'पुढे येणार्‍या भीषण आपत्काळात जिवंत रहाण्यासाठी व्यष्टी आणि समष्टी साधना वाढवा !' - डॉ. जयंत आठवले

जनतेचा जीव घेणारा भेसळयुक्त दुधाचा महापूर

दुग्ध व्यवसायात पश्चिम महाराष्ट्र अग्रेसर मानला जातो. दोन्ही काँग्रेसचे सत्तास्थान असलेल्या या भागातील दूध संस्था बर्‍याचशा याच मंडळीच्या मालकीच्या आहेत. राज्यात सध्या भेसळयुक्त दुधाच्या व्यापाराने परिसीमा गाठली आहे. पोलीस कारवाई करत असून राजकीय दबावामुळे या बेकायदेशीर आणि जनतेच्या जीवाशी खेळणार्‍या धंद्याला संरक्षण मिळत आहे. त्याविषयीचा दैनिक ‘सामना’मध्ये प्रसिद्ध झालेला लेख पुढे देत आहोत.
लेखक : श्री. बाबा डमाळे-पाटील
१. दुधात अशी भेसळ केली जाते !
१ अ.  रसायनांचा वापर करून कृत्रिम दूध बनवण्याची पद्धत ! :
कृत्रिम दूध बनवण्यासाठी ‘सोडियम लॅटेल सल्फेक्स’ आणि ‘कॉब्रोलेक्सिक सिड’ यांचा वापर केला जातो. सोयाबिन तेल किंवा ज्या पामतेलाचा ‘बीआर्’ ४२ अंशांच्या वर आहे, असे तेल वरील रसायनांत मिसळून ते कुटण्याच्या यंत्रात (मिक्सर) घालून त्याचा लगदा बनवला जातो. तेलामुळे आलेला पिवळा रंग प्रक्रिया करून पांढरा केला जातो. दुधातील ‘कॉब्रोलेक्सिक सिड’मुळे फेस येतच असतो; परंतु दुधाला अधिक फेस येण्याकरता निरमा पावडर, साबण किंवा शाम्पू यांचा वापर केला जातो. ‘फॅट’ आणि ‘बीआर्’ वाढवण्यासाठी तेलाचा वापर होतो. डिग्री वाढवण्यासाठी स्टार पावडर, युरिया, साखर, माल्टोज, मका पावडर किंवा दुग्धजन्य पदार्थांपासून तयार होणार्‍या कोणत्याही पावडरचा वापर केला जातो. डिग्री जुळवण्यासाठी किंवा वाढवण्यासाठी युरिया, साखर, लॉक्सिमार्ट डेक्सर्टिन यांचा वापर, तर कृत्रिम दूध नाशवंत होऊ नये; म्हणून कॉस्टिक सोड्याचा वापर केला जातो. कृत्रिम दुधाचे दही करण्यासाठी खर्‍या दुधातील लॉक्टोज बॅक्टेरियाचा वापर केला जातो. अशा प्रकारे कृत्रिम दुधाच्या रसायनांमध्ये ७० टक्के पाणी, तर ३० टक्के खरे दूध एकत्रित करून कृत्रिम दुधाची ‘पॅकिंग’ केली जाते किंवा टँकरद्वारे बाजारात पाठवले जाते. कृत्रिम दूध बनवण्यासाठी प्रतिलिटर ४ रुपये खर्च येतो. हेच नकली आणि शरिराला हानीकारक असणारे दूध बाजारात १८ ते २० रुपये लिटरने विकले जाते.
१ आ. कृत्रिम दूध शरिराला हानीकारक : हे कृत्रिम दूध शरिराला हानीकारक आहे. मेंदू, डोळे, पोटाचे विकार, नपुंसकता, कर्करोग, दुर्बलता अथवा कोणत्याही मोठ्या आजाराला निमंत्रण देणारे आहे. हे दूध लहान बाळांना एक प्रकारचे विष आहे. या कृत्रिम दुधापासून खवा, पेढे, बर्फी, दही, ताक आणि अन्य दुग्धजन्य पदार्थही बनवले जातात.
१ इ. महाराष्ट्रभर कृत्रिम दूध बनवण्याचा धंदा : धक्कादायक माहिती अशी की, शकिकरराला घातक असणार्‍या रासायनिक पदार्थांचा सर्रास वापर करून कृत्रिम दूध बनवण्याचा मोठा प्रकार महाराष्ट्रभर चालू आहे. यामुळे नकली दुधाचा महापूर आला आहे. चांगल्या दुधात बनावट दुधाबरोबरच रासायनिक पदार्थांपासून कृत्रिम दूध बनवून टाकले जाते. दुधाला गोंडस नाव देऊन चकचकीत रंगीत बंद पिशवीत भरलेले दूध मुंबई, पुणे, नाशिक, संभाजीनगर, जळगाव, नागपूर आदी मोठ्या शहरांमध्ये विक्री केले जाते.
२. दुधाच्या भेसळीतून मोठ्या प्रमाणावर आर्थिक लाभ !
    दूध व्यवसायात मोठी नगदी आर्थिक उलाढाल होत असल्यामुळे ज्यांच्याकडे पुरेसा चारा उपलब्ध आहे, अशा लोकांसमवेत ज्यांच्याकडे शेती आणि चारा नाही असे काही लोक दुधाच्या व्यवसायात उतरले. पावडर आणि रसायन यांचा उपयोग करून १०० ते २०० लिटर दूध उपलब्ध करून अल्प कष्टात अधिक पैसे कमवण्याचा चांगला पर्याय निर्माण झाल्यामुळे ज्यांच्याकडे गाई-म्हशी अल्प मात्र दूध अधिक, असे प्रमाण बनले आहे. यामुळे या धंद्याकडे अनेक तरुण आकर्षित झाले.
२ अ. भेसळयुक्त दूध शरिराला हानीकारक : गाई-म्हशींनी ताबडतोब आणि अधिक दूध देण्याकरिता त्यांच्या सडाला (स्तन) ऑक्सिटोसीन इंजेक्शन देतात. त्यामुळे जनावरांना खूप वेदना होतात, तरीही काही लोक हे अघोरी कृत्य करतात. तसेच यासाठी विविध रसायनेही वापरली जातात. या  रसायनाचे नमुने पुणे येथील डॉ. नॉलॉटिकल लॅब आणि नागपूर येथील अनॉकॉम लॅब येथील प्रयोगशाळेत पडताळणी केली असता सदर रसायनापासून बनवलेल्या दुधापासून कर्करोग, नपुंसकता, हृदयविकार यांसारखे आजार होण्याची शक्यताही नमूद करण्यात आलेली होती.
३. राजकारण्यांच्या वरदहस्ताखाली दूध भेसळीचा प्रकार चालू !
३ अ. राजकीय पुढार्‍यांच्या डेअरीत दुधाची भेसळ : महाराष्ट्रात शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय अत्यंत मोठ्या प्रमाणात आहे. सहकारी दूध संघ आणि खासगी दूध डेअरी या मोठ्या राजकीय पुढारी आणि उद्योजक यांच्या अधिपत्याखाली चालतात; मात्र येथे मोठ्या प्रमाणात दूधभेसळ होतेच.
३ आ. दुधात भेसळ करणार्‍या मोठ्या पुढार्‍यांचे दूध संघ आणि संस्था ! : नगर येथे पोलिसांनी रसायन देणारे आरोपी पकडल्यानंतर त्यापासून कृत्रिम दूध कोण बनवते याचा पोलिसी खाक्यामुळे नावे पुढे आली. यामध्ये बाबासाहेब चिडे (लक्ष्मीमाता दूध), राजेंद्र बनकर (साईअमृत दूध), अनिल वायकर हे कृत्रिम दूध बनवून इतर मोठ्या संस्था आणि दूधसंघांना पुरवठा करत असल्याचे निष्पन्न झाले. मोठ्या पुढार्‍यांच्या असणार्‍या दूध संघ आणि संस्थांबरोबर गोदावरी अन् विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या सोलापूर येथील दूध संघासारख्या मोठ्या संघासह कोल्हापूर, सातारा, सोलापूर आदी जिल्ह्यांतही अशाप्रकारे दूध बनवले जाते, अशी माहिती मिळाली. या बनावट दुधाची व्याप्ती किती मोठी आहे याचे गंभीर स्वरूप समोर आले.
३ इ. काही भ्रष्ट पोलीस आणि राज्यकर्ते यांमुळे पुढारी मोकाट ! :  गोदावरी संघ महानंदालयासही दूधपुरवठा करते. अशा मोठ्या संस्थेचे नाव समोर आल्यामुळे जिल्हा पोलीसप्रमुख कृष्णप्रकाश यांनी भेसळ दूधप्रकरणी तपास तातडीने थांबवण्याचे तोंडी आदेश दिले. संपूर्ण महाराष्ट्रात जनजागृती करण्याचे आणि भेसळ अन् कृत्रिम दुधाला पायबंद घालण्यासाठी कठोर पावले उचलण्याचे गृहमंत्री रा.रा. पाटील यांनी घोषित केले; मात्र नगर जिल्ह्यातील पकडलेल्या आरोपींना जिल्हा पोलीस अधीक्षक कृष्णप्रकाश यांच्या संशयास्पद भूमिकेमुळे अभय मिळाले आणि त्यामुळे बनावट दूध बनवणार्‍यांना त्याचा फारसा जरब बसला नाही.
३ ई. अन्न भेसळ प्रतिबंधक खात्याचे भ्रष्ट अधिकारी ! : दूध भेसळ हे अन्न भेसळ प्रतिबंधक खात्याच्या अधिकार्‍यांच्या अधिपत्याखाली असले तरी दूध भेसळ हे अधिकार्‍यांच्या आशीर्वादाने चालते; कारण अन्न भेसळ प्रकरणात काही माहिती मिळाल्यास सदर अधिकारी वरवरची कारवाई करून आरोपींना सोडून देतात. त्यांना न्यायालयात जामीनही होतो; परंतु भा.दं.वि. कलम ३२८ नुसार पोलिसांना कारवाई करण्याचे अधिकार आहेत. या कलमानुसार आरोपींना शासन होतेच, परंतु जामीनही लवकर होत नाही; म्हणून ही कारवाई महत्त्वाची समजली जाते.
४. राज्यकर्त्यांच्या पाठबळामुळेच कृत्रिम आणि भेसळयुक्त दुधाचा व्यापार चालूच !
    कृत्रिम आणि भेसळयुक्त दुधाची व्याप्ती मोठ्या प्रमाणात अन् गुंतागुंतीची आहे. मोठ्या पुढार्‍यांनी चालू केलेल्या या भ्रष्टाचाराची पाळेमुळे संपूर्ण महाराष्ट्रभर पसरली आहेत. या व्यवसायाचे कर्तेधर्ते महाराष्ट्र शासनातील आघाडीतील नेते मंडळींचेच बगलबच्चे असल्यामुळे याकडे महाराष्ट्र शासन जाणूनबुजून दुर्लक्ष करीत असल्याचे नवल वाटणे स्वाभाविक आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याशी खेळणार्‍या भेसळ आणि कृत्रिम दूधधंदेवाल्यांचा बीमोड करण्यासाठी सरकार पुढे काय करणार, हा मोठा गहन प्रश्न महाराष्ट्राच्या जनतेसमोर आहे.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : www.hindujagruti.org हिंदी : www.hindujagruti.org/hindi