'पुढे येणार्‍या भीषण आपत्काळात जिवंत रहाण्यासाठी व्यष्टी आणि समष्टी साधना वाढवा !' - डॉ. जयंत आठवले

`एस्.एस्.आर्.एफ्.’चे संकेतस्थळ भ्रमणभाषवर घेण्याच्या प्रकल्पाची सेवा करतांना आलेल्या अनुभूती

श्री. रोहन मेहता
१. स्वतःच्या आस्थापनाचे संकेतस्थळ भ्रमणभाषवर घेण्याचा प्रकल्प पाहून कुतूहल वाटणे आणि ‘भ्रमणभाषद्वारे `एस्.एस्.आर्.एफ्.'च्या संकेतस्थळाला भेट देणार्‍यांची संख्या १० टक्के आहे’, असे कळल्यावर ‘ईश्वरच या संदर्भातील सेवा करवून घेणार आहे’, असे वाटणे : `गेल्या सहा मासांपासून माझा एक सहकारी मित्र आमच्या आस्थापनाचे संकेतस्थळ भ्रमणभाषवर घेण्याच्या प्रकल्पावर काम करत होता. या प्रकल्पाविषयी मला कुतूहल होते; परंतु मला त्यात अधिक गुंतायचे नव्हते.
तसेच ‘आपले संकेतस्थळ भ्रमणभाषवर घेण्याविषयी एवढ्यात विचार करायला नको’, असेही मला वाटत होते. सहा मासांनंतर हा प्रकल्प पूर्ण झाला. तो प्रकल्प अतिशय चांगल्या प्रकारे झालेला पाहून  माझे कुतूहल आणखी वाढले. हा प्रकल्प चालू झाल्यानंतर काही दिवसांनी कु. आनाताई यांच्याशी झालेल्या चर्चेतून ‘भ्रमणभाषद्वारे `एस्.एस्.आर्.एफ्.'च्या संकेतस्थळाला भेट देणार्‍यांची संख्या १० टक्के आहे’, असे कळले. त्या वेळी ‘ईश्वरच माझ्याकडून ही सेवा करवून घेणार आहे आणि त्यामुळे मला त्यात आवड निर्माण केली पाहिजे’, असे मला आतून वाटू लागले.
२. एका महत्त्वाच्या सूत्राचा उपयोग `एस्.एस्.आर्.एफ्.'च्या संकेतस्थळासाठी करावा, असा विचार मनात येणे आणि या प्रकल्पावर काम करतांना ‘सेवेतील आवड अल्प असली, तरी देवच आपल्या माध्यमातून ती सेवा पूर्ण करवून घेतो’ अशी अनुभूती येणे : दुसर्‍या आठवड्यात मी एका प्रकल्पावर काम करतांना त्यातील एका छोट्याशा सूत्राचे मला स्पष्टीकरण (खुलासा) हवे होते. भ्रमणभाषवर संकेतस्थळ घेण्याचा प्रकल्प करणार्‍या त्या सहकारी मित्राला मी माझी शंका विचारली, तेव्हा त्याने मला योग्य युक्ती सांगितली. तसेच भ्रमणभाषवर संकेतस्थळ घेण्याच्या प्रकल्पाविषयीचे एक महत्त्वाचे सूत्रही सांगितले. त्यातून मला आवश्यक प्रेरणा मिळाली आणि या सूत्राचा उपयोग आपण `एस्.एस्.आर्.एफ्.'च्या संकेतस्थळासाठी करावा, असा विचार मनात आला.
     माझा आत्मविश्वास अल्प असल्यामुळे ‘मी मध्येच कुठेतरी अडणार’, असे मला वाटत होते; परंतु आश्चर्याची गोष्ट म्हणजे, या प्रकल्पावर काम करण्यास आरंभ केल्यावर केवळ दोन आठवड्यांमध्येच मला संपूर्ण प्रकल्पाची संकल्पना समजली. या प्रकल्पातील एकेक टप्पा पूर्ण करत असतांना पुढच्या टप्प्यातील सूत्रांविषयी ईश्वरच मला आतून सुचवत असे. ‘एखाद्या सेवेतील आपले कौशल्य अल्प असले, तरी देवच आपल्या माध्यमातून ती सेवा पूर्ण करवून घेतो’, अशी अनुभूती मला यापूर्वीसुद्धा आली होती; परंतु या वेळी आलेली अनुभूती वेगळीच होती. ‘सेवेतील आपली आवड अल्प असली, तरी देव आपल्या माध्यमातून ती सेवा पूर्ण करवून घेतो’, हे या वेळच्या अनुभूतीतून मला शिकायला मिळाले. त्यानंतर माझ्या मनात कोणत्याही प्रकारचा अहं निर्माण न होता मला ईश्वराप्रती कृतज्ञता वाटत होती.

३. ‘एस्.एस्.आर्.एफ्.’च्या संकेतस्थळाच्या स्पॅनिश भाषेतील मुखपृष्ठाची संरचना करतांना आलेल्या अनुभूती 
३ अ. मुखपृष्ठ संरचनेच्या शेवटच्या टप्प्याची सेवा चालू असतांना `लवकरच हे मुखपृष्ठ प.पू. डॉक्टरांना दाखवणार आहोत', असे श्री. आन्द्रेदादांनी सांगणे : वरील प्रकल्पासह `एस्.एस्.आर्.एफ्.’च्या संकेतस्थळाच्या स्पॅनिश भाषेतील मुखपृष्ठाची संरचना करण्याची सेवाही मी करत होतो. त्यासाठी आवश्यक ती माहिती मला श्री. आन्द्रेदादा आणि श्री. सिरियाकदादा पुरवत होते. मुखपृष्ठ संरचनेच्या शेवटच्या टप्प्याची सेवा चालू असतांना ‘`लवकरच हे मुखपृष्ठ प.पू. डॉक्टरांना दाखवणार आहोत'’, असे श्री. आन्द्रेदादांनी मला सांगितले होते; परंतु त्यात काही पालट करावयाचे असल्यामुळे ही सेवा पूर्ण होण्यास अजून काही कालावधी लागणार होता.

३ आ. स्वप्नात आश्रमातच प.पू. डॉक्टरांचे दर्शन होणे, त्यांच्या मुखावर सुंदर हास्य असणे, नंतर ‘श्री. आन्द्रेदादांनी प.पू. डॉक्टरांना मुखपृष्ठ दाखवले असावे आणि या सेवेची पोचपावती देण्यासाठीच ते स्वप्नात आले असावेत’, असा विचार मनात येणे अन् तसेच असणे : या कालावधीत एका रात्री मला पुढील स्वप्न पडले. मी आश्रमातील मार्गिकेतून चालत असतांना प.पू. डॉक्टर वेगाने माझ्या मागून चालत आले आणि त्यांनी माझ्या खांद्यावर हात ठेवला. त्यांच्या मुखावर सुंदर हास्य होते, तसेच ते तेजस्वी दिसत होते. त्यांची प्रकृतीही चांगली वाटत होती. त्यांच्याशी बोलण्याचा मी प्रयत्न करत होतो; परंतु मी बोलू शकलो नाही. त्या वेळी `काहीतरी बोल', असे ते म्हणाले आणि मला त्यांची प्रकृती चांगली असल्याचे दिसत असूनही मी त्यांना `तुम्ही कसे आहात', असे विचारले. ‘पूर्वीपेक्षा चांगला आहे’, असे त्यांनी मला उत्तर दिले. नंतर ते मला त्यांच्या खोलीत घेऊन गेले. त्यानंतर मला जाग आली आणि भिंतीवर लावलेले प.पू. डॉक्टरांच्या नेत्रांचे छायाचित्र माझ्या दृष्टीस पडले. ते पाहून ‘श्री. आन्द्रेदादांनी प.पू. डॉक्टरांना मुखपृष्ठ दाखवले असावे आणि या सेवेची पोचपावती देण्यासाठीच ते माझ्या स्वप्नात आले असावेत’, असा विचार माझ्या मनात आला. त्या वेळी मला ‘प.पू. डॉक्टर (छायाचित्रातून) मान हलवून होकार देत आहेत’, असे जाणवले. त्याच दिवशी सायंकाळी श्री. आन्द्रेदादांनी मला सांगितले की, त्यांनी प.पू. डॉक्टरांना मुखपृष्ठ दाखवले आणि त्यांना ते पुष्कळ आवडले आहे. 
३ इ. स्वप्नात प.पू. डॉक्टरांची प्रकृती चांगली असल्याचे दिसणे आणि प्रत्यक्षातही तसेच असल्याचे श्री. आन्द्रेदादांनी सांगितल्यावर अतिशय आनंद होणे : मी आन्द्रेदादांना प.पू. डॉक्टरांच्या प्रकृतीविषयी विचारले, तेव्हा श्री. आन्द्रेदादांनी सांगितले, ‘‘ते छान आहेत. सहा मासांपूर्वीपेक्षा त्यांची प्रकृती आता चांगली आहे आणि त्यांचे वजनही वाढले आहे.’’ हे ऐकून मला माझे स्वप्न खरे झाल्याचे पाहून अतिशय आनंद झाला आणि माझ्याकडे बोलण्यासाठी काही शब्दच उरले नाहीत. प.पू. डॉक्टरांसारखे गुरु आपल्याला मिळाले आहेत. ज्यांना स्थळ, काळ यांची मर्यादा नाही, जे सूक्ष्मातून प्रत्येक साधकासमवेत असतात आणि साधकांच्या मनातील ओळखून त्यांना आवश्यक अशी अनुभूती देतात. त्यामुळे ‘आपण किती भाग्यवान आहोत’, याची मला जाणीव झाली.’
    - श्री. रोहन मेहता, मेलबर्न, ऑस्ट्रेलिया. (भाद्रपद कृ. ११, कलियुग वर्ष ५११३ (२३.९.२०११))

धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : www.hindujagruti.org हिंदी : www.hindujagruti.org/hindi