मुंबई, ३ फेब्रुवारी - सार्वजनिक गणेशमूर्तीची उंची न्यून करण्यासाठी सामाजिक आणि राजकीय पातळीवरील प्रयत्न अपयशी ठरलेले असतांनाच आता खुद्द मर्तीकारच पुढे सरसावले आहेत. १८ फुटांहून अधिक उंचीच्या मूर्ती न घडवण्याचा निर्णय घेण्यासाठी उद्या, शनिवारी मूर्तीकारांची बैठक होणार आहे. दिनानाथ वेलिंग यांनी १९९०मध्ये लालबागच्या राजाच्या मंडळाची २२ फुटी मूर्ती घडवली आणि त्यानंतर उंचीबाबत स्पर्धा चालू झाली; मात्र गेल्या वर्षी त्यातून दुर्दैवी घटना घडली.
दुर्दैवी घटना पुढे कधीही घडू नयेत, यासाठी आता मूर्तीकारच सरसावले आहेत. या वेळी बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने हा मुद्दा हाती घेतला असून यावर्षी मूर्ती घडवण्यास प्रारंभ होण्याआधीच शहरातील प्रमुख मूर्तीकारांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत बृहन्मुंबई गणेश मूर्तीकार संघाचे अध्यक्ष गजानन तोंडवळकर, संघटक सचिव एस्.जे. काळसेव, तसेच प्रमुख मूर्तीकार विजय खातू आदी उपस्थित रहाणार आहेत.