९२ वे अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलन नुकतेच सांगली येथे पार पडले. मागील दोन महिन्यांपासून या संमेलनाविषयी मोठा गाजावाजा होत होता. तथापी दोन दिवस चाललेल्या या नाट्यसंमेलनाला मिळालेला अल्प प्रतिसाद पहाता नाट्यसंमेलन हे प्रतिवर्र्षीचे केवळ एक कर्मकांड ठरले आहे. साहित्य संमेलन आणि नाट्यसंमेलन भरवण्यामागील उदात्त हेतूला स्मरण्याचे काम प्रत्येकाने प्रथम करायला हवे.
या संमेलनासाठी येणारा प्रेक्षकवर्ग हा आपल्या संस्कृतीला मध्यवर्ती ठेवून काहीतरी उपयुक्त, नाविन्यपूर्ण, अभिमानास्पद, ऐकायला मिळेल, या उद्देशाने आलेला असतो. त्यांना उत्तम वक्त्यांकडून चार गोड शब्द कानांवर पडावेत, असे वाटत असते. वक्त्याच्या वाणीतून व्यक्त होणारी सरस्वतीदेवीची कृपा त्यांना अनुभवायची असते. त्यांना अघोरी वक्तृत्व नको असते, त्यांना संस्कृतीचे विरोधक नको असतात, त्यांना धर्माचे टीकाकार नको असतात. प्रेक्षकवर्गाच्या या मानसिकतेची ज्यांना जाणीव नाही, त्यांनी अशी संमेलने आयोजित केली किंवा अशा संमेलनाच्या व्यासपिठावर जागा व्यापण्याचा प्रयत्न केला, तरी त्यांना प्रेक्षकवर्गाचे प्रेम आणि शुभेच्छा मिळणे शक्य होत नाही. या नाट्यसंमेलनाच्या चिन्हापासूनच अपशकून चालू झाला होता. हिंदूंच्या भावना दुखावणारे चिन्ह सिद्ध केल्यामुळे धर्माभिमान्यांनी आवाज उठवला आणि आयोजकांना ते चिन्ह पालटावे लागले. हिंदूंच्या भावनांशी आणि संस्कृतीशी निगडित संमेलनाचे चिन्ह कसे असावे, याविषयी सारासार विचार करण्याची कुवत नसलेल्यांकडे अशी संमेलने भरवण्याची योग्यता नाही. संमेलने म्हणजे करमणूक आणि दूरचित्रवाणीच्या कॅमेर्यासमोर चमकणे, अशी जर आयोजकांची समजूत असेल, तर त्यांना आयोजनाच्या दायित्वापासून वेळीच दूर करायला हवे.
संस्कृतीद्वेष्ट्यांसाठी दोन शब्द !
घाशिराम कोतवाल हे नाटक त्यातील वैगुण्यांमुळे सादर करण्यास धर्माभिमान्यांकडून विरोध दर्शवण्यात आल्यावर अभिनेता अमोल पालेकर यांनी संताप व्यक्त केला. संमेलनाचे दोन दिवस त्यांनी धर्माभिमान्यांना लक्ष्य करून त्यांच्यावर टीकेची झोड उठवली. ‘हिंदु संस्कृतीद्वेषी राजकीय लोकांच्या भाषणावर तुम्ही कोणताच ‘सेन्सॉर’ लावत नाही, त्यांनी प्रक्षोभक विधाने केल्यास त्यांना नंतर अटक केली जाते. नाटकांना मात्र ‘सेन्सॉर’ लावले जाते, असे का ? स्वतःला संस्कृतीरक्षकवाले म्हणवणार्यांच्या, जर भावना दुखावत असतील, तर त्यांनी घरी बसून शोक व्यक्त करावा. घरी बसून तुमच्या भावना जपणारे नाटक करा’, अशी गरळओक त्यांनी सलग दोन दिवस केली. राष्ट्रपुरुषांविषयी कळकळ आहे, तेच समाजात काही अयोग्य चालले असल्यास त्यावर बोट ठेवतात. पालेकरांसारख्या संस्कृतीद्रोही आणि धर्मद्रोही व्यक्तीला आयोजकांनी जाणीवपूर्वक हिंदूंच्या धर्मभावना दुखावण्यासाठीच बोलावले होते का ? गल्लाभरू आणि धर्मद्वेष्टी विचारसरणी असणार्या पालेकर यांना बोलावून आयोजकांना नेमके काय साध्य करायचे होते ? राजकारणामध्ये हिंदु संस्कृतीद्वेषी लोक आहेत, ते हिंदूंच्या संस्कृतीवर आघात करणारी भाषणे करतात, येथपर्यंत पालेकर यांना माहिती आहे. १२० कोटी जनतेमध्ये असे कोट्यवधी लोक असतील, ज्यांना पालेकर यांच्याप्रमाणे हिंदु संस्कृतीवर होणारे आघात माहीत आहेत. आपल्या कृतीच्या समर्थनार्थ इतरांकडे बोट दाखवण्यात काही तथ्य नाही. त्यासाठी प्रत्यक्ष कृतीच्या स्तरावर उतरून समदुःखी लोकांना एकत्र आणण्यासाठी पुढाकार घेतला असता, तर पालेकरांना ते शोभून दिसले असते. त्यांच्या प्रसिद्धीत आणखीनच भर पडली असती. संस्कृती ही जोपासण्यासाठी असते, तिचे रक्षण करण्याचे दायित्व प्रत्येक हिंदूचे आहे. पालेकर यांनी उदाहरण दिल्याप्रमाणे देशात हिंदु संस्कृतीवर टीका करणारे राजकारणी आहेत; ते तसे करतात कारण त्यांना थोपवायला संस्कृतीचे अभिमानी शासन आपल्याकडे नाही. आहे ते हिंदुद्वेष्टे आणि पाश्चात्त्यांचे लाळघोटे शासन. चीन, जपान, श्रीलंका या देशांत स्वतःच्या संस्कृतीची काळजी घेणारे शासन आहे. जागतिक कीर्तीचा पॉप गायक मायकेल जॅक्सन याला त्यांनी देशात प्रवेश नाकारला. ‘जॅक्सनचे कार्यक्रम म्हणजे आमच्या संस्कृतीवरील आघात’, असे त्यांनी सांगूनच टाकले. ही विचारसरणी आम्हाला कोणत्याच राजकीय पक्षाकडून मिळणार नाही. त्यासाठी प्रत्येक हिंदूने कंबर कसायला हवी. कोणी संस्कृतीच्या भल्यासाठी काही करत असतील, तर त्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे. संस्कृतीच्या रक्षकांनी भावना दुखावत असतील, तर घरी बसावे, हे बोलणे जेवढे सोपे आहे, तेवढे ते सहन करणे सोपे नाही, हे प्रत्येकानेच लक्षात घ्यायला हवे.
