Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

राजकीय पक्षांकडील संपत्तीचाही स्रोत शोधावा !

       पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीच्या घेतलेल्या निर्णयाचे सर्वसामान्य जनतेने भरभरून स्वागत केले. स्वत:ला त्रास होऊनही जनतेने हा पालट मनापासून स्वीकारला, यावरून जनतेच्या मनात काळ्या पैशांविषयी किती चीड आहे, हे स्पष्ट होते. या निर्णयानंतर सरकारने आता एक पाऊल पुढे जाऊन सर्व राजकीय पक्षांच्या संपत्तीचा स्रोतही शोधला पाहिजे, अशी मागणी जनतेकडून केली जात आहे. याविषयी इंदूर (मध्यप्रदेश) येथील दैनिक स्वदेशचे मुख्य पत्रकार श्री. अजय जैन यांनी लिहिलेला लेख आमच्या वाचकांसाठी येथे प्रसिद्ध करत आहोत.
१. नोटाबंदीचा सर्वाधिक लाभ सर्वसामान्यांना !
     पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या प्रकारे काळ्या पैशांवर घाव घालत नोटा रहित करून विरोधी पक्षांचा आवाज क्षीण केला आहे. हा निर्णय देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकटी देण्याविषयीही आश्‍वस्त करत आहे. मी स्वत: भ्रष्टाचार करणार नाही आणि इतरांना तो करू देणार नाही, असे म्हणणारे पंतप्रधान देशाला प्रगतीपथावर नेण्यासाठी प्रयत्नशील आहेत. हे प्रयत्न करतांना काळा पैसा असणार्‍यांना चाप लावणे आवश्यक आहे. सरकारने ५०० आणि १ सहस्र रुपयांच्या नोटा बाद केल्याने सामान्य जनतेला त्याचा लाभ होईल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. भविष्यात हाच लाभ सरकारसाठी मैलाचा दगड ठरू शकतो. या निर्णयाच्या मुळाशी जाऊन विचार करता, 
अ. मालमत्तांच्या किमती अल्प होणार आहेत. 
आ. या निर्णयाच्या दुसर्‍याच दिवशी शेअर बाजारावर जो परिणाम झाला, त्यावरून बनावट नोटांचा धंदा कायमचा बंद होणार, हे निश्‍चित झाले आहे.
इ. हवालाच्या पैशांवरही लक्ष ठेवले जाणार आहे.
ई. बाजारात दोन नंबरचा पैसा बंद झाला की, आतंकवादासाठी वापरण्यात येणार्‍या काळ्या पैशांवरही नियंत्रण येईल.
उ. शैक्षणिक संस्था आणि विकासकामे यांत गती प्राप्त होणार आहे. त्याचा सरळ लाभ सर्वसामान्यांना होणार आहे. 
ऊ. भ्रष्टाचारावर बारीक लक्ष ठेवण्यात यऊन बँक व्यवहारातही वृद्धी होणार आहे. पाकिस्तानच्या विरोधात करण्यात आलेल्या सर्जिकल स्ट्राईकनंतर भारत सरकारने उभारलेले हे पाऊलही सर्जिकल स्ट्राईकपेक्षा अल्प नाही. या निर्णयाच्या विरोधात काँग्रेससह काही विरोधी पक्ष आवाज उठवत आहेत; मात्र हा निर्णय कोळशाच्या खाणीतून निघालेल्या हिर्‍यासारखा सिद्ध होणार आहे. या निर्णयामुळे आरंभीच्या काळात लहान व्यापारी आणि दुकानदार यांना बराच त्रास सोसावा लागला; परंतु चांगल्या फलश्रुतीसाठी सर्वांना आहुती द्यावीच लागेल ना ! सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये मोठा प्रश्‍न निर्माण झाला आहे की, मोठ्या नोटा पालटल्याने महागाई अल्प होणार आहे का ? अन्नधान्याच्या किमती अल्प होणार आहेत का ?
२. काळा पैसा बाळगणार्‍या चोरांना चाप बसावा !
      या निर्णयानंतर बँका आणि एटीएम् यांच्या बाहेर सर्वसामान्य जनतेला नोटा पालटण्यासाठी फार त्रास सहन करावा लागत आहे. त्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. काळा पैसा बाहेर काढण्याच्या या गडबडीत मध्यमवर्गियांमध्ये असंतोष पसरता कामा नये. काँग्रेसच्या राजवटीतील महागाईमुळे त्रस्त झाल्याने सर्वसामान्य जनतेने भाजपवर विश्‍वास ठेवला होता. महागाई काही प्रमाणात घटली; मात्र ती आणखी अल्प होण्याची आवश्यकता आहे. पंतप्रधानांच्या या निर्णयाचा काळा पैसा बाळगणार्‍या चोरांना जोरदार फटका बसला पाहिजे अन्यथा सर्वसामान्य जनता पुढे चांगल्या निर्णयांनाही विरोध करील. रिजर्व बँक ऑफ इंडिया आणि संबंधित मंत्रालय यांनी काही दिवसांनी या निर्णयाचा आढावा घ्यावा आणि अंबानी-अदानी यांच्यावर काय परिणाम झाला, हेसुद्धा पडताळून पहावे. सरकारकडून नोटांच्या निर्णयाप्रमाणे आता रोजगाराविषयी मोठा निर्णय अपेक्षित आहे.
३. जनतेनेही सरकारला साथ द्यावी !
     पंतप्रधानांचे हे पाऊल म्हणजे भाग २ असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही; कारण याविषयीचे बीज फार पूर्वी रुजवण्यात आले होते. सामान्य जनतेला बँकांमध्ये खाते उघडण्यासाठी बळजोरी केली जात होती. लोकांना त्यांचे उत्पन्न घोषित करण्यासाठी सांगितले जात होते. काळा पैसा असणार्‍यांना या योजनेमागील भविष्य लक्षात आले नाही. तत्कालीन पंतप्रधानांनी स्वत: चेतावणी दिली होती की, 
     ३० सप्टेंबरपर्यंत काळा पैसा बाहेर काढा अन्यथा तो कसा बाहेर काढायचा, हे मला माहीत आहे ! तत्कालीन पंतप्रधानांची ही चेतावणी गांभीर्याने घेण्यात आली नाही. आता मात्र हा निर्णय गांभीर्याने घ्यावा लागेल. सरकारने स्वत:चे गांभीर्य दाखवून दिले आहे. आता जनतेने कृती करण्याची वेळ आहे.
४. जुन्या नोटा बाद होणे आणि नवीन नोटा चलनात येणे, 
यांविषयीचा एकूण लाभ किंवा हानी भविष्यकाळच सांगेल !
      अर्थव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून या निर्णयाकडे पाहिल्यास देशात एकूण १७ लाख कोटी रुपयांचे चलन आहे. यामध्ये ८.२ लाख कोटी (५०० रुपयांच्या नोटा) आणि ६.७ लाख कोटी (१००० रुपयांच्या नोटा) एकूण चलनाच्या ८६ टक्के आहेत. या नोटा आता चलनातून बाहेर पडल्या आहेत. नव्या नोटा चलनात येण्यामध्ये बराच कालावधी लागेल. याविषयी लाभ किंवा हानी याची सत्यस्थिती भविष्यकाळच ठरवेल.
५. राजकीय पक्षांकडील ८० टक्के पैशांचा मागमूसच नाही !
     आज ४ सहस्र रुपयांसाठी लोकांनी रांगा लावल्या आहेत. अशा वेळी कुठल्याही राजकीय पक्षाला करामध्ये कोट्यवधी रुपयांची सूट का दिली जावी ? वर्ष २००३ नंतर राजकीय पक्ष हवाला प्रकरणात गुंतलेले आहेत. राजकीय पक्षांनी स्वत:ची सुटका करून घेतली, तरी पंतप्रधानांचे लक्ष राजकीय पुढारी, नोकरशाह आणि राजकीय पक्ष यांच्याकडील काळ्या पैशांवर गेले. आज हाऊस प्रॉपर्टी, कॅपिटल गेन, दान आणि इतर स्रोत यांद्वारे येणार्‍या पैशांवर कर लागत नाही; मात्र सर्वसामान्य व्यक्ती हॉटेलमध्ये काही खाण्यासाठी गेल्यास तिला कर भरावा लागतो. राजकीय पक्षांकडे ८० टक्के पैसा कुठून येतो, याचा थांगपत्ता नसतो. सरकारने याचा शोध घेतला पाहिजे. देशात १ सहस्र ७३७ राजकीय पक्ष आहेत. यांतील काही पक्षांनी कधी निवडणुकाही लढवलेल्या नाहीत. तरीही त्यांना सर्व सुविधा प्राप्त आहेत. आयकर (प्राप्तीकर) कायद्याच्या १३ अ कलमानुसार राजकीय पक्षांना करामध्ये सूट मिळाली आहे; परंतु राजकीय पक्षांना मिळणार्‍या निनावी दानातून सरकारला काय मिळाले ? हा प्रश्‍न निर्माण होतो. यावरही कर लावला गेला, तरच सर्वसामान्य लोकांमध्ये समानतेची भावना निर्माण होईल. निवडणूक निधीच्या नावे लहान-मोठे राजकीय पक्ष काळा पैसा वापरात आणतात. यावरही आता सर्जिकल स्ट्राईक करण्याची वेळ आली आहे. निवडणूक निधीच्या सूत्रावरून वर्ष १९७१ मध्ये स्थापन केलेल्या वांचू समितीने अनेक प्रश्‍न उपस्थित केले होते आणि चिंता व्यक्त केली होती. निवडणूक सुधारणांविषयी काम करणार्‍या एडीआर् या संस्थेने प्रसिद्ध केलेली आकडेवारी आश्‍चर्यचकित करणारी आहे. त्यानुसार वर्ष २००४ ते २०१५ या कालावधीत ७१ विधानसभा आणि ३ लोकसभा निवडणुकांसाठी राजकीय पक्षांना २ सहस्र १०० कोटी रूपये रोख दानापोटी मिळाले आहेत. एवढेच नव्हे, तर गेल्या लोकसभा निवडणुकीत निवडणूक आयोगाला ३०० कोटी रूपये निनावी रोख सापडली होती. यावरून राजकीय पक्षांना मिळणार्‍या निधीपैकी ८० टक्के निधी कुठून येतो याचा पत्ताच नसतो, असे म्हटल्यास अयोग्य ठरणार नाही. या पैशांवरही कर लावल्यास ते योग्य दिशेने उचललेले पाऊल ठरू शकते.
- श्री. अजय जैन, मुख्य पत्रकार, दैनिक स्वदेश, इंदूर (मध्यप्रदेश)
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn