Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

आणखी किती सैनिक हुतात्मा होणार ?

संपादकीय 
     अलीकडे सीमेवर आपले शूर सैनिक हुतात्मा झाल्याचे वृत्त आले नाही, असा दिवस नाही. ही वृत्ते प्रत्येक राष्ट्रभक्ताचे मन अस्वस्थ करतात. भारताने सर्जिकल स्ट्राईक केल्याच्या दिवसापासून पाक चांगलाच चेकाळला आहे. २९ नोव्हेंबरला जम्मूतील नगरोटा येथील सैनिकी छावणीवर पाकपुरस्कृत आतंकवाद्यांनी आक्रमण केले. यात २ सैन्याधिकार्‍यांसह ५ सैनिक हुतात्मा झाले. पाकने गेल्या ७ दिवसांत केलेले हे ७ वे आक्रमण होते. नगरोटा येथील छावणी ही सैन्याच्या १६ व्या कोअरचे मुख्यालय आहे. या मुख्यालयावर झालेले आक्रमण हे पठाणकोट आणि उरी येथील आक्रमणांइतकेच मोठे होते. म्हणूनच ते तितकेच गांभीर्याने घेण्याची आवश्यकता आहे.
     पाकला येनकेन प्रकारेण काश्मीरचे सूत्र धगधगत ठेवायचे आहे. त्यासाठी कोणत्याही थराला जाण्यास मागेपुढे तो पहात नाही. पाकमध्येही अनेक राजकीय गट-तट आहेत. तथापि तेथे सत्तापालट होऊन कोणीही जरी सत्तेवर आले, तरी त्यांच्या भारतविरोधी धोरणात पालट होत नाही. ही परिस्थिती सैन्यदल प्रमुखांच्या बाबतीतही आढळते. आताही पाकचे नवे सैन्यदल प्रमुख जनरल कमर जावेद बाजवा हे मावळते सैन्यप्रमुख राहिल शरिफ यांच्याकडून पदाची सूत्रे स्वीकारत असतांनाच नगरोटा येथे आक्रमण झाले. राहिल शरिफ यांनीच हे आक्रमण अत्यंत नियोजनबद्धरित्या घडवून आणल्याचे सांगितले जात आहे. पठाणकोट, उरी, नगरोटा आणि अन्य ठिकाणांवर एकापाठोपाठ झालेल्या आक्रमणांमुळे जगभरात भारताची नाचक्की झाली आहे; पण राजकारण्यांना त्याचे फारसे देणेघेणे दिसत नाही. सत्ताधारी तर अद्यापही सर्जिकल स्ट्राईकचेच गोडवे गाण्यात मग्न असल्याचे चित्र आहे. पाकसारख्या हिरव्या विषारी सापांना सर्जिकल स्ट्राईकची नव्हे, तर युद्धाचीच भाषा कळते, हे मात्र कोणी उघडपणे सांगायला पुढे येत नाही. विरोधक संसदेत नोटांमध्ये अडकलेले दिसून येतात. खरे तर नगरोटा येथील आक्रमणाचा प्रतिशोध सरकार कधी घेणार, असा राष्ट्रहितैषी प्रश्‍न विचारत विरोधकांनी संसदेत सरकारला धारेवर धरायला हवे होते; मात्र विरोधकांना नोटांचीच काळजी अधिक असल्याने असे चित्र दिसले नाही. भारताचे सैनिकी सामर्थ्य पाकपेक्षा कित्येक पटीने अधिक आहे. तरीही पाकसारखे एक फडतूस राष्ट्र महासत्ता बनू पहाणार्‍या बलाढ्य भारताला नाकेनऊ आणत आहे. ही गोष्ट जितकी लज्जास्पद आहे त्याहीपेक्षा अधिक ती संतापजनक आहे. 
आतंकवादी सैन्य छावणीपर्यंत पोचतातच कसे ?
      प्राथमिक अंदाजानुसार आतंकवाद्यांनी नगरोटा येथील छावणीत मागील बाजूस असणारी भिंत ओलांडून येथील मुख्यालयाच्या परिसरात प्रवेश केला असावा, असे वृत्त एका वृत्तपत्राच्या संकेतस्थळाने प्रसारित केले आहे. त्यानंतर आतंकवाद्यांची सैन्याशी चकमक झाली. यात तिन्ही आतंकवादी मारले गेले; पण आपली ७ रत्ने आपण गमावली. पठाणकोटला असेच आतंकवादी एकाकी घुसले होते. त्यापाठोपाठ उरी येथील सैन्य मुख्यालयात सहज प्रवेश मिळवला आणि आताही नगरोटा येथील सैन्य मुख्यालयात घसून आतंकवाद्यांनी विध्वंस घडवून आणला. यावरून कोणालाही शिरणे अशक्य असलेल्या कडेकोट (?) सुरक्षा व्यवस्थेतेतील सैन्य मुख्यालयांमध्ये शस्त्रसज्ज आतंकवादी घुसतातच कसे ?, हा प्रश्‍न सर्वसमान्यांच्या मनात घर करून आहे. याचे उत्तर सरकारने जनतेला दिले पाहिजे. दुसरे असे की, गुप्तचर यंत्रणांनी आतंकवाद्यांकडून मोठे आक्रमण होण्याची शक्यता असल्याची पूर्वकल्पना दिली होती, अशाही बातम्या अनेक वृत्तपत्रांच्या संकेतस्थळांवर प्रसारित झाल्या आहेत. हे सत्य असेल, तर पूर्वकल्पना देऊनही हे आक्रमण कसे झाले, याचा खुलासा करण्याचे दायित्व पुन्हा सरकारचे रहाते.
सरकारने कठोर कृती करावी, जनतेचा पाठिंबा आहेच !
    भारतीय नेतृत्वाने युद्धाविषयी नुकतेच एक विधान केले. युद्ध करा असे म्हणणे सोपे आहे; पण त्याच्या परिणामांना सामोरे जाण्याची किती जणांची सिद्धता आहे ? एकदा युद्ध चालू झाले की, इंधन, अन्नधान्य सर्व महाग होते. त्याला सामोरे जाण्याची सिद्धता आहे का ?, असे म्हटले. अशा आशयाचे ते विधान होते. तथापि जी जनता काळ्या धनाच्या उच्चाटनासाठी २ मास नोटाबंदीचा त्रास सहन करून राष्ट्रोत्थानाच्या कार्याला हातभार लावू शकते, ती जनता राष्ट्रहितार्थ कुठल्याही कठीण परिस्थितीला सामोरे जाऊच शकते. कारण त्यांच्या अंगी छत्रपती शिवाजी महाराजांसह अनेक थोर राष्ट्रपुरुषांकडून घेतलेली प्रेरणा आहे. जनतेची ही सिद्धता आणि सज्जता आजचीच आहे असे नाही, तर पूर्वीपासून ती होतीच; पण तेव्हा वानवा होता ती राजकीय इच्छाशक्तीची. त्यामुळे सरकारने पाकला समजेल अशा भाषेत निदान उत्तर तरी त्वरित दिले पाहिजे. युद्ध कोणालाही नकोच आहे. तथापि शत्रूलाच ते हवे असेल किंबहुना त्यादृष्टीने त्याची प्रतीदिनची आक्रमणे असतील, तर गप्प बसावे का ? ७ दिवसांत ७ वेळा केेलेल्या आक्रमणाला युद्ध म्हणायचे नाही तर काय म्हणायचे, हेही सरकारने जनतेला सांगितले पाहिजे. सरकारने पाकच्या विरोधात उचलेल्या कोणत्याही कठोर पावलाचे भरभरून कौतुक होते, हे सर्जिकल स्ट्राईकवरून स्वत: सरकारनेच अनुभवले आहे. आताही सरकार पाकविरोधात जी कठोर पावले उचलील त्यासाठी जनता सरकारच्या मागे खंबीरपणे उभी राहील, यात शंका नाही. आपला देश सर्वदृष्ट्या बलाढ्य आहे, यात तीळमात्र शंका नाही; परंतु बलवान जर कृतीहीन बनले, तर ते निंदेस पात्र ठरतात, हे लक्षात घेऊन सरकारने पाकच्या विरोधात निर्णायक लढा द्यावा अन्यथा आणखी किती सैनिक मरू देणार ?, असा प्रश्‍न जनतेने सरकारला विचारण्याचे दिवस दूर नाहीत.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn