मुंबई, ३ फेब्रुवारी - मायावती यांच्या भ्रष्टाचाराविरुद्ध उत्तरप्रदेशात नरडे गरम करणारा काँग्रेसचा युवराज स्वतःच्या सरकारच्या २-जी स्पेक्ट्रम घोटाळ्यावर काहीच बोलत नाही. त्याची ‘मम्मी’ही गप्प आहे. पंतप्रधानही या सूत्रावर तोंड उघडत नाहीत. या मौनातच ‘सत्य’ दडले आहे, अशी टीका शिवसेनाप्रमुख श्री. बाळासाहेब ठाकरे यांनी काँग्रेस शासनावर दैनिक ‘सामना’तील संपादकियातून केली आहे.
यात ते पुढे लिहितात,१. ‘चिदंबरम यांचे त्यागपत्र घेण्याऐवजी त्यांना पाठीशी घालण्याचेच प्रयत्न काँग्रेस करत आहे.
२. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर खरे तर सरकारनेच तत्काळ पायउतार व्हायला हवे होते; पण काँग्रेस सरकार गेंड्याच्या कातडीचे आहे, हेच पुन्हा सिद्ध झाले.
३. ‘बरे झाले, न्यायालयाने सारे काही स्पष्ट केले, आता संभ्रम दूर झाला’, असे मानभावीपणे सांगत न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत वगैरेही कपिल सिब्बल महाशयांनी केले. म्हणजे ‘गिरे तो भी टांग उपर !’
४. भ्रष्टाचार आणि घोटाळ्याची प्रकरणे पचवण्याची नाही म्हटले तरी एक जबरदस्त कला या काँग्रेसी पोपटांना अवगत आहे.
५. एखाद्या खेड्यातही १० फूट जागा विकत घेतली, तर वर्षभरात त्या जागेचे दर दुप्पट होतात. असे असतांना २००१ मध्ये सरकारने ज्या दरात स्पेक्ट्रमचे वाटप केले त्याच दरात २००८ मध्येही ते कसे विकले ?
६. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे अर्थतज्ज्ञ पंतप्रधान, अर्थमंत्री दिल्लीत बसले असतांना त्यांच्या नाकासमोर देशाच्या तिजोरीची लूट होत होती हे सरकारला दिसले नाही काय ?
७. मनमानी परवाने वाटणार्या राजा यांच्या कार्यपद्धतीला आधी आक्षेप घेणारे चिदंबरम यांनी नंतर याच व्यवहाराला मान कशी डोलावली ?
८. पंतप्रधानांच्या पत्रानंतरही राजा यांनी स्पेक्ट्रमचे हवे तसे वाटप केले, तेव्हा पंतप्रधानांनी संपूर्ण प्रक्रिया रहित करून राजावर कारवाई का केली नाही ?
९. घोटाळा होत आहे, हे धडधडीत दिसत असतांनाही सरकार गप्प का बसले ?
१०. जे काही चालू होते ते ‘सर्व सहमतीने’ चालू होते, असा त्याचा अर्थ निघत नाही काय ?’