'पुढे येणार्‍या भीषण आपत्काळात जिवंत रहाण्यासाठी व्यष्टी आणि समष्टी साधना वाढवा !' - डॉ. जयंत आठवले

‘मी एकटा काय करू शकतो ?’, असे वाटणार्‍यांपुढे आदर्श ठेवणारे ‘हिंदु जनजागृती समिती’चे मुंबई विभाग समन्वयक श्री. शिवाजी वटकर !

श्री. शिवाजी वटकर
     अनेक ठिकाणी पोलीस चोरीच्या अथवा एखाद्याने केलेल्या अन्यायाच्या विरोधात सामान्य नागरिकाच्या तक्रारी नोंद करून घेत नाहीत. नोंद केल्याच तर त्या अदखलपात्र नोंद करून घेतात. काही वेळा तक्रार करणारा चिकाटीने पाठपुरावा करतो अथवा क्षात्रवृत्तीने अन्याय करणार्‍यांच्या विरोधात आणि पोलिसांच्या विरोधात आवाज उठवतो. अशा वेळी पोलिसांना तक्रार नोंद करून घ्यावी लागते.
काही प्रसंगात पोलिसांना अथवा संबंधित शासकीय खात्यातील अधिकार्‍यांना अप्रसन्नतेने का असेना कायदा मोडणार्‍यांच्या विरोधात कारवाई करावी लागते.
अशा घटनांची माहिती देणारी ही लेखमाला आम्ही आता प्रकाशित करत आहोत.पदपथावरील अनधिकृत कापड विक्रेत्यांवर कारवाई होण्यासाठी थोडेसे प्रयत्न करणे आणि त्यावरून ‘सामाजिक हित आणि राष्ट्ररक्षण यांची आंदोलने श्रीकृष्णाच्या कृपेने सहज होणार आहेत’, याविषयी निश्चिती वाटणे       ‘मार्गशीर्ष शुद्ध नवमी, कलियुग वर्ष ५११३ (३.१२.२०११) या दिवशी सकाळी ११.३० वाजता मी अधिकोषातील काम संपवून चेंबूर स्थानकाकडे चालत जात होतो. नटराज चित्रपटगृहासमोरील मार्गावर वाहनांची कोंडी आणि माणसांची दाटी (गर्दी) असते. मार्गाच्या बाजूला वाहने उभी केलेली असतात. त्यामुळे मी पदपथावरून (फूटपाथवरून) कसाबसा मार्ग काढत हातातील आणि खांद्यावरील सामान सांभाळत चालत होतो. तेव्हा घडलेला प्रसंग पुढे देत आहे.
१. पदपथावरील कापड विक्रेते वारंवार सांगूनही मार्ग मोकळा करत नसल्याने महानगरपालिकेकडे गार्‍हाणे करणार असल्याचे त्यांना सांगणे
    मी पदपथावरील कापड विक्रेत्यांना म्हणालो, ‘‘येथे चालण्यासाठी मोकळा मार्ग नाही. तुम्ही ही गाठोडी बाजूला सरकवा.’’ तेव्हा त्यांनी माझ्याकडे दुर्लक्ष केले; म्हणून थोड्या मोठ्या स्वरात सांगितल्यावर आरामात बसलेल्या एका माणसाने (तो मालक असावा) नाटकी पद्धतीने कामगारांना गाठोडी बाजूला करण्यास सांगितले. तेव्हा त्याला कोणीच प्रतिसाद दिला नाही. (आमचे सर्व संभाषण हिंदीत होत होते.) तेव्हा मी म्हणालो, ‘`कपड्यांची गाठोडी त्वरित बाजूला करून चालण्यास मार्ग द्या. लोकांना चालायला जागा नाही. वाहने जातात, तेथूनच लोकांना जावे लागत आहे.’' एवढे सांगूनही तो ऐकत नव्हता; म्हणून मी त्याला म्हणालो, ‘‘जवळच असलेल्या महानगरपालिकेकडे मला गार्‍हाणे (तक्रार) करावे लागेल.’’
२. अनधिकृत कापड विक्रेत्यांचा उद्दामपणा
     नंतर त्याने सामान हलवण्याचे मान्य करूनही ते न हलवल्याने मी त्याला पुनःपुन्हा सांगत होतो. तेव्हा तो मला रागाने म्हणाला, ‘‘जा, तुला गार्‍हाणे द्यायचे आहे, तर महापालिकेत जा.’’ मी त्याला म्हणालो, ‘‘मला तेथे जाण्याची आवश्यकता नाही. तेथे न जाता येथूनच पाच मिनिटांत काय होते ते बघ.’’
३. महानगरपालिकेचे अतिक्रमणविरोधी पथक आणि आरक्षक मार्गामध्ये उभे राहून चालणारे अपप्रकार पाहूनही काहीच करत नसल्याने चीड येणे अन् त्यांना त्याची जाणीव करून दिल्यावर त्यांनी येऊन त्या विक्रेत्याला चोप देणे
    मी श्रीकृष्णाला शरण जाऊन प्रार्थना केली. भ्रमणभाषवरून  १०० या क्रमांकावर आरक्षकांना सांगण्याचा विचार करत दहा पावले स्थानकाच्या दिशेने पुढे जाऊन कोपर्‍यावर वळलो, तर तेथे महानगरपालिकेची अतिक्रमणविरोधी पथकाची गाडी उभी होती. आरक्षक बाहेर उभे राहून आरामात चेष्टामस्करी, गप्पागोष्टी करत होते. महानगरपालिका कार्यालय किंवा आरक्षक ठाणे येथे जाऊनही जे काम झाले नसते, ते देवाने त्वरित आणि कोठेही न जाता करून दिले. यावरून ‘देवाचे माझ्याकडे किती लक्ष आहे, तो मला पावलोपावली किती साहाय्य करतो’, याची जाणीव होऊन कृतज्ञता व्यक्त झाली.
     एरव्ही अतिक्रमणविरोधी पथकाची गाडी येण्याची वार्ता समजताच मार्गावरील अनधिकृत विक्रेते त्यांचे साहित्य आणि जीव मुठीत घेऊन धावत सुटतात; परंतु येथे दुकानदार, आरक्षक, महानगरपालिकेचे अतिक्रमणविरोधी पथक सर्व जण आरामात अपप्रकार करत होते आणि पहात होते. यामुळे मला सर्वांची चीड आली. मी प्रार्थना करून तेथील आरक्षकांना म्हणालो, ‘‘मला पदपथावरून चालायला जागा नाही. दुकानदाराला सांगितले, तर तो मला मार्ग मोकळा करून न देता माझ्याशी भांडत आहे. तुमच्या बाजूला दहा पावलांवर हे सर्व चालते, तरी तुम्ही काहीच कसे करत नाही ?'’ तेव्हा तो आरक्षक आणि अतिक्रमणविरोधी पथकाची माणसे माझ्यासमवेत आली अन् त्या विक्रेत्याला ओरडून चोप देऊ लागली.
४. विक्रेत्याला मारण्यापेक्षा त्याचे सामान राजाधीन (जप्त) करण्यास सांगितल्यावर उद्दाम विक्रेता गयावया करू लागणे
    मी आरक्षकाला सांगितले, ‘`केवळ शिव्या देऊन आणि मारून उपयोग नाही. त्याचे सामान राजाधीन (जप्त) करून घेऊन जा.’’ आरक्षक त्याच्या जवळील कपड्यांची गाठोडी आणि कपडे उचलून त्यांच्या गाडीकडे नेऊ लागले. त्यासरशी आरडाओरडा चालू झाला. मला उद्दामपणे बोलणारा माणूस रडू लागला. तो आरक्षकाच्या आणि माझ्या पाया पडू लागला.
५. ४० - ५० जणांचा समुदाय धावत आल्याने गर्दीत मिसळून निघून जाण्याचे ठरवणे आणि सर्व जण येऊन क्षमायाचना करू लागणे
     त्या वेळी ‘आपण भ्रमणभाषद्वारे या गोंधळाचे छायाचित्र काढून निघून जावे’, असे वाटले. मी एक छायाचित्र काढले. तेवढ्यात ४० - ५० जण माझ्याकडे धावत आले. त्यात दाढी आणि टोपीवाले जास्त होते. मला वाटले, ‘आता काय होणार ?’ मी प्रार्थना आणि नामजप वाढवला. आश्चर्य म्हणजे मी स्वतःहून गर्दीत मिसळून पुढे निघून जायचे ठरवले होते; पण तेच सर्व जण मला ‘‘साहेब, एकवेळ क्षमा करा. आपण निघून जा’’, अशी गयावया करून विनंती करू लागले. मी तेथून निघून गेलो. त्यानंतर आरक्षक, दुकानदार आणि त्यांचे मध्यस्थी यांची एकमेकांशी नेहमीप्रमाणे सारवासारव झाली असावी.
६. ‘हिंदु जनजागृती समिती’ करणार असलेली समाजाभिमुख, सामाजिक हित आणि राष्ट्ररक्षण यांविषयीची आंदोलने श्रीकृष्णाच्या कृपेने सहज होणार आहेत, हेच देवाने या प्रसंगातून शिकवणे
    या प्रसंगानंतर माझ्या मनात विचार आला, ‘मी या उतारवयात (६६ वर्षे) एकटा असूनही असे कसे वागू शकलो ? गेली कित्येक वर्षे तेथून जात-येत असतांना काहीच केले नाही आणि आजच हे कसे झाले ? हे सर्व श्रीकृष्णाचेच नियोजन आहे.’ ईश्वराने ‘हिंदु जनजागृती समिती’च्या वतीने आंदोलने करण्यास सांगितली आहेत. ती पुष्कळशी समाजाभिमुख, सामाजिक हित आणि राष्ट्ररक्षण यांविषयीची आहेत, उदा. ग्राहकांची वजनमापातील फसवणूक रोखणे, भेसळखोरांना रोखणे, अश्लीलता रोखणे. ही आंदोलने किती सोपी आणि सहज होणार आहेत, हेच देवाने मला या प्रसंगातून शिकवले. तसेच तो पावलोपावली मला साहाय्य करून माझे रक्षण करतो, हेसुद्धा दाखवून दिले.
     मी काहीही न करताही माझ्याकडून अशी कृती करवून घेतल्यामुळे श्रीकृष्ण आणि प.पू. डॉक्टर यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतो !’
- श्री. शिवाजी वटकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल                     
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : www.hindujagruti.org हिंदी : www.hindujagruti.org/hindi