'पुढे येणार्‍या भीषण आपत्काळात जिवंत रहाण्यासाठी व्यष्टी आणि समष्टी साधना वाढवा !' - डॉ. जयंत आठवले

शिवसेनेची परीक्षा आता सुरू झाली आहे !

मुंबईत जी लढत झाली ती राज यांच्याविषयी तरुणांना वाटणारे आकर्षण आणि कोणी किती काहीही म्हणाले, तरी बाळासाहेबांना खाली बघायला लावणे बरोबर नाही, असे मनापासून वाटणार्‍या जुन्या पिढीची कृतज्ञता या दोन गोष्टींमध्ये झाली. आकर्षण आणि कृतज्ञता यात मूल्यांचा विजय झाला. उद्धवनी परिश्रम कमी केले असे नाही; पण ते परीक्षेला बसले आहेत, असे लोकांनी मानले नाही. लोकांनी त्यांचे कौतुक केले आणि बाळासाहेबांकडे बघून परीक्षा उत्तीर्ण होण्याइतकी मते दिली. उद्धव यांची परीक्षा आता चालू झाली आहे.
लेखक : श्री. अरविंद विठ्ठल कुळकर्णी, समादेशक (सल्लागार) संपादक, सनातन प्रभात, मुंबई.

मुंबई-ठाण्यातील विजय हा मराठी माणसाने बाळासाहेबांना घातलेला दंडवत
    मुंबई आणि अन्य नऊ महानगरपालिकांच्या निवडणुकांचे जे परिणाम घोषित झाले, त्यामुळे एकंदरच राजकीय व्यवहाराविषयी ज्यांना चिंता आहे, अशांनी गंभीर आत्मपरीक्षणाला सामोरे गेले पाहिजे. मुंबई आणि ठाणे महापालिकांवर भगवा फडकला यामुळे आनंद होणे साहजिक आहे; परंतु सर्वसामान्य माणसाचा आणि जाणकार हितचिंतकांचा आनंद यात अंतर असले पाहिजे. भगवा फडकला याचा अर्थ मुलगा उत्तीर्ण झाला इतकाच आहे. तो अनुतीर्ण झाला नाही, खाली मान घालायला लावली नाही, असे जेव्हा होते, तेव्हा त्याला पालकांनी सुस्कारा टाकला म्हणतात. त्या निश्वासात जेवढा मावेल तेवढाच आनंद मानून लगेच पुढच्या अभ्यासाला लागायचे असते. भाजप आणि शिवसेनेला महाराष्ट्रात राज्यावर यायचे असेल आणि दिल्लीत राज्य करण्यासाठी पुरेसे सांसद येथून पाठवायचे असतील, तर आहे त्या परिस्थितीवर समाधान मानून चालणार नाही. मुंबईवर भगवा फडकला याचा अर्थ घरधनी अडचणीत असेल आणि कोठे कमी पडत असेल, तर अडगळीत पडलेले जुने निष्ठावान सेवक सगळे विसरून धावत पुढे येतात आणि घरावरचे संकट निवारतात, तसे या निवडणुकीत झाले आहे. मुंबई महापालिका हिसकावून घेऊन शिवसेनेची रसद तोडण्याची भाषा काँग्रेस नेत्यांनी केली होती. या निवडणुकीनंतर बाळासाहेब ठाकरे निष्प्रभ आणि आगापिछा नसलेले होतील असे प्रलाप कसे कोणास ठाऊक; पण मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या तोंडून निघाले होते. शिवसेनेची संघटना बांधतांना गेली चाळीसेक वर्षे बाळासाहेबांनी काय कष्ट घेतले ते ज्याने ज्याने पाहिले आहे, अशा कोणत्याही मराठी माणसास पृथ्वीराजजींचे उद्गार सहन करणे कठीण होते. यशवंतराव चव्हाणांनी कोल्हापूरच्या गादीविषयी म्हणजे कोल्हापूर संस्थानाविषयी काही अभद्र उद्गार ते केंद्रात गृहमंत्री असतांना काढले
होते. त्याची तत्काळ उत्स्फूर्त प्रतिक्रिया होऊन सगळ्या कोल्हापूरकरांनी त्यांचेवर कित्येक
वर्षे बहिष्कार टाकला होता. त्यांना कोल्हापूरात प्रवेशबंदी होती. तेव्हा आपल्या राजाविषयी जी भावना करवीरकरांची होती, ती भावना मराठी माणसाची बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी आहे. हे ज्याला कळले नाही त्याला मराठी माणूस गोत्यात आणल्यावाचून रहाणार नाही. तेव्हा मुंबई आणि ठाण्यावरील विजय म्हणजे मराठी माणसाने मतदानकेंद्रावर जाऊन बाळासाहेबांना घातलेला दंडवत आहे.
दादरमध्ये मनसेचा प्रभाव 
        घराबाहेर लोकांच्या चपलांचा पडलेला ढिग म्हणजे घराला माणसांचा राबता आहे आणि घर जिवंत आहे याचा पुरावा आहे, असे प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांनी बाळासाहेबांना एकदा मुद्दाम थांबवून सांगितले होते. त्याचा नेमका अर्थ बाळासाहेबांनी जाणून घेतला आणि त्यांच्या घराकडचा लोकांचा राबता कधी कमी झाला नाही. हा राबता पुन्हा चालू होईल आणि मनात केवळ मराठी माणसाचे हित असलेले विविध प्रकारचे लोक शिवसेना भवनाच्या पायर्‍या चढूउतरू लागतील तेव्हा नेत्यांना परिस्थिती किती खोल आहे हे कळेल आणि दादर भागातील महानगरपालिकेच्या जागा कोणाला किती द्यायच्या याचा निर्णय घाईने घेतला जाणार नाही. आज जेथे शिवसेना भवन उभे आहे, त्याच्या आसपासच्या जवळजवळ सर्व जागा राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जिंकल्या आहेत. मुंबईतल्या मराठी संस्कृतीचे केंद्र एकेकाळी गिरगाव होते. आज ते दादर आहे. या दादरमध्ये शिवसेनेचे मुख्य कार्यालय आहे. ते कार्यालय उद्धव ठाकरे यांच्या स्वाधीन आहे. दादरमध्ये सेनेचे पहिले मुख्यमंत्री रहातात. दादरमध्येच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे रहातात. दादरवर राजकीय प्रभाव जेवढा शिवसेनेचा आहे, त्याहून काहीसा अधिकच मनसेचा आहे, हे या निवडणुकीने आकड्यांनी सिद्ध केले आहे.      
 निवडणुकीचे तंत्र लीलया खेळणारे पवार
       आकडे बरेच बोलके असतात. मुंबई, ठाणे, उल्हासनगर, पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, सोलापूर, अकोला, अमरावती आणि नागपूर अशा दहा महानगरपालिकांची निवडणूक जी १६ फेब्रुवारीला झाली ती एकूण १ सहस्र २४४ जागांसाठी झाली. शरद पवार काँग्रेसला सर्वाधिक म्हणजे २६७ जागा मिळाल्या. त्याखालोखाल काँंग्रेसला २६३, शिवसेनेला २२६, भाजपला २०६  आणि मनसेला ११२ असे जागावाटप लोकांनी केले. दोन्ही काँग्रेस, शिवसेना आणि भाजप यांंना मिळालेल्या लोकांच्या पाठिंब्यात फार मोठे अंतर आहे, असे म्हणता येणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळाल्या कारण त्यांचा नेता शरद पवार आहे. पवारांच्या मागे लोक आहेत असे वाटते याची कारणे दोन आहेत. इतर पक्ष आपल्या पक्षापेक्षा कमी संवेदनशील आहेत; आपला पक्ष इतर पक्षांपेक्षा लोकांच्या समस्यांविषयी अधिक संवादी आणि जाणकार आहे, अशी प्रतिमा सतत लोकांसमोर राहील, याची काळजी पवार कटाक्षाने घेत असतात. दुसरे म्हणजे निवडणुकीचे तंत्र लीलया खेळण्यात पवार इतरांपेक्षा पुष्कळ पुढे आहेत. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की पवारांचा पक्ष हा काँग्रेसमधून फुटून निघालेला गट आहे. या गटाचा पक्ष झाला असला आणि त्याने काँग्रेसच्या गोटात काळजीचे वातावरण अनेकदा निर्माण केले असले, तरी गेल्या ३५ वर्षांत या पक्षाच्या मर्यादाही स्पष्ट झाल्या आहेत. या पक्षाला काँग्रेसपेक्षा वेगळा ध्येयवाद नसला तरी मुळात या पक्षाला ध्येयवादामध्ये फारसे स्वारस्य नाही. व्यवहारचातुर्याने पक्ष वाढविण्यावर पवारांचा भर आहे. एकट्याच्या बळावर हा पक्ष सत्तेवर येऊ शकत नाही; पण त्यामुळे त्या पक्षाचे काही बिघडत नाही. उलट कमी खर्चात अधिक लाभ देणारी अशीच व्यवस्था पवारांना हवी आहे. पवारांकडे गेल्यावर पोट चांगले भरते या विश्वासावर तो पक्ष वाढतो आहे. ध्येयवादाचे राजकारण करूनच काँग्रेसला पवारांच्या पक्षाचे आव्हान पेलता येईल. तसे नेते तेथे फार कमी आहेत आणि व्यवहारी राजकारणात त्यांना फारसे कोणी विचारीत नाही.
आकर्षण आणि कृतज्ञता यात मूल्यांचा विजय
    राज ठाकरे यांच्या ‘मनसे'ला दहा महापालिकांमध्ये ११२ म्हणजे शिवसेनेच्या निम्म्या जागा मिळाल्या आहेत. नाशिक महापालिकेत सर्वाधिक जागा त्याला मिळाल्या असून तेथे त्याची सत्ता येणार आहे. मुंबईत ‘मनसे'ची शक्ती चौपट झाली आहे. हा शिवसेनेतून फुटून निघालेला गट आहे आणि त्याचा राज्यात सत्तारूढ होणारा महत्त्वाकांक्षी पक्ष म्हणून प्रवास चालू झाला आहे. जेथे मनसेचा पराभव झाला तेथे १७ फेब्रुवारीला फेरफटका मारला असता ‘राजसाहेबांना एक संधी मुंबईकरांनी द्यायला हवी होती, अशी हळहळ व्यक्त करणारे अनेक विशिबाविशीतले तरुण पहावयास मिळाले. बिघडलेल्या परिस्थितीत राज ठाकरे पालट  घडवून आणू पहात आहेत आणि ते ज्या पोटतिडीकीने बोलतात त्यावरून ते पालट करतील असे तरुणांना वाटत आहे. तेव्हा मुंबईत जी लढत झाली ती राज यांच्याविषयी तरुणांना वाटणारे आकर्षण आणि कोणी किती काहीही म्हणाले तरी बाळासाहेबांना खाली बघायला लावणे बरोबर नाही, असे मनापासून वाटणार्‍या जुन्या पिढीची कृतज्ञता या दोन गोष्टींमध्ये झाली. आकर्षण आणि कृतज्ञता यात मूल्यांचा विजय झाला. उद्धवनी परिश्रम कमी केले असे नाही; पण ते परीक्षेला बसले आहेत, असे लोकांनी मानले नाही. लोकांनी त्यांचे कौतुक केले आणि बाळासाहेबांकडे बघून परीक्षा उत्तीर्ण होण्याइतकी मते दिली. उद्धव यांची परीक्षा आता चालू झाली आहे. जे पक्षातून फुटून निघतात त्यांच्याशी युद्ध ध्येयवादाने केले तरच लोकांना ते पटते. बंडखोर माणूस कमी योग्यतेचा आहे असे नुसते म्हणून लोक मानीत नाहीत. आपल्याकडे त्याच्यापेक्षा चांगला विचार आहे,  हे लोकांना पटवावे लागते. हिंदुत्व हे कृतीप्रवण आणि सगळ्यांना स्नेहरज्जूंनी बांधून ठेवणारे आहे, हे जर सांगितले, तर राज यांनाही त्यांचे तत्त्वज्ञान सांगावे लागेल. मग लोकांना कोणाची बाजू घ्यायची त्याचा निर्णय आधीच घेता येईल आणि आता जशी ऐनवेळी धावपळ करावी लागली तशी करावी लागणार नाही. तेव्हा आता अभ्यासला लागा.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : www.hindujagruti.org हिंदी : www.hindujagruti.org/hindi