'पुढे येणार्‍या भीषण आपत्काळात जिवंत रहाण्यासाठी व्यष्टी आणि समष्टी साधना वाढवा !' - डॉ. जयंत आठवले

महाराष्ट्रात राजकीय दहशत !

महाराष्ट्रातील महापालिका, जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या यांच्या निवडणुकांत झालेली आमदार-खासदारांची फोडाफोडी आणि उमेदवारांची बंडखोरी यांमुळे प्रचारसभांमध्ये सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांकडून झालेला ‘शाब्दिक हिंसाचार’ पहायला मिळाला. सत्तेत एकमेकांच्या मांडीला मांडी लावून बसणार्‍या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी परस्परांच्या विरोधात निवडणूक लढवतांना एकमेकांवर खालच्या पातळीला जाऊन केलेले आरोप हे विशेष लक्षवेधी होते.
या आरोप-प्रत्यारोपांच्या नाटकाचा पहिला अंक निवडणुकांच्या निकालानंतर संपला आणि निवडणुकीतील पराभूत उमेदवारांकडून सुडनाट्याच्या दुसर्‍या अंकास प्रारंभ झाला. स्वत:च्या पराजयाचे खापर विजयी उमेदवार किंवा स्वपक्षातून बंडखोरी करणारे उमेदवार अन् त्यांना साथ देणारे कार्यकर्ते यांवर फोडण्यात आले. ज्यांच्यामुळे पराभूत झालो, त्यांचा काटा काढण्याचा चंग मनात बांधण्यात आला. ‘काहीही करून आपल्या शत्रूला जगातून नाहीसा करायचा’, अशा सूडभावनेने त्यांच्यावर आक्रमण करण्यात आले. यामुळे गेले तीन दिवस महाराष्ट्रातील मुंबई, नाशिक, पुणे आणि नागपूर या मोठ्या शहरांत राजकीय दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
महाराष्ट्र अराजकाच्या वाटेवर !
मुंबईतील धारावी येथील भाजपचे कार्यकर्ते वसंत जोटा यांची राजकीय वैमनस्यातून हत्या करण्यात आली. त्यांनी निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराच्या प्रचारात पुढाकार घेतला होता. नाशिक येथे महापालिका निवडणुकीतील वादातून शिवसेनेचे पराभूत उमेदवार निवृत्ती दातीर यांनी त्यांच्या साथीदारांसह अपक्ष उमेदवार दिलीप दातीर यांच्यावर आक्रमण केले. दिलीप दातीर यांना शिवसेनेने उमेदवारी नाकाराली होती. त्यामुळे ते अपक्ष म्हणून उभे राहिले होते. ‘मतविभाजन झाल्यानेच आपण पराभूत झालो’, असा मनात राग धरून निवृत्ती दातीर यांनी दिलीप दातीर यांच्यावर सूड उगवला. राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरमध्ये विरोधकांसाठी प्रचार केल्याचा राग मनात बाळगून केशवानंद आकरे यांची मनसेच्या पराभूत उमेदवाराने निर्घृण हत्या केली, तर पुण्यातील सुतारवाडी प्रभागातून पराभूत झालेल्या अपक्ष उमेदवाराने चक्क मतदारांवरच राग काढला. त्याने वस्तीवरच आक्रमण करून २० घरांची तोडफोड आणि ३० गाड्यांची मोडतोड केली. पराभवाला जनतेला कारणीभूत धरून तिच्यावर आक्रमण करणे, हे केवळ या वस्तीवरील आक्रमण नसून ते लोकराज्यावरीलच आक्रमण आहे. पराभूत उमेदवारांचा हा हिंसाचार महाराष्ट्रात लोकराज्य संपुष्टात येत असल्याचे द्योतक आहे. राज्यातील या राजकीय आतंकवादाविषयी माध्यमांनी रान उठवले आणि ‘सरकार झोपले आहे का’, असा प्रश्न विचारला. खरे तर सरकार झोपले नसून त्याने झोपेचे सोंग घेतले आहे. या घटनेची सरकारने दखल न घेण्यामागील कारण म्हणजे हे ‘राजकीय आतंकवादी’ सत्ताधारी आणि विरोधी पक्ष यांचेच राजकीय भाऊबंद आहेत. महाराष्ट्रात राजकीय हिंसाचार पेटून दिवसाढवळ्या खून पडत असतांना सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी घेतलेली गुळणी, ही जगाला एकात्मतेचा अन् शांतीचा संदेश देणार्‍या संतभूमी असलेल्या महाराष्ट्राला लांच्छनास्पद तर आहेच; परंतु महाराष्ट्राला अराजकाकडे नेणार्‍या या राजकीय पक्षांना निवडून देणार्‍या जनतेलाही तितकेच आत्मचिंतन करण्यास भाग पाडणारी आहे !
हिंदु राष्ट्र हाच पर्याय !
मुंबई महापालिकेत जनतेने निवडून दिलेल्या २२७ नगरसेवकांपैकी ३२ नगरसेवक हे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत. त्यांच्यावर खून, बलात्कार, भ्रष्टाचार, अपहार आदी गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत. निवडून आलेल्या पाच नगरसेवकांवर तर लहान मुलींना शरीरविक्रय करण्यास भाग पाडल्याचा आरोप आहे. अशा गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना जनता निवडून देते, ही लोकराज्याची विटंबना म्हणायची नाही, तर काय म्हणायचे ? हिंसाचार करणार्‍यापेक्षाही हिंसाचार सहन करणे हे पाप आहे. त्यामुळे राजकीय गुंडांना वाढू देण्याचे पाप जितके शासनाचे आहे, तितकीच या पापाची भागीदार या गुंडांना निवडून देणारी जनताही आहे. महाभारतात एक धर्मवचन आहे, ‘प्रजेला तिच्या लायकीप्रमाणे राजा मिळतो.’ त्यामुळे गुंडांना निवडून देणार्‍या जनतेला ‘गुंडाराज’ अनुभवास मिळाल्यास नवल ते काय ? तथाकथित लोकराज्यातील हीr स्थिती मात्र हिंदु राष्ट्रात नसेल. त्यामुळे ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्र स्थापन करण्याला पर्याय नाही !
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : www.hindujagruti.org हिंदी : www.hindujagruti.org/hindi