कर्नाटक राज्यात शेकडो मंदिरे पाडणार्या भाजपचे उत्तरप्रदेशातील जनतेला आश्वासन !
राममंदिर बांधण्याचे आश्वासन देऊन भाजप यापूर्वी उत्तरप्रदेशसह दिल्लीत सत्तेवर आला होता;मात्र मंदिराच्या निर्माणाकडे दुर्लक्ष करून भाजपने मुसलमानांचे लांगूलचालन चालू केले आणि त्याचा परिणाम म्हणून त्याला केंद्रातील सत्ता गमवावी लागली. त्यातून शहाणपण शिकण्याचा प्रयत्न भाजपने केला नाही. आता परत उत्तरप्रदेशातील निवडणुकीत राममंदिराचे आश्वासन देऊन भाजप हिंदूंना मूर्ख बनवू शकत नाही ! - संपादक
लखनौ, २७ जानेवारी - उत्तरप्रदेशातील विधानसभेच्या निवडणुकीसाठी आज भाजपने स्वतःचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. यात सत्तेवर आल्यावर अयोध्येतील राममंदिराचे निर्माण आणि गायींचे विनामूल्य वाटप करण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले आहे. उमा भारती, मुख्तार अब्बास नक्वी, कलराज मिश्रा इत्यादी नेत्यांच्या उपस्थितीत हा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला.
राम मंदिराविषयी प्रदेश अध्यक्ष सूर्यप्रताप शाही म्हणाले की, अयोध्येत भव्य राममंदिर बांधणे हा हिंदूंच्या श्रद्धेचा भाग आहे. काँग्रेस, समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष इत्यादी पक्षांमुळे त्याला विरोध होत आहे. सत्तेवर आल्यावर राममंदिराच्या मार्गातील सर्व अडथळे दूर करून त्याचे निर्माण करू, यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत.
वरील आश्वासनांसह इतर मागासवर्गीयांसाठीच्या २७ टक्के आरक्षण कोट्यातून मुसलमानांसाठी ४ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय रहित करू, विद्यार्थ्यांना १ सहस्र रुपयांत ‘टॅब्लेट’ संगणक, तर ५ सहस्र रुपयांत भ्रमण संगणक; शेतकर्यांना २४ घंटे वीजपुरवठा, गरिबांना २ रुपये दराने गहू आणि ३ रुपये दराने तांदूळ, अशी आश्वासने देण्यात आली आहेत. (सगळेच राजकीय पक्ष जनतेला आमिष दाखवण्याच्या संदर्भात ‘एकाच माळेचे मणी !’ भाजप त्याला अपवाद नाही. - संपादक)