल्या पती-पत्नीला वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन एकच प्रश्‍न दोघांना विचारणे : आम्ही प्रसाराला दोघे (प.पू. देशपांडेकाका आणि मी) जात असलो, तर बोलत बोलत हेतूपुरस्सर आम्हाला दोन वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन घेराव केला जायचा आणि एकच प्रश्‍न दोघांनाही विचारले जायचे. आमची उत्तरे निरनिराळी आली, तर आम्हाला कैचीत पकडायची त्यांना एक संधी मिळेल, या हेतूने असे केले जायचे.
२ ऊ. अन्य संप्रदायांनुसार साधना करत असल्याची कल्पना न देता आपल्या सत्संगात येऊन शिकून घेऊन नंतर यायला जमणार नसल्याचे सांगणे : आम्ही अभ्यासवर्ग घ्यायचो, तेव्हा इतर संप्रदायातील साधक अचानक यायचे. आमच्या समवेत रहायचे आणि ‘प्रवचन कसे करायचे ? सत्संग कसा घ्यायचा ? प्रसार कसा करायचा ?’, हे शिकून घ्यायचे आणि नंतर आम्हाला सांगितले की, आम्ही एका संप्रदायानुसार साधना करत असल्याने तुमच्या सत्संगात येऊ शकत नाही.
२ ए. आध्यात्मिक त्रास असलेल्या जागा देणे अथवा अशा जागी बसण्याची अन् रहाण्याची व्यवस्था करणे : आध्यात्मिक त्रास असलेली घरे, वाईट शक्तींचा त्रास असणारी घरे, अशा ठिकाणी आमची रहाण्याची व्यवस्था केली जायची. आत्महत्या केलेली जागा, काही तरी गाडलेली जागा अशा ठिकाणी आसंदी ठेवून आमची बसण्याची व्यवस्था केली जायची. आमच्यावरून आम्हाला कळू न देता सहजतेने लिंबू उतरवले जायचे. काही वेळा उतारा अंगावर फेकणे, घरात बाहुल्या आणून टाकणे, भारीत करून प्राणी सोडणे, असेही केले जायचे. भारीत केलेले पाणी आम्हाला प्यायला दिले जायचे. अशा अनेक प्रसंगांना तोंड द्यावे लागायचे. असा त्रास देण्यामागे विरोधकांचा एकच हेतू असायचा, तो म्हणजे आमचे मानसिक खच्चीकरण करणे. मात्र गुरुकृपेने त्यातूनही आम्ही पार होत गेलो.
२ ऐ. चुकीचा रस्ता सांगून रात्री-अपरात्री अडकून पडावे, असा प्रसंग निर्माण करणे : नवीन गावाला जातांना काही व्यक्तींना रस्ता विचारल्यावर त्यांनी मुद्दाम चुकीचा रस्ता सांगितला. परतायला गाडी नाही, रहाण्याची सोय नाही, अशी आमच्यावर परिस्थिती येईल, अशी व्यवस्था केली जायची.
२ ओे. रात्रीच्या वेळी काही कल्पना न देता घरातून बाहेर काढणे आणि रिक्शात बसवून गावाबाहेरच्या मंदिरात सोडण्यास सांगणे : एका प्रसंगात आम्ही ज्यांच्याकडे रात्री मुक्कामाला जाणार होतो, त्यांच्याकडे प्रसार करून रात्री ११-११.३० वाजता गेलो असता धर्मद्रोह्यांच्या भीतीने त्यांनी आम्हाला कसे तरी जेवू दिले. नंतर आम्हाला काहीच कल्पना न देता रिक्शा बोलावून आमचे सामान भराभर रिक्शात भरले. अक्षरशः आमचे बखोटे धरून आम्हा उभयतांना रिक्शात बसवले आणि रिक्शावाल्याला गावाबाहेरच्या दत्तमंदिरात आम्हाला सोडण्यास सांगितले. रिक्शावाल्याने मंदिराच्या फाटकाजवळ सामान उतरवले आणि आम्हाला उतरवून काही न बोलता निघून गेला. रात्री १ ची वेळ. हाका मारल्यावर कसे तरी पुजार्‍याने बाहेर येऊन फाटक उघडले आणि ते त्यांच्या खोलीत निघून गेले. लहानसे मंदिर ! मंदिरात जनावरे, कुत्री यांनी सर्वत्र घाण केली होती. पाय ठेवायला जागा नव्हती. आम्ही एवढ्या रात्री मंदिर धुऊन स्वच्छ केले. सर्वत्र अंधार आणि ओले ! त्यामुळे एका जागी बसून सूर्यनारायणाची वाट बघत राहिलो. सकाळी पुन्हा नव्या दमाने प्रसाराला लागलो.
२ औ. सापांचे निवासस्थान असलेल्या जागी काही कल्पना न देता रात्री निवासाची व्यवस्था करणे : एका नवीन गावात आम्ही प्रसारासाठी गेलो होतो. तिथे रहाण्यासाठी मंदिराच्या खोल्या आहेत, असे आम्हाला सांगितले; म्हणून आम्ही वस्तीसाठी थांबलो. संध्याकाळी थोडे प्रसार करून खोलीकडे आलो. त्या खोल्या म्हणजे वापरात नसलेल्या झोपडीवजा जागा होत्या. त्या खोल्यांपर्यंत जाण्यासाठी वाटेत ४ - ५ फूट उंचीचे दाट गवत होते. आतमध्ये पुष्कळ शेण घालून भूमी सारवलेली असल्याने ती ओली होती. आम्ही कसे तरी एका ठिकाणी बसलो. मध्यरात्री तेथे सापाचे फुत्कार आणि मोठे मोठे साप त्यांच्या शेपट्या आपटत असल्याचे ऐकू येत होते. ‘ते ठिकाण सापांचे निवासस्थान होते’, असे नंतर आम्हाला समजले. सर्वत्र ओले, उग्र शेणाचा दर्प आणि सापांचा आवाज यांमुळे त्या जागेत बसणेही कठीण होते. तिथे झोप कशी येणार ?
३. सर्व विधी उघड्यावर करावे लागणे
         नवीन गावात गेल्यावर सर्व विधी (अंघोळीसहित) उघड्यावर करावे लागत. म्हणून आम्ही पहाटे ४ वाजताच उठून अंधारात थंड पाण्याने अंघोळ करत असू.
४. पोट भरण्यासाठी भिक्षा मागावी लागणे
         नवीन ठिकाणी गेल्यावर जेवणा-खाण्याची काहीच सोय नसायची. त्यामुळे आम्हाला अक्षरशः दारोदारी भिक्षा मागावी लागायची. गुरुदेवांनी सकाळी जेवण दिले, तर रात्रीचे जेवण कुठे असेल, हे ठाऊक नसायचे; पण त्यांनी कधीच उपाशी ठेवले नाही. सदोदित भिक्षेकरी ! त्यामुळे कशाचीच चिंता नसायची.
५. प्रसारासाठी फिरतांना पळसाची पाने गोळा 
करून त्यांचे द्रोण आणि पत्रावळी बनवून त्यांचा 
उपयोग चहा पिण्यासाठी अन् जेवणासाठी करणे
         भिक्षेत जे मिळेल, ते देवाचा प्रसाद समजून आम्ही ग्रहण करायचो. कुणी चहा दिला, तर कपबशी-पेला नसायचे किंवा भिक्षा मिळाल्यावर जेवण्यासाठीही ताट-वाटी, पेला असे काही नसायचे. मग दिवसभर फिरत असतांना आम्ही पळसाची पाने जमा करून ठेवायचो. या पानांचे द्रोण करून त्यांचा उपयोग चहा पिण्यासाठी करत असू आणि पत्रावळी करून जेवण करत असू.
         पुढे सत्संगाच्या साधकांमध्ये एकोपा व्हावा; म्हणून एकत्र जेवण ठेवले, तरी आलेल्या व्यक्ती आपल्याकडील वस्तू काढत नसत. अशा वेळीही याच पत्रावळी कामी येत.
६. ग्रंथप्रदर्शन लावल्यावर पोट
भरण्यासाठी व्यवसाय करत असल्याचे बोलणे
         नवीन नवीन ठिकाणी ग्रंथप्रदर्शन लावले की, आम्हाला म्हणायचे, ‘‘कमाई करून ठेवली नाही का ? आता भोगा ! हाही व्यवसाय करावा लागतो. पोटाला मरेपर्यंत लागणार ना !’’
७. कृतज्ञता
         हळूहळू समाजात पालट झाला. त्यांच्यातील त्यागाची कृती वाढली आणि आक्रमणेही न्यून झाली. तोपर्यंत केवळ गुरुकृपेनेच आम्ही सर्व विरोधकांना तोंड देत प्रसार करू शकलो. यासाठी गुरुदेवांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करावी तेवढी अल्पच !’
- श्रीमती वसुधा कालीदास देशपांडे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (११.८.२०१६)
         ‘प.पू. कालीदास देशपांडे आणि त्यांच्या पत्नी यांना नवीन ठिकाणी प्रसार करतांना किती कठोर प्रसंगांना तोंड द्यावे लागले आणि तरीही त्यांनी प्रसार कसा केला, हे या लेखात दिले आहे. प.पू. कालीदास देशपांडे संत असल्यामुळे एवढ्या प्रसंगांना तोंड देऊ शकले. प्रसारातील अडचणींविषयी साधक जेव्हा तक्रार करतात, तेव्हा त्यांनी हा लेख आठवावा, म्हणजे त्यांनाही कोणत्याही प्रसंगाला तोंड देण्याचे सामर्थ्य मिळेल.’ 
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले (१०.११.२०१६)
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn