Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

प्रत्येक साधकाच्या जीवनातील परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यासमवेतचे आनंदाचे तुषार !

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त...
सौ. रेखा जाखोटिया
    या विश्‍वात परात्पर गुरु डॉ. आठवले ही एकच गोष्ट अशी आहे, जी साधकांच्या जीवनात आनंदाचा वर्षाव करते. साधक कितीही दु:खात असो, निराशेने घेरलेला असो अथवा नकारात्मक विचारांनी घेरलेला असो, परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा विषय निघाला किंवा त्यांची आठवण आली, म्हणजे त्यांचा तोंडवळा, त्यांचे चरण, त्यांचे हसणे, बोलणे या गोष्टी डोळ्यांसमोर एखाद्या चित्रपटाप्रमाणे येऊ लागतात आणि साधक स्वतःचे सुख-दुःख विसरून आनंदी होतो. माझ्या जीवनातील प.पू. डॉक्टरांसमवेतचे काही दुर्मिळ प्रसंग आजही मला जसेच्या तसे आठवतात.
साधनेला आरंभ केल्यावर परात्पर गुरु डॉ. आठवले यांची पहिली भेट !
१. साधनेला आरंभ केल्यावर नातेवाइकांना पत्राद्वारे सनातनच्या सत्संगात जाण्यास
सांगणे आणि हे समजल्यावर परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी बोलावून कौतुक करणे
    मी साधनेला आरंभ केल्यावर काही दिवसांतच कु. शशिकला आचार्य यांच्या घरी परात्पर गुरु डॉ. आठवले यांची भेट झाली. आम्ही सर्व साधक बाहेर अंगणात बसलो होतो. परात्पर गुरु डॉ. आठवले आणि काही साधक आतल्या खोलीत बोलत होते. बोलता बोलता ते भोजनही करत होते. अचानक माझे भाग्य उजळले आणि डॉ. (सौ.) नंदिनी सामंत यांनी बाहेर येऊन मला गुरुदेव बोलावत असल्याचे सांगितले.
     माझ्या आनंदाला पारावार राहिला नाही. त्यांनी मला बोलावण्याचे कारण असे होते की, काही दिवसांपूर्वी मी माझ्या नातेवाइकांना एक पत्र लिहिले होते. त्यात सनातन संस्थेची थोडक्यात माहिती लिहिली होती. प्रत्येकाला आपापल्या जवळच्या सत्संंगाला जाण्याची विनंती केली होती. या पत्राविषयी डॉ. (सौ.) नंदिनीताईंनी प.पू. डॉक्टरांना सांगितले होते आणि त्यांनी मला आत बोलावले होते. मी आत गेल्यावर त्यांनी मला या पत्राची प्रत तुमच्याजवळ आहे का ? असे विचारले. सुदैवाने ती प्रत माझ्याजवळ होती. त्यांनी त्या पत्रातील शब्द-न्-शब्द वाचला. माझे तोंडभरून कौतुकही केले आणि मला विचारले, हे तुम्हाला कसे सुचले ? त्या वेळी गुरुच आपल्याला विचार देतात आणि कृतीही करवून घेतात, हे ठाऊक असले, तरी माझ्याकडून आपोआपच सुचले, तसे उत्तर दिले गेले. धर्मप्रसारासाठीच्या केलेल्या छोट्याशा कृतीमुळे त्यांनी मला पुष्कळ प्रोत्साहन दिले. त्यामुळे मला साधना करायला पुष्कळच आवडू लागले.
२. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या दुसर्‍या भेटीच्या
कालावधीत त्यांच्या ठिकाणी श्रीकृष्णाचे दर्शन होणे
२ अ. दुकानातील साहित्य खरेदीसाठी मुंबईला गेल्यावर सेवाकेंद्रात जाणे आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांंनीच दार उघडल्यावर भुंकणारा कुत्रा अदृश्य होणे : त्यानंतर आमची दुसरी भेट सेवाकेंद्रात झाली. त्या वेळी सांगली येथील विश्रामबाग भागात आमचे जनरल स्टोअर होते. नाशिक जवळील पिंपळगाव बसवंत येथे माझ्या भावाचेही जनरल स्टोअर होते. दुकानाच्या खरेदीसाठी आम्ही दोघे मिळून मुंबईला जात असू. साधनेला आरंभ केल्यानंतर मी मुंबईला जाणार असल्याचे डॉ. (सौ.) नंदिनीताईंना कळल्यावर त्यांनी आपल्या सेवाकेंद्रात जाऊन या, असे सांगितले. खरेदीच्या व्यस्त दिनक्रमात सेवाकेंद्रात जायला भाऊ सिद्ध होतो कि नाही ?, असे वाटत होते; परंतु तोही सिद्ध झाला. आम्ही संध्याकाळच्या वेळी पोेचलो. आम्ही दारात पोचलो आणि एक मोठा वाघ्या कुत्रा माझ्यावर भुंकत जवळ येऊ लागला. तो क्षणार्धात माझा लचका तोडणार इतक्यात परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी दार उघडले आणि तो भुंकणारा कुत्रा कुठे आणि कसा नाहीसा झाला, ते मला कळलेच नाही.
२ आ. संध्याकाळचा महाप्रसाद आणि रात्री मुक्काम सेवाकेंद्रात करणे : संध्याकाळचा महाप्रसाद आम्ही सेवाकेंद्रात घेतला. त्या वेळी भावाच्या ताटात त्यांनी आवर्जून शीतकपाटात असलेले श्रीखंड काढून वाढले. नंतर भावाने मला हळूच विचारले, तुला श्रीखंड नाही वाढले ? तेव्हा माझ्या तोंडून आपोआपच निघाले, अरे, मी घरचीच आहे ना ? गोडधोड पाहुण्यांसाठी असते. आम्ही रात्री मुक्कामही सेवाकेंद्रात केला.
२ इ. अंघोळीला जातांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांची झोपमोड होऊ नये; म्हणून त्यांच्या खोलीचे दार लावून घेतांना त्यांच्या ठिकाणी श्रीकृष्णाचे दर्शन होणे आणि त्यांचे तेज सहन न झाल्याने दिवसभर झोप येणे : दुसर्‍या दिवशी सकाळी अंघोळीला जातांना कु. श्रुती शेलार (आताच्या सौ. जान्हवी शिंदे) म्हणाल्या, काकू, प.पू. डॉक्टरांच्या खोलीचे दार घट्ट लावून घ्या, नाहीतर नळाच्या पाण्याच्या आवाजाने त्यांची झोपमोड होईल. मी त्यांच्या खोलीजवळ गेले. खोलीच्या दाराची थोडीशी फट उघडीच होती. मी सहजच फटीतून आत पाहिले, तो काय आश्‍चर्य ! परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या तोंडवळ्याभोवती तेजोवलय असलेला पहुडलेला भगवान श्रीकृष्णच मला दिसला. आतापर्यंत असे चित्र मी देवतांच्या दिनदर्शिकेमध्येच पाहिले होते. आम्ही आवरून खरेदीसाठी बाहेर पडलो. त्यांचे ते तेज मला बहुतेक सहन झाले नाही; कारण त्यानंतर पूर्ण दिवसभर आणि रात्री प्रवासात मला अत्यंत झोप येत होती. निघतांनाही गुरुमाऊली दारापर्यंत पोचवायला थांबलेली होती. भावाला प्रसाद म्हणून भला मोठा काजूचा पुडाही दिला होता. सांगलीला जातांना वाटेत पुण्याला सौ. ज्योती दाते यांच्याकडे देण्यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी दिलेले एक पार्सल मी घरी घेऊन गेले. माझ्या डोळ्यांवर इतकी गुंगी होती की, पुणे कधी आले आणि गेले, मला कळलेच नाही.
३. हे विश्‍वचि माझे घर या उक्तीनुसार आचरण करण्यास शिकवणारे प.पू. डॉक्टर !
३ अ. जाऊबाईंकडे जावेसे वाटणे, त्यांच्याकडे पोचण्याआधीच परात्पर गुरु डॉ. आठवले तेथून निघाल्याचे समजल्यावर रडू येणे आणि आपण साधनेत मागे असल्याची जाणीव होणे : जीवनात अनेक व्यक्ती, प्रसंग येतात आणि जातात; पण परात्पर गुरु डॉ. आठवले यांना कोणीही एकदा का भेटले किंवा त्यांच्याशी एकदा जरी बोलले, तरी ते आयुष्यभर स्मरणात रहातात. असाच एक प्रसंग. माझ्या जाऊबाई सौ. विद्या जाखोटिया यांच्याकडे एकदा परात्पर गुरु डॉ. आठवले आले होते. माझ्या दुर्दैवाने मला त्या वेळी निरोप मिळाला नाही. त्या दिवशी सकाळपासूनच मला सौ. विद्या यांच्याकडे जावेसे वाटत होते. या वाटण्याची तीव्रता इतकी वाढली की, काम भरभर आवरून मी तिच्या घरी गेले. मी तेथे पोचण्यापूर्वीच परात्पर गुरु डॉ. आठवले तिथून रवाना झाले होते. हे समजल्यावर मला पुष्कळ रडू आले. गुरुमाऊली येते आणि मला तेथे बोलावले नाही; म्हणून स्वत:वर आणि माझ्या दिरांवरही मी रागावले. कोणतीही गोष्ट देवाच्या इच्छेविना होत नाही, हेच खरे ! त्या वेळी जाणीव झाली की, अजून मी साधनेत पुष्कळच मागे आहे.
३ आ. आमच्याकडे परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे नियोजन कधीही शक्य न होणे आणि त्यांच्याच शिकवणीनुसार साधकांची घरे आपली वाटून तेथे सेवेची संधी मिळणे : मी रडले, हे समजल्यावर सौ. नंदिनीताईंनी मला धीर दिला. त्या म्हणाल्या, पुढच्या वेळी आपण परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे नियोजन तुमच्या घरी करू. कौटुंबिक कलह, लहान घर आणि एकाच घरात ४ कुटुंबांचे रहाणे, या गोष्टींमुळे ते नियोजन कधीही झाले नाही. आरंभीच्या काळात याचे मला वाईटही वाटायचे; पण आपल्या गुरुमाऊलीने विश्‍वचि माझे घर हा सुविचार अगदी लहानात लहान साधकाच्या मनावर बिंबवला आहे. त्यामुळे सर्व साधकांची घरे आपली वाटू लागली. मिरजेत डॉ. (सौ.) शरदिनी कोरे यांचे घर असो, सांगलीत सौ. गौरी खिलारे यांचे घर असो किंवा जत मधील डॉ. वाघ यांचे घर असो, अनेक साधकांकडे गुरूंनी सेवेची संधी दिली. कोणत्याही नवीन अनोळखी साधकाच्या घरी जाऊन स्वयंपाकापासून सत्संगापर्यंतचे सर्व नियोजन करतांना कधीही परकेपणा जाणवला नाही. हे केवळ सनातनचे आणि आमच्या महान गुरुमाऊलीचे वैशिष्ट्य आहे. इतर कोणत्याही संप्रदायात असे पहायला मिळत नाही.
४. साधकाच्या मनातील प्रश्‍न आणि ताण एका
हास्याने क्षणार्धात दूर करणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !
    त्यानंतर पुन्हा एकदा परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या भेटीचा दुर्मिळ योग आला. मिरजेला आश्रमात गुरुमाऊलीची भेट झाली. त्या वेळी मला नुकताच थॉयराईड आणि हर्नियाचा त्रास चालू झाला होता. बरेच प्रश्‍न मनात होते. पूर्वी दोन सिझेरीयन या शस्त्रक्रिया झाल्यामुळे मला हर्नियाच्या शस्त्रकर्माची भीती वाटत होती. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीत गेल्यावर त्यांना बघून मला रडायला आले. रडतच मी त्यांना माझ्या आजाराविषयी सांगितले. तेव्हा अंगातील बंडी वर करून पोटावरील हर्नियाच्या शस्त्रक्रियेचा व्रण दाखवून ते मला म्हणाले, अरेच्चा, एवढेच ना ! माझ्या हर्नियाच्या शस्त्रक्रियेचा व्रण पहा. त्यांच्या त्या एका वाक्यातच त्यांनी मला निरुत्तर केले. गुरुमाऊलीच्या एक हास्याने माझे सर्व प्रश्‍न आणि आजाराचा ताण दूर झाला होता.
५. साधकांचे तारणहार असणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !
    आता तर काय, आम्हा सर्वांना त्यांच्याच कृपेने आश्रमात रहायला मिळाले आहे. केवळ त्यांच्या कृपेमुळेच माझा श्‍वास चालू आहे. त्यांच्याच कृपेने आमचा योगक्षेम वहात आहे. जन्मदात्या आई-वडिलांनाही मुलगी अधिक दिवस माहेरी राहिलेली डोळ्यांत खुपते; पण माझी गुरुमाऊली माझाच नव्हे, तर माझ्यासारख्या लाखो साधकांचा तारणहार आहे.
६. स्थुलातून भेट कधी होणार असे विचारल्यावर
आरोग्य सुधारण्याकडे लक्ष देण्यास सांगणे
    आता पुन्हा गुरुमाऊलीची स्थुलातून भेट कधी होणार, हे त्यांनाच माहीत ! ६ मासांपूर्वी (महिन्यांपूर्वी) लिहिलेल्या एका पत्रात मात्र मी त्यांना विचारले होते की, आता आपल्या भेटीचा योग कधी येईल ? त्या वेळी त्यांनी आधी आरोग्य सुधारण्याकडे लक्ष द्या, असे सांगितले होते. त्यांनी दिलेल्या उत्तरावरून मुंबईतील अनेक आधुनिक वैद्यांनी हात टेकलेले असतांनाही माझे आरोग्य निश्‍चितच सुधारणार आहे आणि त्यांना याचि डोळा याचि देही बघण्याची माझी इच्छा पूर्ण होणार आहे, अशी ठाम श्रद्धा ठेवून हे लिखाण थांबवते.
७. कृतज्ञता
    हे गुरुदेवा, तुमच्या भेटीत मिळालेला हा आनंदाचा ठेवा माझ्या आजाराच्या दु:खद प्रसंगात मला कामाला येत आहे आणि येणार आहे. वरील लिखाणात माझी काही चूक झाली असल्यास क्षमा मागते. लिखाण आपणच सुचवले आणि आपणच करवून घेतले, त्यासाठी आपल्या कोमल चरणी कृतज्ञता व्यक्त करते आणि आम्हा सर्व साधकांना लवकरात लवकर आपल्या चरणांशी येण्यासाठी आवश्यक ती साधना करण्याची बुद्धी द्यावी, हीच आर्ततेने प्रार्थना करते.
- सौ. रेखा नटवरलाल जाखोटिया, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२०.८.२०१६)
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn