मुंबईतील प्रसिद्ध दैनिक ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या कार्यालयावर काल शिवसेनेचे खासदार आनंदराव अडसूळ यांच्या समर्थकांनी आक्रमण केले. ‘अडसूळ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे’, अशा आशयाचे वृत्त मटाने प्रसिद्ध केल्याने अडसूळ यांच्या समर्थकांनी हे आक्रमण केले, असे प्रथमदर्शनी दिसते. या आक्रमणानंतर ‘कायदा हातात घेणे कसे चुकीचे आहे’, इथपासून ‘हे पत्रकारितेवरील आक्रमण आहे, या घटनेचा निषेध केला पाहिजे, याला उत्तरदायी असणार्यांवर कडक कारवाई करण्यात येईल’, येथपर्यंतच्या प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहेत.
या प्रतिक्रिया पाहिल्यावर या आक्रमणामागील कारण शोधण्याचा कोणीही प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला नाही. ‘लोकशाहीमध्ये स्वतःचे मत मांडण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. वृत्ताविषयीची बाजू लोकशाहीमार्गाने मांडता येऊ शकते. कार्यालयात घुसून तोडफोड करणे अत्यंत अशोभनीय आहे’, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली. चव्हाण यांचे म्हणणे अत्यंत योग्य आहे. मुळात घडलेल्या घटनेची संपूर्ण माहिती घेतल्यास अडसूळ समर्थक कार्यालयावर आक्रमण करण्यास गेलेच नव्हते. प्रसिद्ध झालेल्या वृत्ताविषयीचा निषेध नोंदवण्यासाठी सनदशीर मार्गाने निवेदन घेऊन ते कार्यालयावर गेले होते. जातांना त्यांच्या हातात निषेधाचे फलक आणि काळे झेंडे होते. कार्यालयाबाहेरील सुरक्षारक्षकांनी निदर्शकांना धक्काबुक्की केल्यामुळे ते संतप्त झाले आणि त्यांनी कार्यालयाच्या स्वागतकक्षाची तोडफोड केली. निदर्शकांकडील निवेदन स्वीकारण्यास मटाचे संपादक आले असते, तर पुढील घटना टळू शकली असती. याचाच अर्थ सनदशीर मार्गाने निषेध नोंदवणार्यांच्या भावना समजून न घेता उलट त्यांना विरोध केला, तर त्याचा परिणाम काय होऊ शकतो, हे यातून लक्षात येते.
समस्या कायदा हातात घेऊनच सोडवायच्या का ?
मुळात ही घटना घडण्याच्या कारणाकडे अधिक गांभीर्याने पहाण्याची आवश्यकता आहे. सध्या महाराष्ट्रात महानगरपालिका आणि जिल्हा परिषदा यांच्या निवडणुका होणार आहेत. त्या संदर्भात गटा-तटांच्या राजकारणापासून ते पक्ष फोडाफोडीपर्यंतच्या घटना घडत आहेत. या फोडाफोडीतूनच मोठ्या पक्षाचा एक खासदार फुटणार असल्याचे विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड यांनी केले आणि त्यावर तर्कवितर्कांना उधाण आले. यातूनच मटाने अडसूळ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याच्या चर्चेचे वृत्त दिले. पत्रकारितेच्या प्राथमिक नियमांचे उल्लंघन करत हे वृत्त देण्यात आले. या संदर्भात अडसूळ यांची प्रतिक्रिया घेण्यात आली नाही, अशी टीका स्वतः अडसूळ यांनीही केली. आता अडसूळ मटाच्या विरोधात १०० कोटी रुपयांचा अब्रूहानीचा दावा ठोकणार आहेत. तसेच ते प्रेस काऊन्सीलकडेही तक्रार करणार आहेत. मटाचे संपादक अशोक पानवलकर यांनी अडसूळ यांच्याकडे खातरजमा करून घेतली नाही, ही चूक मान्य केली आहे. पानवलकर यांनी प्रामाणिकपणे चूक मान्य केली, हे योग्य झाले. नाहीतर स्वतःला अधिक समजते, या आविर्भावात वागणारे सध्याचे पत्रकार आणि संपादक ‘आपण कधीच चुकत नाही’, असे म्हणतात. या घटनेला अन्य वर्तमानपत्रांनी आणि वृत्तवाहिन्यांनी शिवसेनाद्वेष न दाखवता पाहिले हेही योग्य झाले. या घटनेवरून पत्रकारांना त्यांची चूक लक्षात आली आहे, हे लक्षात येत आहे. याचाच अर्थ सनदशीर मार्गाने जे होत नाही, ते कायदा हातात घेतल्यावर होते, असेच म्हणायचे का, असा प्रश्न निर्माण होतो.
हिंदूंच्याही भावनांची दखल घ्या !
अभिव्यक्ती स्वातंत्र्य, पत्रकारितेचे स्वातंत्र्य या नावाखाली आज वर्तमानपत्रांतून आणि वृत्तवाहिन्यांवरून हिंदूंच्या देवता, परंपरा, संस्कृती आणि संघटना यांची अपकीर्ती करणारी वृत्ते प्रसिद्ध केली जातात. हिंदू सहिष्णु असल्याने याच्या विरोधात सनदशीर मार्गाने एखादी प्रतिक्रिया उमटते. त्यामुळे वर्तमानपत्रे आणि वृत्तवाहिन्या त्याची दखल घेत नाहीत. भविष्यात असा प्रकार चालू राहिला, तर सहिष्णु हिंदूंच्या सहनशीलतेचा अंत होऊन त्यांचा उद्रेक होऊ शकतो आणि मग हिंदूंच्या भावनांची दखल घेतली जाऊ शकते. असे होऊ नये, यासाठी प्रसारमाध्यमांनी मटाच्या घटनेवरून शहाणे होण्याची आवश्यकता आहे.
