Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

प.पू. डॉक्टरांनी साधकांना केलेले अमूल्य मार्गदर्शन

१. भावाचे महत्त्व 
     ‘भावात आनंद आहे. भावानंतर शांतीचा टप्पा आहे. भावाच्या स्थितीत जाणे अवघड असते. सतत शरणागत भावाने प्रयत्न करायला हवेत. भावाच्या स्तरावर असणार्‍या साधकांची प्रार्थना देव ऐकणारच ! भाव-भक्ती वाढली की, शक्ती वाढते. पुढील आपत्काळात ज्यांच्यात शारीरिक बळ आहे, ते शारीरिक स्तरावर कार्य करतील. ज्यांच्यात बौद्धिक बळ आहे, ते नियोजन करतील आणि या दोघांनाही चैतन्य पुरवण्याचे कार्य भाव असणारे, म्हणजेच आध्यात्मिक बळ असणारे साधक करतील; मात्र त्या वेळी हे चैतन्य ग्रहण करण्याची क्षमता साधकांत असायला हवी. त्यासाठी आता नामजप आणि साधना करणे आवश्यक आहे.
२. तळमळ 
     तळमळीला साधनेत ८० टक्के महत्त्व आहे. त्यामुळे साधनेचे प्रयत्न तळमळीने करायला हवेत.
३. हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) 
     हिंदु राष्ट्राची (सनातन धर्म राज्याची) स्थापना संपूर्ण पृथ्वीवर होणार आहे. संत संकल्प करतील आणि हिंदु राष्ट्राची स्थापना होईल. संकल्पानेच कार्य होणार आहे; मात्र आपण हे कार्य करणार आहोत; कारण त्यातून आपली साधना होणार आहे. पुढच्या टप्प्याला संतांच्या अस्तित्वानेच कार्य होणार आहे. कार्य सतत करत रहायचे. छोटे-छोटे ध्येय घेऊन साधनेच्या कृती करत जायच्या. भावनेच्या भरात कोणतीही कृती करायला नको. रामराज्यात जाण्यासाठी सत्त्वगुण लागेल. साधकांमध्ये सत्त्वप्रधान रजोगुण असेल, तर कार्य चांगले होणार आहे. नामजप करून सात्त्विकता वाढवायची. ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे जीव महर्लोकात राहून केवळ नामजप करण्यापेक्षा पुढच्या साधनेसाठी पृथ्वीवर जन्म घेत आहेत. हीच उच्च लोक आणि महर्लोकातील मुले पुढे ईश्‍वरी राज्य चालवतील. 
    ‘सर्व हिंदू माझेच आहेत’, असे वाटले पाहिजे. ‘प्रत्येक व्यक्ती आपल्यालाच जोडली जाणार’, अशी अपेक्षा करायला नको. धर्माभिमानी शोधण्यासाठी आपण सभा घेतो. त्यानंतर आढावा बैठक घेतो, एवढ्या लोकांपैकी या बैठकीला येणारे खरे धर्माभिमानी. हे सर्व आपण साधना म्हणून करतो, तर अन्यत्र हे सर्व पदासाठी करतात. आपल्याला मात्र त्याग करायचा आहे. आपल्याकडे जे आहे, ते हिंदु राष्ट्रासाठी अर्पण करायचे आहे. महिला रात्री १२ वाजताही दागिने घालून कुठेही एकट्याने वावरू शकतील, असे हिंदु राष्ट्र आपल्याला हवे आहे.’
- परात्पर गुरु डॉ. आठवले
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn