ठाणे - श्री वेणाबाई मठ, मीरज, मठाधिपती श्री कौस्तुभबुवा रामदासी हे समर्थ रामदासस्वामींच्या मूळ पादुका आणि समर्थांच्या शिष्या श्री वेणास्वामी यांच्या पादुका घेऊन ठाणे शहरात आले आहेत. मठाचा जीर्णोद्धार करण्याच्या दृष्टीने निधी संकलनासाठी या पादुकांचा दौरा निश्चित करण्यात आला आहे. हा मठ मीरज येथे १६५५ मध्ये बांधलेला असून दैनंदिन पूजेसाठी समर्थ रामदासस्वामी यांनी तो श्री वेणास्वामी यांना दिला आहे.
त्याचप्रमाणे समर्थांनी तपश्चर्या आणि देशाटन करतांना २४ वर्षे ज्या रामपंचायतनच्या मूर्तीची पूजा केली, त्या ध्यानस्थ श्रीरामाची मूर्ती या मठात आहे. या पादुका सज्जनगड संस्थान यांच्या माध्यमातून महाराष्ट्रात ठिकठिकाणी जात असतात. या पादुकांचा मुक्काम १० मार्चपर्यंत ठाण्यातील वर्तकनगरमधील श्री. दिगंबर देशपांडे यांच्या रुणवाल प्लाझा, रो हाऊस, बंगला क्रमांक ११ या निवासस्थानी आहे. भाविकांनी पादुकांच्या दर्शनाचा लाभ घ्यावा, तसेच मठाच्या जीर्णोद्धारासाठी आर्थिक हातभार लावावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. यासाठी भाविकांनी श्री. दिगंबर देशपांडे यांच्या दू.क्र. ९९६७० ६०९६२ वर संपर्क साधावा.