Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

जगभरातील नोटाबंदी !

       ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबरच्या रात्री ८ वाजता नोटाबंदी घोषित केल्यानंतर देशभरात एटीएम् आणि अधिकोष यांच्या बाहेर मोठमोठ्या रांगा दिसायला लागल्या. व्यवहारातील एकूण नोटांपैकी ८६ टक्के नोटा अचानक बंद केल्याने एकच हलकल्लोळ उडाला. मोदी यांचे हे ‘सर्जिकल स्ट्राइक’ भारतीय जनतेसाठी नवे असले, तरी जगभरात असे प्रयोग अनेक वेळा झाले आहेत. विशेष म्हणजे अशा प्रयोगांमुळे अनेक सत्ताधिशांना सत्ताही सोडावी लागली.
देश आणि नोटाबंदीचे वर्ष 
१. घाना : वर्ष १९८२ 
     जगाच्या आधुनिक इतिहासात नोटाबंदीचे पहिले पाऊल आफ्रिकन देश असणार्‍या घानाने टाकले. वर्ष १९८२ मध्ये करचोरी आणि भ्रष्टाचार रोखण्याच्या उद्देशाने ५० सेडीच्या (स्थानिक चलन) नोटा बंद करण्यात आल्या होत्या. या घटनेमुळे घानाच्या जनतेचा आपल्याच चलनावरील विश्‍वास उडाला. त्यामुळे त्यांनी विदेशी चलनाकडे आपला मोर्चा वळवला. त्यामुळे घानाच्या बँकिंग व्यवस्थाच नव्हे तर, अर्थव्यवस्थेलाही धक्का बसला. ग्रामीण जनतेला कित्येक अंतर पार करून नोटा पालटण्याची वेळ आली. नोटा पालटण्याची कालमर्यादा संपल्यानंतर मोठ्या संख्येने नोटांचा ‘कचरा’ झाला.
२. नायजेरिया : वर्ष १९८४
      नायजेरियामध्ये वर्ष १९८४ मध्ये मुहम्मदू बुहारी यांच्या नेतृत्त्वाखालील लष्करी सत्तेने भ्रष्टाचाराचे निर्मूलन करण्यासाठी विविध रंगांतील नोटा लागू केल्या. जुन्या नोटा पालटण्यासाठी ठराविक अवधी दिला. सरकारने घेतलेला हा निर्णय तोंडावर आपटला. प्रचंड कर्जात बुडालेल्या आणि महागाईमुळे रसातळाला गेलेल्या नायजेरियाच्या अर्थव्यवस्थेला कोणताही दिलासा मिळाला नाही. पुढच्याच वर्षी बुहारी सत्तेतून फेकले गेले.
३. म्यानमार : वर्ष १९८७
     भारताचा शेजारी देश असणार्‍या म्यानमारने वर्ष १९८७ मध्ये नोटाबंदीचा निर्णय घेतला. तत्कालीन सत्ताधार्‍यांनी काळा बाजार नियंत्रित करण्यासाठी प्रचलित ८० टक्के चलन रहीत केले. या निर्णयामुळे जनतेमध्ये मोठ्या प्रमाणात आगडोंब उसळला. विशेषतः विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून सरकारविरोधी निदर्शने केली. देशभर मोठ्या प्रमाणात निदर्शने करण्यात आली. नोटाबंदीच्या पुढील वर्षी परिस्थिती हाताळण्यासाठी पोलीस आणि सैन्य यांच्या साहाय्याने सरकारने निदर्शकांवर कारवाई केली. यात अनेक जण ठार झाले.
४. झैरे : वर्ष १९९०
     नोटांमध्ये सुधारणा घडवून आणण्याच्या नावाखाली नव्वदच्या दशकात झैरेचा हुकूमशहा मोबुतू सेसे सेको याने नोटाबंदी लागू केली. चलनात असणार्‍या नोटा पूर्णपणे काढून घेण्याच्या नादात झैरेमध्ये महागाईने गंभीर स्वरूप धारण केले आणि अमेरिकी डॉलरच्या तुलनेत स्थानिक चलनात मोठी घसरण झाली. त्यानंतर अंतर्गत परिस्थिती गंभीर झाली आणि वर्ष१९९७ मध्ये सेसेला सत्ताभ्रष्ट करण्यात आले.
५. सोव्हिएत युनियन : वर्ष १९९१ 
      मिखाइल गोर्बाचेव्ह यांच्या नेतृत्त्वाखालील ‘सोव्हिएत संघा’ने अंतिम वर्षाच्या प्रारंभीला काळ्या पैशांवर नियंत्रण मिळवण्यासाठी ५०, १०० रूबल (स्थानिक चलन) मागे घेण्याचा निर्णय घेतला; मात्र हे पाऊल महागाईवर मात करण्यासाठी अपयशी ठरले. लोकांचा सरकारवरील विश्‍वास उडला. त्याच वर्षी ऑगस्टमध्ये सरकार पाडण्याचे षड्यंत्र रचण्यात आले. या घटनेमुळे सरकारचे वर्चस्व निकामी झाले आणि पुढील वर्षी सोव्हिएत संघाचे विभाजन झाले.
६. उत्तर कोरिया : वर्ष २०१०
       उत्तर कोरियामध्ये वर्ष २०१० मध्ये हुकूमशहा किम जोंग इल यांनी अर्थव्यवस्थेवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि काळा बाजार करणार्‍यांना धडा शिकवण्यासाठी जुन्या चलनाच्या नोटेतून दोन शून्य काढून टाकले. त्यामुळे शंभरच्या नोटेचे मूल्य एकवर आले. त्या वेळी देशातील शेती क्षेत्राची अवस्था फारच बिकट होती. त्यामुळे उत्तर कोरियात खाद्यान्नाचा तुटवडा जाणवू लागला. तांदळाच्या वाढत्या किंमतीमुळे जनतेमध्ये किमविषयी प्रक्षोभ इतका वाढला, की त्याला जनतेची सार्वजनिक क्षमा मागावी लागली.’
(संदर्भ : ‘महाराष्ट्र टाईम्स’ संकेतस्थळ, २१.११.२०१६)
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn