Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

गोवा राज्याचा ऑक्टोबर २०१६ मधील हिंदु जनजागृती समितीच्या प्रसारकार्याचा आढावा

डॉ. मनोज सोलंकी-
१. राष्ट्रीय हिंदू आंदोलनात विविध संघटनांचा सहभाग 
     म्हापसा, गोवा येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलनांतर्गत ९ ऑक्टोबर या दिवशी म्हापसा नगरपालिका बाजारात आंदोलन करण्यात आले. यामध्ये सनातन संस्था, रणरागिणी शाखा, मराठी राजभाषा समिती, गोमंतक मंदिर आणि धार्मिक संस्था महासंघ, शिवसेना, विठ्ठल-रुक्मिणी देवस्थान समिती, राष्ट्रप्रेमी संघटना आणि भारतीय भाषा सुरक्षा मंच या संघटनांचा सहभाग होता. बिलिव्हर्स पंथियांच्या विरोधात जागृती करणार्‍यांची मुस्कटदाबी थांबवा, फटाक्यांवर तात्काळ बंदी घाला आणि मराठीला राजभाषेचा दर्जा द्या, हे या आंदोलनाचे विषय होते.
२. दसर्‍याच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात हिंदु जनजागृती समितीचा सहभाग 
    कळंगुट येथील श्री शांतादुर्गा संस्थानच्या वतीने दसर्‍याच्या निमित्ताने आयोजित केलेल्या रासगरबा कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून हिंदु जनजागृती समिती आणि एक भारत अभियान-कश्मीर की ओरचे सदस्य श्री. जयेश थळी यांना निमंत्रित करण्यात आले होते. या कार्यक्रमात श्री. जयेश थळी यांनी काश्मीरच्या समस्येचा विषय मांडून लोकांमध्ये जागृती केली. या कार्यक्रमात कळंगुट पंचक्रोशीतील सर्व देवस्थान समित्यांचे सदस्य मिळून अनुमानेे ४०० जणांची उपस्थिती लाभली.
३. एक भारत अभियान-कश्मीर की ओर मोहिमेअंतर्गत सभा आणि बैठकांचे आयोजन !
३ अ. एक वक्ता एक सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद : १६ ऑक्टोबर या दिवशी पर्वरी येथील धर्माभिमानी श्री. राजकुमार देसाई यांच्या निवासस्थानी एक वक्ता एक सभा घेण्यात आली. या वेळी हिंदु जनजागृती समिती आणि एक भारत अभियान-कश्मीर की ओरचे सदस्य श्री. जयेश थळी यांनी विषय मांडला. ही सभा यशस्वी करण्यासाठी श्री. राजकुमार देसाई आणि श्री. उदय मुंज यांनी साहाय्य केले, तसेच अन्य ४ धर्माभिमानी सेवेत सहभागी झाले. त्यांनी अन्य ३ ठिकाणी छोट्या सभा आणि रणरागिणी शाखेच्या वतीने एक बैठक आयोजित करण्याची सिद्धता दर्शवली.
३ आ. पेन्ह-दि-फ्रान्स आणि पोम्बुर्फा पंचायतींचे काश्मिरी हिंदूंना पाठिंबा दर्शवणारा ठराव करण्याचे आश्‍वासन : पेन्ह-दि-फ्रान्स पंचायतीच्या सदस्यांना संपर्क केल्यावर त्यांनी जनसंवाद सभेचे आयोजन करण्याची अनुमती दिली. सभेचा प्रचार-प्रसार आम्ही करतो, तुम्ही केवळ वक्ते म्हणून या, असे त्यांनी सांगितले, तसेच पंचायतीच्या वतीने त्वरित ठराव करण्याची सिद्धता दर्शवली.
     पोम्बुर्फा ग्रामपंचायतीत एक भारत अभियान - कश्मीर की ओर याविषयी सांगितल्यानंतर तेथील सरपंच आणि पंचसदस्य यांनी सकारात्मक प्रतिसाद देत ग्रामसभेत विस्थापित हिंदूंच्या पुनर्वसनासंबंधी ठराव संमत करून घेण्याचे आश्‍वासन दिले.
३ इ. म्हापसा येथे प्रत्येक गुरुवारी संघटित होण्याचा धर्माभिमान्यांचा निर्धार : म्हापसा येथील सुहास हॉटेलमध्ये १८ ऑक्टोबर या दिवशी एक भारत अभियानच्या सभेनंतरची दुसरी बैठक झाली. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ता श्री. रमेश शिंदे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. बैठकीत गोव्यात वाढलेले धर्मांतराचे प्रकार, म्हापसा बाजारात धर्मांधांचे वाढते प्रस्थ, या समस्यांविषयीही चर्चा करण्यात आली. या समस्यांच्या विरोधात जनजागृतीची दिशा ठरवण्यासाठी प्रत्येक गुरुवारी एकत्र येण्याचेही निश्‍चित करण्यात आले. 
३ ई. म्हापसा येथील धर्माभिमानी कृतीशील : म्हापसा येथे झालेल्या एक भारत अभियानच्या सभेनंतर कृतीप्रवण झालेल्या हिंदूंनी संघटितपणे कार्य करण्याचे ठरवले आहे. या दृष्टीने म्हापसा येथे झालेल्या तिसर्‍या बैठकीत मंदिराचे पावित्र्य राखण्यासंदर्भात बार्देश तालुक्यातील देवस्थान समितीच्या सदस्यांना भेटून प्रबोधन करण्याचे ठरले. मंदिरात येणार्‍या पर्यटकांना नियमावली घालून देण्याचे आवाहन सर्व मंदिर समितीच्या सदस्यांना करण्यात येणार आहे.
४. धर्माभिमान्यांचा धर्मकार्यात सहभागी होण्यासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद
अ. म्हापसा येथील अधिवक्ता श्री. महेश शेटगावकर आणि श्री. अतुल आपटे यांची भेट घेतल्यावर त्यांनी राष्ट्र आणि धर्म यांच्या कार्यात सहभागी होण्याची सिद्धता दर्शवली.
आ. कुर्टी, फोंडा येथील केंद्रीय विद्यालयात संपर्क केल्यानंतर त्यांनी शाळेत शौर्यजागरणचा विषय घेण्याची अनुमती दिली.
इ. तोकडे कपडे परिधान करून मंदिरात प्रवेश करण्यावर प्रतिबंध घालावा, अशा मागणीचे निवेदन म्हापसा येथील श्री महारुद्र संस्थानचे (श्री मारुती मंदिर) अध्यक्ष श्री. अमर कवळेकर यांच्याकडे रणरागिणी शाखेच्या वतीने देण्यात आले. या वेळी रणरागिणी शाखेच्या सौ. राजश्री गडेकर, सनातन संस्थेच्या सौ. अंजली नायक, सौ. शर्वाणी आगरवाडेकर यांचा समावेश होता. श्री. अमर कवळेकर यांनी या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला. रणरागिणी शाखेच्या वतीने श्री भूमिका मंदिर, श्री साईबाबा मंदिर आणि श्री सिद्धेश्‍वर मंडप येथेही याच संदर्भात निवेदन देण्यात आले.
५. दिवाळीत नरकासुरदहन प्रथेतील गैरप्रकार रोखण्याविषयी निवेदनांद्वारे जागृती
अ. नरकासुरदहन प्रथेतील गैरप्रकार रोखण्याविषयी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने काणकोण, म्हापसा, फोंडा, पणजी, पेडणे येथे पोलीस आणि जिल्हाधिकारी कार्यालय येथे निवेदने देण्यात आली.
आ. मडकई मतदारसंघातील सहाही पंचायतींनी यंदा नरकासुर स्पर्धेला विरोध केला आणि भगवान श्रीकृष्णाच्या पूजनाला महत्त्व देऊन पारंपरिक पद्धतीने दिवाळी साजरी करण्याचे आवाहन केले. यासाठी हिंदु जनजागृती समितीने त्यांचे अभिनंदन केले. या वेळी नरकासुर प्रतिमेद्वारे आतंकवादी पाकिस्तान आणि त्याला साहाय्य करणारा चीन यांच्या विरोधात चीड व्यक्त करण्यात आली. 
इ. नरकचतुर्दशीच्या दिवशी संपूर्ण मये गावात भगवान श्रीकृष्णाची मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत मये ग्रामस्थ, हिंदु जनजागृती समिती, सनातन संस्था, आदिनाथ संप्रदाय इत्यादी संघटनांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. 
६. चिनी उत्पादनांवर बहिष्कार घालण्यासाठी जनप्रबोधन मोहीम
अ. म्हापसा येथे हिंदु जनजागृती समिती आणि अन्य हिंदुत्वनिष्ठ यांनी बाजारपेठेत जाऊन चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्यासाठी व्यापारी आणि ग्राहक यांचे प्रबोधन केले. या मोहिमेला सर्व व्यापार्‍यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि भारत माता की जय अशा घोषणा दिल्या. राष्ट्रप्रेमी नागरिकांनी ग्राहक आणि व्यापारी मिळून अनुमाने ५०० लोकांपर्यंत हा विषय पोचवला.
आ. म्हापसा येथील राष्ट्रप्रेमी नागरिकांनी म्हापसा बाजारात चिनी उत्पादनांवर बहिष्कार घाला, स्वदेशीचा वापर करा, ही जनप्रबोधन मोहीम २१ ऑक्टोबर या दिवशी राबवली. म्हापसा बाजारपेठेतील व्यापारीवर्ग आणि ग्राहक यांचे प्रबोधन केल्यावर सर्वांनी चांगला प्रतिसाद दिला. बाजारात अनेकांनी थांबून मोहिमेसंदर्भात माहिती जाणून घेतली. या मोहिमेत हिंदु जनजागृती समिती, चिन्मय मिशन, पतंजली योग समिती, सनातन संस्था, रणरागिणी शाखा आणि अनेक राष्ट्रप्रेमी नागरिकांनी सहभाग घेतला. या मोहिमेत ५० हून अधिक जणांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.
इ. अशीच मोहीम फोंडा येथील राष्ट्रप्रेमी नागरिकांनी शहरात तीन ठिकाणी राबवली. या वेळी हिंदु जनजागृती समिती, चिन्मय मिशन, फोंडा आणि म्हापसा येथील धर्माभिमानी, सनातन संस्था, रणरागिणी, तसेच अनेक राष्ट्रप्रेमी नागरिकांनी सहभाग घेतला. फोंडा येथील किराणा मालाचे मोठे व्यापारी रा.व्यं. कुडतरकर अ‍ॅन्ड सन्स यांना या वेळी निवेदन देण्यात आले. मी येणार्‍या सर्व ग्राहकांना हे निवेदन वाचण्यास सांगेन. तुमचा उपक्रम स्तुत्य आहे. आमचा तुम्हाला पूर्ण पाठिंबा आहे, असे कुडतरकर म्हणाले. २१ जणांचा गट स्वतःहून आंदोलनात सहभागी झाला. अनुमाने २ सहस्र लोकांपर्यंत विषय पोचला.
ई. पेडणे येथील बाजारपेठेत मोहीम राबवल्यावर १ सहस्र लोकांपर्यंत विषय पोचला. 
उ. पणजी येथील बाजारपेठेत व्यापार्‍यांना हिंदु जनजागृती समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले.
    या मोहिमेद्वारे अनुमाने १२ सहस्र लोकांचे प्रबोधन करण्यात आले. स्थानिक वृत्तपत्रे, वृत्तवाहिनी आणि सामाजिक प्रसारमाध्यमे यांद्वारे या मोहिमेला चांगली प्रसिद्धी मिळाली.
७. शौर्य जागरण मोहीम 
अ. १४ ऑक्टोबर या दिवशी पणजी बसस्थानकावर श्री दुर्गामाता पूजनाच्या ठिकाणी हिंदु जनजागृती समितीचे श्री. जयेश थळी यांनी एक भारत अभियान-कश्मीर की ओर या मोहिमेअंतर्गत शौर्य जागरण हा विषय मांडला. या वेळी २५० जणांची उपस्थिती लाभली. श्री दुर्गामाता पूजन समितीच्या सदस्यांनी प्रभावित होऊन रामनाथी येथील सनातन आश्रमाला भेट देण्याची इच्छा व्यक्त केली.
आ. २६ ऑक्टोबर या दिवशी पणजी येथील प्रोग्रेस हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे विद्या प्रबोधिनी संकुल, पर्वरी येथे शौर्य जागरण या विषयावर प्रबोधन करण्यात आले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. गोविंद चोडणकर यांनी विषय मांडला. इयत्ता ८ वी ते १० वीच्या वर्गातील विद्यार्थ्यांनी या विषयाचा लाभ घेतला.
८. मडगाव, केपे, गोवा येथे राजस्थान क्षत्रिय संघाच्या नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात हिंदु जनजागृती समितीला विषय मांडण्यासाठी निमंत्रित केले होते. त्या कार्यक्रमात श्री. संगम बोरकर यांनी नवरात्र या विषयावर मार्गदर्शन केले. त्या ठिकाणी लावलेल्या सनातन-निर्मित ग्रंथ प्रदर्शनालाही उत्तम प्रतिसाद लाभला. कार्यक्रमाला २०० हून अधिक भाविक उपस्थित होते. 
- डॉ. मनोज सोलंकी, समन्वयक, हिंदु जनजागृती समिती, गोवा. 
शिवसेनेचे पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे यांची भेट 
     गोवा दौर्‍यावर असलेले शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे यांच्यासह गोव्यातील हिंदुत्वनिष्ठांची महत्त्वाची बैठक झाली. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. जयेश थळी, रणरागिणी शाखेच्या सौ. राजश्री गडेकर, हिंदु महासभेचे गोवा राज्य अध्यक्ष श्री. शिवप्रसाद जोशी, सनातन संस्थेच्या सौ. शुभा सावंत, व्यापारी संघटनेचे श्री. मनोज वाळके, भारतीय संस्कृती रक्षा मंचचे श्री. अंकित साळगावकर उपस्थित होते. बिलिव्हर्स पंथियांकडून होणारे हिंदूंचे धर्मांतर, बाजारपेठांमध्ये धर्मांधांची वाढती दहशत या गोव्याला भेडसावणार्‍या समस्यांवर शिवसेना आणि शिवसैनिक गोव्याच्या नागरिकांच्या खांद्याला खांदा लावून लढतील, असे आश्‍वासन श्री. उद्धव ठाकरे यांनी बैठकीत दिले.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn