Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

कारागृहांची सुरक्षा ‘चोख’च पाहिजे !

     पंजाबच्या पतियाळा येथील नाभा कारागृहावर शस्त्रधार्‍यांनी आक्रमण केले. चित्रपटातील कथानकास साजेशा अशा या आक्रमणाच्या नियोजनावरून हेच सिद्ध होते की ते कारागृह सर्वात असुरक्षित आहे. त्या कारागृहाच्या सुरक्षा व्यवस्थेतील ढिसाळपणा या आक्रमणातून अधोरेखित झाला आहे. असे अत्यंत महत्त्वाचे कारागृहात केवळ नाममात्र सुरक्षित नको, तर खर्‍या अर्थाने सुरक्षित असायला हवे. जिथे कैदी आहेत, तिथे चोख सुरक्षा व्यवस्था ही असायलाच हावी. कैद्यांनी कारागृहातून पळ काढणे त्या व्यवस्थेस लांछनास्पद आहे. देशातील महत्त्वाच्या कारागृहाविषयी ज्या घटना घडत आहेत, त्या लक्षात घेता पळ काढण्याच्या डावपेचांत कैदी यशस्वी ठरत आहेत आणि त्यांना पुन्हा पकडण्यासाठी पोलिसांना डावपेच आखावे लागत आहेत. एकाच गुन्हेगारास पुन्हा पकडण्यासाठी मनुष्यबळ, वेळ यांचा व्यय करावा लागत आहे. या कारागृहावरील आक्रमणाच्या वेळी आक्रमणकर्ते पोलिसांच्या वेशात आले होते. आतंकवादीही पोलीस वा सैनिक यांच्या वेशात येतात. यामुळे आक्रमणकर्ते पुढ्यात येऊनही जोपर्यंत ते आपले खरे रूप प्रगट करत नाहीत, तोपर्यंत त्यांना ओळखताच येत नाही आणि नेमका याचाच लाभ आक्रमणकर्ते उचलतात. वेशभूषेची हल्लेखोरांची तशी ही जुनी पद्धत आहे तरीही ते याचाच पुनर्वापर करत आहेत. यावर ठोस उपाय शोधण्यात यश आले असे समाधानकारक चित्र नाही.
      अलीकडेच भोपाळच्या कारागृहातून ‘सिमी’च्या आतंकवाद्यांनी पलायन केले. पोलिसांनी त्यांना ठार केले आणि त्यानंतरची पतियाळाची ही दुसरी घटना. त्यामुळे पंजाबसहित देशाच्या सर्व राज्यांतील कारागृहांची सुरक्षा व्यवस्था चोख असणे आवश्यक आहे.
       गुन्हेगारांना पकडण्यासाठी पोलिसांना जंगजंग पछाडावे लागते आणि त्यानंतर कह्यात असलेल्या गुन्हेगारांनी पलायन करणे पोलिसांच्याच मेहनतीवर पाणी तर फिरवतेच शिवाय समाजासाठी धोकाही निर्माण करते. कैद्यांवर आणि त्यांना कारागृहात भेटण्यास येणार्‍यांवर बारीक लक्ष ठेवणे महत्त्वाचे आहे; कारण कारागृहात राहूनही गुन्हेगार बाहेरील हालचालींवर लक्ष ठेवून असतात. हे समाजात घडणार्‍या गुन्ह्यांची सुई कारागृहातील गुन्हेगाराकडे वळते तेव्हा समजते. असे असतांना पोलिसांना कारागृहातील गुन्हेगारांवर लक्ष ठेवणे किती आवश्यक आहे, हे लक्षात येते. देशावर नेहमीच आतंकवाद्यांच्या आक्रमणाचे सावट असते आणि त्यातच कारागृहातील कुख्यात कैदी पळ काढत आहेत. तद्नंतर त्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी धावाधाव करावी लागत आहे. सुरक्षा व्यवस्थेतील चुका किती अंगलट येऊ शकतात याचा विचार होत नसल्याने त्या चुका कैद्यांच्या पथ्यावर पडतात. संधी मिळताच गुन्हेगार तर पळून जाणारच; पण त्यांना तशी संधी मिळणार नाही, हे कारागृह प्रशासनाचे दायित्व आहे. 
- श्री. जयेश राणे, भांडुप, मुंबई.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn