Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

स्वतःच्या घरापासून आश्रमजीवनाचा आरंभ करून साधकांना नेहमी साहाय्य करणारे ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे महर्लोकवासी रंजन देसाईकाका !

रंजन देसाई
प.पू. डॉक्टरांनी देसाईकाकांची 
साधना चांगली चालू असल्याचे सांगणे 
     ५ मासांपूर्वी (महिन्यांपूर्वी) माधवबाग येथील आयुर्वेदिक उपचार घेण्याविषयी रंजन देसाई यांना विचारले होते. त्या वेळी काकांनी साधनेसाठी आणखी काय केले पाहिजे ?, असे विचारले होते. तेव्हा प.पू. डॉक्टर म्हणाले होते, मला आता रंजन देसाई यांची काळजी नाही. त्यांची साधना चांगली चालली आहे. ते आता पूर्वीचे राहिलेले नाहीत. त्यांच्यात पुष्कळ चांगले पालट आहेत. - एक साधक 
रंजन देसाई यांनी आधीच गाठली होती ६१ टक्के आध्यात्मिक पातळी ! 
     मी वरील वाक्य म्हणालो होतो; कारण रंजन देसाई यांनी ६१ टक्के पातळी गाठली होती, म्हणजे जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून ते मुक्त झाले होते. त्यांची पातळी जाहीर करणे त्यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे पुढे पुढे ढकलले जात होते. आता त्यांनी देहत्याग केला असला, तरी त्यांना त्यांची पातळी आतून ज्ञात आहे.
     त्यांच्या त्यागाचे एक उदाहरण म्हणजे त्यांनी साधनेला आरंभ केल्याकेल्याच त्यांच्या कुडाळ येथील कारखान्याच्या परिसरातील एक इमारत सनातन संस्थेला दिली. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात सनातन संस्थेच्या कार्याला चालना मिळाली. - (परात्पर गुरु) डॉ. आठवले
     सनातनचे रंजन देसाई यांच्या मृत्यूनंतरचा आज बारावा दिवस आहे. त्यानिमित्ताने त्यांची गुणवैशिष्ट्ये पाहूया.
     कुडाळ (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील सनातन सेवाकेंद्रात असतांना रंजन देसाईकाकांच्या समवेत मला विविध सेवा करायला मिळाल्या. त्यांनी मला पूर्णवेळ साधक होण्यास बरेच साहाय्य केले. त्या काळात मला त्यांच्याकडून शिकायला मिळालेली प्रातिनिधिक सूत्रे पुढे देत आहे.
१. रंजन देसाईकाका यांनी पहिल्या भेटीतच बैल
आणि गायी विकून पूर्णवेळ साधना करण्यास सांगणे
    १९९७ या वर्षी परुळे (जिल्हा सिंधुदुर्ग) या गावी एका जाहीर सभेच्या वेळी माझी श्री. रंजन देसाईकाकांशी ओळख झाली. पहिल्या भेटीतच त्यांनी मला सांगितले, दादा, तुम्ही तुमचे बैल आणि गायी विका अन् सेवाकेंद्रात पूर्णवेळ साधना करा. देव तुमची काळजी घेईल ! या बोलण्यामुळे प्रारंभी मला त्यांचा थोडा राग आला. माझ्या मनात विचार आले, काका असे कसे म्हणतात ? शेती, बैल आणि गायी यांच्यावर आमचा उदरनिर्वाह आहे. त्यांच्याविना आमचे कसे होणार ? त्यानंतर त्यांनीही साधनेसाठी भांड्यांचे आस्थापन (कंपनी) विकण्याविषयी सिद्धता केली, असे मला सांगितले. (ईश्‍वरावरील श्रद्धेच्या बळावर आणि साधनेत प्रगती करण्याच्या त्यांच्यातील तळमळीमुळे साधक त्याग करून पूर्णवेळ साधना करतात. - संकलक)
२. घरगुती अडचणीमुळे घरी रहाणार्‍या साधकाची अडचण समजून 
घेऊन त्याच्यासाठी एका मासाला (महिन्याला) खर्चाला पुरतील एवढे पैसे पाठवणे
     त्या वेळी एक साधक पूर्णवेळ सेवेत होता; पण त्याच्या घरगुती अडचणीमुळे (पत्नी गरोदर असल्यामुळे) तो काही दिवस घरी थांबला. तेव्हा काकांनी त्याची अडचण समजून घेतली आणि त्याला एका मासाला (महिन्याला) पुरतील एवढे पैसे माझ्या हस्ते पाठवले. त्यामुळे तो पुन्हा सेवाकेंद्रात सेवेला येऊ लागला. या प्रसंगातून मला साधकांविषयी प्रेम कसे असायला हवे ?, ते शिकायला मिळाले. 
३. साधकांची आवड आणि कौशल्य पाहून त्याप्रमाणे त्यांना सेवा देणे 
अन् साधकाची आर्थिक अडचण समजून घेऊन त्याला त्या दृष्टीने साहाय्य करणे 
    देसाईकाका सेवाकेंद्रात असणार्‍या साधकांना कोणती सेवा आवडते ? त्यांच्याकडे कोणते कौशल्य आहे ? यांविषयी पूर्ण अभ्यास करून त्यांच्या सेवेचे नियोजन करत होते. एक साधक इतर सेवेत आळस करत होता. काकांनी त्याच्या आवडीची सेवा शोधून त्याला चारचाकी वाहन शिकण्यासाठी पाठवले. त्यामुळे तो अजूनही साधनेत स्थिर आहे. मी पूर्णवेळ साधक होण्यापूर्वी माझे कुटुंब आणि आर्थिक अडचणी यांचा विचार करून त्यांनी मला प्रथम त्यांच्या आस्थापनामध्ये कामाला ठेवून घेतले. त्या पगारातून मला घर चालवणे सोयीस्कर झाले. उरलेल्या आणि सुट्टीच्या वेळी आश्रमातील सेवा, तसेच प्रतिदिन मुद्रणालयातून येणार्‍या गाडीने परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यासाठी नारळाची शहाळी काढून पाठवणे, दैनिक सनातन प्रभातचे वितरण करणे, तसेच फणस आणि जांभळे काढून इतर सेवाकेंद्रांमध्ये पाठवणे अशा प्रकारे काकांनी माझ्या सेवांचे नियोजन केले. 
४. घरी असलेल्या गायीकडे लक्ष जात असल्याने काकांनी ती सेवाकेंद्रात आणायला सांगून आणखी
गायी अन् म्हशी घेऊन गोशाळा चालू करणे आणि दुचाकी शिकण्यास सांगून दुचाकीही घेऊन देणे
      घरी असलेल्या गायीकडे माझे लक्ष वेधले जात असे, यासाठी काकांनी मला घरची गाय सेवाकेंद्रात आणायला सांगितली आणि आणखी काही गायी अन् म्हशी पाळून सेवाकेंद्रात गोशाळा चालू केली. प्रत्येक आठवड्याला गायीचे खाद्य, चारा आणि त्यांचा आजार यांची चौकशी करून ते आय-व्ययाकडे (जमा-खर्चाकडे) लक्ष देत असत. माझ्या गायीच्या दुधाच्या व्ययातून (खर्चातून) मिळालेले ५ सहस्र रुपये त्यांनी माझ्याकडे दिले. नंतर त्यांनी मला दुचाकी शिकण्यास सांगितले. ती शिकल्यावर मला ७ सहस्र रुपये किमतीची एक जुनी दुचाकी घेऊन दिली. त्यामुळे मला गायींचे खाद्य, चारा आणणे आणि इतर सेवा करता येऊ लागल्या अन् वयाच्या ३८ व्या वर्षांनंतरही मला त्यांच्यामुळे दुचाकी शिकायला मिळाली.
५. दुचाकीचे पैसे काकांनी न घेणे आणि व्यवहारात तारतम्य, 
काटकसर अन् अध्यात्माची जोड देऊन कसे वागावे, ते काकांकडून शिकायला मिळणे
      गोशाळा बंद करण्यात आली, तेव्हा मी गाडीचे पैसे त्यांना द्यायला गेलो. तेव्हा ते म्हणाले, गायींचा सर्व व्यय (खर्च), त्यांचे दूध आणि खाद्य यांचा हिशोब यांतून माझे पैसे मला मिळाले. गोबरगॅसमुळे सेवाकेंद्रासाठी लागणारे सिलेंडर वाचले. यात माझी काही हानी (नुकसान) झाली नाही. तुमच्या कष्टांमुळे या गाडीचे पैसे उरले, ते माझे नाहीत. ही गाडी तुमचीच आहे. तेव्हा व्यवहारातही तारतम्य, नियोजन, काटकसर आणि अध्यात्माची जोड देऊन कसे करावे ?, हे मला काकांकडून शिकायला मिळाले.
६. स्वस्त भावात फळे घेऊन ती साधकांना देणे आणि अनेक ठिकाणी गोशाळा 
पहाण्यासाठी समवेत घेऊन जाणे अन् तेथील सर्वकाही अभ्यास करून शिकून घेण्यास सांगणे
     काका कोल्हापूर आणि बेळगाव येथे स्वतःच्या कामासाठी जात. तेव्हा येतांना द्राक्षे, तसेच इतर फळे आणि कांदे स्वस्त भावात आणून साधकांना देत असत. हंगामी फणस आणि जांभळे साधकांकडून काढून घेऊन ती इतर सेवाकेंद्रांमध्ये पाठवत होते. एकदा बांदा येथील अननसाच्या बागेची पाहणी करून माहिती घेऊन शिकण्यासाठी त्यांनी मला त्यांच्या समवेत नेले. येतांना अननसाची रोपे खरेदी करून ती आपल्या बागेत लावली आणि त्यानंतर आलेली फळे परगावाहून आलेल्या साधकांना आणि सेवाकेंद्रांमध्ये देण्याचे नियोजन काका करायचे. अनेक ठिकाणी गोशाळा पहाण्यासाठी मला समवेत घेऊन जायचे. तेथील सर्व अभ्यास शिकून घ्यायला सांगायचे. गावठी वैद्य आणि पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याशी जवळीक ठेवायला सांगायचे.
७. गोपालन आणि वृक्षसेवा हे काकांच्या आवडीचा विषय 
असणे अन् गायींना चरायला घेऊन जाण्यात त्यांना आनंद मिळणे
     गोपालन आणि वृक्षसेवा हे काकांच्या आवडीचे विषय होते. सकाळी लवकर उठून गोठ्यात माझ्यासमवेत यायचे आणि गायींच्या पाठीवर प्रेमाने हात फिरवायचे. काही गायींना चरायला घेऊन जायचे. यातून त्यांना आनंद मिळायचा. एकदा त्यांच्या आस्थापनातील कामगारांनी संप केला. तेव्हा ते म्हणाले, आस्थापन बंद झाले, तर आपण येथे परात्पर गुरु डॉ. आठवले यांना विचारून गोशाळा काढूया. तपोधाम सेवाकेंद्रात गीर गायी आणल्या, तेव्हा ते वारंवार तेथील उत्तरदायी साधकांकडे गायींविषयी चौकशी करायचे. 
८. गायीच्या आय-व्ययाविषयी (जमा-खर्चाविषयी) चर्चा करून गोमूत्र अर्क चालू करण्यास 
सांगणे आणि काकांनी आंबे काढणे, पेट्या सिद्ध करणे, आंबे पेट्यांमध्ये भरणे इत्यादी सेवा शिकवणे
      एकदा रात्री १.३० वाजेपर्यंत गायीच्या आय-व्ययाविषयी (जमाखर्चाविषयी) चर्चा करून काकांनी गोमूत्र अर्क त्वरित चालू करण्यास सांगितले आणि तेथील उत्तरदायी साधकाला सांगून त्याविषयी ते त्याचा पाठपुरावा घेत होते. यातून त्यांना गुरुकार्याविषयी वाटणारी तळमळ मला शिकायला मिळाली. आमच्या घरी आंब्याची झाडे नव्हती. त्यामुळे मला त्याविषयी काही ठाऊक नव्हते. यासाठी त्यांनी मला आंबा बागायतदार व्यक्तीकडून जाणून घेण्यास सांगितले आणि त्यांनी मला सेवाकेंद्रातील बागेत लागलेले आंबे काढणे, पेट्या सिद्ध करणे, आंबे त्यात भरणे इत्यादी सेवा शिकवल्या. त्याचा लाभ मला तपोधाम आणि रामनाथी येथील लागवडची सेवा करतांना झाला.
९. वाहन परवाना काढण्यासाठी साधकांना साहाय्य करणे
      सिंधुदुर्गामध्ये साधक वाहन चालवायला शिकत होते. तेव्हा देसाईकाका चालकासमवेत बसून त्यांची अंतिम चाचणी घेत असत. साधकांची सिद्धता पाहून त्यांना ते गर्दीच्या ठिकाणी घेऊन जायचे आणि ते नंतर त्याला प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आर्.टी.ओे. कायमस्वरुपी परमनंट) परवान्यासाठी पाठवायचे. 
१०. कुडाळ सेवाकेंद्राचा आरंभ काकांच्या घरातच होणे
       कुडाळ सेवाकेंद्राचा आरंभ काकांच्या घरात झाला. तेथेच प्रसाद-महाप्रसाद (अल्पाहार आणि जेवण) बनवून तो साधकांना मिळत असे. साधकसंख्या वाढत गेल्यावर काकांनी त्यांच्या आवारातील जागा सेवाकेंद्रासाठी दिली. संस्थेचे कार्य वाढत गेले, तेव्हा काकांनी त्यांच्या कार्यालयातील सर्व सामान ठेवायची आणि गोडाऊनची जागाही सेवाकेंद्रासाठी दिली. 
११. प्रकृती ठीक नसल्यामुळे भेटायला गेल्यावर बोलण्याची 
स्थिती नसतांनाही त्यांनी गीर गायी घेण्याविषयी सांगणे
      नोव्हेंबर २०१६ मध्ये मी घरी गेलो होतो. त्या वेळी त्यांना भेटायला गेल्यावर मला पाहून ते लगेच उठून बसले. त्यांची बोलण्याची स्थिती नसतांनाही त्यांनी गीर गायी घ्या. काही अडचण असल्यास साधकांचे साहाय्य घ्या, असे सांगितले. मी त्यांना श्‍वास लागत असल्यामुळे थांबवण्याचा पुष्कळ प्रयत्न करत होतो. शेवटी तुमची प्रकृती ठीक झाल्यावर पाहूया, असे सांगून मी त्यांचा निरोप घेतला. नंतर १६.११.२०१६ या दिवशी त्यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे त्यांना कुडाळ येथील खाजगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात ठेवले होते. 
१२. साधकांची आध्यात्मिक पातळी ६० टक्के झाल्यावर काकांना पुष्कळ आनंद व्हायचा आणि लगेच ते त्यांना भ्रमणभाष करायचे. 
१३. कृतज्ञता आणि प्रार्थना
      १७ वर्षांच्या कालावधीत देसाईकाकांकडून मला पुष्कळ शिकायला मिळाले आणि त्यांचे वेळोवेळी साहाय्यही मिळाले, याविषयी त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करतो. तसेच त्यांच्या आत्म्याला सद्गती मिळावी आणि त्यांची उत्तरोत्तर प्रगती व्हावी, यांसाठी मी प.पू. डॉक्टरांच्या चरणी प्रार्थना करतो. 
- श्री. रामचंद्र कुंभार, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२१.११.२०१६)
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn