देवाला फुले वहातांना ती सुंदर पद्धतीने आणि अध्यात्मशास्त्रदृष्ट्या योग्य पद्धतीने वाहिल्यास त्याचा लाभ होतो. या दृष्टीने अध्यात्मशास्त्रदृष्ट्या फुले कशी वहावीत याविषयी येथे समजून घेवूया.
१. देवाला योग्य ते फूल वहाणे, हे अध्यात्मशास्त्राला धरून असल्याने फुलांची अशी रचना ईश्वरेच्छेने स्पंदने प्रक्षेपित करणारी ठरणे आणि त्यामुळे तिचा कमाल स्तरावर चैतन्याच्या दृष्टीने समष्टीला लाभ होण्यास साहाय्य मिळणे अन् अशी फुले सुंदर पद्धतीने वाहिली, तर लाभाचे प्रमाण आणखी वाढणे.
डॉ. आठवले : देवाला योग्य ते फूल वहाणे, यासोबत फुले वहाण्यामुळे देवघरही सुंदर दिसणे, याला देवपूजेत काही महत्त्व आहे का ? १. देवाला योग्य ते फूल वहाणे, हे अध्यात्मशास्त्राला धरून असल्याने फुलांची अशी रचना ईश्वरेच्छेने स्पंदने प्रक्षेपित करणारी ठरणे आणि त्यामुळे तिचा कमाल स्तरावर चैतन्याच्या दृष्टीने समष्टीला लाभ होण्यास साहाय्य मिळणे अन् अशी फुले सुंदर पद्धतीने वाहिली, तर लाभाचे प्रमाण आणखी वाढणे.
एक विद्वान : हो. देवाला योग्य ते फूल वहाणे, ही काळाला संमत असणारी आणि ईश्वराच्या कार्यकारणभावाला धरून असणारी, तसेच ईश्वरेच्छेने स्पंदने प्रक्षेपित करणारी रचना आणि पद्धत असल्याने तिचा कमाल स्तरावर चैतन्याच्या दृष्टीने समष्टीला लाभ तर होतोच; परंतु तीच फुले अगदी त्या त्या देवतेला योग्य पद्धतीने वहातांनाच ती सुंदर पद्धतीने ठेवली, तर लाभाचे प्रमाण आणखी वाढते; कारण यामुळे त्या त्या क्षेत्री फुलांचा सुयोग्य रचनाकार आकृतीबंध तयार झाल्याने या प्रक्रियेतील प्रत्येक कर्म आणि कृती सुंदर बनते. त्यामुळे या ठिकाणी ‘योगः कर्मसु कौशलम् ।’, म्हणजे ‘कर्म कुशलतेने करणे म्हणजे योग’, या उक्तीप्रमाणे ‘ईश्वरी योग’ साधला जाऊन ब्रह्मांडातून या आकृतीबंधाकडे चैतन्य आकृष्ट होण्याचे प्रमाण वाढते आणि तेवढ्याच प्रमाणात समष्टीला कल्याणाच्या स्तरावर लाभ होण्याचे प्रमाणही वाढते. (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, माघ कृ. ६, कलियुग वर्ष ५११३ (१३.२.२०१२), सकाळी १०.५०))
२. एका फुलावर दुसरे फूल किंवा एखादे पान ठेवून देवासमोर फुलांची रचना करणे अयोग्य असण्याची कारणे
डॉ. आठवले : देवघरात फुले वहातांना काही साधक एका फुलावर दुसरे फूल ठेवतात, उदा. जास्वंदीच्या फुलावर पांढर्या रंगाचे तगरीचे फूल ठेवतात किंवा तुळशीपत्रावर फुले ठेवतात. अशी रचना दिसायला चांगली दिसते. असे असले, तरी विविध देवतांची तत्त्वे आकृष्ट करणारी फुले किंवा पाने एकत्रित ठेवल्यामुळे काय परिणाम होतो ? भावाचा त्याच्यावर काय परिणाम होतो ?
एक विद्वान : २ अ. अध्यात्मशास्त्रदृष्ट्या अयोग्य असणे : एका फुलावर दुसरे फूल ठेवणे त्यावर एखादे पान ठेवणे, ही रचना अध्यात्मशास्त्रदृष्ट्या अयोग्य आहे.
२ आ. फुलांची कार्य करण्याची क्षमता घटणे : एकावर एक फुले ठेवून रचना दोन्ही फुलांची कार्य करण्याची क्षमता घटते; कारण त्यांच्या स्पंदनप्रक्षेपणात एकमेकांचाच अडथळा निर्माण होतो.
२ इ. फुलांची कार्य करण्याची दिशा पालटणे : एकावर एक दुसरे फुल ठेवल्याने पहिल्या फुलपाकळ्यांतून, तसेच पुंकेसरातून प्रक्षेपित होणार्या त्या त्या देवतेच्या तत्त्वयुक्त लहरींची दुसरे फुल मधे येण्याने कार्य करण्याची दिशा बदलू शकते. यामुळे ईश्वरी नियोजनानुसार त्या त्या दिशांकडे फुलांच्या माध्यमातून नैसर्गिक प्रक्रियेने चालू असणार्या ईश्वरी कार्यात बाधा येते.
२ ई. दोन्ही फुलांची स्पंदने एकमेकांवर आदळल्याने त्रासदायक स्पंदने निर्माण होणे : दोन्ही फुले एकमेकांच्या संपर्कात आल्याने दोन्ही फुलांच्या माध्यमातून प्रक्षेपित होणारी स्पंदने एकमेकांवर आदळतात आणि या स्पंदनांच्या आघातयुक्त लहरींच्या नादातून त्रासदायक अशी घर्षणयुक्त स्पंदने निर्माण झाल्याने देवतेच्या तत्त्वाचे वहन करण्याच्या फुलाच्या कार्यात घट होते आणि त्याच्या भाविकाला मिळणार्या आध्यात्मिक लाभातही न्यूनता येते.
२ उ. फुलांच्या रचनेवर वाईट शक्तींचे आक्रमण होणे : फुलांचे दिशा पालटून कार्य चालू झाल्यामुळे, तसेच त्यांच्या कमाल चैतन्याच्या स्तरावर कार्य करण्यात घट झाल्याने त्याकडे ईश्वरेच्छेने आकृष्ट होणार्या लहरींच्या प्रवाहातही घट होते आणि यामुळे अशी रचना वाईट शक्तींच्या आक्रमणाला बळी पडू शकते.
३. अध्यात्मशास्त्रदृष्ट्या योग्य अशी फुलांची रचना करण्याचे महत्त्व आणि याचे भाविकांना होणारे आध्यात्मिक स्तरावरील लाभ
३ अ. लाभ अधिक असणे : अध्यात्मशास्त्रदृष्ट्या योग्य अशी फुलांची रचना केल्याने भाविकाला अधिक लाभ मिळतो.
३ आ. ज्या फुलाची रचना, त्याचा गंध, त्याचा आकार त्या त्या देवतेच्या तत्त्वाला आकृष्ट करून घेण्याच्या दृष्टीने योग्य असतो, तेच फूल त्या त्या देवतेला वहाण्यास अध्यात्मशास्त्रात सांगितलेले असणे : प्रत्येक फुलाची त्या त्या देवतेचे तत्त्व आकृष्ट करून घेण्याची आणि ते प्रक्षेपित करण्याची क्षमता निरनिराळी असते. ज्या फुलाची रचना, त्याचा गंध, त्याचा आकार त्या त्या देवतेच्या तत्त्वाला आकृष्ट करून घेण्याच्या दृष्टीने योग्य असतो, तेच फूल त्या त्या देवतेला वहाण्यास अध्यात्मशास्त्र सांगते.
३ इ. फूल चैतन्याचे उत्तम वाहक बनणे : त्या देवतेकडून मिळणार्या चैतन्य लहरी फुलाच्या माध्यमातून वायूमंडलात त्या त्या पंचतत्त्वांच्या स्तरावर जास्तीतजास्त प्रमाणात प्रक्षेपित केल्या जातात आणि पूजाविधीत फूल हे एक या प्रक्रियेतील उत्तम वाहक बनते.
३ ई. फुलांच्या रचनेतून सगुण तत्त्वाचा लाभ होण्याचे प्रमाण अधिक असणे : फुलांच्या माध्यमातून भाविकाला कमाल प्रमाणात देवतेच्या सगुण तत्त्वाचा लाभ होऊ शकतो; म्हणून गणपतीला जास्वंदाचे फूल, शिवाला बेल, हनुमानाला रुईची पत्री वहाण्याची योजना ईश्वरी इच्छेनुसार ऋषीमुनींनी मानवजातीच्या कल्याणासाठी केलेली आढळते.
४. अध्यात्मशास्त्राला धरून नसलेली; परंतु भावपूर्ण पद्धतीने केलेली फुलांची रचना केवळ व्यष्टी स्तरावर आध्यात्मिक लाभ मिळवून देण्यात अग्रेसर असणे
एखाद्या भाव असणार्या साधकाने भावपूर्ण पद्धतीने फुलांची रचना केली; परंतु ती अध्यात्मशास्त्रदृष्ट्या योग्य नसेल, तर ही रचना केवळ व्यष्टी स्तरावर चैतन्याचा लाभ मिळवून देण्यात अग्रेसर ठरते; कारण साधकाच्या भावऊर्जेच्या सान्निध्याने त्या फुलांच्या रचनेची कार्य करण्याची क्षमता वाढल्याने या क्षमतेच्या आधारे ही रचना भाविकांना त्याचा योग्य तो लाभ केवळ व्यष्टी स्तरावर मिळवून देऊ शकते; परंतु ही रचना समष्टी स्तरावर चैतन्य प्रक्षेपणाच्या दृष्टीने कार्य करण्यात मात्र न्यून पडते; कारण ही रचना ईश्वरेच्छेला धरून, म्हणजेच काळाला संमत अशी नसून केवळ स्थळयुक्त भावबंधनात अडकलेली असते; म्हणून त्यामानाने याचा व्यापक स्तरावर समष्टीला लाभ मिळण्याचे प्रमाण अल्प होते. प्रत्येकाच्या भावानुसार त्या त्या रचनेतून चैतन्य प्रक्षेपणाचे प्रमाणही बदलते रहाते. ही रचना स्थळाशी निगडित असल्याने ती तात्कालीक रूपात आध्यात्मिक स्तरावर लाभ मिळवून देते.
५. बाह्यदृष्ट्या केवळ सजावट म्हणून केलेली फुलांची रचना मात्र सर्वच बाबतीत सर्वांनाच आध्यात्मिक दृष्ट्या देवतेच्या चैतन्याचा लाभ करून देण्यात न्यून पडणे
बाह्यदृष्ट्या केवळ सजावट म्हणून केलेली फुलांची रचना मात्र सर्वच बाबतीत सर्वांनाच आध्यात्मिकदृष्ट्या देवतेच्या चैतन्याचा लाभ करून देण्यात न्यून पडते; कारण ही सजावट पूजा म्हणून नाही, तर केवळ भावनेच्या स्तरावर केलेली एक दिखाऊ स्वरूपाची रचना असते. ही रचना आध्यात्मिक लाभ करून देऊ शकत नाही; कारण यात सजावट करणार्या व्यक्तीच्या अहंयुक्त रज-तमात्मक स्पंदनांचे प्रमाण रचनेच्या रूपात बद्ध झालेले असल्याने ही स्पंदनेच फुलांच्या रचनेवर आवरण आणणारी ठरतात आणि याचा लाभ वाईट शक्ती उठवून सर्व रचनेलाच तमोगुणी बनवतात. ही रचना केवळ बाह्यांगाने सुंदर दिसत असली, तरी अंतरंगातून चैतन्य प्रक्षेपणाच्या दृष्टीने फोल ठरते.
६. निष्कर्ष
अ. अध्यात्मशास्त्रदृष्ट्या योग्य नसणारी फुलांची रचना बाह्यांगाने, म्हणजेच स्थूल डोळ्यांनी दिसायला सुंदर दिसली, तरी ती आध्यात्मिकदृष्ट्या भाविकाला लाभ मिळवून देण्यात न्यून पडते.
आ. भावपूर्ण केलेली, मात्र अध्यात्मशास्त्राला अनुसरून नसणारी फुलांची रचना मात्र केवळ व्यष्टी स्तरावरच आध्यात्मिकदृष्ट्या लाभ मिळवून देणारी ठरते; कारण ही रचना केवळ अंतरंगातून सुंदर असते.
इ. अध्यात्मशास्त्रदृष्ट्या योग्य केलेली रचना मात्र सर्वांनाच चैतन्याचा लाभ करून देते; कारण ती बाह्यांगाने, तसेच अंतरंगानेही सर्वांगसुंदर असते. अशी परिपूर्ण रचना देवाला संमत असणारी अशी असल्याने ती समष्टी स्तरावर पहिल्या दोन रचनांपेक्षा अधिक प्रमाणात आध्यात्मिक स्तरावर लाभ मिळवून देणारी ठरते.
ई. अध्यात्मशास्त्राला धरून असणारी प्रत्येक गोष्ट ही त्या त्या गोष्टीतून निर्माण होणार्या कमाल कार्यकारणभावात्मक ईश्वरी फलनिष्पत्तीला धरून असल्याने तिचा समष्टीला कमाल स्तरावर लाभ मिळण्यास साहाय्य मिळते; म्हणून अध्यात्मशास्त्राला धरून देवतांना त्या त्या प्रकारची फुले वहाणे, हे अधिक इष्ट ठरते.
(सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, माघ कृ. ६, कलियुग वर्ष ५११३ (१३.२.२०१२), सकाळी १०.५०))
