Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

भावजागृतीचे प्रयत्न करत असतांना आलेली अनुभूती आणि त्यातून मिळालेला आनंद !

डॉ. (सौ.) नंदिनी सामंत
१. पूर्वी भावजागृतीसाठी प्रयत्न करावे लागणे आणि 
परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या दर्शनाने आपोआप भावजागृती होणे 
     ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी वेळोवेळी केलेल्या मार्गदर्शनानुसार गेली १ - २ वर्षे भावजागृतीसाठी विविध प्रयत्न चालू होते. त्या प्रयत्नांमुळे कधी भावजागृती व्हायची, तर कधी व्हायची नाही. झाली तरी प्रत्यक्ष प्रयत्न करत असतांनाच ती टिकायची. काही वेळा आपोआपही भावजागृती व्हायची, उदा. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे दर्शन झाल्यावर किंवा एखाद्या यज्ञाच्या वेळी इत्यादी. 
२. सध्या विशेष प्रयत्न न करताही आपोआप भावजागृती होणे 
     गेल्या १ - २ मासांपासून प्रयत्न न करताही किंवा विशेष परिस्थिती नसतांनाही, अगदी सहजस्थितीत ‘आधी भावजागृती झाली अन् नंतर त्याची जाणीव झाली’, असे हळूहळू होऊ लागले आहे. भावजागृती कधी व्यक्त स्वरूपात (अष्टसात्त्विक भाव) असते, तर कधी अव्यक्त स्वरूपात. भावजागृतीचे निमित्त वेगवेगळे असते, उदा. सेवा करत असतांना अचानक आतून तीव्रतेने जाणीव होते, ‘ही सेवा मला परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेमुळेच मिळाली आहे. तेच माझ्याकडून ती करवून घेत आहेत.’ ही कृपेची जाणीव एवढी उत्कट असते की, आपोआप भावजागृती होते आणि काही काळ टिकून रहाते. या जाणिवेमुळे थकवा असला किंवा कंटाळा आलेला असला, सेवा क्लिष्ट असली, तरीही सेवा चालू ठेवता येते किंवा सेवेत वारंवार झालेले पालट सहजतेने स्वीकारता येतात आणि मन सकारात्मक रहाते.
३. परिणाम 
३ अ. भावजागृतीमुळे अनामिक आनंद होणे आणि सर्वत्र 
परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे अस्तित्व जाणवू लागणे 
     कधी ‘सर्व जगत् ईश्‍वराचे शरीर आहे आणि मी त्याचा एक भाग आहे’, असे जाणवते. कधी ‘मी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चैतन्याच्या महासागरातील एक लाट आहे’, असे जाणवते. कधी ‘मी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या हृदयात आहे, तर कधी ते माझ्या हृदयात; कधी ते माझ्या पुढे चालत आहेत अन् मी त्यांच्या मागून’, असे जाणवते. बर्‍याचदा भावजागृतीची जाणीव अनामिक आनंदाने होते आणि आनंदाचे कारण शोधायला गेल्यावर वरीलप्रमाणे लक्षात येते. कधी अचानक अंगावर आल्हाददायक रोमांच येतात आणि त्याचे कारण पहायला गेल्यावर ‘सद्गुरु (सौ.) बिंदाताई यांच्या शरिरातून चैतन्याच्या लहरी प्रक्षेपित होत आहेत, मी त्या ग्रहण करत आहे आणि त्यामुळे हे रोमांच आले आहेत’, हे लक्षात येतेे. एकदा मी दुसर्‍या मजल्यावरून तिसर्‍या मजल्यावर जाण्यासाठी जिना चढत असतांना अचानक मला सर्वत्र परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे अस्तित्व जाणवू लागले. ती जाणीव एवढी व्यापक होती की, मला आतून स्तब्ध आणि नतमस्तक व्हायला झाले. त्या वेळी झालेल्या आनंदाने मी अक्षरशः वेडी होईन कि काय, असे वाटले ! 
३ आ. साधकांविषयी बंधुभाव निर्माण होऊन त्यांना साहाय्य करण्याची जाणीव होणे 
     भावजागृतीची ही स्थिती सतत टिकून रहात नाही. त्यातील उत्कटता काही मिनिटांनी किंवा घंट्यांनी न्यून होते; परंतु पूर्ण नाहीशी होत नाही. प्रत्येक वेळी भावजागृती झाल्यावर ती विरल्यानंतरही मागे भाव ठेवूनच जाते आणि प्रत्येक वेळी माझी साधनेची भूमी अधिक समृद्ध बनवून जाते, उदा. साधकांविषयी आपोआप (मी जाणीवपूर्वक प्रयत्न न करता, त्याविषयी मनात विचारही न येता) बंधुभाव निर्माण होऊन आपोआप त्यांची विचारपूस केली जाणे, त्यांच्या दृष्टीकोनातून विचार करता येणे, त्यांना समजून घेता येणे, त्यांना आवश्यक तिथे साहाय्य केले जाणे इत्यादी. आधीही साहाय्य करायला अडचण नव्हती; पण तो विचार नसायचा किंवा ‘त्यांना मी काय साहाय्य करू शकते’, हे लक्षात यायचे नाही. 
३ इ. मनात सतत देवाचा विचार येणे आणि त्याच्याशी एकरूप होण्याचा ध्यास लागणे 
      पूर्वी देवाचा विचार प्रयत्नपूर्वकही मनात टिकत नसे. सध्या तो हळूहळू मनात घर करू लागल्याचे जाणवू लागले आहे. एखाद्याच्या प्रेमात पडल्यावर जसा आपल्या मनात सतत त्याचाच विचार रहातो, मन सतत सर्वत्र त्याचाच वेध घेत रहाते, त्याच्या एका भेटीसाठी आतुरलेले असते, त्याच्या स्मरणानेही मन आनंदते, त्याच्यासाठी काय करू आणि काय नको, अशी स्थिती होते, तशी काहीशी स्थिती परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने मला देवाच्या संदर्भात होतांना जाणवते. मी शरिराने काही करत असले, तरी मन देवाच्या विचारात असते, त्यात ते रमते. देवाचे माझ्यावर किती प्रेम आहे, ते मी नित्य अनुभवत आहे. मनात ‘मी त्याच्यावर कसे प्रेम करू ? त्याला मी कशी आवडेन ? त्यासाठी शरीर-मन-बुद्धी-अहं या स्तरांवर माझी शुद्धी कशी करू ? तो माझ्यासाठी इतके करतो, तर मी त्याच्यासाठी काय करू ?’, असे विचार रहातात. त्यामुळे व्यष्टी आणि समष्टी साधनेत पूर्वी ज्या अडचणींवर मात करता येत नसे, ती या विचारांनी तुलनेने लवकर आणि आनंदाने करता येते. पूर्वी सेवा करतांना मायेतील विचार यायचे. सध्या अन्य काही करतांना, अगदी सेवेतील स्थूल कृती करतांनाही काही प्रमाणात वेध देवाचा राहू लागला आहे, ही केवळ परात्पर गुरु डॉ. आठवले यांचीच कृपा आहे.
४. परात्पर गुरु डॉ. आठवले यांना प्रार्थना 
     साधनेला प्रारंभ झाला, तेव्हा मी प.पू. गोंदवलेकर महाराज यांचे पुढील वचन वाचले होते - ‘देवाचा विचार करत असतांना मायेच्या विचारांचे थैमान उठणे हा व्यवहार आणि मायेच्या विचारांत असतांना देवाच्या विचारांचे थैमान उठणे म्हणजे परमार्थ !’ प.पू. डॉ. आठवले, प्रत्येक साधकाला असा परमार्थ तुम्ही लवकरात लवकर साध्य करून द्या; त्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न तुम्ही आम्हा सर्वांकडून करवून घ्या, अशी तुमच्या कृपाळू चरणी कळकळीची प्रार्थना आहे.’ 
- डॉ. (सौ.) नंदिनी सामंत, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
     या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. - संपादक
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn