Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अवतारी कार्याची ओळख महर्षि, संत आणि नाडीवाचक यांनी जगाला करून देणे अन् सर्व समष्टी ठायी प.पू. डॉक्टरांचे तत्त्वच कार्यरत असल्याचे अनुभवणे

पू. डॉ. चारुदत्त पिंगळे
परात्पर गुरु श्री श्रीजयंत बाळाजी आठवले, 
हेच श्रीहरि विष्णूचे कलियुगातील बुद्ध 
अवतार, म्हणजे समष्टीची बुद्धी शुद्ध करणारा !
     ‘परात्पर गुरु डॉ. आठवले हे श्रीहरि विष्णूचे कलियुगातील बुद्ध अवतार आहेत. बुद्ध अवतार म्हणजे समष्टीची बुद्धी शुद्ध करणारा अर्थात् गुरुभक्तीद्वारे साधना (गुरुकृपायोगाद्वारे) करून ज्ञानाच्या आधारावर समाजाला धर्म आणि राष्ट्र यांप्रती जागृत अन् क्रियाशील करणारा ज्ञानशक्तीरूपी अवतार !’ - पू. डॉ. चारुदत्त पिंगळे, उत्तरभारत प्रसारसेवक
१. परात्पर गुरु (डॉ.) आठवले यांच्या अवतारी कार्याची महर्षि, 
महर्षितुल्य संत आणि नाडीवाचक यांनी जगाला ओळख करून देणे
     ‘समाज, साधक आणि शिष्य कधी श्रीगुरूंना ओळखू शकत नाहीत. जे अवतार श्रीगुरुरूपात कार्य करत असतात त्यांना ओळखणे अशक्य कोटीतील असते. त्यामुळे अशा वेळी तेच आपल्या अवतारत्वाची शिष्यांना अनुभूती, तर साधक आणि समाजाला ओळख करून देतात. इतकेच नव्हे, तर विष्णूच्या अवतार कार्याची ओळख त्यांचे भक्त आणि अखिल मानवजातीला व्हावी; म्हणून संत, महर्षि, सप्तर्षि इत्यादी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रूपात आपला वाटा उचलत असतात. गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी, प.पू. योगतज्ञ दादाजी वैशंपायन, प.पू. कर्वेगुरुजी, प.पू. आबा उपाध्ये, यांसारखे महर्षितुल्य संत प.पू. डॉक्टरांच्या अवतारी कार्याविषयी साधक अन् समाजाला ओळख करून देत आहेत. याचबरोबर सप्तर्षि जीवनाडीच्या माध्यमातून महर्षि पू. ॐ उलगनाथन्, भृगुसंहितेच्या माध्यमातून भृगुवंशज श्री. विशाल शर्माजी आणि पंडित लालदेव शास्त्री अन् अनेक नाडीसंहितांच्या माध्यमातून अनेक महर्षि वंशज प.पू. डॉक्टरांचे अवतारी कार्य, तसेच हिंदु राष्ट्राविषयी जगाला ओळख करून देत आहेत.
२. साधनेत प्रारंभी कर्मकांडाची उपासना करणार्‍या नातेवाइकांना अल्प लेखणे आणि 
‘प.पू. डॉक्टर अवतारी असल्याचे मला कळले आहे’, असा सूक्ष्म अहंभाव निर्माण झाल्याची जाणीव होणे
      प्रारंभी मी साधनेत आलो आणि सनातन संस्थेच्या कार्याविषयीचे महत्त्व कळले. साधना चालू झाली, तेव्हा सनातन संस्था ही इतर संस्थांच्या तुलनेत वेगळी आहे आणि ‘प.पू. डॉक्टर हे इतर संतांपेक्षा वेगळे आहेत. ते अवतारी आहेत’, याची अनुभूती आली. माझी साधना नुकतीच चालू झाल्याने माझे मन आणि चित्त अशुद्धच होते. त्या काळात घरी किंवा नातेवाईक जे कर्मकांडाची उपासना करायचे, त्यांना मी अल्प लेखत असे. मला श्रीगुरु आणि सनातन संस्था यांच्याविषयी जे वाटते, ते योग्य असले, तरी ‘कर्मकांड किंवा कर्मकांड करणार्‍यांना अल्प लेखणे’, हा माझा अहंभाव असल्याचे माझ्या लक्षात येत नव्हते. काही वर्षांनी प.पू. डॉक्टरांनी साधकांना स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रिया करण्यास सांगितले. नंतर एका सत्संगामध्ये मला ‘तुम्ही स्वत:ला अन्य साधनामार्गी किंवा नातेवाईक यांपेक्षा वेगळे समजता का ? मी करतो तीच साधना श्रेष्ठ आणि इतर करतात, ती कनिष्ठ असा मनात भेद असतो का ?’, असा प्रश्‍न विचारला. त्यानंतर मला थोडे अंतर्मुख व्हायला झाले. मला माझ्या वेगळेपणाची, म्हणजे अहंभावाची जाणीव झाली. ‘नातेवाईक किंवा समाजातील अन्य व्यक्तींना सनातन संस्थेचे कार्य लक्षात येत नाही. ते प.पू. डॉक्टरांना ओळखू शकत नाहीत. त्यांची प.पू. डॉक्टरांवर श्रद्धा नाही’, असे अहंभावी विचार माझ्या मनात होते. साधनेच्या प्रारंभी प.पू. डॉक्टरांविषयी आलेल्या अनुभूतींमुळे माझ्या मनात ‘प.पू. डॉक्टर अवतारी असल्याचे मला कळले आहे’, असा सूक्ष्म अहंभाव निर्माण झाल्याची जाणीव झाली. 
३. प.पू. डॉक्टरांचे अध्यात्मप्रसाराचे कार्य अनेक आयामांमध्ये 
अनेक पटींनी वाढल्यानंतर प.पू. डॉक्टरांनी ‘गुरूंना शिष्य किंवा साधक 
ओळखू शकत नाही, त्यांच्या कार्याची गती पकडू शकत नाही’, याची अनुभूती देणे
      कालांतराने प.पू. डॉक्टरांचे अध्यात्मप्रसाराचे कार्य एखादे कमळ उमलावे, तसे अल्प काळात अनेक आयामांत अत्यंत गतीने पसरायला लागले. त्या वेळी ते मला आणि अनेक साधकांना पेलवेनासे झाले. यातून प.पू. डॉक्टरांनी प.पू. भक्तराज महाराज यांच्या ‘गुरु की खसखस, चेले कि बस बस’ या वाक्याची अनुभूती आम्हाला दिली आणि ‘आपले गुरु अवतारी आहेत आणि महर्षींनी सांगितल्याप्रमाणे त्यांच्या अवतारी कार्याचा पुढील टप्पा चालू झाला अन् त्यांच्या कार्याचा वेग आता कोणाला पकडता येणार नाही’, याची जाणीव झाली. यातून ‘मी माझ्या गुरूंना अंशत:ही ओळखू शकत नाही’, हे लक्षात आले; परंतु हे लक्षात आणून देणे, ही त्यांची आम्हा साधकांवर अत्यंत प्रीती, दया, करुणा आणि कृपा होती. त्यामुळेच ‘मी प.पू. डॉक्टरांना ओळखले आणि मी गुरुकार्य करू शकतो’, या अहंभावी विचार आणि संस्काराला छेद मिळाला. त्यानंतर खर्‍या अर्थाने अहंभावावर मात करण्याची अन् शरणागतीची प्रक्रिया चालू झाली.
४. सनातनवर विविध आरोप होण्यास आरंभ होणे, त्याला तोंड 
देत सनातनचे कार्य अनेक पटींनी वाढणे आणि ‘श्रीगुरूंची जेवढी 
ओळख होत जाईल, तेवढे साधक त्यांना जाणू शकतील’, याची जाणीव होणे
     कालांतराने सनातनवर पोलीस, प्रशासन, राजकारणी आणि सत्ताधारी यांच्याकडून विविध आरोप होऊ लागले. सनातनला नष्ट करण्याचे त्यांचे आटोकाट प्रयत्न चालू झाले आणि ते सध्याही चालू आहेत. या सगळ्यांना तोंड देत सनातनचे कार्य अनेक पटींनी वाढत आहे. हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्यावर आज समाजाला सनातनचा आधार वाटायला लागला, ही प.पू. डॉक्टरांच्या अवतारी कार्याची प्रचीती होय. गुरुचरणांच्या धुळीलाही जाणणे अशक्य असून श्रीगुरूंची जेवढी ओळख होत जाईल, तेवढे साधक त्यांना जाणू शकतील, याची जाणीव झाली. यामुळे ‘मी त्यांना ओळखले आहे’, हा माझा अहंभावही विरघळू लागला. पुढे महर्षींच्या आज्ञेनुसार वेळोवेळी साधकांना आवश्यक ते कर्मकांडातील विधीही करण्यास सांगितले. त्यामुळे कर्मकांडातील विधींवरही प्रेम निर्माण झाले. हिंदूसंघटनाचे कार्य करतांना इतर साधना मार्गातील साधक किंवा अन्य हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते इत्यादींविषयी प्रेम निर्माण होऊन व्यापकता निर्माण झाली. ही तर परात्पर गुरु डॉ. आठवले यांची अनन्य कृपा आहे ना !
५. महर्षींनी प.पू. डॉक्टरांच्या अवतारी कार्याविषयी संकीर्तन करतांना 
काळही स्तंभित होणे आणि प.पू. डॉक्टरांच्या संकीर्तनामुळे साधकांमध्ये भावभक्ती निर्माण 
होणे अन् त्यासाठी साधकांनी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती बोबडी आणि तोकडी असणे
      आम्ही साधक त्यांना जाणण्यात अल्प पडल्याने प.पू. डॉक्टरांच्या अवतारी कार्याची महती सांगण्यासाठी ब्रह्मर्षि आणि महर्षि यांना त्यांची ओळख करून देण्यास पुढे यावे लागले. त्यांना प.पू. डॉक्टरांच्या अवतारी कार्याची थोरवी आम्हाला सांगावी लागते. असे असले, तरी प.पू. डॉक्टरांची आम्हा साधकांवर प्रीती, दया आणि करुणा हीच की, नाडीवाचनाच्या माध्यमातून महर्षि प.पू. डॉक्टरांच्या अवतारी कार्याविषयी संकीर्तन करतात, तेव्हा केवळ साधकच नव्हे, तर काळसुद्धा स्तंभित होेऊन त्यांच्या संकीर्तन भक्तीत देहभान हरपून जातो. आपल्या इष्टाचे संकीर्तन करणे किंवा त्यांच्याविषयी होणारे संकीर्तनाचे श्रवण करणे, हे किती अविट आहे, याची अनुभूती त्यांनी आम्हा सर्व साधकांना दिली. आपल्या श्रीगुरूंना आपण ओळखू शकत नाही, हे अनुभवल्यानंतर त्यांची महिमा संकीर्तन करणारा कोणी वक्ता सतत लाभावा, ही आस साधकांच्या मनी सुप्तपणे असते. तसेच ‘आपल्या श्रीगुरूंचा जो काही महिमा कळला, तो इतरांना सांगत सुटावे’, अशी तळमळ साधकांमध्ये निर्माण होते. ही भावभक्ती प.पू. डॉक्टरांनी आम्हा साधकांमध्ये निर्माण केली. ही त्यांची आम्हा साधकांवरील अपार करुणा अन् कृपा आहे. त्यासाठी आम्ही सर्व साधक त्यांच्या चरणी शब्दांत कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरीही ती बोबडी अन् तोकडी आहे. 
६. प.पू. डॉक्टरांच्या मुखातून निघालेला प्रत्येक शब्द, त्यांनी केलेले धर्म आणि 
राष्ट्र विषयक लिखाण हे सर्व चिदाकाशाला (विश्‍वमन आणि विश्‍वबुद्धी यांना) व्यापून असणे
      जयपूरला असतांना एक प्रसंग घडला. एका जिज्ञासूने सांगितले, ‘‘त्यांच्या संपर्कातील श्री. सुखपालजी महाराज उपाख्य दाजी यांना सनातनचे श्री दुर्गादेवीचे चित्र दाखवले. त्या वेळी त्यांना जाणवले की, तिच्या हातातील सुदर्शन चक्र कार्यान्वित असून त्यायोगे बारा कोस (अंदाजे ४२ कि.मी.) दूरवरच तुमच्यावर येणारे कोणतेही संकट दूर होईल.’’ त्या वेळी ‘आपल्या गुरूंच्या कार्याला जाणू शकणारी एक विभूती आहे’, ही जाणीव होऊन त्यांना भेटण्याची ओढ निर्माण झाली. ‘ते निश्‍चित चांगले संत असणार आणि त्यांच्यावर गुरुकृपा असणार’, असे वाटले. त्यांना भेटून त्यांच्या मुखातून प.पू. डॉक्टरांच्या कार्याविषयी जाणून घ्यावे, यासाठी मी त्यांच्या भेटीसाठी गेलो होतो. तेव्हा त्यांनी सांगितलेली बहुतांश सूत्रे प.पू. डॉक्टर सांगतात, त्यानुरूपच होती. प.पू. डॉक्टरांच्या मुखातून निघालेला प्रत्येक शब्द त्यांनी केलेले राष्ट्र आणि धर्म विषयक लिखाण हे सर्व चिदाकाशाला (विश्‍वमन आणि विश्‍वबुद्धी यांना) व्यापून गेले असल्याचे जाणवले. 
७. परात्पर गुरूंच्या अस्तित्वाने आणि संकल्पाने वैचारिक आणि बौद्धिक धर्मक्रांतीची प्रक्रिया 
कशी असू शकते, याची प्रत्यक्ष अनुभूती श्री. सुखपालजी महाराज (दाजी) यांच्या भेटण्याने होणे
      प.पू. डॉक्टरांचे संकल्प आणि अस्तित्व यांमुळे त्यांचे विचार विश्‍वमन अन् विश्‍वबुद्धीतून प्रथम चिदाकाशात प्रवेश करतात. नंतर ते विचार उन्नत संत किंवा गुरु, शिष्य, साधक आणि समाज यांच्या चिदाकाशात संक्रमित होतात. त्यानंतर अवतारांकडून खर्‍या अर्थाने आध्यात्मिक क्रांती घडते. याची प्रत्यक्ष प्रचीती मला आली. अवतार किंवा परात्पर गुरूंच्या अस्तित्वाने आणि संकल्पाने वैचारिक आणि बौद्धिक धर्मक्रांतीची प्रक्रिया कशी असू शकते, याची प्रत्यक्ष अनुभूती दाजींना भेटल्याने आली. 
८. श्री. सुखपालजी महाराज (दाजी) यांना सनातन संस्था, प.पू. डॉक्टर 
यांच्याविषयी बाह्यत काहीही ठाऊक नसणे आणि त्यांनी प.पू. डॉक्टर सांगतात, 
तीच सूत्रे सांगितल्यामुळे सर्व समष्टी ठायी प.पू. डॉक्टरांचे तत्त्व कार्यरत असल्याचे अनुभवणे
       शिष्याची महती ऐकावी, ती श्रीगुरूंच्या मुखातून ऐकावी, जसे सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांच्याविषयी महर्षि आणि प.पू. डॉक्टर सांगतात. आपल्या श्रीगुरूंची महती ऐकावी, ती अन्य मार्गी, संंप्रदायाचे संत किंवा अन्य मार्गाने साधना करणारे साधक किंवा समाज यांच्या मुखातून. नसिराबाद येथील दाजींना भेटायला गेलो. त्यांना प.पू. डॉक्टर किंवा सनातन संस्था यांची कोणतीही बाह्यतः ओळख नव्हती. त्यांनी प.पू. डॉक्टरांविषयी तसेच संस्थेचे आश्रम आणि साधकांविषयी सांगितलेली सूत्रे ही प.पू. डॉक्टरांच्या अवतारी कार्याचे महिमामंडन (गौरव) होते. प.पू. डॉक्टर जे प्रत्यक्ष आम्हाला सांगतात, तेच ते महर्षि, प.पू. आबा उपाध्ये, प.पू. कर्वे गुरुजी इत्यादींच्या माध्यमांतून सांगतात. तेच विचार त्यांनी दाजींच्या मुखातून आम्हाला सांगितले. देह, वाणी आणि रूप दाजींचे होते; मात्र प्रत्यक्षात तत्त्वतः प्रचीती प.पू. डॉक्टरांचीच होती. सर्व रूपे, वाणी, स्पर्श, गंध, रस, आदी सर्व समष्टी ठायी प.पू. डॉक्टरांचे तत्त्व कार्यरत असल्याचे यातून अनुभवायला मिळाले.’
- पू. (डॉ.) चारुदत्त पिंगळे, उत्तरभारत प्रसारसेवक
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn