Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

व्यष्टी साधनेचा आढावा घेतांना सौ. सुप्रिया माथूर यांनी साधना, स्वभावदोष आणि अहं यांविषयी केलेले मार्गदर्शन अन् आलेली अनुभूती

सौ. सुप्रिया माथूर
१. साधना
अ. ‘इतरांच्या दोषांचा परिणाम आपल्या मनावर होत असेल, तर आपली साधना होत नाही.
आ. आपण अनेक कृती बुद्धीने करत असल्यामुळे त्या मनापासून होत नाहीत; म्हणून त्यात सातत्य रहात नाही.
इ. चूक झाल्यावर प्रायश्‍चित्त न घेतल्यामुळे आपली साधना अल्प होते. याचा विचार आपण केला पाहिजे.
ई. मनाप्रमाणे करण्याची सवय लागल्यावर प्रत्येक कृती करतांना संघर्ष होतो.
उ. आपल्या मनाची स्थिती (साधना) चांगली असेल, तर शारीरिक व्याधी कितीही होऊ देत, परिस्थिती स्वीकारून आपण साधना करू शकतो.
ऊ. आपल्याला व्यष्टी साधनेविषयी किती आत्मीयता आहे, त्यावर आपले प्रयत्न अवलंबून असतात.
    आपण इतरांचे दोष बघण्यात आपली ऊर्जा व्यय करतो, त्यापेक्षा स्वतःचे दोष शोधण्यात ती ऊर्जा व्यय केली, तर आपल्याला त्याचा लाभ होईल. इतरांना दोष देतांना ‘देव आपल्यासाठी किती करतो’, याची जाणीव रहात नाही. आपल्याला एखादे सूत्र सांगतांना ‘तो अयोग्य पद्धतीने सांगत आहे’, हे न पहाता तो जे सांगत आहे, तशी कृती आपल्याला करता आली पाहिजे.
२. प्रतिक्रिया येणे 
    प्रतिक्रिया व्यक्त होत असतील, तर लगेच प्रत्यक्ष क्षमा मागावी आणि प्रतिक्रिया अव्यक्त असतील, तर मनातून देवाची क्षमायाचना करावी.
३. नकारात्मक विचार 
     आपले नकारात्मक विचार मनातील विकल्पांमुळे अधिक वाढतात.
४. चुका
अ. चुकांना घाबरून भीतीपोटी त्या सूत्राविषयी पुन:पुन्हा क्षमायाचना करत असू, तर त्याचा अभ्यासही करायला हवा.
आ. चूक झाली आणि चिंतन न करताच वरवरची क्षमा मागितली, तर तिची खंत वाटल्याची जाणीव रहात नाही.
इ. ‘मी अडचण सांगितली, तर माझी चूक होईल; म्हणून मी अडचणच सांगत नाही’, असे वाटणे ही गोष्ट गंभीर आहे.
५. चुकांचा सत्संग
अ. चुकांच्या सत्संगात इतरांना साहाय्य करण्याला केवळ १० टक्के महत्त्व आहे, तर स्वतःच्या चुकांमधून शिकण्याला ९० टक्के महत्त्व आहे.
आ. सत्संगात प्रयत्न करण्यास जमत नसेल, तर आपण पळवाट काढतो आणि देवाने दिलेली संधी गमावतो.
६. अहंचे पैलू
अ. दिवसभरात आपल्या मनात आलेल्या विचारांत ‘कोणकोणते अहंचे पैलू होते ?’, याचा अभ्यास करावा.
आ. सर्वच स्वतःच्या मनाने करून त्यावर ठाम रहात असू, तर आपण इतरांकडून शिकू शकणार नाही.
इ. स्वतःचा विचार अधिक करून कर्तेपणाची जाणीव पुष्कळ होत असेल, तर कुणाविषयी निष्कर्ष काढतांना आपण चुकतो.
ई. आपल्याला एखादे सूत्र विचारण्यात कमीपणा वाटतो; म्हणून आपण ते विचारण्याचे टाळत असल्यास आपण त्याचा अभ्यास करायला हवा.
७. अपेक्षा करणे आणि स्वतःला न्यून लेखणे 
     ‘त्याने एवढे तरी केले पाहिजे’, असा विचार करणे म्हणजे अपेक्षा आणि ‘मी एवढेही कसे केले नाही ?’, असा विचार करणे म्हणजे स्वतःला न्यून लेखणे होय. आपण साधना करतो, तरी आपला अहं अल्प होण्यासाठी किती वर्षे लागतात. मग समाजातील व्यक्तींनी लगेच पालटावे, अशी अपेक्षा आपण कशी करू शकतो ?
८. कोणाचे मन दुखवू नये ! 
      कोणाची चेष्टा-मस्करी करतांना ‘आपण कुणाचे मन दुखवत नाही ना ?’, ते पहायला हवे.
९. अनुभूती 
    सुप्रियाताई दुसर्‍या गटाचा व्यष्टी आढावा घेतांना आवरण अल्प होऊन उपाय होत असल्याचे जाणवणे : ‘आमच्या गटाचा भावसत्संग चालू होता. तेव्हा मला पुष्कळ झोप येत होती. माझ्या मागेच सुप्रियाताई दुसर्‍या गटाचा व्यष्टी आढावा घेत असतांना ‘माझ्या पाठीमागून काहीतरी येत आहे आणि माझे आवरण अल्प होऊन माझ्यावर उपाय होत आहेत’, असे मला जाणवत होते.’ 
- सौ. शुभांगी पाटणे, सांगोला, जिल्हा सोलापूर. (२४.५.२०१६)
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn