ओस्लो, २७ जानेवारी - नॉर्वे शासनाने भारतीय दांपत्याच्या दोन लहान मुलांना त्यांना परत करण्याविषयीचा भारताचे परराष्ट्र मंत्री एस्.एम्. कृष्णा यांचा प्रस्ताव स्वीकारला आहे. आता अनुरूप आणि सागरिका भट्टाचार्य या दांपत्याला नॉर्वेच्या न्यायालयात त्यांच्या तीन वर्षांचा मुलगा अभिज्ञान आणि १ वर्षाची मुलगी ऐश्वर्या यांची देखभाल कोण करणार, हे सांगावे लागेल.
नॉर्वे शासनाने भारत शासनाकडून त्याचा प्रस्ताव लिखित स्वरूपात मागितला आहे. या प्रस्तावानुसार हे दांपत्य भारतात मुलांच्या देखभालीविषयी लिखित स्वरूपात सूचित करणार आहे. तसेच भारत शासनाला मुलांच्या पालनपोषणाविषयी आणि औषधोपचाराविषयी उत्तरदायित्व निश्चित करावे लागणार आहे. भट्टाचार्य दांपत्य त्यांच्या दोन लहान मुलांसह एकाच बिछान्यावर झोपते आणि त्यांना स्वतःच्या हाताने जेवण भरवते, तसेच हे दांपत्य मुलांची नीट काळजी घेत नाही, असा आरोप करून गेल्या वर्षी नॉर्वेच्या बालकल्याण विभागाने त्यांच्या मुलांना स्वतःच्या कह्यात घेतले होते. सध्या या मुलांना बालगृहामध्ये ठेवण्यात आले आहे. (ज्या देशात १ आणि ३ वर्षांच्या मुलांना आई शेजारी झोपवू शकत नाही किंवा त्यांना स्वतःच्या हाताने भरवू शकत नाही, त्या देशात मुलांचे पालनपोषण एखाद्या यंत्राप्रमाणेच केले जात असेल, यात शंकाच नाही. आज पाश्चात्त्य देशांतील अशा विकृत विचारसरणीमुळेच तेथे आत्महत्या, घटस्फोट, कुटुंबव्यवस्था उद्ध्वस्त होणे, मुले व्यसनाधीन बनणे आणि ती वाममार्गाला लागणे, असे प्रकार घडत आहेत. असे हे भोगवादी संस्कृतीवाले, मुलांचे पालनपोषण कसे करायचे, हे कधीच समजू शकणार नाहीत. - संपादक)