मुंबई, २७ फेब्रुवारी (वार्ता.) - केंद्रशासनाच्या कर्मचारी विरोधी
धोरणांचा निषेध करण्यासाठी उद्या देशभरातील सर्व कामगार संघटनांनी एक
दिवसाच्या लाक्षणिक संपाचे आवाहन केले आहे. तथापि राज्यात सध्या इयत्ता
१२वी च्या परीक्षा चालू असल्याने विविध राज्य शासकीय कर्मचारी संघटनांनी या
संपात सहभागी न होण्याचा निर्णय घोषित केला आहे; मात्र या संपाला सक्रीय
पाठिंबा दर्शवण्यासाठी राज्यभरातील सर्व कर्मचारी यांनी काळ्या फिती लावून
आपला निषेध करण्याचे ठरवले आहे.
त्याचबरोबर मंत्रालय, विभागीय महसूल
कार्यालये आणि सर्व जिल्हाधिकारी कार्यालये यांसमोर राज्यशासनाने प्रदीर्घ
काळ प्रलंबित ठेवलेल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी सर्व शासकीय कर्मचारी
दुपारी भोजनाच्या सुटीत अर्धा घंटा निदर्शने करणार आहेत, असे महाराष्ट्र
राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती महासंघाचे अध्यक्ष नीतू डावरे आणि
सरचिटणीस सुभाष गांगुर्डे यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे घोषित केले आहे.