मुंबई, २८ जानेवारी (वार्ता.) - पुस्तके हवी असतात; पण ती सहज मिळत नाहीत. ‘गाव तिथे ग्रंथालय’ ही चळवळ ग्रंथोत्सवांमुळे बळकट होईल. देव, धर्म, पाणी याची जशी मानवाला आवश्यकता असते, तशीच ग्रंथांचीही असते. आधुनिक जीवन पद्धतीमुळे जगणे सोपे नाही, असुरक्षितता आली. त्यामुळे आलेला ताणतणाव विविध प्रकारचे साहित्य वाचल्याने दूर होऊ शकतो.
वृत्तवाहिन्यांमुळे विचार मिळत नाहीत आणि वृत्तपत्रांतील विचार संकुचित होत आहेत. वाङ्मयीन साहित्याचे वाचन केल्यास आधुनिक जीवन पद्धतीमुळे वाढत चाललेला ताणतणाव दूर होऊ शकतो, असे प्रतिपादन चंद्रपूर येथे होणार्या ८५ व्या अ.भा. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. वसंत डहाके यांनी केले.
महाराष्ट्र शासनाचा मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, माहिती अन् जनसंपर्क महासंचालनालय, शासकीय विभागीय ग्रंथालय, जिल्हा माहिती कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने नागूपर येथील राजाराम दीक्षित वाचनालयात आयोजित केलेल्या ‘नागपूर ग्रंथोत्सव २०१२’च्या उद्घाटनप्रसंगी प्रा. डहाके बोलत होते.