Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी सांगितल्याप्रमाणे दत्तमालामंत्राचे पठण केल्यावर रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातील ध्यानमंदिराजवळील परिसरात औदुंबराची रोपे उगवणे

सनातन आश्रमातील एक बुद्धीअगम्य घटना
औदुंबराच्या रोपांवर आलेले सुरवंट
१. गोव्यातील सनातनच्या 
आश्रमात होत असलेल्या 
दत्तमालामंत्राच्या पठणाविषयी माहिती
    ‘सनातन संस्थेवरील संकट दूर होण्यासाठी महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील कल्याण येथील थोर संत योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी सांगितल्याप्रमाणे सप्टेंबर २०१५ मध्ये गोव्यातील सनातनच्या आश्रमातील ध्यानमंदिरात दत्तमालामंत्राचे पठण चालू केले. पठणास आरंभ झाल्यापासून काही मास (महिने) सकाळी, दुपारी आणि सायंकाळी अशी एका दिवसात पठणाची ३ सत्रे करण्यात येत. ऑगस्ट २०१६ पासून आजपर्यंत (१५.११.२०१६ पर्यंत) प्रतिदिन २१ साधक एका सत्रात १२ वेळा करण्यात येत आहे.
२. दत्तमालामंत्राचे पठण चालू केल्यानंतर काही दिवसांनी औदुंबराची रोपे उगवणे
     सनातन आश्रमातील ध्यानमंदिरात बसून साधक दत्तमालामंत्राचे पठण करतात. ध्यानमंदिराच्या दक्षिण दिशेकडील खिडकीला लागूनच साधारणपणे ९ मीटर लांब आणि ९ मीटर रूंद आश्रमाचा मोकळा भूभाग असून तेथे एक यज्ञकुंड आहे. त्या भूभागाच्या भोवती चारही बाजूंनी आश्रमाची ३ मजली इमारत आहे. या जागेत ऑक्टोबर २०१५ मध्ये, म्हणजे श्री दत्तमालामंत्राचे पठण चालू केल्यानंतर साधारण १ मासाने औदुंबराची पुष्कळ रोपे उगवली असल्याचे साधकांच्या लक्षात आले. आश्रमाच्या आतील भागात असलेल्या आणि जिथे आधी कुठलेही झाड नव्हते, अशा या मोकळ्या जागेत अशा प्रकारे औदुंबराची रोपे आपोआप उगवणे वैशिष्ट्यपूर्ण असल्याने पुढील अभ्यासासाठी या रोपांच्या संख्येच्या नोंदी ठेवणे चालू केले.
३. एखाद्या ठिकाणी रोप उगवण्यामागील संभाव्य कारणे
३ अ. भौतिक कारणे
३ अ १. लागवड केल्यावर रोप येणे : एखाद्या भूमीमध्ये बी पेरणी केली असता त्या भूमीमध्ये रोप येऊ शकते अथवा कुणीतरी त्या भूमीमध्ये त्या झाडाचे रोप लावल्यावर त्या ठिकाणी त्याची वाढ होऊ शकते.
३ अ २. नैसर्गिक हालचालींतून रोप येणे : यामध्ये पक्ष्यांच्या विष्ठेतून भूमीत बिजारोपण होऊन रोपे उगवतात अथवा हवा किंवा पाणी यांच्या वहनातून हे बी भूमीत रुजल्यामुळे तेथे रोप उगवू शकते.
३ आ. आध्यात्मिक कारणे
३ आ १. एखाद्या ठिकाणी (स्थळात) मुळातच असलेल्या विशिष्ट देवतेशी संबंधित स्पंदनांमुळे रोप उगवणे : काही वृक्ष हे ‘देववृक्ष’ म्हणून ओळखले जातात. त्यांमध्ये वड, पिंपळ, औदुंबर आदी वृक्षांचा समावेश होतो. त्यांची निर्मिती कोणत्याही स्थूल कारणाने नव्हे, तर आपोआप होते, उदा. महाराष्ट्रातील वाडी येथील औदुंबर वृक्ष, देहू येथील नांदुरकी वृक्ष, आळंदी येथील अजान वृक्ष इत्यादी. चैतन्यमय स्थानांमध्ये हे देववृक्ष आपोआप येतात. चैतन्याचे प्रक्षेपण करणे, हे यांचे कार्य असते.
३ आ २. एखाद्या ठिकाणी (स्थळात) केलेल्या विशिष्ट उपासनेमुळे निर्माण झालेल्या देवतेशी संबंधित स्पंदनांमुळे रोप उगवणे : एखाद्या ठिकाणी विशिष्ट देवतेशी संबंधित मंत्राचा जप केल्यास त्याची स्पंदने (शक्ती) तेथील वातावरणात निर्माण होतात आणि त्यामुळे तेथे त्या देवतेची स्पंदने अधिकाधिक ग्रहण करणारी वनस्पतीची रोपे उगवू शकतात अथवा त्या देवतेशी संबंधित वनस्पतींना किंवा वस्तूंना त्या देवतेचा आकार येतो. हे ‘शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध आणि त्यांच्याशी संबंधित शक्ती एकत्र असतात’, या अध्यात्मातील सिद्धांतानुसार घडते. या सिद्धांताशी संबंधित ३ सर्वपरिचित उदाहरणे पुढे दिली आहेत.
अ. ‘पांढर्‍या रुईच्या (मंदाराच्या) झाडापुढे ‘गँ’ ची आवर्तने केल्यास, त्या झाडाची एक मुळी वर येते. तिला श्री गणेशाचा आकार असतो.
आ. अंगारकयोग (मंगळवारी संकष्ट चतुर्थी) किंवा रविवारी पुष्य नक्षत्र असेल, तेव्हा ७ - ८ वर्षांहून जास्त वयाच्या वृक्षाचे शोडषोपचारे पूजन करून अथर्वशीर्षाचा पाठ करावा. पठण साधारण चतुर्थीपासून चालू करून दुसर्‍या चतुर्थीपर्यंत एक सहस्र पाठ करावेत. त्यानंतर ते झाड मुळापासून उपटून काढावे. त्याचा आकार श्री गणपतीसारखाच असतो.
इ. खार्‍या पाण्यातील गारगोटीवर ‘गँ’ मंत्राचा न्यूनतम वर्षभर उच्चार केल्यास गारगोटीचा आकार गणपतीसारखा होतो. थोर गणेशभक्त मोरया गोसावी यांनी असे बरेच गणपति बनवले होते.’
(संदर्भ : सनातन संस्थेचा ग्रंथ ‘श्री गणपति’)
३ आ ३. देववृक्षांच्या माध्यमातून ईश्‍वराने उपासकांना काळानुसार विशिष्ट देवतातत्त्व किंवा चैतन्य देणे : काळानुसार उपासकासाठी विशिष्ट देवतातत्त्वाची आवश्यकता असल्यास ते तत्त्व उपासकाला मिळावे, यासाठी ईश्‍वर दैवी वृक्षाला माध्यम बनवून त्याद्वारे उपासकाला आवश्यक ते तत्त्व किंवा चैतन्य देतो. त्यामुळे उपासकाला लाभ होईल अशा ठिकाणी औदुंबरासारखे देववृक्ष आपोआप उगवतात.
३ आ ४. देववृक्षांच्या माध्यमातून ईश्‍वराने उपासकांना अनुभूतीद्वारे आश्‍वस्त करणे : काही वेळा विशिष्ट दैवी वृक्ष उगवल्याची अनुभूती देऊन उपास्यदेवता उपासकांना स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव करून देऊन आश्‍वस्त करते.
    थोडक्यात सांगायचे, तर देववृक्षांच्या निर्मितीमागील आध्यात्मिक कारणांचा विचार करतांना लक्षात ठेवायचे महत्त्वाचे सूत्र म्हणजे, ‘स्थळ-काळानुसार उपासकांसाठी जे आवश्यक आहे, ते ईश्‍वर करतो.’
४. औदुंबराविषयी वैशिष्ट्यपूर्ण माहिती
४ अ. ‘औदुंबर वृक्ष हे दत्ताचे पूजनीय रूप आहे. त्यात श्री दत्ततत्त्व पुष्कळ प्रमाणात आहे.’ (संदर्भ : सनातन संस्थेचा ग्रंथ ‘दत्त’)
४ आ. औदुंबराचे माहात्म्य ‘श्री गुरुचरित्र’ या ग्रंथातील अध्याय १९ मध्ये सविस्तरपणे दिले आहे.
४ इ. ‘औदुंबराच्या सर्वच अंगांचा (पाने, फळे, साल इत्यादींचा) औषधांमध्ये उपयोग होतो’, असे ‘भावप्रकाशनिघण्टु’ या ग्रंथात दिले आहे.
४ ई. ‘वड, पिंपळ, चाफा, तुळस, बेल, शमी, चिंच, पारिजातक आणि औदुंबर हे वृक्ष २४ घंटे वातावरणात प्राणवायू सोडतात. त्यामुळे त्यांना प्राचीन काळापासून ‘देववृक्ष’ असे संबोधण्यात येते. बाकीच्या सगळ्या झाडांना वृक्ष किंवा वनस्पती म्हणतात’, असे वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झाले आहे.’ (संदर्भ : विश्‍वचैतन्याचे विज्ञान)
४ उ. ‘अथर्ववेदातील १९ व्या कांडातील ३१ व्या सूक्तातील पहिला मंत्र औदुंबराविषयी आहे. राज्याभिषेक-समारंभात राजासाठी औदुंबराच्या लाकडाचे सिंहासन करीत.’ (संदर्भ : भारतीय संस्कृतिकोश, खंड १ (तृतीयावृत्ती), पृ. ६५०) 
४ ऊ. ‘औदुंबर वृक्षात नेहमी सर्व देवतांमध्ये श्रेष्ठ अशा भवानीचा वास असतो. तिची प्रतिदिन सकाळी गंध, फूल, अक्षता इत्यादी द्रव्यांनी पूजा करावी’, असे धर्मशास्त्रात सांगितले आहे.
४ ए. पूजेमध्ये अक्षतांचे महत्त्व असते, तसे हवनामध्ये समिधांचे महत्त्व असते. पूजेमध्ये ज्याप्रमाणे फूल, वस्त्र आदी नसल्यास त्या ठिकाणी अक्षता वापरतात, तसेच हवनामध्ये एखाद्या विशिष्ट वृक्षाची समिधा नसल्यास औदुंबराच्या समिधा वापरतात.
५. सनातन आश्रमातील ध्यानमंदिराजवळ उगवलेल्या 
औदुंबराच्या रोपांसंदर्भातील निरीक्षणे आणि त्यांचे विवरण
    १७.१०.२०१५ ते १.१०.२०१६ या काळात सनातन आश्रमातील ध्यानमंदिराजवळ उगवलेल्या औदुंबराच्या रोपांची विविध दिवशी संख्या मोजली, तसेच छायाचित्रेही काढली आहेत.
५ अ. दिनांकानुसार औदुंबराच्या रोपांची संख्या दर्शवणारा आलेख
५ अ १. आश्रमाचे बांधकाम पूर्ण झाल्यापासून, म्हणजे वर्ष २००६ पासून आश्रमाच्या आतील बाजूस असलेल्या या मोकळ्या भूभागात कोणतीही रोपेेे उगवली नव्हती; पण सप्टेंबर २०१६ मध्ये ध्यानमंदिरात श्री दत्तमालामंत्राचे पठण आरंभ झाल्यानंतर काही दिवसांत तेथे औदुंबराचीच अनेक रोपे आपोआप उगवली.
५ अ २. आलेख ‘५ अ’ मध्ये दिल्याप्रमाणे १७.१०.२०१५ या दिवशी औदुंबराची एकूण ५६ रोपे होती. त्यांची संख्या वाढून १.२.२०१६ या दिवसापर्यंत ७९ झाली आणि १.११.२०१६ ला म्हणजे ९ मासांत (महिन्यांत) ती आणखी वाढून २०२ झाली. सप्टेंबर २०१६ मध्ये साधारण ८० नवीन रोपे उगवली होती. गोव्यामध्ये जून आणि जुलै हे पावसाळ्याचे मुख्य मास आहेत. त्यामुळे पावसाळा संपत आल्यावर (सप्टेंबर मासात) अचानक एवढ्या मोठ्या संख्येने रोपे उगवणे वैशिष्ट्यपूर्ण आहे.
५ आ. औदुंबराच्या रोपांची वाढलेली संख्या दर्शवणारी ध्यानमंदिराजवळील भूभागाची रंगीत छायाचित्रे पहा पृष्ठ १२ वर 
५ आ १. आश्रमाच्या आतील मोकळ्या भूभागात औदुंबराची रोपे सर्वत्र उगवली असली, तरी ध्यानमंदिराला लागून असणार्‍या भूभागात ती सर्वाधिक दाटीने उगवली आहेत. हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. (सूत्र ‘५ आ’ मधील छायाचित्रातील वरचा डावीकडील कोपरा पहावा.)
५ आ २. सनातन आश्रमातील ध्यानमंदिराजवळील मोकळा भूभाग चारही बाजूंनी आश्रमाच्या ३ मजली इमारतींनी वेढलेला असल्याने तेथे पक्ष्यांचा वावर अगदीच नगण्य आहे. त्यामुळे सूत्र ‘३ अ २’ मध्ये दिल्याप्रमाणे पक्ष्यांच्या विष्ठेतून, तसेच हवा आणि पाणी यांच्या वहनातून भूमीत बीजारोपण होऊन औदुंबराची रोपे उगवण्याची शक्यता नाही. 
५ इ. पितृपक्षात (१७ ते ३० सप्टेंबर २०१६ या काळात) औदुंबराच्या रोपांवर आलेले सुरवंट
५ इ १. छायाचित्र ‘५ इ’ मध्ये दाखवल्याप्रमाणे सप्टेंबर २०१६ मध्ये पितृपक्षाच्या काळात औदुंबराच्या रोपांवर पुष्कळ सुरवंट आले. रोपांवर औषध फवारणी करूनही ते गेले नाहीत; पण पितृपक्ष संपल्यावर ते दिसणे बंद झाले. 
६. निष्कर्ष
६ अ. अध्यात्मशास्त्रानुसार
६ अ १. दत्तमालामंत्रामुळे पुष्कळ प्रमाणात श्री दत्ततत्त्व पठणाच्या स्थळी निर्माण होणे आणि त्याच्या परिणामस्वरूप श्री दत्ततत्त्व पुष्कळ प्रमाणात असणारी औदुंबराची रोपे उगवणे : अध्यात्मशास्त्रातील सिद्धांतानुसार ‘शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध आणि त्यांच्याशी संबंधित शक्ती नेहमी एकत्र असतात.’ संस्कृतमधील ‘श्री दत्तमालामंत्र’ या स्तोत्रातील मुळातच असणारी शक्ती, साधकांनी केलेले भावपूर्ण पठण, थोर संत योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचा संकल्प आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे वास्तव्य असलेल्या अत्यंत पवित्र अशा सनातन आश्रमातील ध्यानंमदिरातील सात्त्विक वातावरण या सर्व चैतन्यमय घटकांचा परिणामस्वरूप श्री दत्तमालामंत्र पठणामुळे (शब्दामुळे) पठणाच्या स्थळी (ध्यानमंदिरात) पुष्कळ प्रमाणात श्री दत्ततत्त्व (शक्ती) निर्माण झाले. त्यामुळे पठणाच्या स्थळाला लागून असलेल्या मोकळ्या भूभागात श्री दत्ततत्त्व पुष्कळ प्रमाणात असणार्‍या औदुंबराच्या वाढीसाठी पोषक वातावरण निर्माण झाले. परिणामी तेथे औदुंबराची रोपे आपोआप उगवली.
६ अ १. औदुंबराच्या रोपांवरील सुरवंट हे आध्यात्मिक स्तरावरील त्रासांमुळे आलेले असणे : सकारात्मक शक्तींना त्रासदायक शक्ती विरोध करतात. पितृपक्षाच्या काळात वर्षातील इतर काळाच्या तुलनेत वातावरणातील त्रासदायक शक्तींचे प्रमाण वाढलेले असते. त्रासदायक शक्तींमुळे औदुंबरावर अनेक सुरवंट आले. ते औषधांची फवारणी करून, म्हणजे भौतिक उपायांनी दूर झाले नाहीत; पण पितृपक्ष संपल्यावर आपोआप गेले. यातून काळानुसार आध्यात्मिक त्रासाची तीव्रता अल्पाधिक होते आणि आध्यात्मिक कारणांमुळे निर्माण झालेले त्रास भौतिक उपायांनी दूर होत नाहीत, हे स्पष्ट होते.
६ आ. प्रचलित विज्ञानानुसार
६ आ १. ‘वनस्पतींना संवेदना असतात’ या वैज्ञानिक सिद्धांतानुसार दत्तमाला मंत्रजपाचा परिणाम औदुंबरावर होऊ शकणे : ऊर्जा अदृश्य असली, तरी तिचे परिणाम दृश्य असतात, उदा. विद्युत ऊर्जा डोळ्यांना दिसत नाही; पण तिच्यामुळे पेटलेला बल्ब दिसतो. मंत्रांमुळे विशिष्ट प्रकारची ऊर्जा निर्माण होते. ही ऊर्जा डोळ्यांनी दिसत नसली, तरी तिचा परिणाम होतोच. त्यामुळेच मंत्रांचा वापर विविध रोगांच्या चिकित्सेसाठीही केला जातो. मंत्रांचा परिणाम जर मनुष्यावर होतोे, तर तो वनस्पतींवरही होणारच; कारण ‘वनस्पतींनाही संवेदना असतात’ हे विज्ञानालाही मान्य आहे. थोर भारतीय संशोधक जगदिशचंद्र बोस यांनी केलेल्या संशोधनात ते सिद्ध झाले आहे.
     थोडक्यात सांगायचे, तर श्री दत्तमालामंत्राच्या पठणानंतर औदुंबराची रोपे उगवणे, ही श्रद्धाळूंसाठी एक आध्यात्मिक अनुभूती आहे आणि तिचे अध्यात्मशास्त्रीय विश्‍लेषण येथे दिले आहे; पण बुद्धीप्रामाण्यवाद्यांसाठी ही एक बुद्धीअगम्य घटना आहे, जिचे ते आधुनिक विज्ञानानुसार विश्‍लेषण देतील का ?’
- डॉ. अजय जोशी, (एम्.व्ही.एस्सी. आणि ए.एच्.(मेडिसीन), पी.जी. (फ्रान्स)) महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय, गोवा (१५.११.२०१६)
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn