'पुढे येणार्‍या भीषण आपत्काळात जिवंत रहाण्यासाठी व्यष्टी आणि समष्टी साधना वाढवा !' - डॉ. जयंत आठवले

राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या अधिकार्‍यांच्या चौकशीच्या कालावधीत कर्नाटक येथील श्री. विनयकुमार आणि श्री. उदयकुमार यांना जाणवलेली सूत्रे

१. श्री. विनयकुमार
१ अ. आध्यात्मिक स्तरावर केलेल्या विविध उपायांचा अधिकार्‍यांवर परिणाम होणे
१ अ १. मुद्रा करता येऊ नये यासाठी अधिकार्‍यांनी साधकांची नावे लिहून देण्यास सांगणे आणि नावे लिहितांना एका हाताने मुद्रा केल्यावर अधिकार्‍यांच्या बुद्धीवर आवरण येऊन विचारावयाचे प्रश्नही ते काही वेळाने विसरून जाणे :
‘चौकशीच्या कालावधीत मी मुद्रा आणि नामजप करून अधिकार्‍यांशी बोलत होतो. त्यामुळे त्यांना पुष्कळ त्रास व्हायचा. मी मुद्रा करू नये; म्हणून ते माझे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करत होते. शेवटी मला मुद्रा करता येऊ नये; म्हणून त्यांनी साधकांची नावे लिहून द्यायला सांगितली.
तरीही मी एका हाताने लिहित होतो आणि दुसर्‍या हाताने मुद्रा करत होतो. त्यामुळे अधिकार्‍यांना मला नेमके काय विचारायचे आहे, ते कळतच नव्हते. विचारावयाचे प्रश्नही ते काही वेळाने विसरून जायचे. त्रास होऊ नये; म्हणून ते पुनःपुन्हा चौकशी कक्षाच्या बाहेर जायचे.
१ अ २. अधिकार्‍यांचे मन आणि बुद्धी यांवर श्रीकृष्णाचे नियंत्रण असल्याचा भाव ठेवल्याने अधिकार्‍यांना नेमकी सूत्रे लक्षात न येता त्यांच्याकडून शांतपणे बोलले जाणे : ‘अधिकारी विचारत असलेल्या प्रश्नांना उत्तरे कशी द्यायची’, याचा विचार करण्यापेक्षा मी ‘या अधिकार्‍यांचे मन आणि बुद्धी यांवर श्रीकृष्णाचे नियंत्रण आहे. त्यामुळे त्याला अपेक्षित असेच प्रश्न विचारले जाणार आहेत', असा भाव ठेवायचो. अधिकार्‍यांच्या मनावर नामजपाचे (ईश्वरी चैतन्याचे आवरण) आवरण निर्माण करण्याचा प्रयत्न करत होतो. त्यामुळे त्यांना नेमके काय विचारायचे, हे लक्षात न आल्याने ते शांतपणे बोलायचे.
१ आ. बहिणीच्या यजमानांनीही अधिकार्‍यांच्या प्रश्नांना धिराने उत्तरे देणे
    पूर्वी माझ्या बहिणीचे यजमान साधना करत नव्हते. एक मासापूर्वी ते रामनाथी आश्रम पहाण्यासाठी आले होते. तेव्हापासून त्यांनी साधनेला प्रारंभ केला. जेव्हा अन्वेषण यंत्रणेचे अधिकारी त्यांच्या घरी चौकशीला गेले, तेव्हा त्यांनी धिराने त्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली. अधिकारी त्यांना त्रास देतील; म्हणून आम्हाला त्यांची काळजी वाटायची; परंतु आता तेच आमची काळजी घेतात. सतत चौकशीही करतात.
१ इ. मुलांना चौकशीसाठी बोलावल्यावर आई-वडिलांना काळजी वाटणे आणि ईश्वरच सर्वकाही करणार असल्याची जाणीव झाल्यावर स्थिर रहाणे
    अधिकार्‍यांनी चौकशीसाठी आमच्या वडिलांना बोलावले, तेव्हा त्यांना काहीच वाटले नाही. ते धिराने चौकशीला सामोरे गेले; परंतु आम्हा दोघांना (मला आणि उदयला) बोलावले, तेव्हा आई-वडिलांना थोडी काळजी वाटत होती. शेवटी ‘ईश्वरच करणार आहे’, याची जाणीव झाल्यावर ते स्थिर आणि शांत झाले. आमच्याविषयी चौकशी करण्यासाठी नातेवाइकांचे दूरभाष आल्यानंतर आई-वडील स्थिर राहून त्यांच्याशी बोलायचे. त्यामुळे नातेवाइकांची काळजी जाऊन तेही स्थिर व्हायचे.
१ ई. ईश्वर कर्ता करविता असल्याची प्रचीती येणे
    चौकशीला सामोरे जाणे, त्यानंतर पत्रकार परिषद घेणे, मानवाधिकार आयोग, तसेच मुख्यमंत्री यांकडे तक्रार करणे, अशा कल्पनातीत आणि असाध्य कृती करणे आमच्या सर्वांच्याच क्षमतेच्या आवक्याबाहेरचे होते; परंतु ईश्वर कोणालाही माध्यम बनवून हे सर्व करवून घेऊ शकतो, याची प्रचीती त्याने या प्रसंगातून दिली. त्यामुळे मला कृतज्ञता वाटत होती. तेव्हा ‘आपण काहीच करू शकत नाही. सर्व जगाचा नियंता भगवंत आहे, याची प्रचीती आली.’

२. श्री. उदयकुमार 
२ अ. श्रीकृष्णाच्या अनुसंधानात असल्याने आलेल्या अनुभूती 
२ अ १. श्रीकृष्णाच्या अनुसंधात राहिल्याने भावजागृती : ‘चौकशीच्या कालावधीत मी श्रीकृष्णाच्या अनुसंधानात असल्यामुळे मधून मधून माझी भावजागृती होत होती. अधिकारी विचारत असलेल्या प्रश्नांची उत्तरे त्यांच्याकडे असलेल्या माहितीप्रमाणेच माझ्याकडून दिली जात होती.

२ अ २. पत्रकार परिषद घेणे, तसेच मानवाधिकार आयोगाकडे तक्रार करणे, या गोष्टी प्रथमच करत असणे, श्रीकृष्णाच्या अनुसंधानात राहिल्यामुळे स्वतः स्थिर रहाणे आणि अधिकार्‍यांनीही त्यानंतर आदरपूर्वक बोलण्यास प्रारंभ करणे : चौकशीच्या कालावधीत अधिकार्‍यांनी केलेले अत्याचार सर्वांना कळावेत; म्हणून पत्रकार परिषद घेण्याचे, तसेच मानवाधिकार आयोगाकडे तक्रार करण्याचे ठरले. नंतर जिल्हा पोलीस अधीक्षक (डी.एस्.पी.) यांच्याकडे प्रत्यक्ष जाऊन तक्रार देण्याचे ठरले. आयुष्यात प्रथमच असा प्रसंग घडत असल्याने काय करावे, ते लक्षात येत नव्हते; परंतु श्रीकृष्णाच्या अनुसंधानात राहिल्यामुळे मी स्थिर राहून इतरांनी सांगितल्याप्रमाणे कृती करू शकत होतो. कृती करतांना कसलीही भीती वाटत नव्हती. पत्रकार परिषद झाल्यानंतर पुन्हा अधिकार्‍यांनी चौकशीला बोलावले. तेव्हा त्यांनी बसायला आसंदी दिली. ते माझ्याशी आदरपूर्वक बोलत होते. शारीरिक किंवा मानसिक त्रास होईल, असे काहीच बोलत नव्हते. सनातनच्या सात्त्विक उत्पादनांविषयी (कुंकू, साबण, कापूर) विचारणा करत होते.
२ आ. अधिकारी मारत असतांना वसुदेव आणि देवकी यांना कंसाने दिलेला त्रास आठवणे अन् अधिकार्‍यांच्या पापाचे घडे भरण्यासाठी भगवंत ही कृती करत असल्याचे जाणवून कृतज्ञता वाटणे
    चौकशीच्या कालावधीत अधिकारी शारीरिक आणि मानसिक त्रास देऊन मारतही होते. तेव्हा ‘ते सर्व स्वीकारणे, ही माझी साधनाच आहे’, असा भाव मी ठेवायचो. अधिकारी मारत असतांना मला वसुदेव आणि देवकी यांना कंसाने दिलेला त्रास आठवायचा अन् कंसाचे पाप भरण्यासाठी भगवंत त्याच्याकडून तशा कृती करवून घेतल्या, त्याप्रमाणेच ‘या अधिकार्‍यांच्या पापाचे घडे भरण्यासाठी भगवंत ही कृती करत आहे’, असे जाणवून त्याच्याप्रती कृतज्ञता अधिक वाटू लागली.
२ इ. प्रसार करण्याची इच्छा देवाने पूर्ण करवून घेतल्याने आत्मविश्वास निर्माण होणे
    पूर्वी घरी असतांना मला ‘प्रसार करावा, तसेच सर्वांना साधनेविषयी सांगावे’, असे वाटायचे; परंतु मला नीट बोलता येत नसल्याचे वाटून मी प्रसाराला जात नसे. शेवटी प्रसार करण्याची माझी इच्छा भगवंताने अशा प्रकारे पूर्ण करवून घेतल्याने त्याच्याविषयी मला कृतज्ञता वाटू लागली, तसेच भीती जाऊन ‘मी बोलू शकतो’, असा आत्मविश्वास माझ्यात निर्माण झाला.
२ ई. भावपूर्ण प्रार्थना केल्याने चौकशीच्या कालावधीत स्वतःकडून होणार्‍या चुका लक्षात येणे आणि इतरांनीही काही चुका लक्षात आणून देणे
    पूर्वी मी साधकांना ‘माझ्या चुका आणि दोष सांगा’, असे सांगायचो; परंतु कोणीच मला त्याविषयी सांगायचे नाही. चौकशीच्या कालावधीत माझ्याकडून काही चुका झाल्या असतील, तर त्या लक्षात येण्यासाठी मी श्रीकृष्णाला शरण जाऊन प्रार्थना करायचो. त्यानंतर मला चुका लक्षात यायच्या. इतर साधकांनीही काही चुका लक्षात आणून दिल्या. त्यामुळे श्रीकृष्णाप्रती कृतज्ञता वाटली.
२ उ. प्रार्थना केल्यावर श्रीकृष्णानेच अहं न वाढण्याची काळजी घेणे
    पत्रकार परिषद अथवा वृत्तवाहिन्यांना मुलाखत देऊन आल्यानंतर सर्व साधक ‘‘कार्यक्रम चांगला झाला. तुम्ही दोघेही चांगले बोललात’', असे म्हणून कौतुक करायचे. पूर्वी कोणी कौतुक केल्यास माझा अहं लगेच जागृत व्हायचा. या वेळी मी श्रीकृष्णाला सांगितले, ‘माझा अहं वाढू देऊ नकोस.' अशी कळवळून प्रार्थना केल्यामुळे साधकांनी कितीही कौतुक केले, तरी ‘सर्वकाही कृष्णानेच केले. तोच कर्ता करविता आहे', असे माझ्याकडून सांगितले जायचे.

२ ऊ. अधिकार्‍यांच्या संदर्भात जाणवलेली सूत्रे  
२ ऊ १. आवश्यक ती माहिती मिळण्यासाठी स्वतः हिंदु धर्माप्रमाणे आचरण करत असल्याचे भासवणे : स्वतःला हवी ती माहिती मिळण्यासाठी काही वेळा अधिकारी सांगायचे, ‘‘आम्हीही हिंदु संघटनेशी संबंधित आहोत.’’ आरक्षक स्थानकात असलेल्या देवतांच्या छायाचित्रांना सतत नमस्कार करून ‘आम्हीही हिंदु धर्माप्रमाणे आचरण करतो’, असे ते भासवायचे.

२ ऊ २. अधिकार्‍यांनी कोणाच्या तरी दबावाखाली कृती करणे : चौकशीच्या कालावधीत त्यांना काही दूरभाष यायचे. त्यानंतर त्यांचे चालणे आणि बोलणे यांत पालट व्हायचा. यावरून ते कोणाच्या तरी दबावाखाली कृती करत असल्याचे जाणवायचे.’

३. श्री. विनयकुमार आणि श्री. उदयकुमार यांना लक्षात आलेली सामायिक सूत्रे 
३ अ. साक्षीभावाने रहाता येणे : ‘चौकशीच्या कालावधीत अधिकारी शरिराला वेदना होईपर्यंत आम्हाला मार द्यायचे आणि आमचा मानसिक छळही करायचे. त्या वेळी आम्हाला त्याचे काहीच वाटत नव्हते. त्या कृतींकडे साक्षीभावाने पहाता आले. प्रत्येक प्रसंगात आम्ही भावपूर्ण नामजप आणि प्रार्थना करून श्रीकृष्णाच्या अनुसंधानात रहाण्याचा प्रयत्न करत होतो. त्यामुळे मन स्थिर राहिले.

३ आ. नम्रतेने बोलता येणे : चौकशीच्या वेळी अधिकारी ओरडून आणि दम देण्याच्या स्वरात आम्हाला प्रश्न विचारत होते; परंतु श्रीकृष्णाच्या कृपेने त्या प्रश्नांची नम्रपणे उत्तर देता आली.
३ इ. आत्मविश्वास वाढून निर्भयता येणे : पूर्वी आम्हाला चारचौघांसमवेत व्यवस्थित बोलता यायचे नाही. त्यामुळे आम्ही प्रचवन किंवा सत्संग घेण्याची सेवा कधीच केली नाही. प्रत्येक कृती साधना म्हणून स्वीकारल्याने पत्रकार परिषदेत, तसेच वृत्तवाहिन्यांनी घेतलेल्या मुलाखतीत निर्भयपणे बोलता आले. त्यामुळे आमचा आत्मविश्वासही वाढला.
३ ई. सनातन संस्थेला सोडून देण्याच्या दृष्टीने अधिकार्‍यांनी प्रश्न विचारणे : ४-५ वेळा अधिकार्‍यांनी आम्हाला विचारले, ‘‘तुम्ही सनातनमध्ये का आहात ? सनातनला सोडून द्या आणि जीवनाचे सार्थक करा. सनातनच्या नादी लागून आयुष्य वाया का घालवता ?'’ असे बोलून त्यांनी आम्हाला सनातनपासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. त्यावरून त्यांचा उद्देश ‘चौकशी करणे’, हा नसून ‘आम्ही सनातनला सोडावे’, असा होता’, हे जाणवले.’
प्रार्थना
    वरील सर्व प्रसंगांमध्ये आम्ही काहीच करू शकत नसल्याने समर्थांनी सांगितलेल्या ‘सामर्थ्य आहे चळवळीचे । जो जो करील तयाचे । परंतु तेथे भगवंताचे । अधिष्ठान पाहिजे ।।' या श्लोकाची जाणीव होत होती. ‘ही जाणीव सर्व हिंदूंच्या मनात दृढ होऊन त्यांच्याकडून धर्मासाठी कार्य करण्याची प्रेरणा जागृत होऊन त्याप्रमाणे कृती होऊन हिंदु राष्ट्राची स्थापना करण्याचे ध्येय साध्य करता येऊ दे’, हीच श्रीकृष्ण आणि प.पू. डॉक्टर यांच्या चरणी प्रार्थना !’
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : www.hindujagruti.org हिंदी : www.hindujagruti.org/hindi