Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

साधना अपरिहार्य !

संपादकीय
      काळ्या पैशांना चाप लावण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५०० आणि १ सहस्र रुपयांच्या नोटा चलनातून रहित करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे काळा पैसाधारकांचे धाबे तर दणाणलेच; पण नागरिकांमध्येही अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले. त्यातच देशभरात मीठाची टंचाई निर्माण झाल्याची अफवा पसरवली गेली. या अफवेमुळे अनेक शहरांमध्ये मीठ खरेदी करण्यासाठी लोकांच्या रांगा लागल्या. काही ठिकाणी ४०० रुपये प्रतीकिलो दरानेही मीठ खरेदी झाल्याचे वृत्त होते. संभाजीनगर येथे मीठाच्या जवळपास ४०० गोण्या चोरून नेण्याची घटना घडली. मध्यप्रदेशातील इंदूर येथे मीठ खरेदी करण्यासाठी आलेल्या नागरिकांची अधिकार्‍यांनी समजूत घालून त्यांना परत पाठवले. केंद्रीय अन्नपुरवठामंत्री रामविलास पासवान यांनी मीठाचा पुरेसा साठा असल्याचे स्पष्ट करत कोणत्याही अफवांवर विश्‍वास न ठेवण्याचे आवाहन केले. तरी नागरिकांमध्ये अफवेचे पडसाद अनेक ठिकाणी उमटलेच होते.
      समाजातील अस्थिरतेचा अपलाभ घेऊन अफवा पसरवल्या जाण्याचे उदाहरण भारतियांसाठी नवीन नाही. तंत्रज्ञानाच्या क्रांतीमुळे आज माहितीचा विस्फोट झालेला आहे. व्हॉटस् अ‍ॅपसारख्या माध्यमामुळे तर प्रत्येक क्षणाला माहितीचा ढीग समोर येऊन पडतो. यातील कोणती माहिती खरी आणि कोणती खोटी याचा सर्वसामान्यांना अंदाज येणे अवघड आहे. त्यातूनच गोंधळाची स्थिती निर्माण होते. असे असले, तरी व्यक्तीला साधनेचा पाया असेल, तर सत्य काय आहे, याची अंतर्मनातूनच जाणीव होणे शक्य आहे. पूर्वीच्या काळी ऋषीमुनींना साधनेच्या बळामुळे सत्याचे अंतर्ज्ञान होत असे. आज सर्वसामान्यांची साधना अल्प असल्याने सत्याचे नेमकेपणाने आकलन होऊ शकले नाही, तरी कोणत्याही परिस्थितीत स्थिर रहाणे, योग्य निर्णय घेता येणे, तसेच सकारात्मक असणे आदी लाभ व्यक्तीला होतातच.
      हाच नियम पोलीस-प्रशासन, न्यायक्षेत्र, तसेच शिक्षणक्षेत्र अशा सर्वच ठिकाणी लावता येऊ शकतो. अनेक वेळा बेवारस बॅगेत बॉम्ब ठेवल्याच्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सर्व परिसर रिकामा करून शोध घेतला असता, ती अफवा असल्याचे आढळून आल्याच्या बातम्या वाचनात येतात. अशा वेळी साधनेच्या बळावर व्यक्तीला खर्‍या-खोट्याची येत असलेली जाण वेळ आणि श्रम वाचण्याच्या दृष्टीने, तसेच सुव्यवस्था राखली जाण्याच्या दृष्टीनेही महत्त्वाची ठरते.
      यावर साधनेने होणारे अंतर्ज्ञान विज्ञानाच्या पातळीवर सिद्ध करा, असा बालीशपणा काही कथित बुद्धीवादी करतीलही; पण अध्यात्माचा प्रवास आधुनिक विज्ञानाच्या पुढे अनंतापर्यंत असतो. त्यामुळे कथित विज्ञानवाद्यांनी योगमार्गाला आव्हान देणे म्हणजे पहिलीतील विद्यार्थ्याने ‘रॉकेट अंतराळात कसे पाठवतात ते समजून सांगा’, असे म्हणण्यासारखे आहे. त्यामुळे कुणाला पटो अथवा न पटो, आपत्कालीन परिस्थितीत ईश्‍वरी पाठबळच मनुष्याला साहाय्यभूत ठरते, हे निश्‍चित. यासाठी सर्वांनीच साधना करून आत्मबळ वाढवणे आवश्यक आहे.
- प्रा. (कु.) शलाका सहस्रबुद्धे, पुणे.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn