Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

युद्धनौकांचे अपघात आणखी किती दिवस ?

     ६ डिसेंबर या दिवशी ३ सहस्र ८०० टन वजनाची ‘आय.एन्.एस्. बेतवा’ ही विशाल युद्धनौका दुरुस्तीनंतर समुद्रात उतरवली जात असतांना तांत्रिक कारणामुळे उलटली. जहाजावर उपस्थित नौदलाच्या सैनिकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले असले, तरी २ नौदल सैनिकांना त्यांचेे प्राण गमवावे लागले. शांततेच्या काळात युद्धनौकांचे अपघात होणे, ही गोष्ट देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर आहे. एका बड्या नेत्यांच्या अंत्यसंस्कारापुढे प्रसिद्धी माध्यमांच्या दृष्टीने या घटनेला इतके महत्त्व नसावे. त्यांच्या मते २ परिच्छेद वृत्त लोकांच्या माहितीसाठी देणे एवढेच या घटनेचे महत्त्व ! असे असले तरी प्रसिद्धीमाध्यमे, शासन आणि सुजाण नागरिक यांनी युद्धनौकेच्या होणार्‍या अपघातांकडे दुर्लक्ष केलेले देशाला नक्कीच परवडणारे नाही.
     यापूर्वीही ‘आय.एन्.एस्.नाशक’चे इंजिन खराब झाल्याने अपघात झाला होता, तर ‘आय.एन्.एस्. सिंधुघोष’वर युद्धाचा सराव चालू असतांना अपघात झाला होता. यानंतर अशा नौकांची दुरुस्ती करण्यासाठी शासन आणि नौदल यांना मोठ्या प्रमाणात पैशाचा व्यय आणि वेळ द्यावा लागतो. ‘आय.एन्.एस्. बेतवा’ ही युद्धनौका अपघातानंतर सरळ करण्यासाठी लागणारी यंत्रणा भारतात उपलब्ध नसल्याने दुरुस्तीसाठी विदेशातून तंत्रज्ञ येणार आहेत. त्यासाठी काही कोटींची रक्कम व्यय करावी लागणार, हेही निश्‍चित !
     वर्ष २००० ते २००९ या ९ वर्षांत युद्धनौकांच्या अपघातांच्या ५ घटना घडल्या आहेत. वर्ष २०१० पासून पुढे अपघातांची ही संख्या वाढतेच आहे. याउलट चिनी आणि अमेरिकन युद्धनौकांच्या अपघातांच्या घटना अभावानेच ऐकायला मिळतात. याचाच अर्थ असे अपघात घडू नयेत, यासाठी नौदल आणि शासन यांच्याकडून योग्य उपाययोजना काढली गेली नाही अथवा कार्यपद्धतींचे पालन केले जात नाही. याचसमवेत वायूसेनेतील विमानांमध्ये बिघाड झाल्यानेही अनेक सैनिकांना त्यांचे प्राण गमवावे लागले आहेत. सैनिक देशासाठी स्वतःचे प्राण देण्यासाठी तयार असले, तरी त्यांचे जीवन हे पुष्कळ मौल्यवान आहे. कारण त्यांनी सामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेचे संपूर्ण दायित्व घेतलेले असते.
     येत्या काही वर्षांत महासत्ता होऊ पहाणार्‍या भारतासाठी अशा घटना घडणे, हे लज्जास्पद आहे, असे कोणी म्हटल्यास ते वावगे होणार नाही. एकीकडे विकास आणि प्रगती यांविषयी बोलायचे, तर दुसरीकडे युद्धनौकांचे अपघात होऊ द्यायचे, हे समीकरण योग्य नाही. भारताचा सर्वांगीण विकास होण्यासाठी आर्थिक विकासासह संरक्षण क्षेत्रात विकास होणे आवश्यक आहे. भारताच्या सीमाांचे रक्षण करण्यामध्ये कोणतीही खोट राहू नये, अशी अपेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विश्‍वासाने निवडून देणारी जनता नक्कीच ठेवू शकते. शत्रूंपासून भारतीय सीमांचे रक्षण करणे, हे शासनाचे प्रमुख कर्तव्य आहे. त्यासाठी संरक्षण दलामध्ये वापरल्या जाणार्‍या साधनांचा योग्य आणि काळजीपूर्वक उपयोग करणे आवश्यक आहे. या अपघातांमागे शूत्रराष्ट्राचा काही हात आहे का, हेही पडताळणे आवश्यक आहे.
- कु. ऋतुजा शिंदे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn