शिस्त आणि शिक्षा हे दोन्ही शब्द शिक्षण या शब्दापासून निर्माण झाले आहेत. शिक्षणाद्वारे चांगली वागणूक अमलात आणणे म्हणजेच शिस्त होय. यासाठी शिक्षा कशाबद्दल आणि कोणत्या चुकीबद्दल किंवा गैरवर्तणुकीबद्दल आहे, हे समजवून देऊनच शिक्षा करावी.
अनुकरणप्रियता : मुले अनुकरणप्रिय असतात. जन्मापासून सतत ती आपल्या आईवडिलांचे निरीक्षण करीत असतात. त्यामुळे बर्याच मुलांची चालण्याची, बोलण्याची अन् वागण्याची ढब आपल्या आईवडिलांप्रमाणे असल्याचे आढळते. त्यामुळे आईवडिलांनी आपल्या कृतीकडे अन् बोलण्याकडे बारकाईने लक्ष द्यावे आणि काही दोष असल्यास सुधारावे.
अ. शिस्त लावण्याबद्दल महत्त्वाच्या सूचना
अनुकरणप्रियता : मुले अनुकरणप्रिय असतात. जन्मापासून सतत ती आपल्या आईवडिलांचे निरीक्षण करीत असतात. त्यामुळे बर्याच मुलांची चालण्याची, बोलण्याची अन् वागण्याची ढब आपल्या आईवडिलांप्रमाणे असल्याचे आढळते. त्यामुळे आईवडिलांनी आपल्या कृतीकडे अन् बोलण्याकडे बारकाईने लक्ष द्यावे आणि काही दोष असल्यास सुधारावे.
अ. शिस्त लावण्याबद्दल महत्त्वाच्या सूचना
१. चांगल्या वर्तणुकीचे कौतुक आणि गैरवर्तणुकीबद्दल शिक्षा : चांगल्या वर्तणुकीबद्दल आणि कृतीबद्दल कौतुक करावे. त्याला परीक्षेत चांगले गुण किंवा बक्षीस मिळाल्यास त्याची स्तुती करावी, त्याला शाबासकी द्यावी म्हणजे त्याला आणखी चांगले वागण्यास प्रोत्साहन मिळेल. त्याच्या गैरवर्तणुकीबद्दल नाराजी व्यक्त करावी आणि आवश्यकता असली, तर शिक्षाही करावी.
२. आज्ञेऐवजी विनंती : आज्ञा न करता विनंती करावी. ‘पाणी आण’, असे न सांगता ‘राजा, मला एक ग्लास पाणी आणून देशील का ?’, अशी विनंती करावी.
३. घरातील मंडळींची एकवाक्यता : मुलाला शिस्त लावण्यापूर्वी मुलाकडून नेमक्या कशा वागणुकीची अपेक्षा आहे, याचा विचार करून आपली भूमिका निश्चित करावी आणि दुमत होऊ देऊ नये.
आईवडिलांची आणि घरातील इतर मंडळींची एकवाक्यता मुलाला शिस्त लावण्याच्या कामी अत्यंत आवश्यक असते. खिडकीचे गज धरून खिडकीवर उंच चढत जाण्याबद्दल वडिलांनी शाबासकी आणि त्याच कृत्याबद्दल आईचे रागावणे, असे होता कामा नये. शिक्षा केव्हा करावी याबद्दलचे मतभेद आईवडिलांनी अगोदरच सोडवून ठेवावेत. मुलासमोर सोडवू नये.
४. चूक केल्यावर लगेच शिक्षा : चूक झाल्यावर लगेच शिक्षा करावी. ‘थांब संध्याकाळी बाबांना देऊ दे, मग बघते’ ही चुकीची शिक्षा आहे. त्यामुळे बाबा येईपर्यंत मुलगा शिक्षेच्या काळजीत रहातो आणि प्रत्यक्ष या वेळी शिक्षा कशासाठी हे त्याच्या लक्षात येत नाही.
५. शिक्षेचे प्रमाण : शिक्षेचे प्रमाण मुलाने केलेल्या चुकीच्या तुलनेशी मिळतेजुळते असावे. आमच्या शाळेचे प्राचार्य गुरुवर्य काळे हे अतिशय सात्त्विक आणि शांत गृहस्थ. त्यांच्याकडे कोणताही विद्यार्थी भीतीने न जाता आदराने आणि प्रेमाने जात असे. एके दिवशी मी त्यांना भेटावयास गेलो असता एका दहावीतल्या मुलाला ते छडीने बेदम मारीत होते. काळे गुरुजींचा रुद्रावतार बघून मीच थक्क होऊन गेलो. नंतर त्यांना भेटल्यावर ते म्हणाले, ‘काल हा विद्यार्थी आईच्या मर्तिकासाठी माझ्याकडून ५० रुपये घेऊन गेला. आज सकाळी मला देवळात त्याची आई भेटली. या मुलाला जन्मभर लक्षात राहील अशीच शिक्षा योग्य, नाहीतर तो अट्टल फसवणारा झाला असता.’
६. योग्य आणि अयोग्य शिक्षा : मुलाशी न बोलणे किंवा मुलाला दिवसभर उपाशी ठेवणे या शिक्षा योग्य नव्हेत; कारण संध्याकाळी तीच आई जेवण्यासाठी मुलाची मनधरणी करील.
संध्याकाळी मुलाला खेळायला घराबाहेर न पाठवणे किंवा त्याला दूरचित्रवाहिनीवरील कार्यक्रम बघू न देणे ही योग्य शिक्षा होय.
