Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

सगुणातील ईश्‍वराची अनुभूती देणारे एकमेवाद्वितीय संत प.पू. परशराम पांडे महाराज ! (वय ८९ वर्षे)

प.पू. परशराम पांडे महाराज
       ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी निर्माण केलेल्या या साधनेच्या विश्‍वातील एक उच्च विभूती म्हणजे प.पू. परशराम माधव पांडे महाराज (प.पू. बाबा) ! ३० नोव्हेंबर २०१६, म्हणजेच मार्गशीर्ष शुक्ल पक्ष प्रतिपदा या दिवशी ते ९० व्या वर्षात पदार्पण करत आहेत. त्यानिमित्ताने त्यांचे चरणी उतराई होण्यासाठी देवद आश्रमातील साधकांनी ही शब्द सुमनांजली अर्पण करण्याचा प्रयत्न केला आहे. हे लिखाण म्हणजे देवद आश्रमातील सर्व साधकांचे मनोगत आहे. 
       प.पू. बाबांचे देवद आश्रमातील साधकांच्या हृदयातील असे अद्वितीय स्थान आहे. परात्पर गुरु डॉक्टरांची देवद आश्रमातील साधकांवर असलेली ही कृपाच आहे, यासाठी ही कृतज्ञतापुष्पांची आेंजळ त्यांच्या चरणी रीती करत आहोत.’
प.पू. परशराम पांडे महाराज 
यांना वाढदिवसानिमित्त सनातन 
परिवाराचा कृतज्ञतापूर्वक नमस्कार !
१. गुणवैशिष्ट्ये

प.पू. पांडे महाराज यांची भावमुद्रा ! (वर्ष २००९)

कु. योगिनी आफळे (वय १४ वर्षे) हिने प.पू. पांडे महाराजांना दिलेले कृतज्ञतापत्र

१ अ. व्यष्टी गुणवैशिष्ट्ये
१ अ १. रूप मनोहर ! : ‘प.पू. बाबांचे रूप पुष्कळ मनोहर आहे. त्यांच्याकडे पहातच रहावेसे वाटते. त्यांचे खाणे, पिणे, बोलणे, चालणे, झोपणे, वाचणे, लिहिणे इत्यादी सर्वच कृती सुंदर आहेत. त्या कृती पहाण्यातही आपल्या दृष्टीला एक वेगळाच आनंद आहे. त्यांच्याकडेच दृष्टी खिळून रहाते. त्यांचे चरणही पुष्कळ सुंदर आहेत. ‘त्यातच सर्व आनंद सामावला आहे’, असे वाटते. त्यांच्या दर्शनाने एक वेगळीच स्थिती होते.’ 
- सौ. अश्‍विनी अतुल पवार 
१ अ २. आनंदी आणि उत्साही : ‘प.पू. बाबांना कधीही कोणत्याही क्षणी पाहिले, तरी ते नेहमी आनंदी आणि उत्साही असतात. त्यांचे विश्‍व निराळेच आहे. 
१ अ ३. मानवी गुणांची खाणच ! : ‘प.पू. बाबा म्हणजे मानवी गुणांची खाणच आहेत. आपल्याकडेच ‘त्यांच्यातील देवत्वाचे दर्शन सर्वांना घडावे’, याचे वर्णन करण्याचे शब्द नाहीत. स्थूल दृष्टीने जे कळते, त्यातच त्यांची महानता, श्रेष्ठत्व अन् गुरुतत्त्व यांचे वर्णन करतांना मती कुंठीत होते. ‘त्यांना जाणण्यासाठी अजून साधनाच पुष्कळ वाढायला व्हायला हवी’, असे वाटते. - कु. पूजा जठार आणि कु. स्नेहा झरकर 
१ अ ४. दैनंदिन सर्व कृतींमध्ये अखंडत्व असणे : ‘वयाच्या ९० व्या वर्षी पहाटे ४.३० वाजता उठल्यानंतर दिवसभर व्यस्त दिनक्रम ठेवणारे संत विरळेच आहेत. उठणे, औषध घेणे, मुखमार्जन, फिरणे, अंघोळ, व्यायाम, पूजा, दैनिक सनातन प्रभातचे वाचन करून त्यातील चुका काढणे, साधकांसाठी नामजप करणे, नंतर ग्रंथाची सेवा इत्यादी कृती करत रात्री मर्दन करून घेऊन झोपणे इत्यादी कृती ते न कंटाळता करतात. वयपरत्वे एखाद्याला वाटू शकते ‘एवढे काय आवश्यक आहे’; मात्र ते दैनिकातील प्रत्येक चौकटीनुसार आज्ञापालन, स्वयंशिस्त आणि अखंड समष्टीचा विचार करत असल्याने प्रत्येक कृती नेटाने पूर्ण करतात. त्यांचे म्हणणे असते की, मला कुणाचे बंधन नाही; पण मी ईश्‍वराला बांधील असल्यामुळे या सर्व कृती करत असतो.’ 
- श्री. यज्ञेश सावंत आणि सौ. आनंदी रामचंद्र पांगुळ 
१ अ ५. आदर्श आचरण
१ अ ५ अ. ‘दैनिकातील सूचनांचे आज्ञापालन : महर्षींनी सांगितल्यापासून ते रात्री झोपण्यापूर्वीही कुंकू लावून झोपतात. दिवसाही नेहमी कपाळावर कुंकवाचा टिळा असतो.’ - सौ. अश्‍विनी अतुल पवार (१९.११.२०१६)
१ अ ५ आ. उपाय तत्परतेने करणे : ‘दैनिक सनातन प्रभात मध्ये येणारे लहानसहान आयुर्वेदिय उपचार, जे त्यांना करणे सोपे आणि आवश्यक आहेत, ते सर्व उपाय ते तत्परतेने करतात.’ - सौ. आनंदी रामचंद्र पांगुळ
१ अ ६. इतरांना समजून घेणे : ‘मी सेवेत नवीन असल्यामुळे माझ्याकडून झालेल्या चुका ते समजून घेतात. ते उच्च कोटीचे संत असून वयोवृद्धही असल्याने त्यांना त्रास होऊ नये, यासाठी मी प्रयत्न करतांना मला ताणही येत असे. तेव्हा प.पू. बाबा म्हणाले, ‘‘घाबरू नकोस. समजून घेऊन आणि भावाच्या स्तरावर प्रयत्न केले की, जमेल.’’ त्या वेळी प.पू. बाबांचा प्रत्येक शब्द पुष्कळ मौल्यवान वाटून बळ आणि उत्साह देतो.’ 
- श्री. संदेश नाणोसकर आणि कु. सोनाली गायकवाड 
१ अ ७. सेवेतील तळमळ
१ अ ७ अ. चिकाटी : ‘मी आणि आई त्यांच्याकडे वैशिष्ट्यपूर्ण आणि विविध आकारातील असणार्‍या संग्राह्य दगड सेवेतील दगड घेऊन सेवेला जातो. त्या वेळी ते नुकतेच ध्यानातून उठलेले असतात. तेव्हा विश्रांती न घेता ते लगेच सेवेला बसतात. यातून त्यांची सेवेतील चिकाटी लक्षात येते. 
१ अ ७ आ. सेवा परिपूर्ण होण्यासाठी प्रयत्न : प.पू. बाबांना सेवेत चूक झालेली आवडत नाही. ते नेहमी एक सेवा झाल्यावर ती लगेच पडताळतात आणि ‘त्यात काही त्रुटी राहिली नाही ना’, हे पहातात. यातून त्यांची सेवा परिपूर्ण होण्याची तळमळ लक्षात येते. 
- कु. योगिनी आफळे (वय १४ वर्षे)
१ अ ८. परिपूर्णता : ‘लिखाणाची सेवा चालू असतांना त्यांना एखाद्या विषयावर अनेक दिवस ज्ञान येत रहाते. जोपर्यंत त्यांना ‘हा विषय पूर्ण झाला’, असे वाटत नाही, तोपर्यंत ते लिखाण पुढे पाठवण्यास सांगत नाहीत. यामध्ये त्या विषयावर कितीही पाने लिखाण झाले, तरी ते पूर्ण होईपर्यंत ते थांबत नाहीत. प.पू. बाबांकडून येणारे ज्ञान परिपूर्ण असल्यामुळे त्यांच्या धारिका प्रदीर्घ असतात. यावरून त्यांची सेवा परिपूर्ण कशी करायची असते, हे लक्षात येते. 
१ अ ९. स्मृतीची विलक्षण कार्यक्षमता : कोणत्याही विषयावरील लिखाण करतांना ते प्रत्येक वेळी संदर्भ ग्रंथानुसार पडताळणी करूनच सूत्र लिहितात. ते कधीच गृहीत धरत नाहीत. तसेच त्यांनी फार पूर्वी वाचलेलेसुद्धा त्यांच्या अजून स्मृतीत आहे. ‘कोणते सूत्र कुठे सापडेल’, हे ते तंतोतंत सांगतात. त्यांची स्मृती कमालीची कार्यक्षम आहे.’ 
- सौ. आनंदी रामचंद्र पांगुळ 
१ अ १०. इतरांचा विचार करणे
अ. आश्रमातील परिसरात कधी कुत्रा आला, तर त्याला भाकरी देण्यास सांगतात. त्यांचे सर्व प्राणीमात्रांवर पुष्कळ प्रेम आहे. 
आ. नामजपाला गेल्यानंतर कधी खोलीत पंखा चालू असेल आणि आपल्याला शिंक आली, तर ते पंख्याची गती न्यून करण्यास सांगतात. ‘उपस्थित साधकांना पंखा लागणार का ?’, असे तत्परतेने विचारून बंद करण्यास सांगतात. ते पुष्कळ सतर्क असतात. त्यांचे प्रेम पुष्कळ निराळेच आहे.’ 
इ. ‘आश्रमातील एक वृद्ध रुग्णाईत साधकाला प.पू. बाबांना भेटायचे होते. प.पू. बाबा तळमजल्यावर रहातात आणि ते साधक पहिल्या मजल्यावर रहातात. त्या वेळी प.पू. बाबांनी स्वतःहून विचारले ‘‘ते कसे येणार ? मीच त्यांना भेटायला जातो.’’ 
ई. प.पू. बाबांच्या खोलीत नामजपासाठी कुणी येणार असल्यास ते येण्यापूर्वीच त्यांच्यासाठी आसंदी आणून ठेवायला सांगतात. आसंदीची दिशा कशी असायला पाहिजे, तेही सांगतात.’ 
- सौ. अश्‍विनी अतुल पवार 
१ अ ११. साधकांना 
स्वतःहून साहाय्य करणे 
अ. ‘प.पू. बाबांकडे कुणी साधक गेला आणि त्याची पाठ दुखत असेल, तर ते त्याची पाठ दाबून देतात. कुणाचा घसा दुखतो, तर त्याला औषध लावून देतात; एखाद्याचे डोके दुखल्यास दाबून देतात. एखाद्याला काही शारीरिक किंवा आध्यात्मिक त्रास होत असेल, तर प.पू. बाबा तो साधक बरा होईपर्यंत त्याची पुष्कळ काळजी घेतात आणि निरनिराळे उपाय अन् मंत्रोपाय सांगत असतात.’ 
- सौ. अश्‍विनी अतुल पवार 
आ. ‘प.पू. बाबा म्हणतात, ‘आपल्याकडे साहाय्य मागायला आलेल्याला कधीच रित्या हाती मागे पाठवायचे नाही. त्यात भगवंताचे रूप पहायचे आणि त्याला साहाय्य करायचे.’ असे प.पू. बाबांचे तत्त्व आहे.’ 
- सौ. आनंदी रामचंद्र पांगुळ 
१ अ १२. देवद आश्रमातील चुकांसाठी स्वत:ला उत्तरदायी धरणे : ‘काही वर्षांपूर्वी देवद आश्रमात अनेक चुका लक्षात आल्या होत्या. खरेतर साधकांतील दोषांमुळे या चुका झाल्या होत्या; मात्र त्याविषयी प.पू. महाराज यांनी ‘मी स्वत: या चुकांसाठी उत्तरदायी आहे. मीही आश्रम परिसरात फिरत असतो’, असे सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना सांगितले.’ - श्री. यज्ञेश सावंत 
१ अ १३. सनातन संस्थेशी पूर्वीपासून, सध्या आणि पुढेही एकरूप असणे : ‘सनातन संस्थेत येण्यापूर्वी त्यांनी ‘श्री गणेश अध्यात्म दर्शन’ हा ग्रंथ लिहिला आहे. तो ग्रंथ सनातन संस्थेने प्रकाशित केलेल्या ग्रंथासारखाच आहे. त्यामध्ये चित्रे, सारणी, तक्ते, टक्केवारी अशी आधुनिक वैज्ञानिक भाषा आहे. यावरून ‘ते सनातन संस्थेशी पूर्वीपासून एकरूप होते, सध्या आहेत आणि पुढेही असणार आहेत’, हे लक्षात येते.’ 
- श्री. शिवाजी वटकर
१ अ १४. कर्तेपणा नसणे : ‘प.पू. बाबा साधकांना त्रासावर उपाय सांगून व्यायाम करायला सांगतात. त्यांनी सांगितल्याप्रमाणे साधकांनी कृती केली की, साधकांना लगेच फरक पडतो. हे प.पू. बाबांना सांगितल्यावर ते म्हणतात, ‘‘मी काय डॉक्टर आहे का लगेच फरक पडायला ? हे परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेमुळे झाले.’’ 
- श्री. सचिन हाके 
१ अ १५. अंतर्मुखता : ‘प.पू. बाबा कमालीचे अंतर्मुख असतात. त्यांना बाहेरील सगुणातील विश्‍वात भगवंताविना दुसरे काही दिसतच नाही. तसेच ते इतके पारदर्शक आहेत की, त्यांना स्वतःच्या ठिकाणी भगवंताविना कुणी दिसतच नाही. भगवंताची लीलाच ते सदैव अनुभवत असतात. त्या आनंदात ते तल्लीन असतात. 
१ अ १६. ६५ वर्षांची सोबत दिलेली सहचारीणी कायमची सोडून गेल्याच्या भाव-भावना त्यांना सद्गतित करून गेल्या होत्या, हे त्यांच्या स्वरात झालेल्या पालटामुळे जाणवणे : ‘‘ती. सौ. पांडेआजींच्या मृत्यूनंतर पुढील ८ दिवस ‘प.पू. बाबांनी आजींचा मृत्यू अक्षरशः गिळला’, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही; कारण या दिवसांत त्यांचा कंठस्वर नीट प्रगट होत नव्हता; परंतु त्यांनी आम्हा कुणालाच याविषयी काही जाणवू दिले नाही. ‘६५ वर्षांची सोबत दिलेली सहचारीणी कायमची सोडून गेल्याच्या भाव-भावना त्यांना सद्गतित करून गेल्या होत्या’, हे त्यांच्या स्वरात झालेल्या पालटामुळे जाणवले. ‘प्रभु रामचंद्राने सीतेचा विरह, कसा अनुभवला असेल’, हे प.पू. पांडे महाराज यांच्या या पालटातून अनुभवता आला.’ - सौ. आनंदी रामचंद्र पांगुळ 
१ अ १७. प्रत्येक गोष्ट स्वत: आचरणात आणतात. 
१ आ. समष्टी गुणवैशिष्ट्ये
१ आ १. साधकांना शिकवणे
अ. ‘प.पू. बाबा कोणतीही गोष्ट सांगतांना किंवा कृती करतांना ती आध्यात्मिक स्तरावर करतात. त्यामागील मूळ तत्त्व सांगतात. त्यासाठी ते वेद, उपनिषद, भगवत्गीता आदींचा संदर्भ देतात.
आ. प.पू. बाबांना व्यष्टी आणि समष्टी यांविषयीची कोणतीही समस्या किंवा अडचण सांगितल्यावर ते त्वरित आध्यात्मिक स्तरावर निराकरण करतात. त्या समस्येचे विश्‍लेषण करून आध्यात्मिक सूत्र सिद्ध करतात. त्या सूत्रात तो प्रश्‍न किंवा गणित बसवून उत्तर देतात. त्यामुळे त्या प्रकारचा कोणताही प्रश्‍न (गणित) त्या सूत्राच्या आधारे सोडवता येतो. अशा रीतीने ते साधकांना स्वयंपूर्ण आणि स्वावलंबी बनवतात. 
इ. प.पू. बाबा साधना आणि सेवा यांविषयी पुनः पुन्हा सांगून तो संस्कार साधकाच्या मनावर करतात. साधकांच्या भल्यासाठी किंवा समष्टीसाठी ते साधना आणि उपाय सांगतात; मात्र साधक ती पूर्ण करण्यास अल्प पडतात. तेव्हा साधकांच्या भल्यासाठी आणि साधना होण्यासाठी ती गोष्ट तडीस जाईपर्यंत ते पाठपुरावा करतात.’ 
- श्री. शिवाजी वटकर 
ई. ‘एकदा प.पू. बाबांनी सकाळी ५.४५ वाजता दाढी करण्यासाठी आरसा मागितला. मी तो आरसा पुसून ठेवला होता. प.पू. बाबा दाढी करायला बसल्यावर त्यांनी विचारले, ‘‘अरे आरसा नीट पुसला नाही का ? आरसा पुसतांना नीट पुसला पाहिजे. आपण एखादी सेवा करतांना ‘देवाला काय आवडेल ? कसे आवडेल ?’ अशी सेवा करायला हवी.’’ त्या चुकीतून मला शिकायला मिळाले, ‘आरसा म्हणजे माझे हृदय आहे. त्यात भगवंत पहाणार आहे. माझे हृदय भगवंत पहाणार, तर ते कसे असायला हवे ? ते पारदर्शकच असले पाहिजे, तरच भगवंताला आवडेल आणि तो तेथे वास करेल.’ 
- श्री. सचिन हाके 
१ आ २. तळमळ 
१ आ २ अ. राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणाचे समष्टी कार्य तळमळीने करणे : ‘हिंदु जनजागृती समितीच्या वतीने हिंदु धर्मजागृती सभा आणि विविध उपक्रम सनदशीर मार्गाने घेतले जातात. त्या वेळी काही कारण नसतांना पोलीस अनुमती मिळण्यास अडचणी येणे, सभेला अडथळा आणण्यासाठी मोठ्या वाईट शक्तींनी मैदानात यंत्र ठेवणे, घारीच्या माध्यमातून वातावरणात काळी शक्ती सोडणे, कार्यकर्त्यांच्या मनात विकल्प पसरवणे, असे सूक्ष्मातील अनेक अडथळे आणले जातात. प.पू. बाबांना याविषयी कळवल्यावर ते त्वरित सूक्ष्मातून आध्यात्मिक स्तरावर उपाय करून सर्व अडथळे दूर करतात. त्यांचे समष्टी कार्याला साहाय्य आणि आशीर्वाद लाभतात. ‘संतच राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणाचे खरे समष्टी कार्य तळमळीने करू शकतात’, हे यावरून लक्षात येते. 
१ आ २ आ. सनातनच्या प्रत्येक साधकाची आध्यात्मिक प्रगती व्हावी, अशी त्यांची तळमळ असून त्यानुसार त्यांनी प्रत्येकाला साहाय्य करणे : वर्ष २०१० मध्ये माझ्या दोषांमुळे माझी आध्यात्मिक पातळी ११ टक्क्यांनी घसरली होती. त्यामुळे मी नकारात्मक स्थितीत गेलो होतो. तेव्हा मी प.पू. बाबांच्या संपर्कात नव्हतो, तरीही त्यांनी मला बोलावून सकारात्मक स्थितीत येण्यासाठी मार्गदर्शन केले आणि आध्यात्मिक स्तरावर आधार दिला. त्यांच्या संकल्प शक्तीने आणि चैतन्यामुळे मला व्यष्टी साधना गांभीर्याने करण्याची प्रेरणा मिळाली. त्यानंतर ७० दिवसांनी (गुरुपौर्णिमेच्या आदल्या दिवशी) प.पू. बाबांनी मला बोलावून ते म्हणाले, ‘‘मासिकामध्ये तुमचे नाव आले असून प.पू. डॉक्टरांच्या कृपेने तुमची पातळी ६१ टक्के झाली आहे.’’ त्या वेळी त्यांना फार आनंद झाला होता. त्यांचे ‘त्या ७० दिवसांच्या काळात माझ्यावर लक्ष होते आणि त्यांची संकल्प शक्ती कार्यरत होती’, असे जाणवते. - श्री. शिवाजी वटकर 
१ आ २ इ. ‘साधकांची प्रगती होऊन त्यांनी अध्यात्मात लवकर पुढे जावे’, याविषयीची तीव्र तळमळ : ‘प.पू. बाबांच्या मनात सतत एकच विचार असतो, तो म्हणजे ‘साधकांची प्रगती व्हावी. साधकांनी अध्यात्मात लवकर पुढे जावे.’ त्यातून त्यांची तळमळ दिसून येते. एकदा रात्री मी प.पू. बाबांचे पाय चेपत होतो. त्या वेळी प.पू. बाबांनी त्यांचे गुरु प.पू. बाबाराव महाराज यांचे उदाहरण दिले. ते म्हणाले, ‘‘मी तुम्हाला पाय चेपायला सांगतो, त्यामागे काहीतरी उद्देश असतो. संतांना काही त्रास होत नसतो. ते त्याच्या पलीकडे गेलेले असतात. या सेवेच्या माध्यमातून साधकांना चैतन्य ग्रहण करता यावे; म्हणून संत पाय चेपायला सांगतात.’’ काही दिवसांनी असाच प्रसंग घडला. प.पू. बाबा झोपले असतांना एक साधक त्यांचे पाय चेपत होता. प.पू. बाबांनी मला पाठ चेपण्यास सांगितले. त्या वेळी मी त्यांचे चैतन्य ग्रहण करता यावे यासाठी नामजप आणि प्रार्थना करत होतो. १० मिनिटांनी प.पू. बाबा झोपेतून उठले आणि त्या साधकाला म्हणाले, ‘‘तू पाय चेपू नकोस. तुझ्या मनात काय विचार चालू आहेत. किती अनावश्यक विचार करतोस. ‘काय काय विचार येतात ?’, ते सांग. तू पाय चेपतोस; पण त्याचा लाभ तुलाही होत नाही आणि मलाही होत नाही. त्यामुळे तू पाय चेपू नकोस.’’ 
- श्री. सचिन हाके 
१ आ २ ई. ‘एकदा प.पू. बाबांना रात्री अडीचच्या दरम्यान एक सूत्र सुचले. त्या वेळी त्यांनी उठून बेसिनकडील दिव्याच्या प्रकाशात ते सूत्र त्याच वेळी लिहून काढले.’ 
१ आ २ उ. सत्संगातील सूत्रे जाणून घेणे : ‘सेवेतील साधकांचा सत्संग झाल्यानंतर सत्संगामध्ये काय सूत्रे घेतली, याविषयी ते साधकांना त्याच वेळी विचारून घेतात. त्यांना प्रत्येक सूत्र जाणून घेण्याची पुष्कळ उत्सुकता आणि तळमळ असते. खरे पहाता, त्यांना अशा प्रकारच्या कोणत्याच गोष्टीची आवश्यकता नाही; पण ‘आम्ही शिकावे, यासाठी भगवंत कृतीतून आपले आचरण कसे असावे ?’, हे दाखवत आहे’, असे वाटते.’ 
- कु. पूजा जठार आणि कु. स्नेहा झरकर 
१ आ २ ऊ. बांधकाम क्षेत्राच्या अनुभवाचा वापर आश्रमाच्या ‘ड्रेनेज लाईन’च्या कामासाठी करवून घेणेे : ‘पूर्वी प.पू. महाराज जलसिंचन खात्यात नोकरी करत असल्यामुळे त्यांना पाण्याची संबंधित बांधकामाचा अनुभव आहे. देवद आश्रमातील ‘ड्रेनेज’ मार्गाची दुरुस्ती, नूतनीकरण, नवीन मार्ग करणे इत्यादी स्वरूपाची मोठी कामे चालू झाली होती. त्या ठिकाणी प.पू. महाराज पहिल्या दिवसापासून ते कामे पूर्ण होईपर्यंत जातीने उभे राहून बांधकामातील बारकावे सांगणे, ‘ते झाले कि नाही’ याची निश्‍चिती करणे, अडचणी सोडवणे, नवीन पद्धतीने काय करू शकतो, याची सूचना करणे, कागदावर आकृती काढून दाखवणे, अशा विविध सेवा उन्हातान्हाची पर्वा न करता केल्या. परात्पर गुरु (डॉ.) आठवले यांच्या आश्रमातील प्रत्येक गोष्ट परिपूर्ण व्हावी, यासाठी महाराज तळमळीने प्रयत्नशील असतात. - श्री. यज्ञेश सावंत 
१ आ ३. जाज्वल्य कृतीशीलता 
१ आ ३ अ. वयाच्या १५ व्या वर्षी शाळेत ९ वीचा वर्ग चालू करून त्यासाठी लागणारी प्रयोगशाळाही उघडण्यास साहाय्यभूत होणे : ‘प.पू. बाबा इयत्ता ९ वीत असतांना त्यांना विज्ञान आणि गणित विषय घ्यायचे होते. ते त्या वेळी ज्या गावी रहात, त्या गावातील चांगल्या शाळेत हे विषय शिकवले जात नव्हते. तेव्हा त्यांनी शाळेतील गणिताच्या शिक्षकांना ‘याविषयी काय करावे ?’ असे विचारले. तेव्हा त्या शिक्षकांनी त्यांना एक कल्पना सुचवली. महाविद्यालयाचे व्यवस्थापक याला सिद्ध असतील, तर ही गोष्ट साकार होऊ शकते, असे ठरले. हे शिक्षक (श्री. देशमुख) स्वतः विज्ञानाचे पदवीधर असल्याने ते विज्ञान शिकवण्यास सिद्ध झाले. विज्ञान शिकवण्यासाठी लागणार्‍या उपकरणांसाठी जी प्रयोगशाळा लागते, त्यासाठी लागणारे धन जमवण्यासाठी प.पू. बाबा शाळेच्या संचालकांना भेटले. त्यांनी त्यांना एक पर्याय सांगितला. त्याप्रमाणे शाळेच्या वार्षिक गणेशोत्सवसाठी गोळा केलेल्या वर्गणीतून बाहेरचे कार्यक्रम करण्याऐवजी शाळेतीलच कार्यक्रम करायचे ठरले. यासाठी प.पू. बाबांनी शाळेतील विद्यार्थ्यांचे मन वळवले. आता या वर्गात शिकण्यासाठी कमीतकमी १० - १२ विद्यार्थ्यांची आवश्यकता होती. यासाठी प.पू. बाबांनी विद्यार्थ्यांना गोळा केले आणि शाळेत वर्ग चालू झाला.’ 
       या प्रसंगातून प.पू. बाबांच्या अंगी मूळातच संघटितपणा, चिकाटी, तळमळ, नियोजनकौशल्य, धैर्य, निर्भयता, दूरगामीपणा, असे अनेक गुण दिसून येतात. ‘वयाच्या १५ व्या वर्षी शाळेत एक वर्ग निर्माण करून त्यासाठी शाळेत प्रयोगशाळा आणणे, हा प्रसंग प.पू. बाबांच्या समष्टी जीवनातील मैलाचा दगड असावा’, असे वाटते. 
१ आ ३ आ. ‘जागतिक स्तरावर होणार्‍या अराजक सदृश परिस्थितीवर उपाययोजनात्मक कृती कोणती करायची ?’ याविषयावर युनो, भारताचे पंतप्रधान आणि ‘पेट्रियॉटिक फोरम’ नावाच्या एक हिंदुत्ववादी संघटनेला प्रदीर्घ लेख लिहून अभ्यासण्यासाठी पाठवणे : ‘जागतिक स्तरावर होणार्‍या अराजक सदृश परिस्थितीवर उपाययोजनात्मक कृती कोणती करायची ?’ या विषयावर प.पू. बाबा यांनी ‘युनो’ला पत्र लिहिले आहे. तसेच भारताच्या पंतप्रधानांनाही एक प्रदीर्घ पत्र लिहून देशाची स्थिती सुधारण्यासाठी कृतीच्या स्तरावर काय करायला पाहिजे, हे त्यात लिहिले आहे. तसेच त्यांनी ‘पेट्रियॉटिक फोरम’ नावाच्या एक हिंदुत्ववादी संघटनेलाही या विषयावर पत्र लिहून जागृतीसाठी प्रोत्साहित केले आहे. 
- सौ. आनंदी रामचंद्र पांगुळ 
१ आ ३ इ. धर्मशिक्षणविषयक सूत्र समाजापर्यंत जाण्यासाठी पाठपुरावा घेणे : ‘सध्याच्या हिंदु धर्माच्या दयनीय स्थितीचे महत्त्वाचे कारण म्हणजे ‘धर्मशिक्षणाचा अभाव’, असे त्यांनी सांगितले. धर्मशिक्षण लहान वयापासूनच देणे आवश्यक आहे. त्यानुसार त्यांनी प्रसारप्रमुखांना कळवून त्याची कार्यवाही होते कि नाही, ते पाहिले. एके दिवशी ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार’ यामध्ये ‘हिंदु राष्ट्र म्हणजे सज्जन लोकांचे राज्य असेल. त्यात मुसलमान, ख्रिश्‍चन, हिंदु असे काही असणार नाही’, असे आले होते. ‘हे विचार संपूर्ण समाजापर्यंत गेले पाहिजेत’, असे प.पू. बाबांना वाटले. हे विचार संकेतस्थळ, फेसबूक आदी सोशल मिडियाच्या माध्यमातून प्रसारित होण्यासाठी त्यांनी पाठपुरावा केला. ‘प.पू. बाबा परात्पर गुरु डॉक्टरांच्या हिंदु राष्ट्र निर्मितीच्या कार्याशी एकरूप झाले आहेत’, असे वाटते. ‘संत दिसती वेगळाले, परि अंतरी ते स्वस्वरूपी मिळाले’, असे त्यांच्याविषयी झाले आहे. - श्री. शिवाजी वटकर 
१ आ ४. प्रीती 
अ. ‘कुणी साधक इतर सेवाकेंद्रात किंवा आश्रमात जाणार असल्याचे त्यांना कळल्यास ते लगेच तेथील साधकांना खाऊ पाठवण्याचा निरोप देतात. त्यांच्यातील प्रीती पुष्कळ व्यापक आहे. तिची व्याप्ती आपल्याला कळूच शकत नाही.’ - कु. पूजा जठार आणि कु. स्नेहा झरकर 
आ. ‘पितृपक्षाच्या कालावधीत आध्यात्मिक त्रासाचे प्रमाण अधिक असते. या पितृपक्षाच्या पहिल्या आठवड्यात प.पू. बाबांनी त्यांच्या सेवेतील साधकांना प्रतिदिन प्रसाद दिला. यातून ‘ते आम्हाला शक्ती आणि चैतन्य देत आहेत’, असे वाटले आणि पुष्कळ कृतज्ञता वाटली.’ - श्री. संदेश नाणोसकर 
इ. ‘काही महिन्यांपूर्वी देवद आश्रमातील एक साधक सकाळी ५.३० वाजता प.पू. बाबा फिरायला आरंभ करतांना भेटले आणि त्यांनी सांगितले की, कोल्हापूर येथील साधक फार अत्यवस्थ आहेत. त्यांना अतीदक्षता विभागात भरती केले आहे. मध्यरात्री त्यांना हा निरोप आला आहे. त्या वेळी प.पू. बाबा म्हणाले, ‘‘मला त्याच वेळी सांगायला हवे होते. आता आपण त्यांना त्वरित मंत्रोपचार देऊ.’’ त्यांनी त्यांचे फिरणे आणि वैयक्तिक गोष्टी बाजूला ठेवून सकाळी ५.३० ते ७.३० मंत्रोपचार देण्यासाठी वेळ दिला. त्या साधकाला उपचार प्राप्त होऊन ते चालू होईपर्यंत त्यांनी पाठपुरावा केला. त्यानंतरच स्वत:चे वैयक्तिक आवरणे चालू केले. ते साधकांचे त्रास स्वत: सहन करतात. अशा प्रकारे ते शेकडो साधक, त्यांचे नातेवाईक, सनातनचे हितचिंतक आणि हिंदुत्ववादी यांना शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक उपाय सांगून साहाय्य करतात. देशभरातील साधकांसाठी गेली अनेक वर्षे ते प्रतिदिन नामजपाला बसतात.’ - श्री. शिवाजी वटकर 
ई. साधकांवर उपाय करून त्यांना बरे करणे : ‘शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक त्रासांवर उपाय म्हणून त्यांनी शेकडो मंत्र आतापर्यंत शोधून काढले आहे. त्यांचा साधकांना पुष्कळ लाभ होत आहे. साधकाला मंत्र दिल्यावर तो पूर्ण बरा होईपर्यंत प.पू. महाराज स्वत:हून पाठपुरावा करतात. एखाद्या वेळी साधक ‘त्याला काय मंत्रजप दिला आहे’, हे विसरलेला असतो; मात्र प.पू. महाराज विसरत नाहीत. तो साधक भेटेल, तेव्हा त्याला त्याविषयी आढावा विचारतात.’ - श्री. यज्ञेश सावंत आणि सौ. आनंदी रामचंद्र पांगुळ 
१ आ ५. साधकांच्या सेवेविषयी कौतुक करून त्यांना सेवेत प्रोत्साहन देणे : एके दिवशी मी प.पू. बाबांच्या खोलीबाहेर दगड पिशवीत घालून पॅकींग (बांधणी) करत होते. त्यांना आम्ही बाहेर सेवा करत आहोत, हे कळल्यावर ते लगेच खोली बाहेर आले आणि सेवा पाहू लागले. मी पॅकींग करत असलेले दगड पाहून ते आईला म्हणाले, ‘‘किती छान पॅकींग केले आहे ना ! तुला सेवेला चांगला जोडीदार मिळाला आहे ना !’’ तेव्हापासून मला सेवेत आनंद मिळू लागला आणि सेवेला प्रोत्साहन मिळू लागले. - कु. योगिनी आफळे
१ इ. आध्यात्मिक वैशिष्ट्ये
१ इ १. ‘प.पू. बाबांमध्ये ध्यानयोग, कर्मयोग, ज्ञानयोग आणि भक्तीयोग असे सर्वच योग आहेत’, असे वाटते.’ - कु. सोनाली गायकवाड 
१ इ २. ‘प.पू. बाबांची कार्यक्षमताही अफाट आहे. ते एकाच वेळी अनेक कार्ये स्थुलातून आणि सूक्ष्मातून करू शकतात. 
१ इ ३. असा कोणताच विषय नाही की, ज्यावर प.पू. बाबा भाष्य करू शकत नाहीत. जणू ब्रह्मांडातील सर्व ज्ञान त्यांच्या वाणीतून स्त्रवण्यास सिद्धच असते. 
१ इ ४. स्वतःवरील नियंत्रणात्मक आत्मशक्ती : प.पू. बाबा यांचे अलौकिकत्व निर्विवाद असूनही ते स्वतःविषयी बोलतांना म्हणतात, ‘मी कसा आहे, हे मी जाणून आहे.’ त्यांच्या अशा बोलण्याने त्यांची स्वतःवरील नियंत्रणात्मक आत्मशक्तीची जाणीव होते.
१ इ ५. सिद्ध पुरुष आणि ऋषीतुल्य व्यक्तीमत्त्व ! : ते सिद्ध पुरुष असून ऋषीतुल्य आहेत. ‘ते पृथ्वीवरील सगुणातील सप्तर्षींपैकी एक आहेत’, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही; कारण सप्तर्षीनी एखादे सूत्र सांगण्यापूर्वी प.पू. बाबा यांनी ते आधीच सांगितले असते आणि त्यानुसार त्यांची कृतीही चालू झालेली असते. याचे आम्ही देवद आश्रमातील प्रत्येक जण साक्षी आहोत.’ - सौ. आनंदी रामचंद्र पांगुळ 
१ इ ६. परात्पर गुरु डॉक्टरांचे प्रतिरूपच ! : ‘प.पू. बाबा म्हणजे परात्पर गुरु डॉक्टरांचे प्रतिरूपच आहेत. देवद आश्रमाचा तेच खरा आधार आहेत. त्यांच्याशिवाय आश्रमाला शोभाच नाही. त्यांच्यामुळेच आम्ही सर्व आहोत. त्यांचे साधकांवरील निरपेक्ष प्रेम, त्यांना पुढे घेऊन जाण्याची तळमळ, याला काही शब्दच नाहीत. ‘ते केवळ अनुभवू शकतो’, असेच वाटते.’ - कु. स्नेहा झरकर 
१ इ ७. एका जागृत देवस्थानातील चैतन्यमय मूर्ती असणे : ‘एक उच्च कोटीचे संत असतांनाही त्यांचा अहं अत्यल्प असल्यामुळे ते ‘मी एक दगड आहे. परात्पर गुरु डॉक्टरांनी मला देवद आश्रमात आणून बसवले आहे. तेच सर्व कार्य करत आहेत’, असे ते म्हणतात. ते प्रत्यक्षात एका जागृत देवस्थानातील चैतन्यमय मूर्ती आहेत. सनातनच्या साधकांसाठी एक वंदनीय आधारस्तंभ आहेत. 
१ इ ८. सनातन संस्थेच्या देवद आश्रमाचे वैभव : प.पू. बाबा हे सनातन संस्थेच्या देवद आश्रमाचे वैभव आहे. त्यांचे चैतन्यरूपी अस्तित्व हीच आम्हा साधकांची श्रीमंती आहे. त्यांना एकदा भेटलेली व्यक्ती त्यांची होऊन जाते. आश्रमात पहाटे फिरायला जातांना रस्त्यात कुत्रा भेटला, तरी ते त्यांच्या चैतन्यमय काठीने त्याच्यावर उपाय करतात. यावरून ती व्यक्ती किंवा प्राणी कोण आहे, काय करते, कशी वागते, आदीचा विचार न करता निरपेक्ष भावाने त्या जिवाचा उद्धार होण्यासाठी सर्वतोपरी साहाय्य करतात. जिवाचे शिवाशी नाते जोडतात. ‘जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती ।’ हे प.पू. बाबा यांच्या उदाहरणावरून शिकायला मिळते. 
१ इ ९. ‘त्यांचे मन विश्‍वमनाशी आणि बुद्धी विश्‍वबुद्धीशी जोडले आहे. त्यांचे आणि परात्पर गुरु डॉक्टरांचे विचार एकच असतात. प.पू. बाबा सनातन संस्थेशी समरूप झाले आहेत.’ - श्री. शिवाजी वटकर 
१ इ १०. ज्ञानगंगेचा स्रोत
१ इ १० अ. भगवंताकडून मिळणारा ज्ञानाचा अखंड ओघ चालूच असणे : ‘प.पू. बाबांना भगवंताकडून मिळणारा ज्ञानाचा अखंड ओघ चालूच असतो. दिवसभरही त्यांच्या मुखातून ज्ञानगंगा वहात असते. याविषयी आश्रमातील आणि सेवेतील साधकांशी प.पू. बाबा सहजपणे बोलतात. त्यात ज्ञानामृत ओतप्रोत भरलेले असते. त्या ज्ञानाचा स्तर उच्च असतो. प.पू. बाबा अखंड याच स्थितीत असतात. भगवंताचा हा आनंद ते स्वतःही घेतात आणि समवेतच्या साधकालाही ते चाखायला शिकवत असतात.’ 
- सौ. अश्‍विनी अतुल पवार आणि सौ. आनंदी रामचंद्र पांगुळ 
१ इ १० आ. अनेक ग्रंथांचा संग्रह असणे आणि त्यांतील ज्ञान मुखोद्गत असणे : ‘प.पू. महाराजांचा वेद, उपनिषदे, पुराणे, भागवत्, श्रीमद्भगवत्गीता, श्रीकृष्णावरील अनेक ग्रंथ, कल्याण उपासना अंक, आयुर्वेद आणि अन्य असंख्य विषय यांचा प्रचंड अभ्यास आहे. जणू ते सर्व त्यांना मुखोद्गतच आहे. आजवर त्यांनी स्वत:कडे १,२०० हून अधिक ग्रंथ विविध ठिकाणांहून संग्रहित केेले आहेत. त्यांचा आवश्यकतेनुसार उपयोग करतात.’ 
- श्री. यज्ञेश सावंत आणि सौ. आनंदी रामचंद्र पांगुळ
१ इ १० इ. पहाटे फिरायला गेल्यावरही साधकांना ज्ञान देणे : ‘पहाटे फिरायला जाण्यापूर्वी ते दैनिक सनातन प्रभात अभ्यासतात. ‘राष्ट्र आणि धर्माला आलेली ग्लानी अन् त्यावर आध्यात्मिक स्तरावरील उपाय काय असावेत’, याविषयी ते पहाटे फिरायला गेल्यावर बोलतात. आम्ही ते ध्वनीमुद्रित करून त्याचे टंकलेखन करून समष्टीसाठी पुढे पाठवतो. ते केवळ तात्त्विक माहिती न देता कृतीशील आणि प्रायोगिक असे ज्ञान देतात.’ 
- श्री. शिवाजी वटकर आणि सौ. आनंदी रामचंद्र पांगुळ 
१ इ १० ई. अतुलनीय ग्रंथलिखाण : ‘प.पू. बाबांनी आतापर्यंत पुष्कळ लिखाण केले आहे. त्यांचे ‘श्री गणेश अध्यात्म दर्शन’, ‘पंढरीचा वारकरी’ हे ग्रंथ प्रसिद्ध झालेले असून ‘जीवन सागरातील मोती’, ‘दिशा चक्र’, ‘ऋतु चक्र’, ‘त्रिसुपर्ण, ‘कलियुग खत्म - सत्ययुग लग गया’ या हिंदी ग्रंथाचा मराठी अनुवाद असलेले ‘युगपरिवर्तन अर्थात् कलियुगाचा अंत आणि सत्ययुगाचा आरंभ’ या ग्रंथांचे लिखाण पूर्ण होऊन ते पुढे पाठवले आहे. ‘भगवद्ध्वज’ या विषयावरील लिखाणाशी संबंधित सर्व साहित्य एकत्र केले असून ‘आत्मवृत्त’ लिखाणाची सिद्धताही होत आहे. याच जोडीला मागील ३ वर्षात ४०० पेक्षा अधिक संगणकीय धारिकांमधून विविध विषय संकलनासाठी पाठवले असून त्यांतील अनेक विषय सनातन प्रभातमधून प्रसिद्ध झाले आहेत. त्यांच्या २०० पेक्षा अधिक संगणकीय धारिका अंतिम टप्प्यात आहेत. त्यांनी लिहिलेला ‘श्रीगणेश अध्यात्म दर्शन’ हा ग्रंथ म्हणजे अध्यात्माची ‘डिक्शनरी’च आहे. या ग्रंथाविषयी ते म्हणतात, ‘‘यात माझा काही सहभाग आहे, असे मला वाटतच नाही.’’ - सौ. आनंदी रामचंद्र पांगुळ 
१ इ १० उ. प.पू. पांडे महाराजांच्या ज्ञानगंगेने मनाची मलीनता दूर करून साधकांना ईश्‍वरप्राप्तीची दिशा देणे : ‘ज्ञान मनुष्याला शुद्ध करते. त्याचप्रमाणे प.पू. पांडे महाराज यांची ज्ञानगंगा आपल्या मनाची मलीनता दूर करून साधकांना ईश्‍वरप्राप्तीची दिशा देते. 
       प.पू. पांडे महाराजांना कोणत्याच विषयाचे ज्ञान नाही, असे नाही. कोणताही विषय आला, तरी त्यावर ते सविस्तर सांगतात. 
- सौ. अश्‍विनी अतुल पवार
------------------------------------------
प.पू. बाबा यांच्या पूर्वायुष्यातील प्रसंग
प्रामाणिक अभियंत्याचे नोकरीत असतांनाचे जीवन 
       ‘प.पू. महाराज सरकारी खात्यात अभियंता म्हणून कार्यरत असतांना त्यांनी स्वत: प्रामाणिकपणे काम केले आणि इतरांनाही भ्रष्टाचार करू दिला नाही. त्यांना कार्यालयात नेण्यासाठी शासकीय चारचाकी वाहन येत असे; मात्र कार्यालयातील कामकाज झाल्यावर ते स्वत: सायकलवरून घरी यायचे. त्यांच्या प्रामाणिक स्वभावामुळे इतरांना भ्रष्टाचार करता यायचा नाही; परिणामी त्यांना अडकवण्यासाठी त्यांच्याविरुद्ध त्यांच्या खात्यातील काही विघ्नसंतोषी लोकांनी इतरांचे कान फुंकले. प.पू. महाराजांकडे पुष्कळ संपत्ती आहे इत्यादी बातम्या पेरल्या. त्यामुळे त्यांच्यावर लक्ष ठेवण्यात येऊ लागले. प.पू. महाराजांचा तेव्हाचा गाडीने जाऊन सायकलवरून येण्याचा दिनक्रम पाहून लक्ष ठेवणार्‍या व्यक्तीने एक दिवस स्वत:हून ‘मला तुमच्यावर लक्ष ठेवण्यासाठी सांगण्यात आले होते; मात्र तसे काहीच तुमच्याविषयी जाणवले नाही’, असे सांगितले आणि ती व्यक्ती निघून गेली. नोकरीवर असतांना धरणाच्या बांधकामाच्या वेळी २ वेळा ‘प्राणावर बेतणार’, असे प्रसंग झाले होते; मात्र त्यातून देवाच्या कृपेने ते सुखरूपपणे वाचले. - श्री. यज्ञेश सावंत
------------------------------------------
एकमेवाद्वितीय प.पू. परशराम पांडे 
महाराज यांच्या चरणी शिरसाष्टांग नमस्कार ! 
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले 
       ‘सनातन संस्थेचे भाग्य आहे की, प.पू. पांडे महाराज यांच्यासारखे एकमेव ज्ञानी भक्त सनातन संस्थेच्या देवद आश्रमात राहून सनातन संस्थेला सर्व प्रकारे साहाय्य करत आहेत ! ‘बुद्धीने व्यक्त होणारे आध्यात्मिक विचार, साधकांना साधनेच्या आणि त्रासांवरील उपायांच्या संदर्भात मार्गदर्शन, तसेच मनाने व्यक्त होणारी प्रीती, ही त्यांची गुणवैशिष्ट्ये आम्हा सर्वांमध्ये निर्माण होवोत’, अशी त्यांच्या चरणी प्रार्थना ! असे संतरत्न आम्हाला लाभले, यासाठी भगवंताच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतो. ‘ज्ञानवृद्ध, वयोवृद्ध आणि तपोवृद्ध प.पू. पांडे महाराज यांच्या चरणी त्यांच्या ८९ व्या वाढदिवसानिमित्त शिरसाष्टांग नमस्कार !’
------------------------------------------
सनातन संस्थेचे महत्त्व सांगणे 
       ‘प.पू. पांडे महाराजांना सत्याची पारख आहे. सनातन संस्थेत येण्यापूर्वी त्यांनी अनेक संप्रदाय आणि आध्यात्मिक संस्था यांचा अभ्यास केलेला आहे.’ ते तत्त्वनिष्ठ आहेत. ‘गीतेचे कृतीरूप दर्शन म्हणजे सनातन संस्था !’ अर्थात् ‘सनातन संस्थेचे कार्य म्हणजे भगवद्गीतेच्या प्रत्येक श्‍लोकाचे कृतीत रूपांतर आहे’, असा त्यांचा भाव असतो. 
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn