'पुढे येणार्‍या भीषण आपत्काळात जिवंत रहाण्यासाठी व्यष्टी आणि समष्टी साधना वाढवा !' - डॉ. जयंत आठवले

अखंड सहजावस्थेत असणारे आणि साधकभावानेच वावरणारे सनातनचे संत !

डावीकडून पू. बाबा (सदानंद) नाईक, पू. अतुल दिघे, पू. अनुराधा वाडेकर, प.पू. डॉ. जयंत आठवले, पू. संदीप आळशी, पू. मुकुल गाडगीळ आणि पू. महादेव नकातेकाका
सनातनच्या सहा संतरत्नांनी प.पू. डॉक्टरांच्या उपस्थितीत एकमेकांशी साधलेला संवाद ! 
संत कसे दिसतात, कसे बोलतात, ते एकमेकांशी संभाषण कसे करतात, यांविषयी साधकांना, तसेच समाजालाही कुतूहल असते. सध्या समाजात वावरणारे संत सातत्याने इतरांना काहीतरी शिकवण्याच्या भूमिकेतच असतात आणि ते त्यांचा आहार, विहार, रहाणे अन् वेशभूषा या सर्वच विषयांत वेगळेपणा जपतात.
त्यामुळे संत म्हणजे भगवी वस्त्रे परिधान करणारे; प्रवचन, कीर्तन आदी करून समाजाला मार्गदर्शन करणारे, असेच चित्र सामान्यजनांच्या डोळ्यांसमोर येते. संत कसे बोलतात, वागतात, ते एकमेकांशी कसे संभाषण करतात, हे समजावे, यासाठी २१.१.२०१२ या दिवशी गोव्यातील रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात पू. बाबा (सदानंद) नाईक, पू. महादेव नकातेकाका, पू. (डॉ.) मुकुल गाडगीळ, पू. अनुराधा वाडेकर आणि पू. संदीप आळशी या सनातनच्या संतांनी अन् पू. अतुल दिघे या एस्.एस्.आर्.एफ्.च्या संतांनी एकमेकांशी केलेल्या संभाषणाचे चित्रीकरण करण्यात आले. हे संभाषण प.पू. डॉ. जयंत आठवले (प.पू. डॉक्टर) यांच्या उपस्थितीत झाले. त्या वेळी त्यांनाही संतांनी काही प्रश्न विचारले. समाजात जे संतांचे रूप दिसते, त्याला हे संत अपवाद आहेत. संतपद गाठले, तरी अहं अल्प असल्याने साधकांमध्ये सहजतेने वावरणारे किंबहुना स्वतः साधकभावातच रहाणारे सनातनच्या शिकवणीनुसार साधना करणारे हे संत म्हणजे विश्वातील एकमेवाद्वितीय उदाहरण आहे, याचीच प्रचीती या सोहळ्याच्या वेळी साधकांनी घेतली. या संभाषणाच्या आरंभाला प.पू. डॉक्टरांनी या संभाषणाचा उद्देश स्पष्ट केला. हा उद्देश, संतांचे संभाषण आणि या संभाषणाचे दोन साधिकांनी केलेले सूक्ष्म-परीक्षण येथे देत आहोत. 
लेखांक २ 
२ ए. अंतर्मनात केवळ आनंद वाटतो, तेच खरे अनुसंधान ! 
पू. गाडगीळकाका : नकातेकाका, अनुसंधान कसे साधायचे ? मी काही वेळा प्रयत्नपूर्वक प्रार्थना, कृतज्ञता करतो; पण प्रार्थना करायची कि नामजप करायचा, हे कळत नाही ! 
पू. नकातेकाका : शिवाच्या पिंडीवर कसे पाण्याचे थेंब सतत पडतात, तेच अनुसंधान आहे ! 
प.पू. डॉक्टर : अनुसंधान हे ध्येय आहे. आरंभी साधक नामजपाच्या माध्यमातून अनुसंधान साधण्याचा प्रयत्न करतो. मग मन इतरत्र भरकटते. काही काळाने नामजप अखंड होऊ लागतो. संत झाल्यावर मन नामातील शब्दांच्या पलीकडे जाते. शब्दांच्या पलीकडे जाऊन साधले जाते, ते खरे अनुसंधान ! अनुताइंना अनुसंधान साधणे सोपे आहे; कारण त्यांच्या नावातच ‘अनु’ आहे ! 
पू. अनुताई : सगळे मला म्हणतात, आता तू संत झालीस, तुझा नामजप, अनुसंधान चांगले होत असेल ना ? पण माझा नामजप होत नाही; मात्र श्वासावर लक्ष केंद्रित झालेले असते. श्वासाच्या माध्यमातून चैतन्य येते आणि जाते, असे वाटते. 
प.पू. डॉक्टर : तुमचा या जन्मात नामजपाचा टप्पा आला नाही; कारण तो गेल्या जन्मात पूर्ण झाला आहे. 
पू. गाडगीळकाका : मला येता-जाता आतमध्ये नामजप चालू आहे, असे वाटते; मात्र त्यावर लक्ष केंद्रित करून पहाण्याचा प्रयत्न केला की, काहीच कळत नाही.
प.पू. डॉक्टर : नामजप नाही; मात्र अंतर्मनात केवळ आनंद वाटतो, तेच खरे अनुसंधान ! 
२ ऐ. सत्त्व-रजप्रधान प्रकृतीप्रमाणे नामजपाची गती असणे
पू. अतुलदादा : गाडगीळकाका, तुमचा नामजप कोणत्या लयीत होतो ?
पू. गाडगीळकाका : पूर्वी कोणी प्रकट असल्यास उपाय करतांना जलद गतीने मारक तत्त्वाचा नामजप होत असे. आता मात्र एकाच लयीत होतो.
प.पू. डॉक्टर : आपल्या प्रकृतीनुसार नामजप होतो. सत्त्वप्रधान प्रकृती असणार्‍यांचा नामजप संथ लयीत होतो. रजप्रधान मारक तत्त्वाची आवश्यकता असतांना जलद होतो.
२ ओ. तीव्र आपत्काळात साधकांना निर्गुण उपायांचीच आवश्यकता असणे
पू. नकातेकाका : साधकांवर उपाय कसे करावेत ? मुद्रा करून सगुण उपाय करायचे कि निर्गुण ?
प.पू. डॉक्टर : पूर्वी मी उपाय करायचो, तेव्हा साधकांना त्रास देणारे मांत्रिक पहिल्या किंवा दुसर्‍या पाताळातील होते. आता त्रास देणारे मांत्रिक ६ व्या आणि ७ व्या पाताळातील आहेत. अशा वेळी सगुणातून उपाय नको. डोळे मिटून ध्यान लावून निर्गुणातून उपाय करावेत. तुम्हा सर्वांच्या दृष्टीने एक चांगली गोष्ट आहे, ती म्हणजे अध्यात्माविषयी तुम्हाला सांगणारे कोणीतरी आहे. मला मात्र अध्यात्मातील बहुतांश गोष्टी प्रयोगातूनच शोधाव्या लागल्या आहेत. सगळ्यात जास्त क्रियमाण वापरल्यामुळे मी आज इथे आहे.
पू. संदीपदादा : व्यष्टी त्रास होतो, तेव्हा नामजपातून उपाय होतात. आपले त्रास समष्टी स्तरावरील असल्यामुळे उपाय निर्गुणातूनच करावे लागतील.
२ औ. संतांच्या चैतन्याचा परिणाम
पू. नकातेकाका : काही वर्षांपूर्वी संस्थेतून बाहेर पडलेले साधक स्वतःहून माझ्याकडे येतात. ते मला विचारतात की, आम्ही आता काय करू ?
प.पू. डॉक्टर : दिवा असला की, पाखरे येतातच ना ! त्यातलाच हा प्रकार! हाच संतांच्या चैतन्याचा परिणाम आहे. आता स्थूलदेहाने काही करावे लागत नाही.
२ अं. कुटुंबियांपैकी कोणी संत झाल्यास त्यांच्याकडे ‘एक संत’ म्हणून पाहिल्यास इतरांची जलद प्रगती होऊ शकणे
पू. अतुलदादा : संदीपदादा, तुम्ही संत झाल्यापासून अवनीताईला (पू. संदीप आळशी यांच्या पत्नी) कसे वाटते ? पू. संदीपदादा : संत होण्यापूर्वी नवरा-बायको याच नात्याने पहाणे होत होते. आता ती ‘एक संत’ या भावाने माझ्याकडे पहाते. तिचा माझ्याप्रतीचा आदरही वाढला आहे. ईश्वरकृपेने तिला त्याचा लाभही होत आहे.
प.पू. डॉक्टर : आता सगळ्या नवर्‍यांनी पटापट संत व्हायला पाहिजे ना ? बायको संत झाल्यावर मात्र नवर्‍याला असे प्रयत्न करणे कठीण जाईल !
२ क. अहं अल्प असल्यामुळे औषधांच्या पाकिटांना येणारा सुगंध स्वतःमुळे येतो, याची जाणीव नसलेले पू. संदीप आळशी !
पू. संदीपदादा : मी औषधे घेतो, त्या पाकिटांना आता प.पू. डॉक्टरांच्या औषधांच्या पाकिटांप्रमाणेच सुगंध येऊ लागला आहे. माझा आध्यात्मिक त्रास शारीरिक त्रासांच्या माध्यमातूनच व्यक्त होईल, असे प.पू. डॉक्टरांनी पूर्वी सांगितले आहे. त्यामुळे मला वाटते की, माझा जो काही आध्यात्मिक त्रास आहे, तो या सुगंधामुळेच दूर होईल. प.पू. डॉक्टर : तुमच्यातील अहं अल्प असल्यामुळे तुम्हाला असे वाटते. प्रत्यक्षात मात्र शास्त्र असे आहे की, तुमच्यामुळे त्या वस्तूंना सुगंध येतो आहे. ती पाकिटे आता आध्यात्मिक त्रास असणार्‍या साधकांना उपायांना द्यायची. तुमच्याऐवजी साधकांना त्यांचा खरा लाभ होईल.
२ ख. समष्टी भाव असलेले आणि समष्टीशी एकरूप झालेले सनातनचे संत !
पू. गाडगीळकाका : आता आपण संत आहोत, तर समष्टीला त्याचा लाभ होण्यासाठी मुद्दाम प्रार्थना करायची का ?
प.पू. डॉक्टर : आरंभीला सगळे करायचे. ते प्रगतीसाठी आवश्यक आहे. तुम्ही ग्रंथांची सेवा करता, त्या ग्रंथांचा तुम्हाला काय उपयोग ? समष्टीसाठीच करतो ना ते ? काय करायचे, काय नाही, हे हळूहळू आपल्याला सुचत जाते.
पू. संदीपदादा : पूर्वी मी आधी व्यष्टीसाठी प्रार्थना करायचो आणि नंतर समष्टीसाठी प्रार्थना व्हायची. आता आधी समष्टीसाठी होते आणि मग व्यष्टीसाठी प्रार्थना होते.
पू. अतुलदादा : पूर्वी प्रसाद ग्रहण करतांना ‘मला लाभ होऊ दे’, अशी प्रार्थना व्हायची. आता मात्र ‘सर्वांना लाभ होऊ दे’, अशी प्रार्थना होते.
२ ग. संतांना आतूनच उत्तरे मिळत असल्यामुळे त्यांना उत्तरे कोणाला विचारण्याची आवश्यकता नसणे
पू. संदीपदादा : पूर्वी मला प्रार्थना करतांना श्रीकृष्णाचे चरण दिसायचे. गेल्या ५ - ६ दिवसांपासून काहीच दिसत नाही. त्यामुळे मला समाधान मिळायचे नाही. एक दिवस देवाने विचार दिला, ‘चरण सगुण आहेत. आता निर्गुणाकडे वाटचाल होत आहे.’
प.पू. डॉक्टर : हाच अनुसंधानाचा लाभ असतो. उत्तरे कोणाला विचारण्याची आवश्यकता नसते. उत्तरे आपोआप मिळतात. पुढे पुढे बुद्धी सात्त्विक होत जाते. तेव्हा जे सुचते, ते योग्यच असते. काही वेळा उपायांसाठी नामजप शोधतांना बराच वेळ ध्यान लावले, तरी उत्तरे मिळत नाहीत. अशा वेळी वाईट शक्तींनी आपले मन विश्वमनाशी एकरूप होण्यात अडथळे आणलेले असतात. प्रार्थना केल्यावर उत्तरे मिळण्यातील अडथळे दूर होतात.
२ घ. संत असूनही जिज्ञासेने प्रश्न विचारून शंकानिरसन करून घेणारे सनातनचे संत !
पू. गाडगीळकाका आणि पू. अतुलदादा : आता पुढील प्रगती कशी करायची ?
प.पू. डॉक्टर : जे करून तुम्ही संत झालात, तेच प्रयत्न चालू ठेवायचे.
पू. अनुताई : ७० - ८० टक्के पातळीला बुद्धीलय होतो, म्हणजे काय होते ?
प.पू. डॉक्टर : बुद्धीतून विचार न करता उत्तरे आपोआप सुचतात.
पू. अनुताई : संत झाल्यापासून माझा आध्यात्मिक त्रास अल्प झाला आहे; मात्र तो पूर्ण गेलेला नाही.
प.पू. डॉक्टर : प्रारब्ध असेपर्यंत त्रास असणारच आहे. ५ वर्षांत मांत्रिक हरल्यावर त्रास शून्य होईल.
पू. अतुलदादा : मांत्रिक हरतील, म्हणजे काय होईल ?
प.पू. डॉक्टर : त्रास देणारे मांत्रिक काळी शक्ती मिळवण्यासाठी पुन्हा पाताळात जातील.
पू. अनुताई : मला आध्यात्मिक त्रास आहे, तर कोणावर उपाय करावे लागल्यास काय करायचे ?
प.पू. डॉक्टर : उपाय करायचे; कारण आपण उपाय करतांना निर्गुणात गेलेलो असतो.
२ च. समष्टी कार्य करण्यासाठी व्यष्टी साधनेचा पाया पक्का असणे आवश्यक, असे प.पू. डॉक्टरांनी सांगणे
पू. अनुताई : विदेशातील साधक प्रतिकूल परिस्थितीत साधना करत असूनही त्यांची फलनिष्पत्ती ५० टक्के आहे. भारतातील साधकांची फलनिष्पत्ती मात्र १० टक्केच आहे. भारतातील साधकांची फलनिष्पत्ती वाढण्यासाठी काय करायला हवे ?
प.पू. डॉक्टर : ‘पिकते तिथे विकत नाही’, असा येथील प्रकार आहे. भारतातल्या लोकांना धर्म, साधना यांची किंमतच नाही. येथे केवळ श्रवणभक्ती आहे. ‘साधना करा’, असे आपल्याकडच्या प्रवचनांतून इतरांना सांगितले जाते. विदेशातील साधक ते कृतीत आणतात. इतके दिवस आपण कार्याचा आढावा घेतला. आता साधनेचाच आढावा घेऊया. साधनेचा आढावा घेतला की, प्रगती होणार आणि सेवाही चांगली होणार. समष्टी कार्य करण्यासाठी व्यष्टी साधनेचा पाया पक्का हवा ! समष्टी साधना करत असतांना व्यष्टी साधनेला जास्त महत्त्व दिले पाहिजे. कार्य किती होते, यापेक्षा नामजप, स्वभावदोष निर्मूलन, भावजागृती या सूत्रांचा आढावा घ्यावा. आपली साधना अशी हवी की, पुन्हा पृथ्वीवर जन्म घ्यायला नको. भावाच्या स्तरावर साधना हवी ! संत झाले, तरी अभ्यासू वृत्ती असणारे संत, हेच ज्ञानाचे खरे अधिकारी ! या वेळी सर्व संत कागद आणि लेखणी घेऊन आले होते. त्यांच्या ठायी असणारी शिकण्याची आणि अभ्यासू वृत्ती यांमुळेच ते संत झाले असल्याचे प.पू. डॉक्टरांनी या वेळी सांगितले.
३. प.पू. डॉक्टर आणि सनातनचे संत यांच्यामध्ये झालेल्या संभाषणाचे सूक्ष्म-परीक्षण
३ अ. कु. प्रियांका लोटलीकर, सनातन संस्था.
‘धन्य तोचि दिन झाले संतांचे दर्शन ।’ असा संतांचा सोहळा सनातनच्या रामनाथी आश्रमात पौष कृ. १३, कलियुग वर्ष ५११३ (२१.१.२०१२) या दिवशी पार पडला. या दिवशी सनातनचे संत आणि प.पू. डॉक्टर यांच्या आध्यात्मिक वाणीतून सर्वत्र मधुर रस पाझरला. या सोहळ्याचे सूक्ष्म-परीक्षण करत असतांना मला ‘मी आनंदाच्या डोहात डुंबत आहे आणि परीक्षणापेक्षा आनंदच अनुभवत रहावा’, असे वाटत होते; परंतु मला अनुभवता आलेला आनंद सर्वांना अनुभवता यावा, यासाठी सूक्ष्म-परीक्षण करून ते पुढे देत आहे.
३ अ १. संतांचा एकमेकांशी झालेला प्रश्नोत्तराच्या स्तरावरील संवाद हा ‘साधकांची प्रज्ञा जागृत करणारा ज्ञानाचा प्रकाश’ असल्याचे जाणवणे
संत ज्या वेळी एकमेकांना प्रश्न विचारत होते, त्या वेळी ईश्वरी ज्ञानाचा ओघ ईश्वराकडून संतांकडे येत असून त्यांच्या मुखातून वातावरणात चैतन्याच्या प्रवाहांचे प्रक्षेपण होत असल्याचे जाणवले. ही प्रक्रिया पहातांना ‘देवच संतांच्या माध्यमातून प्रश्न विचारत आहे आणि देवच त्यांच्या माध्यमातून उत्तर देत आहे’, असे जाणवले आणि देवाचा हा खेळ केवळ आपल्यासाठीच चालू असल्याचे जाणवले. त्यामुळे संतांचा एकमेकांशी झालेला प्रश्नोत्तराच्या स्तरावरील संवाद हा ‘प्रज्ञा जागृत करणारा ज्ञानाचा प्रकाश’ असल्याचे जाणवले.
३ अ २. संतांच्या वाणीतून प्रक्षेपित होणार्‍या प्रत्येक चैतन्यस्वरूप शब्दाने अंतर्मनापर्यंत पोहोचून स्थूल आणि सूक्ष्म देहावरील मालिन्य दूर करणे
सोहळ्यासाठी उपस्थित असलेल्या संतांच्या वाणीतून बाहेर पडणार्‍या प्रत्येक शब्दाचा स्पर्श मनाला आनंद देणारा होता. त्यांचा प्रत्येक शब्द साधकांच्या अंतर्मनापर्यंत पोहोचून स्थूल आणि सूक्ष्मदेहांवरील सर्व मालिन्य दूर करत असल्याचे जाणवले.
३ अ ३. संतांची प्रकृती आणि साधनामार्ग यांनुसार त्यांच्यात वेगळेपणा असूनही ते आतून एकरूप असल्याचे जाणवणे
संतांची प्रकृती, तसेच साधनामार्ग यांनुसार त्यांच्यामध्ये वेगळेपणा दिसत असला, तरी आंतरिकदृष्ट्या ते एकरूप असून द्वैताकडून अद्वैताकडे वाटचाल करत असल्याचे जाणवले. त्यामुळे प्रकृती वेगवेगळी असूनही त्यांची आध्यात्मिक पातळी समान आहे. जसे विविध स्थानकांतून सुटणार्‍या आगगाड्या अंततः एकाच स्थानकात पोहोचतात, त्याप्रमाणे संतांपैकी कोणी ज्ञानयोगी, कोणी कर्मयोगी, तर कोणी भक्तीयोगी असले, तरी ते अंततः ईश्वरापर्यंत पोहोचणार असल्याचे जाणवले.
३ अ ४. ‘ईश्वराशी अनुसंधान’ या विषयावरील संभाषणाच्या वेळी संतांच्या मुखातून बाहेर पडणार्‍या प्रत्येक शब्दातून आनंदाच्या लाटा साधिकेकडे येत असल्याचे जाणवणे सोहळ्यामध्ये संत ‘ईश्वराशी अनुसंधान’ या विषयावर बोलत असतांना त्यांचे ईश्वराशी सातत्याने अनुसंधान असल्याचे दिसले. प्रत्येकाचे त्यांच्या प्रकृतीनुसार ईश्वराशी अनुसंधान होत असल्याचे दिसले. या विषयावर संभाषण चालू असतांना ‘संतांच्या मुखांतून बाहेर पडणार्‍या प्रत्येक शब्दातून आनंदाच्या लाटा माझ्याकडे येत आहेत’, असे मला जाणवले.
३ अ ५. संतांची प्रकृती आणि साधनामार्ग वेगवेगळे असले, तरीही त्यांच्यात विविध पैलू असल्याचे जाणवणे
संतांच्या प्रकृती वेगवेगळ्या असल्या, तरी त्या सर्व प.पू. डॉक्टरांतून निर्माण झाल्या असून त्यांच्यात विविध पैलू असल्याचे जाणवले. प्रत्येक संतांच्या साधनामार्गानुसार त्यांच्यामध्ये विविधता असली, तरीही त्यांच्यात प.पू. डॉक्टरांच्या शिकवणीतून निर्माण झालेले विविध पैलू असल्याचे जाणवले.
३ अ ६. पारदर्शक निर्मळ मन संभाषणाच्या वेळी ज्या प्रकारे संत एकमेकांशी संभाषण साधत होते, त्यातून मला त्यांचे पारदर्शक निर्मळ मनच दिसत होते.
३ अ ७. संतांच्या मुखातून बाहेर पडणार्‍या प्रत्येक शब्दातून परमानंदाची स्पंदने दूरवर पसरून वायूमंडलातील काळ्या आवरणाचा थर दूर झाल्याचे जाणवणे
या सोहळ्याच्या वेळी त्यांच्या मुखातून बाहेर पडणार्‍या प्रत्येक अमृतमय शब्दातून परमानंदाची स्पंदने वातावरणात दूरवर पसरत होती, तसेच वायूमंडलातील काळ्या शक्तीचा दाट थर दूर झाल्याचे जाणवले. प.पू. डॉक्टरांनी संत सोहळ्याच्या वेळी संतांच्या माध्यमातून साधकांना अमूल्य मार्गदर्शन केले, त्यासाठी मी त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करते.’ (पौष कृ. १३, कलियुग वर्ष ५११३ (२१.१.२०१२))
३ आ. सौ. योया एस्.एस्.आर्.एफ .
पौष कृ. १३, कलियुग वर्ष ५११३ (२१.१.२०१२) या दिवशी सनातनच्या रामनाथी आश्रमात प.पू. डॉक्टर यांच्या उपस्थितीत सनातनचे सहा संत पू. बाबा (सदानंद) नाईक, पू. नकातेकाका, पू. गाडगीळकाका, पू. अतुल दिघे, पू. संदीपदादा आणि पू. अनुताई यांचा अपूर्व संतमेळावा झाला. या सोहळ्याचे एस्.एस्.आर्.एफ. च्या साधिका सौ. योया यांनी केलेले सूक्ष्म-परीक्षण येथे देत आहोत.
३ आ १. संतांची गुणवैशिष्ट्ये
अ. ‘प्रत्येकाची प्रकृती आणि गुणवैशिष्ट्ये भिन्न असून प्रत्येकामध्ये वेगवेगळ्या प्रकारचा भाव आहे.
आ. त्यांचा आध्यात्मिक स्तर चांगला असूनही, म्हणजेच ते संतपदाला पोहोचले असूनही ते सतत शिकण्याच्या स्थितीत असतात आणि शिकायला मिळालेली सूत्रे ते स्वतः कृतीत आणतात.
इ. ते आणि प.पू. डॉक्टर यांच्यामध्ये अद्वैत आहे.
३ आ २. संतांच्या बसण्याची रचना पाहून ‘सहा संत म्हणजे ईश्वरप्राप्तीचे विविध मार्ग असून अंतिमतः ते सर्व प.पू. डॉक्टरांशी एकरूप झाले आहेत’, असे वाटणे
हे सहा संत एकमेकांच्या शेजारी अर्धवर्तुळाकार बसले होते आणि प.पू. डॉक्टर त्यांच्या समोर बसले होते. त्यांच्या बसण्याची रचना पाहून ‘सहा संत म्हणजे, ईश्वरप्राप्तीचे विविध मार्ग असून अंतिमतः ते सर्व प.पू. डॉक्टरांशी एकरूप झाले आहेत’, असे वाटले. काही व्यष्टी साधना करून, तर काही समष्टी साधना करून संतपदाला पोहोचले आहेत. साधना करतांना ते एकमेकांचे गुण आत्मसात करण्याचा प्रयत्न करतात आणि सतत ईश्वराच्या, म्हणजे प.पू. डॉक्टरांच्या अनुसंधानात असतात.
३ आ ३. आपण ईश्वरी राज्यात आहोत, अशी अनुभूती येणे ईश्वरी राज्यात आध्यात्मिक विद्यालये असणार आहेत, तसेच सर्वत्र ईश्वराचेच अस्तित्व आणि अनेक संत असणार आहेत. संपूर्ण वातावरणात चैतन्य आणि सात्त्विकता असेल. हेच दृश्य आज चित्रीकरण कक्षात मला पहायला मिळाले. जेव्हा प.पू. डॉक्टर आणि सनातनचे सहा संत एकमेकांशी बोलत होते, तेव्हा ‘मी ईश्वरी राज्यात आहे’, असे मला वाटत होते. त्यांच्या बोलण्यात केवळ प्रेमभाव आणि शिकण्याची वृत्ती होती, कोठेही भावनाशीलता किंवा अहंभाव नव्हता.
३ आ ४. या अपूर्व संतमेळाव्याची जाणवलेली सूक्ष्मातील स्पंदने
अ. प.पू. डॉक्टरांच्या देहाभोवती असलेले निर्गुण चैतन्य आणि परमानंद वातावरणात प्रक्षेपित होत होते.
आ. तपलोकातून येणारी स्पंदने सर्व संतांच्या देहाभोवती तरंगत होती.
इ. सर्व संत पृथ्वीवर असल्यामुळे त्यांचा पूर्णपणे बुद्धीलय झालेला नाही आणि ईश्वराशी पूर्णपणे एकरूप झाल्यावरच त्यांचा बुद्धीलय होणार आहे.
ई. सर्व संतांकडून विविध प्रकारची स्पंदने वातावरणात प्रक्षेपित होत होती आणि ती स्पंदने ईश्वराशी एकरूप होत होती.
उ. ते सतत आनंदावस्थेत असतात, तसेच ईश्वराशी अखंड अनुसंधानात असतात; परंतु त्यांना कोणत्याही देवतेचे किंवा प.पू. डॉक्टरांचे रूप किंवा चरण दिसत नाही. निर्गुण रूपातील ईश्वराशी त्यांचे अनुसंधान असते. (पू. संदीपदादा त्यांच्या स्थितीविषयीची अनुभूती सांगतांना म्हणाले, ‘‘मला आता प्रार्थना करतांना श्रीकृष्णाचे चरण दिसत नाहीत. याचे उत्तर मला आतून मिळाले की, आता आपल्याला ईश्वराचे केवळ अस्तित्व जाणवते. याचा अर्थ तेथे ईश्वराचे निर्गुण चरण असतातच.’’ सौ. योया यांना सूक्ष्मातून जाणवलेला भाग आणि हे सूत्र अगदी जुळून येते. यावरून सौ. योया यांची सूक्ष्मातील कळण्याची क्षमता लक्षात येते. तसेच अध्यात्म म्हणजे केवळ ग्रंथांच्या वाचनातून तात्त्विक भाग समजून घेणे नसून ते कृतीचे, अनुभवण्याचे शास्त्र आहे, हेही लक्षात येते.’ - कु. भाविनी कपाडिया, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.)
ऊ. ते ईश्वरेच्छेने वागत असल्यामुळे त्यांना ईश्वराकडून आपोआप, म्हणजे ईश्वराला काही न विचारता आतून मार्गदर्शन मिळत असते. प.पू. डॉक्टर आणि सनातनचे सहा संत एकमेकांशी बोलत असतांना ते २ घंटे मला पुष्कळ शांत वाटत होते. त्या वेळी सूक्ष्म-परीक्षण करण्यासाठी उपस्थित रहाण्याची संधी मिळाल्यामुळे मी ईश्वरचरणी कृतज्ञ आहे.’ (पौष कृ. १३, कलियुग वर्ष ५११३ (२१.१.२०१२)) 

प.पू. डॉक्टरांनी दिली त्यांच्या ईश्वरत्वाची स्वीकृती !
१. प.पू. डॉक्टरांनी एका वाक्याद्वारे ‘सर्वांच्या मुखातून बोलणारा, सोहळा पार पाडणारा मीच आहे’, हे ध्वनित करणे : सोहळा संपल्यावर साधिका कु. मधुरा भोसले म्हणाल्या, ‘‘सर्वांनी प्रश्न चांगले विचारले.’’ ते इतरांना सांगतांना प.पू. डॉक्टर म्हणाले, ‘‘ती म्हणाली, मी प्रश्न चांगले विचारले.’’ नंतर ते ‘गंमत केली’, असे म्हणायला विसरले नाहीत; मात्र नकळतपणे ‘सर्वांच्या मुखातून बोलणारा, सोहळा पार पाडणारा मीच आहे’, हेच त्यांनी एक प्रकारे ध्वनित केले.
२. प.पू. डॉक्टरांनी स्वतः दिलेल्या उत्तराविषयी ‘एखाद्याच्या मनातील प्रश्नांची उत्तरे देव आपोआप देतो’, असे सांगणे
पू. अनुताई : खिस्ताब्द २००८ मध्येच माझा नामजपाचा टप्पा पूर्ण झाला, असे दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये आले होते.
प.पू. डॉक्टर : वर्तमानपत्रातून उत्तर दिले का मी ? पहा, कोणाच्या मनात काही प्रश्न असेल, तर देव आपोआप उत्तरे देतो.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : www.hindujagruti.org हिंदी : www.hindujagruti.org/hindi