पनवेल, ३० जानेवारी - ज्येष्ठराज सिद्धीविनायक मंदिर, जोशीआळी पनवेल यांच्या वतीने माघी जन्मोत्सवास जोडून लक्ष मोदक अर्चन करण्याचा कार्यक्रम पार पडला. लक्ष मोदकाच्या अर्चनाचा कार्यक्रम कर्नाटकात अनेक वेळा झाल्याचा उल्लेख आहे. महाराष्ट्रात असा सोहळा प्रथमच झाला आहे. आद्य शंकराचार्य शृगेरी पीठात अनेक वेळा लक्ष मोदक हवन झाले असल्याने या उत्सवासाठी देवस्थानचे विश्वस्त अध्यक्ष श्री. मुरलीधर जोशी यांनी शृगेरी येथे जाऊन शंकराचार्यांची भेट घेतली आणि या कार्यक्रमासाठी त्यांचे आशीर्वाद घेतले.
त्यानुसार २७ आणि २८ या दोन दिवसांत लक्ष मोदक अर्चनाचा सोहळा पार पडला. या वेळी वेदमूर्ती विवेकशास्त्री गुरुजी यांचे ‘दिनचर्या कशी असावी’ यावर भाविकांसाठी प्रवचन झाले. २९ जानेवारीला दुपारी १२.३० वाजता पूर्णाहुती झाली. यामध्ये १० सहस्र मोदक हवन करण्यात आले. या कार्यक्रमाचे आचार्य वेदमूर्ती विवेकशास्त्री गोडबोले हे सातारा येथील कृष्ण यजुर्वेद पाठशाळेचे प्रमुख आहेत आणि त्यांचे सहकारी वेदमूर्ती मंदार गुरुजी खळदकर हेही पुणे येथे स्वतंत्र ऋग्वेदी पाठशाळा चालवतात. या कार्यक्रमाचा आणि मोदक प्रसादाचा अनेक भाविकांना लाभ झाला. वेदमूर्ती मंदार गुरुजी यांनी ‘गणेश सहस्रनाम’ महती सांगितली.