मुंबई, २६ जानेवारी (वार्ता.) - राष्ट्रवादी काँग्रेसच्या निवडणूक विषयक बैठकीत काल सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात खडाजंगी होऊन शाब्दिक चकमक उडाल्याचे वृत्त आज प्रसिद्ध झाले आहे.
या वृत्ताचा धसका घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड यांनी आज घाईघाईने सकाळी ११.३० वाजता प्रदेश कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन त्यांच्या नेत्यांमधील मतभेद झाकण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. हे वृत्त म्हणजे निवळ अफवा असून त्यांच्यात कोठलेही मतभेद नसल्याचे सांगत पिचड यांनी अजित पवार यांना जाणूनबुजून लक्ष करण्याचा प्रकार होत असल्याची सारवासारव या वेळी केली. त्यांच्यावर अन्य मागासवर्गीय नेत्यांत फूट पाडत असल्याचा केला जाणार आरोप बिनबुडाचाच असल्याचा निर्वाळाही पिचड यांनी पुढे दिला. या वेळी राज्यात होणार्या १० महापालिकांच्या निवडणुकांतील पक्षाच्या उमेदवारांची सूची आता लवकरच एकत्रितपणे घोषित करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट करतांना निवडणुकांतील उमेदवारांविषयी अद्यापही तीव्र मतभेद चालू असल्याचे दिसून आले.