'पुढे येणार्‍या भीषण आपत्काळात जिवंत रहाण्यासाठी व्यष्टी आणि समष्टी साधना वाढवा !' - डॉ. जयंत आठवले

श्री. अण्णा हजारे यांच्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनातलासलगाव येथे सहभागी होतांना शिकायला मिळालेली सूत्रे

श्री. नीलेश बोरा
१. प्रत्येक व्यक्तीमध्ये भ्रष्टाचाराविरुद्धचा राग, लढण्याची सिद्धता दिसून येणे आणि लोकांचा ‘हिंदु जनजागृती समिती’वरचा विश्वास दृढ असल्याचे अन् ‘हेच लोक काहीतरी करतील’, अशी भावना त्यांच्या मनात असल्याचे लक्षात येणे : ‘भ्रष्टाचाराच्या विरोधात केवळ भारतातच नव्हे, तर संपूर्ण जगात आंदोलनाद्वारे रान उठवणारे श्री. अण्णा हजारे यांच्या समर्थनार्थ लासलगाव येथेही ‘हिंदु जनजागृती समिती’कडून विविध प्रकारे कार्य केले गेले. अवघ्या देशात भ्रष्टाचाराविरुद्ध रान उठलेले असतांना ‘आपणही काहीतरी करावे’, अशी मनोमन इच्छा होती.
श्रावण कृ. तृतीया, कलियुग वर्ष ५११३ (१६.८.२०११) या दिवसापासून श्री. अण्णा हजारे उपोषणाला बसणार होते. तत्पूर्वी अनेकांनी येऊन ‘आपण काहीतरी करायला हवे’, असे सांगितले. वास्तविक लासलगावात अनेक पक्षांची राजकारणी मंडळी, सामाजिक कार्यकर्ते, श्रीमंत व्यक्ती असे बरेच जण असतांना लोकांचा ‘हिंदु जनजागृती समिती’वरचा विश्वास दृढ असल्याचे आणि ‘हेच लोक काहीतरी करतील’, अशी भावना लोकांच्या मनात असल्याचे लक्षात आले. तेव्हापासूनच लासलगावात निषेधफेर्‍या, उपोषणे, निवेदने देणे, लघुसंदेश पाठवणे इत्यादी उपक्रम वेगाने राबवले जात होते. प्रत्येक व्यक्तीमध्ये भ्रष्टाचाराविरुद्धचा राग, त्या विरोधात लढण्याची सिद्धता आणि बाहेर पडण्याचे बळ प्रथमच दिसून आले.
२. घराचा उंबरठा कधीही न ओलांडणार्‍या रणरागिणींनी चक्क आरक्षक स्थानकात जाऊन निवेदन आणि निषेधाच्या घोषणा देणे : लासलगाव हा तसा ग्रामीण भाग असल्याने येथील महिला शक्यतो घराबाहेर जात नाहीत; मात्र या वेळी प्रथमच शेकडो महिलांचा उद्वेग या आंदोलनाच्या माध्यमातून दिसून आला. या महिला म्हणजे साक्षात रणचंडीचा अवतारच असल्याची धारणा होत होती. दोन ठिकाणी महिलांनी उत्स्फूर्तपणे अण्णांच्या समर्थनार्थ फेर्‍या काढल्या. त्यांना लक्षणीय अशी उपस्थितीही लाभली. कधीही घराचा उंबरठा न ओलांडणार्‍या या रणरागिणी चक्क आरक्षक स्थानकात जाऊन निवेदन देणे आणि निषेधाच्या घोषणा देणे, इत्यादी करत होत्या.
३. साखळी उपोषणात श्रीमंत व्यक्तींपेक्षा सर्वसाधारण व्यक्तीच सहभागी होतांनाचे चित्र दिसणे : लासलगाव येथे पहिल्या दिवसापासून साखळी उपोषण चालू झाले. तेव्हा श्रीमंत व्यक्तींपेक्षा सर्वसाधारण व्यक्तीच या आंदोलनात सहभागी होतानाचे चित्र होते. बरेच व्यापारी, नोकरवर्ग या आंदोलनात सहभागी होण्यापासून दूर राहिला; मात्र सर्वसाधारण मध्यमवर्गीय कष्टकरी वर्ग हा प्रामुख्याने सहभागी होत होता. श्रीमंतांना पैशांमुळे भ्रष्टाचाराचे महत्त्व नसते; मात्र सर्वसाधारण व्यक्ती थोडेफार पैसे कमावते, त्यात अनेक कामांसाठी भ्रष्ट माणसांना पैसे वाटावे लागतात. त्यामुळेच येथील ट्रक चालक-मालक संघटनेद्वारे दोन दिवस उपोषण करण्यात आले.
४. समितीच्या कार्यकर्त्यांनी सर्वांना निषेधफेरीची अनुमती काढण्यापासून ते निवेदन देण्यापर्यंतचे साहाय्य करणे : बर्‍याच जणांना उपोषण करणे, निवेदन देणे, निषेधफेरी काढणे, यांसाठी काय करायचे असते, शासकीय अनुमती घ्यायची असते कि नाही, निवेदन कसे बनवावे, कोणाला द्यावे, हाही भाग ठाऊक नव्हता. त्यामुळे प्रत्येक वेळी समितीच्या कार्यकर्त्यांनी सर्वांना अनुमती काढण्यापासून ते निवेदन देण्यापर्यंतचे साहाय्य केले.
५. समितीच्या कार्यकर्त्यांनी लघुसंदेश, दूरभाषद्वारे, तसेच प्रत्यक्ष भेटी घेऊन लोकांना पहिल्या दिवशी निघणार्‍या निषेधफेरीची माहिती देऊन फेरीत सहभागी करवून घेणे : श्री. अण्णा हजारे आंदोलनाला बसणार होते, तेव्हा हा प्रश्न संपूर्ण गावाचा होता. तेव्हा काय करायचे, ते गावाने एकत्रित बसून ठरवायचे होते; मात्र यात काही मंडळींनी परस्पर नियोजन करून निषेधफेरी काढण्याचे ठरवले. तेव्हा गावकर्‍यांनाही याची कल्पना नव्हती. त्यामुळे पहिल्या दिवशी निघालेल्या निषेधफेरीला पाहिजे तशी उपस्थिती लाभली नाही, तरीही समितीच्या कार्यकर्त्यांनी लघुसंदेश, दूरभाषद्वारे, तसेच प्रत्यक्ष भेटी घेऊन लोकांना फेरीची माहिती देऊन सहभागी करवून घेतले.
६. निषेधफेरीत दोन महाविद्यालयांचे प्राध्यापक सहभागी होणे : पहिल्या निषेधफेरीत दोन महाविद्यालयांचे प्राध्यापक सहभागी झाले. त्यांनीही आपले विचार मांडून पाठिंबा दर्शवला. त्यांच्या बोलण्यातून त्यांच्यामध्ये भ्रष्टाचाराविषयीची चीड खरोखर निर्माण झालेली दिसून आली.
७. अण्णांच्या आंदोलनाविषयी राज्यकर्त्यांची उदासीनता !
७ अ. बरेच राज्यकर्ते मनापासून सहभागी न होणे आणि काही राजकारणी स्वतःहून आंदोलन अन् निषेधफेर्‍या यांपासून दूरच असणे : पहिल्या दिवशी संपूर्ण गाव मिळून निषेधफेरी निघाली. तेव्हा नेहमी पुढारीपण करणार्‍या एका राजकीय व्यक्तीला अगदी आग्रहाने आणि तीन-चारदा बोलावून सहभागी करून घेण्यात आले, जणू हा वैयक्तिक कार्यक्रम होता. बरेच राज्यकर्ते मनापासून सहभागी न होता आग्रह केल्याने झाले, तर काही राजकारणी स्वतःहून आंदोलन आणि निषेधफेर्‍या यांपासून दूरच राहिले. (याचा अर्थ ‘राजकारण्यांना भ्रष्टाचार हवा आहे आणि केवळ सर्वसामान्यांना तो नको आहे’, असा होतो. असे राजकारणी कधीतरी देशाचे आणि देशातील नागरिकांचे भले करू शकतील का ? हिंदूंनो, अशा राजकारण्यांना सत्ताच्यूत करण्यासाठी सिद्ध व्हा ! - संकलक)
८. निषेधफेरीनंतर स्वतःची मते मांडणारी मंडळी नंतर गुप्तहोणे : पहिल्या दिवशी बर्‍याच जणांनी निषेधफेरीनंतर झालेल्या सभेत आपली मते मांडली. त्यानंतर अनेक आंदोलने, साखळी उपोषणे झाली; मात्र ती बोलघेवडी मंडळी एकदम गुप्तच झाली. नंतर ती आंदोलन आणि उपोषण स्थळी फिरकलीच नाहीत.
९. प्रत्येक निषेधफेरीचे दायित्व समितीने घेणे : प्रतिदिन कोणी ना कोणीतरी निषेधफेरी काढतच होते. त्या वेळी समितीने प्रत्येक फेरीचे नियोजन करणे, योग्य प्रकारे फेरी काढणे, कोणत्या घोषणा द्याव्यात, हे सांगणे, निवेदनाची सूत्रे सांगणे इत्यादी स्वरूपाची कार्येही प्रभावीपणे केली.
१०. एका संप्रदायाने रात्रीच्या वेळी काढलेल्या मेणबत्ती फेरीत पुरेशी सिद्धता नसणे आणि निवेदनही बनवलेले नसणे : ज्या ज्या वेळी समितीचा सहभाग होता, त्या त्या वेळी आंदोलन सुव्यवस्थित झाले. एकदा एका संप्रदायाने रात्रीच्या वेळी मेणबत्तीफेरी काढण्याचे नियोजन केले; मात्र त्यांच्याकडे व्यवस्थापन हा भाग नव्हता. या आंदोलनाची पूर्वकल्पना समितीलाही नसल्याने या फेरीत पुष्कळ विस्कळीतपणा जाणवला. पुरेशी सिद्धता नसल्याने त्यांनी साधे निवेदनही बनवलेले नव्हते.
११. हिंदु जनजागृती समितीच्या वतीनेही एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात आले. त्या वेळी अनेकांनी समितीच्या कार्याचे कौतुक केले आणि समितीच्या नवीन कार्याची ओळखही समाजाला झाली.
१२. लघुसंदेशांमुळे क्रांती होत असल्याचे लोकांनी सांगणे : अण्णांच्या आंदोलनाच्या कालावधीत लघुसंदेश पाठवले जात होते. त्यामुळे जनजागृती होण्यासह आंदोलनातील सहभागींची संख्याही वाढत होती.
    श्री. अण्णा हजारे यांच्या आंदोलनासाठी ५ - ६ दिवस सातत्याने काही ना काही सेवाकार्य चालू होते. असे असतांनाही कुठल्याही स्वरूपाचा ताण निर्माण झाला नाही. ‘अण्णांचे आंदोलन म्हणजे समाज संघटित करण्याची एक प्रकारची लीलाच होती’, अशी सातत्याने जाणीव होत होती. त्यामुळे आपोआप या कार्यात मला स्फूर्ती मिळून ईश्वराने शिकण्याची संधी दिली. ‘एकटे अण्णा केवळ ईश्वराच्या पाठबळावर एवढे मोठे कार्य करू शकतात, तर आपणही त्याचे साहाय्य प्रत्येक क्षणी घ्यायला हवे’, याची जाणीव सातत्याने वाढली. ईश्वराने हे कार्य करवून घेतले. त्यामुळे त्याच्याप्रती कृतज्ञता व्यक्त  करतो.’
    - श्री. नीलेश बोरा, लासलगांव


धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : www.hindujagruti.org हिंदी : www.hindujagruti.org/hindi